परीक्षा (ऐश्वर्य पाटेकर)

aishwarya patekar
aishwarya patekar

शाळेत जशी परीक्षा द्यावी लागते, तसं आयुष्य हरघडी परीक्षा घेतं अन् या परीक्षेला बसलेलो आम्ही सारेच नापास झालो होतो. रिपिटर होऊन परत परत परीक्षेला बसण्याची उमेद होतीच. अजून किती परीक्षा द्याव्या लागतील तेवढं फक्त माहीत नव्हतं...!

राजा-राणीची, परीची गोष्ट लहानपणी मला कुणी सांगितली नाही, त्यामुळे परीच्या राज्याची कधीच कल्पना करता आली नाही. भुकेच्या मात्र खूप गोष्टी मला माहीत आहेत. खरं तर त्याही कुणी सांगितल्या नाहीत. कारण, या गोष्टी सांगायच्या नसतातच, त्या फक्त भोगायच्या असतात आणि भुकेच्या गोष्टीत असतात फक्त काटेच.
अशाच एका भोगवट्याची ही गोष्ट.
‘‘आई, दरोबस लादन्या सुरू झाल्या. आपुन बी लादनी करून घेऊ.’’
‘‘हावं नं बाई, म्या त्याच इचारातंय; पर मजूर मिळत्याल का?’’
‘‘तसं बी मजुरायच्या हातात फुटक्या कवड्या ठिवनार का?’’
‘‘मग काय म्हनती?’’
‘‘हातुपाती घिऊ. घरच्या घरीच लादनी उरकू!’’
‘‘आई, आक्की म्हनते तसंच करू. इथं आपलेच वांदे हायेत, मजूर कशाचे परवडतेत आपल्यायला?’’ धाकटी बहीण तायडी म्हणाली.
‘‘मला नका धरू तुमच्यात आं. माहीवाली घटकचाचनीची परीक्षाय,’’ तायडीच्या पाठच्या पमीनं तिची सुटका करून घेतली.
‘‘ऐ, घटकचाचनीवाले, म्हाईतंय, काय दिवे लावनारंय.’’
‘‘म्या हुशारंय जरा शाळेत.’’
‘‘ऱ्हाऊं दे. तुही हुशारी तं उतू चाललीया. पास तं काय व्हनार न्हाई.’’
‘‘म्या पन यिईल, आक्का.’’
‘‘कामाचे दडात्या आन् बिनकामाचे उताणे पडात्या!’’
‘‘सांगू का आक्का, तायडीला?’’
‘‘तायडे, तुला म्हाईत न्हाई, माहा भाऊ तं लई कामाचाय. नको हिनवू त्याला.’’
‘‘चला उचला विळे.’’
घरच्या घरी आम्ही साऱ्यांनी आमच्या चंदनपट्टीच्या वावरातल्या एक एकर बाजरीची लादणी सुरू केली. आक्काची शाळा बुडण्याचा प्रश्नच नव्हता. तिची शाळा कधीच सुटली होती. पमी आणि तायडीचीच गैरहजेरी लागणार होती. माईलाही कॉलेजात जाता येणार नव्हतं. मला तर काय, घरी राहायला निमित्तच हवं होतं.
ज्या वावरात आम्ही बाजरीचं पीक केलं होतं, त्याच्यात आतापर्यंत कांद्याचंच पीक आम्ही घेत आलो होतो. खतामुताचं रान असल्यामुळे बाजरी अशी काही वठली की जात्यायेत्याच्या नजरेत भरायची. आई तर म्हणायची, ‘कुनाचं दिसटं न्हाई लागले म्हंजी देव पावला!’
आतापर्यंत तरी या भरल्या रानाला कुणाची दृष्ट लागली नव्हती.
