राधीची आजी (ऐश्वर्य पाटेकर)

ऐश्वर्य पाटेकर oviasishpate@gmail.com
रविवार, 28 जून 2020

हळूहळू जत्रा पांगू लागली होती. अंधार पडू लागला होता. काशिनाथनं राधीला खूश करण्यासाठी बरीच खेळणी घेतली. ते एकही खेळणं तिला तिची आजी मिळवून देऊ शकत नव्हतं!
‘‘बघ राधे, काय काय घेतलंया मी तुह्यासाठी?’’

हळूहळू जत्रा पांगू लागली होती. अंधार पडू लागला होता. काशिनाथनं राधीला खूश करण्यासाठी बरीच खेळणी घेतली. ते एकही खेळणं तिला तिची आजी मिळवून देऊ शकत नव्हतं!
‘‘बघ राधे, काय काय घेतलंया मी तुह्यासाठी?’’
एरवी, एवढी खेळणी पाहून राधी हरखून गेली असती. आनंदानं गिरक्या घेत नाचली असती; पण तिला आता काहीच वाटलं नाही. आजी नसताना ही सगळी खेळणी तिच्या लेखी कुचकामी होती.

राधीनं चूल-बोळक्याचा खेळ मांडला होता. तिच्या आजीलाही या खेळात तिनं सहभागी करून घेतलं होतं. नाहीतरी तिला प्रत्येक गोष्टीत आजी हवी असायचीच. आजीशिवाय तिचं पानही हलायचं नाही. जगाच्या दृष्टीनं ती तिची आजी असली तरी राधीला तसं काही वाटायचं नाही. राधीला ती अतिशय जवळची, जिव्हाळ्याची मैत्रीण वाटायची. तिच्याय वयाची...! म्हणून तर राधी आजीवर कधी लटके रागे भरायची. दोघींत कट्टीबट्टीचा खेळही चालायचा. आजी-नातीचं हे नातंच खूप वेगळं होतं. आजीनं जरा राधीची गंमत केली. म्हणाली : ‘‘राधाबाई, लई नवरा-नवरीचा खेळ मांडलाया; व्हनारच यक दिस तुझं बी लगीन.’’
‘‘आजी, मी माहं लगीन झालं ना की तुला कनी माह्या घरी घिऊन जाईन!’’
‘‘राधाबाई, तू तुह्या माय-बापाला यकटी. तसं काय व्हायाचं न्हाई बघ.’’
‘‘म्हंजी गं आजी?’’
‘‘आगं, तुहा नवराच घरजावाई व्हऊन यिईन इथं!’’
‘‘कुढं?’’
‘‘इथं, आपल्या घरी.’’
‘‘व्हय? मज्जाच मंग. बरंच व्हईन की. म्हंजी माही आजी बी माह्या बरूबरच राहीन!’’ आजीला पाठीमागून लडिवाळपणे बिलगत राधी म्हणाली.
तेवढ्यात दाराशी एक मोठी गाडी उभी राहिली अन् राधीचा बाप काशिनाथ घरात आला. आल्या आल्या आपल्या आईला जरा रागावूनच तो म्हणाला : ‘‘आई, भर बरं तुहे कपडे.’’
‘‘काय रं, बाबा? कुढं जायाचं हाय? जलदीनं बांधाबांध कराया लावतुयास ती?’’
‘‘तुला जत्रंला धाडावा म्हन्तोय!’’
‘‘काशी, घास-कुटका खाईल आन् पडंल बाबा इथंच सांदीकोपऱ्याला अंगाचं मुटकुळं करून; पर म्हतारपनी नगं असं मला घराभाईर कहाडू.’’
‘‘आई, तुला कुढं म्या घराभाईर कहाडतोय? तुला जत्रंला तं घिऊन जातोय.’’
