दत्तोबाचं चप्पलपॉलिश! (ऐश्वर्य पाटेकर)

aishwarya patekar
aishwarya patekar

दत्तोबांनी सुनीलच्या चपला हातात घेऊन पॉलिश करायला सुरुवात केली. सुनीलनं ते पाहिलं अन् तो धावला. त्यानं दत्तोबांच्या हातून चपला काढून घेतल्या अन् म्हणाला : ‘‘दत्तोबाऽऽ काय हे? तुम्ही मला माझ्या वडिलांच्या जागी आहात! अन् तुम्ही माझ्या चपला हातात घेतल्यात?’’

‘‘सरकार, आयती भाकर मला काई ग्वाड लागनार न्हाई. माह्या गळ्याच्या खाली घास काई उतरायचा न्हाई. मला चतकूर भाकरीपुरतं काम तेवढं सांगा.’’
‘‘दत्तोबा, तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे. ते जसे थकलेत; तसे तुम्हीही थकलेले आहात. तुम्हाला काम सांगण्याचं पाप मी कसं करू?’’
‘‘म्या आजूक थकल्याला न्हाई, सरकार. थकून मला कसं चालंल? चतकूर भाकरीपुरतं का व्हईना मला काम करावंच लागंल.’’
‘‘नाही दत्तोबा, तुम्ही बसून खायचं. मी आहे की तुमच्या लेकासारखा!’’
‘‘न्हाई सरकार, असं कसं? तुमी मालक आन् आमी सेवक. आमची जागा तुमच्या पायतानाशी!’’
‘‘नाही दत्तोबा, तुमच्या कष्टावर तर माझ्या वडिलांनी एवढी इस्टेट कमावली! तुम्ही बिलकूल काम करायचं नाही. बसून खायचं अन् मी काही तुमचा मालक नाही. तुमच्या अंगा-खांद्यावार खेळलोय मी.’’
‘‘सरकार, सांगा बरं माझ्याजोगतं काई काम...मला भूक लागलीया.’’
‘‘दत्तोबा, चला मी तुम्हाला जेवायला वाढतो.’’
‘‘न्हाई, काम केल्याबिगर कसं खायाचं? ते काही माह्या मनाला पटत न्हाई.’’
***
सुनीलला ठाऊक होतं की दत्तोबा फार स्वाभिमानी आहेत. ते ऐकायचेच नाहीत. काम केल्याशिवाय ते भाकरीला काही केल्या शिवणार नाहीत. तसेच उपाशी राहतील.
दत्तोबांना काय काम सांगायचं हा त्याच्यापुढं पेच उभा राहिला.
तांब्या भरून पाणी घ्यायलाही ज्यांना कोण प्रयास पडतो त्यांना काम सांगणं म्हणजे मोठं पापच! ते आपण कसं करायचं? धापा टाकत राहताहेत सारखे. ते काय काम करतील? काम नाही म्हटल्यावर उपाशी राहतील तसेच.
दत्तोबांना जराही श्रम व्हायला नकोत अन् आपण काम केलं आहे याचं समाधानही त्यांना वाटलं पाहिजे असं कोणतं काम त्यांना सांगता येईल बरं? असा विचार करत असतानाच दत्तोबांनी सुनीलच्या चपला हातात घेऊन पॉलिश करायला सुरुवात केली. सुनीलनं ते पाहिलं अन् तो धावला. त्यानं दत्तोबांच्या हातून चपला काढून घेतल्या अन् म्हणाला : ‘‘दत्तोबा ऽऽ काय हे? तुम्ही मला माझ्या वडिलांच्या जागी आहात! अन् तुम्ही माझ्या चपला हातात घेतल्यात?’’
मात्र, आपण दत्तोबांची भाकरीच हिसकावून घेतली असं दुसऱ्याच क्षणी सुनीलला वाटलं.
***

