घाटी (ऐश्वर्य पाटेकर)

aishwarya patekar
aishwarya patekar

अर्ध्या रात्रीच झेलीला वेणा सुरू झाल्या. सुमननं घाईघाईनं सरूला अन्‌ गवत्याला उठवलं. सरू अन्‌ गवत्या लगोलग गावातल्याच जनावरांच्या डॉक्‍टरकडे निघाले. अंधाराची भीती वाटायचं त्याचं वय. मात्र, दोन्ही भावंडं रमतगमत निघाली होती. आनंदानं त्यांचा ऊर उचंबळून आला होता.

सरू सरपणाचा भारा घेऊन आली. डोक्‍यावरचा भारा दाणकन् ओट्यावर टाकून घरात गेली. शिंकाळ्यावरचं भाकरीचं टोपलं तिनं
खाली घेतलं अन्‌ जेवायला बसली. तेवढ्यात गवत्याही आला. लाकडाचं फळकूट असलेली त्याची क्रिकेटची बॅट त्यानं कोपऱ्यात टाकली. तोही फतकल मारून जेवायला बसला. कढईच्या बुडाला उरलेलं थोडंसं पिठलं पाहून तो नाराज झाला अन्‌ सरूला म्हणाला : ‘‘सरूताई, काय गं, मला न्हाई ठिवलं का पिठलं? समदंच घिऊन टाकलं त्वा.’’
‘‘तुझं तं डोळंच फुटलंत बाबा. पातिल्याखाली पाह्य; वाटीत कहाढून ठिवलंय,’’ कपाळावर येणाऱ्या झिपऱ्या आवरत सरू रागानं म्हणाली.
‘‘बय, तू जेवली का?’’ खाटेवर बसलेल्या आपल्या अंध आजीला गवत्यानं विचारलं.
भागाईचे डोळे भरून आले. गवत्याचा बाप अप्पा तिच्या डोळ्यांसमोर तरळून गेला. तिच्या लेकाचा तिच्यावर असाच जीव होता. अन्नाचा घास घेताना तो आईला कधी विसरला नव्हता. स्वतः पोरासोरांचा बाप झाल्यानंतरही आईला विचारल्या-पुसल्याशिवाय कुठली गोष्ट करत नव्हता. मात्र, शेवटची आज्ञा त्यानं काही घेतली नाही. भरल्या घरातून असा कायमचा उठून निघून गेला. भागाईनं पदरानं डोळे पुसले अन्‌ ती गवत्याला तोंड भरून म्हणाली : ‘‘माह्या बबड्याला माही लई काळजीय.’’
‘‘तुहा बबड्या तुह्या पिशवीतलं शेंगदानं चोरून खातो; त्याचं काय न्हाई तुला, ’’ सरू तोंडातला घास गिळता गिळता म्हणाली.
‘‘खाव दे, खाव दे. त्योच आता राखनदारंय आपला!’’
‘‘त्येला स्वोताची चड्डी बी संभाळता येत न्हाई आन्‌ चाललाय राखनदार व्हायाला.’’
‘‘सरूताई, काय गं... सुलीचं न्‌ तुह भांडान झालं; तव्हा कुनी सोडिवलं? कसा कडकडून चावलो व्हतो सुलीच्या हाताला...!’’
‘‘तिचा भाऊ आला हातात काठी घिऊन तव्हा पळाला चड्डी पिवळी करत...’’ सरू खदाखदा हसत म्हणाली.
‘‘पाह्य गं बय...’’
‘‘सरे, नको हसू माह्या बबड्याला.’’
मग दोघं एकमेकांना बराच वेळ चिडवत राहिले.
* * *

सुमन दळण घेऊन आली. आल्या आल्या तिच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला.
‘‘काय गं सरे, गावभर हुंदडून न्हाई आली तं बसली का खावटायला? इथं आई मर मर मरती...त्याचं हाय का तुम्हाला काई!’’
‘‘काय गं आये, सरपान घिऊन आले की म्या.’’
‘‘बरं बरं. खावटून झाल्यावं झेलीला सोड अन्‌ चारायला घिऊन जा.’’
‘‘आई, माही शाळा बुडंल. म्या न्हाई जानार.’’
‘‘ऐ साळावालेऽऽ कमरंत लाथच घालीन.’’
‘‘न्हाई जानार म्हंजी न्हाई जानार,’’ सरीही हटवादीपणानं म्हणाली.
सरूच्या उलटून बोलण्यानं सुमनला असा काही राग आला की तिनं सरूला झोडपायला सुरुवात केली. तिची अंध सासू मध्ये पडली.
‘‘येवढं मारावा का ल्हान लेकराला?’’
‘‘चांगली तेरा वर्षांची घोडी झालीया; ती काय ल्हान न्हाई ऱ्हायली आता. तुमचा ल्योक गेला गळ्याला फास लावून. ही उली उली लेकरं अन्‌ आंधळी आई ठिवलीय माझ्या मढ्यावं! कसं करायचं म्या येकटीनं? म्या बी घ्यायला पाह्यजे व्हता गळफास. म्हंजी सुटले आसते या जंजाळातून...’’
यावर सासू गप्प झाली. सारं घरंच गप्प झालं. वेळ मात्र पुढं सरकायच्या ऐवजी मागं फिरला. सरकत सरकत आठ वर्षं पाठीमागं जाऊन त्या कडूकाळ्या दिवसापाशी स्थिर झाला.
* * *