जत्रा म्हटल्यावर राधीच्या आजीची मनोमन खात्रीच पटली. जे ऐकायला नको ते ती ऐकत होती. तिच्या काळजाची गोधडी उसवली गेली. कारण, तिच्या बरोबरीची कितीतरी म्हातारीकोतारी बायामाणसं गावातून जत्रेच्या निमित्तानं ‘नाहीशी’ झाली होती. जत्रेला जायला कुणाला आवडणार नाही? पण जत्रेला गेलेले कुणीच म्हातारे माय-बाप पुन्हा कधीच परतून आले नाहीत म्हटल्यावर, गाव काय समजायचं ते समजलं.
आपले लेक-सून कधीही आपल्याला जत्रेचा रस्ता धरायला लावतील या भीतीपोटी
म्हातारीकोतारी माणसं धास्तावून गेली होती.
राधीच्या आजीच्या मनात विचार येऊ लागले...‘आयाबायांकडं आपुन मोठ्या इश्वासानं लई येळा म्हनलो व्हतो की, ‘माहा काशी मला आंतर द्यायाचा न्हाई! लई जीव हाये त्याचा माह्यावर; पर आज त्योच वंगाळ वखत दारावर टकटक करतुया आपल्या...’
राधीची आजी काशिनाथला अजीजीनं म्हणाली : ‘‘नगं बाबा, जत्राखेत्रा, न्हाई सोसायची मला. हाडाचा पार चुना झालाया.’’
‘‘आई, तू जिवाची हौस कधी केली न्हाई.’’
‘‘काशी, जी जिवाच्या मानसांपासून तट्कनी तोडून टाकील अशी हौस काय कामाची, बाबा?’’
‘‘तुमी आमाला का जड झाल्या का आत्याबाई?’’ सूनबाई म्हणजेच राधीची आई मध्येच म्हणाली.
‘‘घराच्या कोपऱ्यात ऱ्हाऊं द्या मला उलशिक जागा.’’
‘‘बघा वं, ही म्हतारी काय म्हनून ऱ्हायलीया?’’
काशिनाथला असा काही राग आला. त्यानं आईची दोन लुगडी पिशवीत कोंबली अन् तो आईला म्हणाला :
‘‘चल, आई.’’
‘‘काशी, माह्या कोकरा, म्या तुह्या पाया पडंते; पर मला नगं रं जत्रला धाडूस!’’
काशिनाथ कुठला ऐकतोय? तो निर्दयी झाला होता. त्यानं आईचा हात धरला. मात्र, राधी बिलगली आपल्या आजीला.
‘‘आबा, कुढं घिऊन चालले आजीला?’’ राधीनं वडिलांना विचारलं.
‘‘अगं, जत्रंला घिऊन चाललुया तिला मी!’’
‘‘मंग मी पन येनार जत्रंला...’’
‘‘राधे, नाहक हट करू नगं.’’
‘‘मग आजीला पन न्हाई न्यायायं जत्रंला.’’
राधीनं आजीला घट्ट मिठी मारली. काशिनाथचा नाइलाज झाला. त्याची बायको त्याला म्हणाली :
‘‘येऊं द्या की राधीला बी तुमच्याबरूबर. ती यवढा हट करतीया तं घिऊन जा. यिईन तुमच्यासंग परत.’’
‘‘यिईन तुमच्यासंग परत’ असं आई का बरं म्हटली असावी...आजी बी यिईनंच ना आपल्याबरूबर परत? ती कशाला राहील जत्रंत? जत्रंत कुठं घर असतं का?’ राधीच्या मनात असे विचार आले आणि तिला आपल्या आईविषयी नवल वाटलं. आई एवढी मोठी होऊनसुद्धा तिला हे कसं ठाऊक नसावं...!
* * *

ही ऽऽ मोठी जत्रा भरली होती. माणसांची अन् दुकानांची गर्दीच गर्दी. राधीला खेळणी घ्यायची होती. तिची नजर भिरभिरत खेळणी शोधत होती अन् तिच्या आजीचे मात्र डोळे सारखे भरून येत होते. आपल्या लेकाला अन् नातीला आता आपण शेवटचंच पाहत आहोत हे तिला कळलं. तिनं तिच्या कमरेची पिशवी काढली अन् राधीला जवळ घेत तिचे पटापट मुके घेत ती म्हणाली :
‘‘माहे गोडांबे राधाबाई, ही खर्ची ठीव. तुला आवडंल ती घी.’’
