esakal | ‘आहारावर नियंत्रण महत्त्वाचं’ (आदित्य नारायण)
sakal

बोलून बातमी शोधा

aditya narayan

‘आहारावर नियंत्रण महत्त्वाचं’ (आदित्य नारायण)

sakal_logo
By
आदित्य नारायण

मी दररोज माझ्या दिवसाची सुरवात जिममध्ये जाऊनच करतो. त्यासाठी कधीच सुटी घेत नाही. अर्थात, कधीकधी मी १८-२० तास चित्रीकरण करत असतो. त्यामुळं खूप थकतो. अशा वेळी आरामाची गरज असते. त्यामुळं मी आरामही करतो. कारण, आराम न केल्यास त्याचा परिणाम इतर गोष्टींवरही होत असतो. फिटनेसबरोबरच वेलनेस सांभाळणं तितकंच गरजेचं आहे.

फिटनेस हा माझ्या दिनचर्येचाच एक भाग आहे. मी दररोज माझ्या दिवसाची सुरवात जिममध्ये जाऊनच करतो. त्यासाठी कधीच सुटी घेत नाही. अर्थात, कधी-कधी असं होतं, की मी १८-२० तास चित्रीकरण करत असतो. त्यामुळं खूप थकतो. अशा वेळी आरामाची गरज असते. त्यामुळं मी आरामही करतो. कारण, आराम न केल्यास त्याचा परिणाम इतर गोष्टींवरही होत असतो. फिटनेसबरोबरच वेलनेस सांभाळणं तितकंच गरजेचं आहे. माझ्या आठवडाभराच्या व्यायामात चार दिवस वेट्‌स आणि तीन दिवस कार्डिओ असे आलटून-पालटून असते.

‘सिक्रेट हेल्दी मिल्स’ या जेवण पुरवणाऱ्या संस्थेकडून मी जेवण घेतो. तेही काळजी घेतात, की मी दररोज पाच वेळा खाईन. माझ्या जेवणात प्रोटिन, कार्ब्स आणि फॅट्‌स यांचं मिश्रण असतं. जसजसा दिवस चढत जातो, तसं आहारातलं कार्ब्जचं प्रमाण कमी आणि प्रोटिनचं प्रमाण वाढत जातं. विशेष म्हणजे मी खाण्याच्या वेळी कधीच चुकवत नाही. कारण, वेळेवर खाल्लं गेलं नाही, तर त्याचे परिणाम काही वेळातच दिसून येतात. त्याचबरोबर जास्तीत जास्त पौष्टिक अन्नपदार्थ आणि फळांचा रस आपल्या शरीरात कसा जाईल, यासाठी मी नेहमीच प्रयत्न करतो. याबरोबरच दिवसातून तीन ते चार लिटर पाणी पितो. त्यामुळे शरीराला चांगलीच एनर्जी मिळते. तसंच, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्यूसचंही मी सेवन करतो. विशेष म्हणजे बाहेरचे पदार्थ खाणं टाळतो.

व्यायामामध्ये बदल करण्याची सवय
खरं तर मी दररोजच न चुकता वर्कआऊट करत असतो. मात्र, तोच-तोच प्रकार कंटाळवाणा वाटतो. त्यामुळं मी व्यायामामध्ये बदल करत असतो. आठवड्यातून एक दिवस चेस्ट/ बायसेप्स, दुसऱ्या दिवशी ४५-५० मिनिटं धावणं, तिसऱ्या दिवशी पाय, चौथ्या दिवशी खांदे/ ट्रायसेप्स, पाचव्या दिवशी क्रॉस ट्रेनर, सहाव्या दिवशी पाठ, तर आठवड्यातून किमान एकदा जॉगिंग किंवा सायकलिंग करतो. तसंच, माझ्या कुत्र्यासोबत लांबवर चालायलाही जातो. त्यामुळं शरीराला नवचैतन्य मिळतं. वर्कआऊटमुळं संपूर्ण दिवस आनंदात जातो. थकवा येत नाही. त्याचे अनेक फायदे होत असतात.

