जमीन (ऐश्वर्य पाटेकर)

aishwarya patekar
aishwarya patekar

...काही वेळानं सीता कशीबशी उठली. तिनं दरवाजावर पुन्हा काही थाप दिली नाही. तो उघडला जाणारच नव्हता हे तिला माहीत होतं. वाट सापडेल तिकडे ती चालत सुटली. डोक्यावरचं आभाळ अन् पायाखालची जमीन एवढंच आता तिचं होतं. ती चालत राहिली. नजरेत कुठलंही घर नव्हतं. जगात एवढी घरं होती; पण सीतासाठी एकही नव्हतं का? चालून चालून ती इतकी थकली की शेवटी तोल जाऊन पडली. या जगात सगळीच घरं निष्ठुर नसतात.
एका घरानं तिला आधार दिला.


‘‘अहो, ऐकलं का मी काय म्हनते?’’
मोहनराव अंगावर कोट चढवत होते. त्यांना तसाही जरा उशीरच झाला होता. त्यांना आमदाराच्या आईच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला जायचं होतं. त्यामुळे त्यांचं बायकोच्या बोलण्याकडे विशेष लक्ष नव्हतं.
‘‘तुमचं तं माह्या बोलन्याकं लक्षच न्हाई बाई.’’
‘‘बोल, काय म्हनते?’’
‘‘तुमच्या यकसष्टीचा कारेक्रम आठ दिसावं आलाय, लई म्हत्त्वाचं पाव्हनं येनार म्हून काळजी वाटंती! बाई, त्या म्हतारीचा कायतरी बंदोबस्त करावा लागंन. न्हाई तं यिईन कारेक्रमाच्या दिशी मधीच ख्वॉक ख्वॉक करत! साराच रंगाचा बेरंग व्हायाचा!’’
‘‘मंगल, म्हतारीची खाट गाईच्या गोठ्यात जाऊ द्यायची त्या दिशी. तिला खायाला-प्यायाला तिथंच द्यायाचं. वाटलं तं दत्तूला त्या दिशी गोठ्याच्या दारात बसून ऱ्हायची डिवटी दी.’’
‘‘तुमी काळजीच करू नगा. म्या चोख बंदोबस्त करीते; पर यकसष्टीच्या कारेक्रमात तुमी मला हिऱ्याची अंगठी आन् येवल्याची पैठनी द्यायाचं कबूल केलंया.’’
‘‘ते कसं इसरंल मी! तू तेवढं म्हतारीचं बघ. बरीच व्हीआयपी मानसं येनारैत आपल्याकं.’’
***
म्हातारी म्हणजे दुसरं-तिसरं कुणी नसून खुद्द मोहनरावांची आई सीताबाई. ती काठी टेकत टेकत काहीतरी सांगायला आली होती; पण आडभिंतीला येताच तिच्या कानावर लेक-सुनेचं हे बोलणं पडलं. मग ती तिथं जराही न थांबता आल्यापावली आपल्या खोलीत येऊन बसली. ज्या मुलाला ती हीरा समजली होती; तो तर गारगोटी निघाला होता. तिच्या डोळ्यांत पाणी आलं. खरंतर छोट्या-मोठ्या दुखण्याचा बाऊ करून उभ्या आयुष्यात ती कधी भुई धरून बसली नव्हती. अवघा दु:खाचा पहाड ती चढून आली होती; पण कधीच कुठंही डगमगली नाही. खंबीरपणे तिनं आयुष्याची लढाई लढली होती. तिच्यापुरता विजय तिनं मिळवला होता; पण लेकाच्या एका वाक्यानं तिला आत्ता पराजित करून टाकलं होतं. माती उकरावी तसं ती काळीज उकरू लागली.... गतकाळातले काही दिवस तिच्या हाती लागले...