आई, आक्का, माई, तायडी यांनी लादणी करायची, खोळीवर जमा झालेल्या कणसांचा शेणानं सारवलेल्या जागेवर मी अन् पमीनं गंज घालायचा. अशी कामाची विभागणी करून एकदाची लादणी आवरली. डोक्यावरचं ओझं खांद्यावर उतरल्यासारखं आईला वाटलं. मात्र,
बाजरी मशिनमधून जेव्हा काढून होईल तेव्हाच खऱ्या अर्थानं आमच्या खांद्यावरचं ओझं खाली उतरेल.
संध्याकाळी ओट्यावर शिणवठा उतरवत आम्ही सारे बसलो होतो. आक्कानं ज्वारीचा लाह्या भाजल्या होत्या.
खाता खाता पमी म्हणाली : ‘‘आई, आमच्या शाळेची सहल जानारंय येरूळ-अजिंठ्याला. म्या बी जाऊ का?’’
‘‘जाय हं माजे बबडे! येवढं काम केलं माझ्या बाईनं.’’
‘‘चाळीस रुपै फी भराया लागंल.’’
‘‘कधी जानारंय तुही सहल?’’
‘‘पुढल्या म्हैन्यात!’’
‘‘हां, मग काई चिंता न्हाई. तवर बाजरी बी काढून व्हईल मशिनमधून,’’ मध्येच आक्का म्हणाली,
‘‘आई, यंदाच्या दिवाळीला लाडू-करांज्या करू बरं का!’’
‘‘करू बाई, यंदाची दिवाळी चांगलीच साजरी करू, बाजरीला चांगलाच झडवा ऱ्हाईल, येकेक कनीस भारूभार दान्यानं भरलया. उभ्या जन्मात आसं पीक निघालं न्हवतं!’’
अभ्यास करायला बसलेली सगळ्यात थोरली माई म्हणाली : ‘‘आई, माहा बी परकर फाटलाय, बाई. कालेजात हसत्यात मला.’’
तायडी तरी कशाला मागं राहील? तोंडात लाह्यांचा तोबरा भरलेल्या स्थितीतच ती म्हणाली : ‘‘आई, पमी येरूळ-अजिंठ्याच्या सहलीला जानार तर म्या पन जानार. म्या तं आजपत्तोर आपलं गाव सोडून दुसरं गाव कधीसुदीक पाह्यल्यालं न्हाई.’’
सगळ्यांच्याच एकामागून एक मागण्या सुरू होत्या, मग मीही सुरू केलं.
‘‘आई, मला बी रिंगा रिंगाचा सदरा आन् फुल पँट घ्यायचीया.’’
‘‘आरं, तुमच्या नशिबानं बाजरीचं पीक भारीच निघालंय. यंदाची दिवाळी दनक्यात करू.’’

बाजरीचं पीक जणू आईसाठी कुबेराचं धनच. या धनाच्या भरवशावर आई आमच्या कुठल्याच गोष्टीला नाही म्हणत नव्हती. सर्वांच्याच मागण्या पूर्ण होणार असं तिला दिसत होती. दिवाळीच्या पणत्यांनी घर-अंगणात झालेला लखलखाट आई आजच पाहत होती! आमच्या अंगावर आलेले नवे कपडे ती पाहत होती...दिवाळीच्या फराळाचा वास आजच साऱ्या घरभर सुटला होता...!
बाजरीचं पीक काही सहजी उभं राहिलं नव्हतं. त्याच्याही हजार आटाआटी होत्याच. घरचा एकच बैल. त्यातून आसपासचे मळे धुंडाळून औतफाटा जमा करावा लागला. ही सारी कामं गडीमाणसाची; पण आई ही बाईमाणूस असून तिलाच ती करावी लागायची. या सणंगांच्या जमवाजमवीत आईला इतरांचे बांधवरमे धुंडाळावे लागायचे. लोक नेमकेच अशा वेळी आडून पाहायचे. एवढं बरं, आईला नांगरता-वखरता येत होतं. नाहीतर त्याच्यासाठी आणखी दहा जणांचे पाय धरावे लागले असते. एवढी खटपट करून एकदाची पेरणी झाली. निंदणी-खुरपणीची कामं आईनं इतरांकडे पडजीनं जाऊन पूर्ण केली, म्हणूनच आजची बाजरी पाहायला मिळाली होती.