तो वडिलांचं जेवणाचं ताट घेऊन पायऱ्या चढून वरती त्यांच्या खोलीकडे आला, तर ते खूप चिडले त्याच्यावर. वस्तूंची फेकाफेक करू लागले.
‘‘काय रं? भाकरीवाचून मारता का बापाला? यवढी इष्टेट कमावली; पर तुमाला हाये का त्याचं काय? खुशाल उपाशी मारून ऱ्हायले बापाला!’’
सुनीलच्या मनात आलं...आपले वडील अन् दत्तोबा एकाच वयाचे. खरं तर आपल्या वडिलांनी पुढारकीच जास्त केली. दत्तोबा मात्र बैलासारखं राबले; म्हणून हे सगळं वैभव उभं राहिलं. वडिलांचा अवमान करायचा आपला हेतू नाही. आपण त्यांची नियमितपणे सेवा करतोय. कशात कसूर होऊ देत नाही. वेळच्या वेळी सगळी उस्तवार करतोय. आज जरा मळ्यात लावणीचं काम आलं. घरातल्या बायाही मळ्यात गेल्या, त्यामुळे झालं थोडं मागं-पुढं, तर किती हा उद्धार!
सुनील शब्दानं काही बोलला नाही. उलट मवाळपणे म्हणाला : ‘‘दादा, आज जरा उशीर झाला!’’
‘‘उशीर झालाच का मी म्हनतो? म्या कमावलंय हे सारं!’’
‘‘चूक झाली दादा; पण इथून पुढं असं काही होणार नाही. एवढ्या वेळ माफ करा.’’
‘‘वर त्वांड करून माफ करा म्हनतो? बापाला उपाशी मारतो व्हय रं? सगळं दान करून टाकीन, काय समजला? कवडी उरू द्यायचो न्हाई तुमाला. मंग बसा गावोगाव भीक मागत.’’
वडिलांनी अशी धमकी देता देता मध्येच दोन-चार शिव्याही हासडल्या.
आता मात्र सुनीललाही राग आला होता. त्याला म्हणावसं वाटलं, ‘टाका दान करून, म्हणजे मला परत परत ऐकावं तरी लागणार नाही.’
मात्र, तो असं काही बोलला नाही. ते आतल्या आत गिळत त्यानं राग आवरला.
त्याच्या मनात आलं...ज्यांच्या जिवावर मळेतळे उभे राहिले, जमीनजुमला कमावला ते दत्तोबा काहीच म्हणत नाहीत. ‘काम केल्याशिवाय चतकोर भाकरीही नको,’ असं म्हणतात ते उलट.
नकोच आहे आपल्याला वडिलांची एवढी इस्टेट. माणसाला नं पोटापुरतंच हवं! आपल्या वडिलांनी एवढी इस्टेट कमावली, त्याबरोबरच थोडी माणुसकीही कमवायला हवी होती! माणुसकी ही काही बाजारात मिळत नाही, नाहीतर आपल्या वडिलांनी तीही खरेदी केली असती अन् गाठोड्यात बांधून ठेवली असती!
सुनीलनं जेवणाचं ताट वडिलांच्या समोर ठेवलं.
‘‘दादा, आधीच जेवणाला उशीर झालाय. दोन घास खाऊन घ्या अन् मग बोला काय बोलायचंय ते!’’
‘‘भिकारी समाजला का काय मला?’’ असं म्हणत रावसाहेबांनी भरलं ताट लाथाडून दिलं. दत्तोबा पायरीच्या कोपऱ्याला ओट्यावर बसलेले होते. तेच ताट त्यांच्या पुढ्यात सरकत आलं. दत्तोबांनी
त्या ताटाचं दर्शन घेतलं अन् म्हणाले : ‘‘मोठं सरकार, का म्हून अन्नाला लाथ मारली? अन्नाचा कशाला अवमान करायचा?’’
‘‘ऐ भिकारड्या ऽऽ तूच खा! न्हाय तरी माह्या दाराशी कुत्र्यावानी पडलेला हायेसच! जगात तुला हाये तरी कोन? इथंच कुटके मोडत बसलायासा.’’
सुनीलला वडिलांचा राग आला. दत्तोबांची यात काय चूक होती? त्यांचा असा पाणउतारा केला जायला नको होता. तो वडिलांना काही म्हणणार तोच दत्तोबांनी ताट उचललं.
आता तरी दत्तोबांच्या पोटात अन्न जाईल याचा सुनीलला आनंद झाला.
वडिलांनी केलेल्या अपमानापेक्षा ही गोष्ट फार आनंदाची होती. मात्र, दत्तोबांनी ताट गाईपुढं ठेवलं अन् ते त्यांच्या खोलीत जाऊन बसले. सुनील मनातच म्हणाला, माणसानं एवढंही नम्र नसावं! मानी आहेत बिचारे. आपल्या वडिलांनी दत्तोबांचं लग्न लावून दिलं असतं तर ते त्यांच्या घरी सन्मानानं राहिले असते. लेकरा-बाळांचे धनी झाले असते. आपल्या वडिलांनी स्वार्थापोटी दत्तोबांना अविवाहितच ठेवलं. काय तर म्हणे, पोरा-बाळांत लक्ष पांगलं तर शेतीकडे दुर्लक्ष होईल! हे वडिलांचं प्रचंड स्वार्थी धोरण. त्या धोरणाचे बळी हे दत्तोबा. खरंच, आपल्या दारचे डंगर बैल अन् दत्तोबा यांच्यात काय फरक उरलाय? याच दत्तोबांनी आपला जीव वाचवला होता, नाहीतर आपण आज या जगात नसतोही.
* * *