* * *
मोहन पोटात असतानाची गोष्ट. सीता जेमतेम सहा महिन्यांची गर्भारशी. नवऱ्यानं अन् त्यानं ठेवलेल्या बाईनं तिचं जगणं मुश्किल करून टाकलं होतं. तरी गर्भातल्या जिवासाठी ती लापट होऊन त्या घरात राहत होती. एक दिवस नवऱ्यानं मारायला सुरुवात केली. सीता विनवण्या करू लागली : ‘‘मला नका काहाढू घराभाईर. म्या कुढं जाऊ? म्या आपली गपचित पडून ऱ्हाईल इथं कोपऱ्यात.’’
मात्र, नवऱ्यानं ठेवलेली बाई ऐकायला तयार नव्हती. ती फणकाऱ्यानं म्हणाली : ‘‘इथं कोनंय तुहं? तुहा नवरा आता माहा झालाय. तू तुहं त्वांड कुढं बी काळं कर जा.’’
‘‘म्या काईच तरास न्हाई द्येयाची तुमाला; पर मला ऱ्हाऊं द्या इथंच,’’ सीता अजीजीनं म्हणाली.
‘‘ही बया जर या घरात ऱ्हायली तं मंग मला मुकावं लागंल तुमाला, सांगून ठिवते,’’ ठेवलेली बाई म्हणाली.

सीताच्या नवऱ्याचा राग अस्मानाला भिडला. त्यानं पोटुशा सीताच्या थेट पोटावरच लाथ मारली. सीता उंबऱ्यातच उभी होती. ती कळवळली, कोलमडली आणि उंबऱ्याबाहेर कोसळली. दरवाजा बंद झाला. काही वेळानं ती कशीबशी उठली. तिनं दरवाजावर पुन्हा काही थाप दिली नाही. तो उघडला जाणारच नव्हता हे तिला माहीत होतं. वाट सापडेल तिकडे ती चालत सुटली. डोक्यावरचं आभाळ अन् पायाखालची जमीन एवढंच आता तिचं होतं. ती चालत राहिली. नजरेत कुठलंही घर नव्हतं. जगात एवढी घरं होती; पण सीतासाठी एकही नव्हतं का? चालून चालून ती इतकी थकली की शेवटी तोल जाऊन पडली. या जगात सगळीच घरं निष्ठुर नसतात.
एका घरानं तिला आधार दिला.
तिनं डोळे उघडले तेव्हा पार्वतीबाई म्हणाल्या : ‘‘बाई... ऊठ, दोन घास खाऊन घी. उपाशीतापाशी कुढं हिंडत व्हतीस?’’
विठ्ठलराव पायत्याशी बसले होते. पार्वतीबाईंनी स्वत:च्या हातांनी सीताला घास भरवले. सीताच्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं. तिनं आपली हकीकत दोघांच्या कानावर घातली. पार्वतीबाईंच्या डोळ्यांतही पाणी आलं. पार्वतीबाईंच्या अन् विठ्ठलरावांच्या नशिबी मूल-बाळ नव्हतं. त्यांनी पोटच्या लेकीसारखं सीताचं दु:खं समजून घेतलं. तिला घरात आसरा दिला. नेमका त्या रात्रीच त्या घरावर दरोडा पडला. लुटालूट सुरू झाली. सीता घाबरून गेली. तिला असंही वाटलं की आपलं कर्मच फुटकं...आपणच या घरावर ही वेळ आणली! तिच्या मनात एकाएकी काय आलं काय माहीत...तिनं पदर खोचला.
विठ्ठलरावांच्या डोक्यात पहारीचा वार एक दरोडेखोर करणार, तोच सीतानं त्या दरोडेखोराच्या डोक्यात मोगरीचा वार केला अन् गल्लीत येऊन सीतानं गाव जागं केलं. दरोडेखोरांना पळता भुई थोडी झाली. साऱ्यांचा जीव वाचला. त्या पती-पत्नीच्या आतली माया दाटून आली. विठ्ठलराव सद्गदित होऊन म्हणाले : ‘‘पोरी, सावकारकीचा धंदा माहा. आयुक्षभर म्या निसतंच कमावलं; पर आज माहं डोळं उघडलं. पैशापरीस जिवाचा मानूस मोठा. अर्ध्या वयात का व्हईना, त्या ईश्वरानं तुला आमच्या वटीत टाकलं. आता तूच आमची लेक आन् आम्ही तुहं माय-बाप. माझी ही शंभर एकर जिमीन म्या तुला दान करतो!’’