एकेक दिवस करता करता, लादणी होऊन दहा दिवस उलटले तरी धान्य काढायचं मशिन मिळालं नव्हतं. मी आणि पमी रोज चंदनपट्टीच्या मळ्यात जाऊन कणसांची राखण करायचो. ऊन्ह पडलं की कणसं दत्तळ्यानं पसरून ठेवायचो अन् जरासंही आभाळ भरून आलं की धुरपता मोठ्याईकडून आणलेल्या प्लास्टिकच्या कागदानं झाकून ठेवायचो. हे रोजचं काम आम्हा दोघांत आलटून-पालटून सुरू होतं.
आई वणवण करत मशिन पाहात हिंडायची. मशिनवाला दत्तू वायदा करूनही आमच्या मळ्यात येत नव्हता. तशी त्याचीही चूक नव्हतीच. रात्री एक-दोन वाजता त्याचं एखाद्याच्या खळ्यावर कणसं काढायचं काम पूर्ण व्हायचं. तेव्हा दुसरं कुणी बैल घेऊन तयारच असायचं. आमच्याकडे तर एकच बैल अशी स्थिती.

त्या दिवशी केदू गणपतच्या मळ्यात मशिन आलं. केदूदादाचं वावर आमच्या मळ्यापासून फार झालं तर दोन वावरं ओलांडून. केदूदादाची बाजरी काढायाला रात्रीचे बारा-एक वाजणार होते. म्हणून जेवणखाण उरकून आम्ही रात्रीच्या दहा-अकरा वाजताच मळ्यात जाऊन बसलो. केदूदादाची बाजरी काढायला एक वाजला. आमचा हरण्या बैल मशिनच्या ‘जू’ला एका बाजूनं जुंपला अन् दुसऱ्या बाजूनं आई-आक्का. त्यांना जास्त नेट लागू नये म्हणून आम्ही मागून मशिन लोटायला लागलो. काही वावरं सोंगलेली होती, तर काही वावरं गहू-हरभऱ्यासाठी तयार करून ठेवलेली. धसकटं पायांना चावत होती. ढेकळांना पाय ठेचकाळत होते. तसेच ओढत ओढत मशिन आम्ही आमच्या खळ्यावर आणलं अन् नेमका पुंजाराम तळेकराच्या वावरात असलेल्या इलेक्ट्रिक डीपीवर मोठा बार झाला. दिवाळीचा सुतळी बॉम्बच! त्यासरशी वीज गेली.
‘‘इंदूकाकू, आता काई रातीची लाईट येत न्हाई. डीपीवर मोठा फॉल्ट झालाय. सकाळच्याला काढू बाजरी. आता काय मशिन बी तुमच्या खळ्यावर हाये,’’ असं म्हणत दत्तू सायकलवर टांग मारत निघूनही गेला. आलेल्या प्रसंगामुळे आक्का मात्र तणफणली.
‘‘आई, आपल्या कुढच्याबी कामाला मोडता आला न्हाई असं कधी झालं न्हाई! त्या मेल्या लायटीला बरं आत्ताच जायचं व्हतं! आपल्या तं आयुक्षात निस्ती परवड लिहून ठिवलीया, बाई.’’
‘‘आक्काबाई, आयुक्ष मानसाची घडूघटक्या कसोटी पघत असतंया. त्याला काई इलाज न्हाई.’’
‘‘कसोट्या पाह्यला बरे आपुनच सापडलो!’’
‘‘येवढे दिस गेले. आता आजची रात तं आडवी जायचीया!’’
आवतण न धाडताही ढगांनी गर्दी करायला सुरुवात केली. आम्ही गावाकडं जाणारी वाट अंधारात ठेचकाळत तुडवत निघालो होतो. विजेनं गडगडाट करून अवसानघातकी वर्दी दिली अन् आईचं काळीज हललं.