आईनं पूर्वी सांगितलेला तो प्रसंग सुनीलच्या डोळ्यांसमोर पुन्हा उभा राहिला : ‘‘सुनील... लेका, काय सांगू तुला...आसशीन तू चार-सहा महिन्यांचा, तव्हाची गोष्ट...
अशी येळ वैऱ्यावं बी यायाला नगं. तू असा फणाफणा तापलेला. मला काय बी सुचंना. म्या तुला उचाललं अन् दत्तूभावजीच्या दाराशी जाऊन उभी ऱ्हायले.’’
‘‘काय झालं वैनीसायेब?’’
‘‘दत्तूभावजी, आवं हे पोर लई लई फणाफणा तापलंया. मला तं काय करावा ती समजंना, बाई. मी तं सुध हरले! काई करता काई झालं म्हंजी काय करायचं?’’
‘‘काई व्हनार न्हाई वैनीसायेब. जरा धीर धरा.’’
‘‘कसा धीर धरू दत्तूभावजी?’’
‘‘सरकार कुढं गेलंत वैनीसायेब?’’
‘‘त्यायला आजच जत्रा सुचली. गेलंत तमाशाला! आता काय सकाळपरेंत येनार न्हायतं.’’
‘‘आपल्या तं बैलगाडीचं येक चाक बी मोडलंया. सुतारकड देलंय दुरुस्तीला.’’
‘‘जीप घेऊन गेलेत ह्ये...माह्या तं मनात काय काय यिऊन ऱ्हायलंय.’’
‘‘वैनीसायेब, तुमी बिनघोर ऱ्हावा. म्या घिऊन जातो छोट्या सरकारला. माझ्या पाठकुळी द्या बांधून त्येला.’’
‘‘म्हंजी पायी पायी? जवळंय का भावजी दवाखाना? दहा मैलंय! पाय ऱ्हात्याल का?’’
‘‘तुमी नका काळजी करू. धाकल्या सरकारच्या जिवापरास माहं पाय मोठं न्हाईत!’’
‘‘सुनील...लेका, माझा तं रातभर डोळ्याला डोळा न्हाई. सारा जीव तुझ्यापाशी गुतला व्हता. काय नं काय मनात यायालं लागलं. तुझ्या दादांची वाट बघत व्हते सारखी... तमाशा संपला की येत्याल आन् तवताक रातीच्या राती तुला न्यायाचं दवाखान्यात; पर तुहं दादा काय राती आलं न्हाईत! सकाळी दहाच्या वक्ताला आलं. लगीच निंगालो तुला बघायसाठी दवाखान्यात. आईचा जीव लई वाईट रं, लेकरा! डाक्टर म्हन्लं, बरं झालं, येळेवं आनलं, न्हाई तं पोर वाचलं नसतं. तुला यमाच्या दारातून आनलंय या दत्तोबानं, त्यायला आपल्या घरचा गडी समजून अंतर देऊ नगं कंधीच.’’
आईची भाषा ही अशी कळकळीची, पोटातून आलेली. कसं अंतर द्यायचं आपण दत्तोबांना? त्यांच्याकडून तर आपला जीवच उधार घेतलाय आपल्या आई-वडिलांनी! उलट, दत्तोबांचंच कर्ज आहे आपल्या वडिलांवर आणि ते त्यांना कधीच फेडता येणार नाही.
* * *

रात्री सगळ्यांची जेवणं झाल्यावर
सुनील अन् त्याची बायको दत्तोबांना जेवणाचं ताट घेऊन गेली; पण त्या ताटातला अन्नाचा एक घास उचलण्यासाठी दत्तोबा जिवंत थोडेच राहिले होते? ते जग सोडून गेले होते. कुत्र्यासारखं दुसऱ्याच्या दाराशी पडून राहण्यापेक्षा त्यांना मरण जास्त सन्मानाचं वाटलं असावं. सुनील ओक्साबोक्शी रडू लागला. आपणच उपाशी मारलं या माणसाला...दुपारी भाकरीसाठी आपल्या चपलेला पॉलिश करत होते, दत्तोबा. आपण करू द्यायला पाहिजे होतं पॉलिश...सुनीलच्या बायकोच्याही डोळ्यांत पाणी होतं; पण तिनं सावरलं सुनीलला.
सुनीलनंच दत्तोबांचे अंत्यसंस्कार केले. त्यांचा मुलगा होऊन अग्निडाग दिला. दशक्रियेच्या दिवशी पिंडाला कावळा शिवेना. सुनीलनं ज्या चपला नाइलाजास्तव दत्तोबांकडून हिसकावल्या होत्या त्या हातात घेऊन सुनील पिंडाजवळ गेला अन् लगोलग कावळा पिंडाला शिवला खरा; पण आपण दत्तोबांचा मुलगा होऊ नाही शकलो याचं
सुनीलला खूप वाईट वाटलं... मेल्यानंतरही ज्याच्यामुळे आपल्याला दत्तोबांना काम सांगावं लागलं त्या कावळ्याचा सुनीलला अतिशय राग आला! त्यानं एक दगड उचलला व कावळ्याच्या दिशेनं रागानं भिरकावला.
* * *

ही कथा वाचल्यावर तुम्हाला वाटेल की पिंडाला कावळा शिवणं ही एक अंधश्रद्धा आहे. मात्र, एवढंही आठवायला काय हरकत आहे, की आपण रक्ताचं नातं सोडून एवढा जीव कुणाला लावला का? कावळ्याचं काय; तो शिवला तरी किंवा न शिवला तरी मेलेलं माणूस काही उठून बसत नाहीच...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com