तसं बरं चाललं होतं; पण अप्पाच्या बोकांडी सुदाम सावकाराचं कर्ज येऊन बसलं अन्‌ सगळंच विस्कटून गेलं. अप्पाचा जीव पक्का कर्जाच्या फासात अडकला होता. त्या दिवशी अप्पा बाजारला म्हणून घरातून बाहेर पडला; पण रात्र झाली तरी त्याचा पत्ता नव्हता. सुमनचा जीव टांगणीला लागला. नाही नाही ते मनात येऊ लागलं. घरात जा, बाहेर ये...अशा तिच्या येरझारा सुरू होत्या. त्यात ती गवत्याच्या वेळी पोटुशी.
ती सासूला म्हणाली : ‘‘आवं, तुमच्या ल्योकाला बाजाराहून यायला लईच उशीर व्हऊन ऱ्हायलाय.’’
‘‘आगं, थांबला असंल कुढं तरी. यईल. तू नगं जिवाला खाऊ.’’
‘‘त्येंचा जीव काय थाऱ्यावं न्हाई बाई. सावकाराचं कर्ज हाये नं डोक्‍यावं. औंदा शेतात काय पिकलं न्हाई. त्येनं तंबीच दिलीया...माहं पैसं दी न्हाई तं वावर नावावं कर माह्या!’’
‘‘अशाच लई जनांच्या जिमिनी हडप करत आलाय त्यो.’’
‘‘आये, मला भूक लागलीया. जेवायला दी ना...’’ लहानगी सरू म्हणाली.
‘‘दम धर, तुहा अप्पा आला की बसू समदेच.’’
‘‘सुमन, तू दोन घास खाऊन घी. दोन जिवांची हायेस तू! पोरीला बी दी जेवायला. आम्ही मायल्योक बसू नंतरनं.’’
माय-लेकी जेवायला बसल्या. सुमननं घासही उचलला नव्हता तोच दाराशी बाजारच्या पिशव्या घेऊन गावचा तुकाराम उभा! बाजारच्या पिशव्या पोचल्या घरी; पण सरूचा बाप...सुमनचा नवरा...भागाईचा लेक काही पोचू शकला नाही! त्यानं फाशी घेतली होती. पाटाजवळच्या बाभळीला. सुमनचं चार बिघे वावर सुदाम सावकारानं बळकावलं. कोरभर भाकरीचा का होईना; पण तेवढाच आधार होता. तोही असा काढून घेतला गेला. मोलमजुरीवर कसंतरी भागवत होती. सुमनच्या बापाला लेकीचे हाल काही पाहवत नव्हते, म्हणून त्यानं म्हशीची पारडी सुमनला आणून दिली. तीच ही झेली. सुमननं तिला जपलं-वाढवलं. तिच्याच जिवावर सुमनचा मोडका संसार आता सावरणार होता.
मोलमजुरीचं काम तर ती करतंच होती. अंध सासूची जबाबदारी अन्‌ दोन छोटी छोटी लेकरं ती वाढवत होती. झेली गाभण राहिली तेव्हा जास्तच वाईट दिवस आले होते. मोलमजुरीचं कामही मिळत नव्हतं. मात्र, आता झेली व्यायला आली होती. पोट लोंबकळून आलं होतं. दोन दिवसांत व्याली तर सुमनची दलिंद्री जाणार होती. तीच आता सुमनची आईबाई होऊन तिच्या फाटक्‍या संसाराला टाका मारणार होती! म्हणून तर सुमन गेले पंधरा दिवस झेलीची जरा जास्तच काळजी घेत होती. मजुरीच्या कामाला गेली तरी झेलीसाठी गवतगुळी घेऊन येत होती.
सरू झेलीला रानावनात चारायला नेऊ लागली. आपल्या आईच्या संसाराला शहाणी होऊन मदत करू लागली. एक दिवस सुमन भाकरी थापत बसली होती. सरू चुलीत जाळ घालत होती. सरूला काही आठवलं.
ती आईला म्हणाली: ‘‘आई, माह्या शाळंतली मीनाक्षीय नं, त्या नव्या कॉलनीतली. तिथं बऱ्याच लोकान्ला दुधाचा रतीब लावायचा हाये.’’
‘‘अगं बया... बरं व्हईल मंग!’’ भाकरीला पाणी लावत ती तव्यावर उलटी टाकत सुमन म्हणाली.
‘‘आई, आपली झेली किती लिटर दूध दिईन गं?’’
‘‘दहा लिटर तं कुढं गेलं न्हाई.’’
सरूनं २० रुपये लिटरनं दहा लिटर दुधाचा हिशेब केला अन्‌ ती आईला म्हणाली : ‘‘आपल्याला दोनशे रुपये रोज मिळंल.’’
‘‘मंग तरी मला क्रिकेटची बॅट घेता यिईल!’’ गवत्या म्हणाला.
‘‘पाह्य गं आई, याला क्रिकेटच्या बॅटचं पडलंया.’’
‘‘त्याचं चांगलं किरकेट कहाढते म्या!’’
‘‘आई, आपल्या बईच्या डोळ्याचं आपरेशन बी करता येईल, न्हाई काय गं?’’
सुमन काही बोलली नाही..
* * *