‘‘आता येतो का काय हा म्येला हाता-तोंडातला घास हिसकायला? असं नगं करू बाबा!’’

‘‘आई, काई येनार न्हाई त्यो आन् आपुन कंस बी झाकून ठिवलेत,’’ मी म्हणालो.
‘‘तुह्या तोंडात साखर पडू मूठभर!’’
मूठभर साखर तोंडात पडावी, असं काही आमचं नशीब नव्हतं. आमचा घरात पाय की दारात, पावसानं कोसळायला सुरुवात केली. त्यानं आईची विनंती सपशेल धुडकावली! आम्ही घडोघडी त्याचा अंदाज घेत होतो. त्याचा जोर जराही कमी होत नव्हता. नंतर आशाच सोडली. आमच्या कणसांचं काय झालं असेल मळ्यात, याचीही जाणीव झाली. सारी कणसं पाण्यावर तरंगत वाहून जाताहेत...आम्ही पोरं कागदाच्या होड्या करून पाण्यावर सोडायचो तशी कणसं पाण्यावर ‘होडी’ होऊन चाललीत वाहत आमच्या हातून दूर दूर...असं चित्र उभं राहिलं!
आमच्या सगळ्यांच्याच तोंडचं पाणी पळालं. आशा कोमेजल्या. मी म्हणालो :
‘‘पमे, तू मला सहलीवरून आणणाऱ्या किल्लीच्या ट्रॅक्टरचं काय?
माईच्या परकर-पोलक्याचं काय?
आक्काच्या लाडू-करांज्यांचं काय?
तायडीच्या येरूळ-अजिंठ्याचं काय?
माझ्या रिंगारिंगाच्या सदऱ्याचं काय...?’’
‘‘ऐ काळजिभ्या, नगं आसं काई बोलूस,’’ आई रागानं म्हणाली.
गेली कित्येक वर्षं असा पाऊस आमच्या भागात कधी झाला नव्हता. असा काही कोसळला की महापुरासारखी परिस्थिती गावावर ओढवली. मोठमोठी झाडं उन्मळून पडली. गावात अनेकांच्या घरांची अतोनात पडझड झाली. रातभर तसा आमच्या डोळ्याला डोळा नव्हताच. सकाळी चिखल-गाळ तुडवत मळ्यात गेलो तर काही कणसं दामूअण्णाच्या वावरात, काही विठोबातात्याच्या वावरात, काही आमच्या वावरात साचलेल्या डबक्यात तरंगून आलेली, तर काही चिखलात! एकही कणीस जागेवर नव्हतं..आई तर गपकन् खालीच बसली.
‘‘झोपतंच धोंडा घातला गं म्येल्यानं.’’
‘‘ताटातलंच हिसकून नेलं, बाई!’’असं म्हणत आक्का रडायला लागली.
तिला सावरत आई म्हणाली : ‘‘ऐ आक्के, आसं रडावं का मग? पोरी, येखांद्याच्या कमाईला बरकता नसतीयाच.’’
‘‘मातीमेळवण झालं आई, काई सुदिक उरलं न्हाई.’’
‘‘गप बाई, साऱ्या जगाचंच झालं. आपुन येकटेच न्हाई.’’
‘‘जगाची परस्थिती आपल्यासारखी थोडीच हाये?’’
‘‘जाऊं द्या, म्या तुमाला उपाशी न्हायी ऱ्हाऊ द्येयाची.’’
शाळेत जशी परीक्षा द्यावी लागते, तसं आयुष्य हरघडी परीक्षा घेतं अन् या परीक्षेला बसलेलो आम्ही सारेच नापास झालो होतो. रिपिटर होऊन परत परत परीक्षेला बसण्याची उमेद होतीच. अजून किती परीक्षा द्याव्या लागतील तेवढं फक्त माहीत नव्हतं...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com