‘‘खर्ची कसली गं? हे तं पैशे हायेत, आजी.’’
‘‘आगं, आपल्या जिवाच्या मानसानं जत्रंखेत्रंसाठी दिलेलं पैसं म्हंजी खर्ची.’’
‘‘आसं व्हय?’’
‘‘कर हात पुढं’’
‘‘आसं काय गं आजी? असूं दी तुह्याजवळच. माह्याकडून हरवून जात्याल. तू हायेस ना माह्याबरूबर? मंग मला जी आवडंल ना ती तू घिऊन दी.’’
‘‘न्हाई बाई. राहूं दी तुह्याकडंच. या जत्रंत म्या हरवले मंग?’’
‘‘आजी, काय बी! आपले आबा हायेत ना आपल्याबरूबर? ते हरवून देत्यान का तुला? आन् तू काही हरवायला राधी थोडीच हायेस! काय वं आबा?’’
काशिनाथ काहीच बोलला नाही. राधीला तिची आवडती खेळणी दिसली.
‘‘बाबा, मला ती भावली घ्यायचीया.’’
काशिनाथनं राधीला तिची आवडती बाहुली घेऊन दिली. राधी बाहुलीत बुडाली. रंगून-गुंगून गेली. काशिनाथनं याच गोष्टीचा फायदा घेत गर्दीची भिंत भेदली अन् आईचा हात धरून तो तिला ओढू लागला. निष्ठुरासारखा!
‘‘आरं काशी, कुढं नेतुया मला?’’ पण त्याला काहीच ऐकू येत नव्हतं! त्याच्या मनाचा दगड झाला होता. त्याला आता कशानंही पाझर फुटणार नव्हता. त्यानं गपकन् गर्दीच्या भोवऱ्यात आईचा हात सोडला अन् गर्दीचं कडं भेदून तो बाहेरही पडला. राधी अजूनही बाहुलीतच गढलेली होती. एवढ्यातल्या एवढ्यात काय घडून गेलं आहे ते तिला काहीच कळलं नाही! आता राधीचा हात धरून काशिनाथ झपझप चालू लागला. आईच्या हाकाही ऐकू येणार नाहीत एवढ्या दूर अंतरावर तो आता आला होता. हाका ऐकू येईनाशा झाल्यावर त्यानं सुस्कारा सोडला!
‘‘आजी, आगं माही भावली पाह्यली का त्वा? किती छानंय!’’ राधी आनंदानं म्हणाली.
पण तिची बाहुली पाहायला आजी कुठं होती? आजी तर जत्रेत ‘हरवली’ होती! राधी घाबरली. कावरीबावरी झाली.
तिनं वडिलांना विचारलं : ‘‘आबा आपली आजी कुढंय?’’
‘‘आरं, हरवली वाटतं! इथं तं व्हती. कुढं गेली?’’ काशिनाथ उगाच इकडे तिकडे पाहत म्हणाला.
‘‘आबा, तुमी आजीचा हात का सोडला? हरवली ना आजी?’’
‘‘राधी, आपली आजी काही आता सापडायची न्हाई!’’
‘‘आसं कसं, आबा? का सापडणार न्हाई? मी शोधील आजीला. ती राधीची आजी हाये. आशी कशी हरवून जाईन?’’
ती एवढुशी पोर आर्ततेनं हाका मारू लागली तिच्या आजीला; पण तिचा बाप माणसांच्या डोंगरापलीकडे सोडून आला होता तिच्या आजीला. त्यामुळे राधीला तिची आजी आता काही दिसणार नव्हती अन् माणसांच्या डोंगराचं काय करायचं हे काही राधीला माहीत नव्हतं. तिच्या पिन्हुल्या हाका आजीपर्यंत कुणीच पोचू देणार नव्हतं. ती हमसून हमसून रडायला लागली. तेवढ्यात जत्रेला आलेला एक माणूस घाईनं काशिनाथजवळ आला. त्याचा चेहरा रडवेला होता. तो काशिनाथला कळवळून म्हणाला : ‘‘आवं, माह्या आईला पाह्यलं का तुमी? लाल पाताळ हाय तिच्या अंगावं. दिसली का तुमाला? सांगा ना, ह्यो बगा, माह्या मोबाईलमधी तिचा फोटू बी हाय. दिसली का कुढं? सांगा ना...’’