* * *

शंभर एकर जमीन सीताच्या पदरात टाकून तिचे हे आई-बाप तीर्थयात्रेला निघून गेले; पण त्यांना निघताना सीता म्हणाली : ‘‘मला माह्या जवळच्या मानसांनी हुसकून देलं, तुम्ही माहे माय-बाप झालात. ही तुमची लेक तुमची वाट पाहीन. तुमची सेवा करन्याचं पुन्य मला लाभूं द्या.’’
ते पुण्यही तिच्या पदरात पडलं. त्यांची लेक होऊन सीतानं त्यांना अखेरपर्यंत मोठ्या मायेनं सांभाळलं. सीता गावासाठी आदर्श ठरली.
ती सावकाराची मानलेली पोर होती, असं कुणीच म्हणू शकलं नाही. सख्खी मुलगी जपू शकली नसती इतकं तिनं दोघांना जपलं.
आज त्याच आदर्श सीताबाईच्या लेकानं तिच्या मातृहृदयाला डागण्या दिल्या होत्या. लेकानं वरकरणी जो मातृप्रेमाचा बुरखा पांघरला होता तो टराटरा फाटून त्याचं खरं रूप समोर आलं होतं.
मोहनरावांचं आईवरचं प्रेम सर्वश्रुत होतं!
आई या विषयावर व्याख्यानं देण्यासाठी त्यांना पंचक्रोशीतूनच नव्हे, तर दूरदूरच्या जिल्ह्यांतून बोलावलं जाई. आईची हेटाळणी करणाऱ्यांची ते कानउघाडणी करत. त्यांच्या व्याख्यानाचा विषयच असायचा ‘आईची महती’! त्यांच्या रसाळ वाणीवर श्रोते लुब्ध व्हायचे. उत्कृष्ट वक्ता म्हणून त्यांची ख्याती होती. आमदार-खासदार त्यांना सन्मानानं कार्यक्रमाला बोलावत.
पुढच्या अनेक महिन्यांच्या त्यांच्या तारखा आरक्षित असत! समाजात त्यांना मोठा मान होता. आदर होता. अशा मोहनरावांचं आपल्या आईविषयीचं खरं मत काय आहे हे जर जगाला कुणी सांगितलं असतं तर ते जगाला मुळीच खरं वाटलं नसतं!
लेकाचं आपल्याविषयीचं मत ऐकून सीताबाईमधल्या आईचं काळीज चिरत गेलं. ज्या पोरासाठी अवघी उमर जाळली, तो पोरगा आपल्याला गोठ्यात ठेवण्याची भाषा करतोय! आपल्या धर्माच्या माय-बापासारखं आपणही अपत्यहीनच असायला हवं होतं...तिला वाटून गेलं. तिच्या आतल्या विहिराचा तळ उमदळून आला; पण हे सारं जरा वेळानं शांत झालं. ती नुसती नावाची सीता नव्हती...!
* * *

मोहनरावांच्या एकसष्टीचा कार्यक्रम सुरू असतो. मोहनरावांना जो तो आईविषयी विचारत असतो. तिची तब्येत बरी नसल्याचं कारण देऊन ते सुटका करून घेत होते.
आपल्या बोटातल्या हिऱ्याच्या अंगठीकडे अन् लाखाच्या पैठणीकडे कुणाचंच लक्ष नाही हे पाहून मोहनरावांची पत्नी मंगल हिला खूप वाईट वाटत होतं!