महिन्यातून दोनदा ‘चीट डे’
मला गोड पदार्थ खाण्याची जास्त आवड आहे. गोड खाण्याची मला अनावर इच्छा होते. यासाठी माझ्या प्रशिक्षकानं मला एक सोपा उपाय सांगितला आहे. मी ‘चीट मिल्स’ घेत नाही, मात्र, महिन्यातून दोनदा मी ‘चीट डे’ पाळतो. म्हणजे १४ दिवस आखलेलं शुद्ध जेवण आणि त्यानंतर एक दिवस मला आवडेल ते खाणं. त्यात नटेला पॅनकेक्‍स, वॉफल्स, चीजकेक्‍स, बटर चिकन, मक्‍याची रोटी आणि मोहरीची हिरवी भाजी (सरसों का साग) आदींचा समावेश असतो.

डाएटचं पालन करणं हे आव्हान
माझ्यासाठी प्रत्येक दिवस म्हणजेच एक आव्हानच असतं. मी सेटवर असतो, तेव्हा दिवसभर माझ्या अवतीभवती लोक नाश्‍ता करत असतात. काही जण चमचमीत खात असतात. त्यामुळं आसपास इतकं चमचमीत खाणं दिसत असताना एक सकस डाएटचं पालन करणं खूपच कठीण असतं. किशोरवयात नको त्या जागी मी खूप वाळका आणि नको त्या जागी जाड होतो. त्यामुळं ही अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आणि शरीर कमावण्यासाठी मला एक वर्ष मेहनत करावी लागली. खरं तर त्यामुळं माझी शरीरयष्टी देखणी झाली आहे. याचबरोबर माझ्यात आंतरिक शक्तीही वाढली आहे. याचा फायदा मला प्रत्येक गोष्टीत होतो. त्यासाठी प्रत्येकानं न चुकता आणि कितीही अडचणी आल्या, तरी फिटनेस आणि वेलनेसबाबत जागरुक राहायला पाहिजे. कारण, शरीरसंपदा ही आपल्यासह कुटुंबीयांसाठीही खूप गरजेची असते. त्यामुळं प्रत्येकानंच फिट असावं. त्यासाठी दररोज स्वतःसाठी वेळही काढावा.
खरं तर चित्रपटसृष्टीमध्ये अनेक जण आपला फिटनेस जपत आहेत. अनेक कलाकार त्यासाठी मेहनत घेताना दिसतात. मलाही अनेक जणांची शरीरयष्टी आवडते; पण सलमान खान, हृतिक रोशन आणि आता टायगर श्रॉफ हेच माझ्यासाठी फिटनेसचे आदर्श आहेत. खरं तर प्रत्येकानंच फिटनेसबाबत कोणाचा तरी आदर्श घेतला पाहिजे. त्यातून आपलं शरीरही फिट होतं आणि त्याचा फायदा आपल्यासह कुटुंबीयांनाही होत असतो. कारण, जो माणूस फिट असतो, तो सर्व संकटांचा सामना मोठ्या धैर्यानं करू शकतो.

सध्या मी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरचा ‘इंडियन आयडॉल’ गाजलेला शो आपलं अकरावं सत्र घेऊन पुन्हा प्रेक्षकांसमोर येतो आहे. या सत्रात मी सूत्रसंचालकाची भूमिका बजावत आहे. ‘एक देश एक आवाज’ ही या सत्राची थीम आहे. या थीमद्वारे संपूर्ण देशाला हा शो एका सूत्रात बांधणार आहे. यातून सर्वसामान्य गायकांना आपल्या आवाजाची जादू देशभरात दाखवण्याची संधी मिळणार आहे.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)

हृतिकची दाद मोलाची
मी एकदा विमानात अभिनेता हृतिक रोशन यांना भेटलो होतो आणि त्यानंतर काही वर्षांनी पुन्हा आमची भेट झाली. त्यावेळी माझा फिटनेस पाहून ते खूपच प्रभावित झाले होते. ते म्हणाले : ‘‘फिट अँड स्ट्रॉंग दिसतो आहेस.’’ माझ्या फिटनेस देवताकडून मिळालेलं हे कौतुक माझ्यासाठी खूप मोठं होते. कारण, मी माझ्या शरीरसंपदेसाठी घेतलेल्या कष्टांना खऱ्या अर्थानं यश आलं होतं.

loading image