अर्ध्या रात्रीच झेलीला वेणा सुरू झाल्या, सुमननं घाईघाईनं सरूला अन्‌ गवत्याला उठवलं. सरू अन्‌ गवत्या लगोलग गावातल्याच जनावरांच्या डॉक्‍टरकडे निघाले. अंधाराची भीती वाटायचं त्यांचं वय. मात्र, दोन्ही भावंडं रमतगमत निघाली होती. आनंदानं त्यांचा ऊर उचंबळून आला होता.
‘‘गवत्या, आपल्या झेलीला पारडी व्हायाला पाह्यजे.’’
‘‘नाही. रेडकू. म्या त्येला नांगराला जुपील.’’
‘‘वावर हाये का नांगरायला? त्या सुदाम सावकारानं घेतलंय ना हिसकावून.’’
‘‘म्या मोठा झालो नं तं परत घिईन त्येच्याकून.’’
‘‘ऱ्हाव दे. तू आधीच असा पैलवान!’’
‘‘काय गं, सरूताई...तू बी...’’ गवत्या जरासा गुरंगाटला.
‘‘आरं, आपल्या झेलीला पारडीच व्हायाला पाह्यजे, म्हंजी ती मोठी झाली का ती बी दूध दिईल. मंग आईला कामाला जायाचीच गरज ऱ्हानार न्हाई. आपल्या झेलीचं दहा लिटर दूध अन्‌ हिचं परत दहा लिटर...म्हंजी चारशे रुपे रोज आपल्याला मिळत्याल; हायेस कुढं!’’
सरू अन्‌ गवत्या डॉक्‍टरला घेऊन परतले अन्‌ समोरचं दृश्‍य पाहून अवाक् झाले. सुमन गोठ्यातल्या भिंतीला पाठ टेकून बसली होती. झेलीचं पारडू मेलेलंच जन्माला आलं होतं अन्‌ झेलीही दगावली होती. गवत्या अन्‌ सरू झेलीला बिलगून रडत बसले. त्यांचा चिमुकला हंबरडा किती तरी वेळ सुरूच होता. सुमनच्या अंध सासूच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी सुरू होतं. सारं संपलं होतं. ज्या म्हशीच्या जिवावर या घराची भाकर चालणार होती ती म्हैसच दगावल्यानं घर कोलमडून पडलं होतं. सुमनला तर काहीच सुचेना. वाटलं, संपवून टाकावा हा जीव अन्‌ व्हावं या साऱ्यातून मोकळं. सुमनच्या डोळ्यासमोर जे दृश्‍य आलं ते फार भयानक होतं. ती नुसती कल्पना असूनही सुमनच्या काळजाचा थरकाप उडाला...सरूनं अन्‌ गवत्यानं फाशी घेतली होती अन्‌ अंध सासूही फासाला लटकलेली...सुमनला असा काही दरदरून घाम फुटला.
मानेला जोरदार हिसका देत सुमननं डोळ्यांसमोर तरळलेलं ते दृश्‍य पुसून टाकलं. एखादी अप्रिय वस्तू लांब भिरकावून देताना हात जोरात हलावेत तसे हातवारे करत सुमन ताडकन् उठली. तिनं पदरानं घाम पुसला, तोच पदर कमरेला खोचला आणि दोन्ही पोरांना हाक मारत ती म्हणाली :
‘‘सरूऽऽ, गौतमाऽऽ पोरांनो, जा, राणूला बोलावून आणा. म्हशीला ठिकाण्याला लावावं लागंल...’’
* * *

दुसऱ्या दिवशी सुमन उठली अन्‌ मळ्याकडं निघाली. हाच मळा सुदाम सावकारानं हिसकावून घेतला होता. या मळ्यावर तिला आता ताबा मिळवायचा होता. चालता चालता तिच्या पायाला ठेच लागली म्हणून ती खाली वाकली तर झेलीची घाटी हाताला लागली. ठणण् असा आवाज झाला. डोळ्यात पाणी तरळलं. ते पुसत ती मनोमन म्हणाली :
‘‘झेले, बाई तू मेलीस...पर जाता जाता मला जित्तं करून गेलीस! त्या सावकारानं थोडीच माझ्या जिमिनीची माती तिजोरीत बंद करून ठिवलीया! त्या मातीवर पाभर फिरली तं माही मानसं जगत्याल; त्येन्ला जगवायचं तं मला जिमीन परत मिळवलीच पाह्यजे!’’
आता कुठलाच सुदाम तिला अडवू शकणार नव्हता...किंवा त्याचा निभाव तिच्यासमोर लागणार नव्हता.
घाटी निनादत राहिली रानभर...!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com