‘माह्या अंगठीपरास ख्वाॅक ख्वाॅक करनारी ती म्हतारीच म्हत्त्वाची वाटतीया या मेल्यांना बी...’ तिच्या मनाची चडफड झाली. तरीही तिनं हार मानली नव्हती. ती मोहनरावांच्या आगंमागं नको तेवढी मिरवत होती. अंगतीपंगती उठल्या अन् मोहनरावांच्या सत्काराचा क्षण येऊन ठेपला. तरी मोहनरावांना आईची आठवण झाली नाही; लोकांना मात्र झाली. धूर्त मोहनरावांनी ती वेळ मारून नेत आपल्या मातृप्रेमाच्या मधाळ भाषणानं लोकांना मंत्रमुग्ध करून टाकलं. त्यांचं भाषण संपतं न् संपतं तोच सीताबाई काठी टेकवत टेकवत व्यासपीठावर आली. मोहनरावांचा चेहरा पडला; पण नाइलाजास्तव उठून आईच्या मदतीसाठी ते पुढं आले. मात्र, आईनं मदत नाकारली.
तिन थेट माईकचा ताबा घेतला : ‘‘लेकरायवो, तुमी माह्या ल्योकाचं भाषन आयकलंच. असा ल्योक होने न्हाई! तो त्येच्या आईला किती मानंतो हे तुमाला मी येगळं सांगायची काय गरज! आईवं याख्यानं दिऊन लई पुन्य त्यानं कमावलं हाये..आईची महती का काय म्हनत्यात ती जव्हा त्याच्या मुखातून भाईर पडंती तव्हा जनू सरसोती त्याच्या वानीत वसली हाये असं ऐकनाऱ्याला वाटतंय. माहं दर्शन घेतल्याबिगर तो घराभाईर पडत न्हाई. आज माही उमर ऐंशी वर्षांच्या म्होरची हाये. त्येनं बी साठी गाठलीया. तरी बी मला इचारल्याबिगर त्यो कुढलीच गोष्ट करीत न्हाई. असा पोरगा जगातल्या समद्याच आयांच्या पोटी यावा. कालच त्यो माह्याजवळ यिऊन कळकळीनं बोलला. मला त्यो म्हनला, ‘आई, जमाना बदलत चाललाय. लोक म्हताऱ्या माय-बापाला घरातल्या केरकचऱ्यागत घराभाईर काढून ऱ्हायलेत. आपली शंभर यकर जिमीन आपुन वृद्धाश्रमासाठी दान करू, म्हंजी कुढल्याच आईला गाईच्या गोठ्यात ऱ्हान्याची यळ येनार न्हाई!’ पोराचे ह्ये इचार मला बी पटले!’’
सीताबाईच्या या बोलण्यावर
लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मोहनरावांचाही जयजयकार केला! मात्र, मोहनरावांच्या काळजावर या टाळ्यांचे घाव उमटले... त्यांच्या सणसणीत मुस्कटात बसली! ते एवढे खजील झाले की काही विचारू नका. आई भाषण संपवून व्यासपीठावरून उतरून गाईच्या गोठ्यात जाऊन बसली. मोहनरावांना आपली चूक कळली. त्यांनी आईचे पाय धरले. आई म्हणाली : ‘‘ल्योका, तू माहं पाय न्हाई धरलंस; तू तं शंभर यकर जिमिनीचं पाय धरलंस! तू रोज माह्या पाया पडून दिसाची सुरुवात करायचा; पर आज कळलं की तू शंभर यकरांचं दर्शन घ्यायाचास, माझं न्हाई! ल्योका, ती जिमीन मला दानातच मिळालीया, म्हून म्या हा निर्नय घेतलाया!’’
मोहनराव निघून गेले. गाईचा गोठा मात्र हंबरू लागल्यासारखा वाटू लागला. त्याला जणू हात फुटले होते. तो आईचे अश्रू पुसत होता. आईच्या डोळ्यांत वृद्धाश्रमाची उंचच उंच इमारत उभी राहिली होती अन् सीता पुन्हा एकदा जिंकली होती...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com