‘‘न्हाई तर!’’ काशिनाथ कोरडेपणाने म्हणाला.
तो माणूस लहान मुलासारखा रडत-ओरडत शोधत होता आपल्या आईला.
हा माणूस आपल्या आबांएवढा मोठा असूनही रडतोय याचं राधीला नवल वाटलं.
जराशानं तिला वाटलं, आपल्या बी आबांची आई हरवलीया. मंग त्ये तं कुनाला आसं इचारतानी दिसत न्हाईत. रडत बी न्हाईत न् शोधत बी न्हाईत...
‘‘राधे, चल बाळा, आपल्याला निघायचंया.’’
‘‘आजीला इथं यकटीला टाकून कसं जायाचं, आबा?’’
‘‘हरवलीया ती. आता न्हाई सापडायची!’’
‘‘आसं कसं, आबा? आपुन शोधू आजीला.’’
‘‘राधे, आता मुस्काटात मारीन बरं तुह्या!’’
कसा निष्ठुरंय आपला आबा! तिनं रागानं तिच्या हातातली बाहुली फेकून दिली गर्दीत. काशिनाथच्या नकळत. अन् म्हणाली : ‘‘आबा, माही भावली हरवलीया!’’
‘‘कशी गं यवढी धांदरट तू! शोध, इथंच आसंन कुढं तरी,’’ असं म्हणत काशिनाथही शोधू लागला राधीची बाहुली.
‘‘बाबा, तुमी आजी हरवली तं ती शोधत न्हाई आन् माही भावली मातर शोधून ऱ्हायले! भावली काय, ती परत बी घेता यिईन. आजीनं दिलीय ना मला खर्ची; त्यातून घेता यिईन! पर आजी कशी आनायची परत?
चला, दोघं बी शोधू तिला.’’
***

हळूहळू जत्रा पांगू लागली होती. अंधार पडू लागला होता. काशिनाथनं राधीला खूश करण्यासाठी बरीच खेळणी घेतली. ते एकही खेळणं तिला तिची आजी मिळवून देऊ शकत नव्हतं!
‘‘बघ राधे, काय काय घेतलंया मी तुह्यासाठी?’’
एरवी, एवढी खेळणी पाहून राधी हरखून गेली असती. आनंदानं गिरक्या घेत नाचली असती; पण तिला आता काहीच वाटलं नाही. आजी नसताना ही सगळी खेळणी तिच्या लेखी कुचकामी होती.
‘‘आबा, यात आजीची खेळणी कुढं हायेत?’’
‘‘लई मोठी व्हायाला बघू नगं, राधे! न्हाई तं झोडपून काढीन.’’
‘‘आबा, खरंच मी मोठी झाले ना की तुमाला आन् आईला बी असंच जत्रंला घिऊन यिईन आन् दिईन सोडून जत्रंत!’’
काशिनाथचं काळीज चरकलं. सगळी जत्रा त्याच्याभोवती गरगरली. वाईट-ओखटा भविष्यकाळ त्याच्या बोकांडी बसून उद्याचं भेसूर चित्र त्याला आजच दाखवू लागला. तो खाडकन् भानावर आला! अन् ज्याला त्याला विचारू लागला :‘‘माह्या आईला पाह्यलं का?’’
राधी रडत होती. ‘आजी, आजी’ करत होती.
आता आजी सापडेल की नाही माहीत नाही! मात्र, आजीनं दिलेली खर्ची तिनं हातात घट्ट धरून ठेवली होती. त्यातला एकही पैसा राधी हरवणार नव्हती की खर्चही करणार नव्हती. आजीशी कायमस्वरूपी बांधून ठेवणारं असं काही तरी त्या खर्चीत होतं!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang aishwarya patekar write gawakadchya gosti article