गणूचं विमान (ऐश्वर्य पाटेकर)

aishwarya patekar
aishwarya patekar

गौतम त्या माणसाला न्याहाळून पाहून लागला. या माणसाला कुठं तरी पाहिलंय, असं त्याला जाणवलं. तो आठवू लागला. तेवढ्यात ‘‘बुंग...बसा रं जल्दी इमानात. निंगालं बरं का इमान...’’ बुंग करत त्याचं विमान निघालं अन् पोरांचा लोंढा त्याच्यामागं. आपण या माणसाला कुठं बरं पाहिलंय...गौतम पुन्हा विचार करू लागला.

गौतम खरं तर चार दिवसांपूर्वी गावाकडे येऊन गेला होता. पुन्हा इतक्या तातडीनं गावाकडे त्याला यावं लागेल असं त्याला वाटलंही नव्हतं. आईची तब्येत अचानक खालावली होती. तसा फोन त्याला आला अन् त्याला लगेच निघावं लागलं. खरं तर अप्पा गेले तसे आपण आईला म्हणतोय, ‘माझ्याकडे चल, माझ्याकडे चल,’ तर ती ऐकत नाही. तिचा जीव मातीत गुंतून पडलाय. चार दिवसांपूर्वीच आईकडे हट्ट धरला होता आपण.
‘‘आई, तू नाही आलीस तर मीच इकडे येतो कायमचा; नोकरी सोडून.’’
‘‘गौतमा, नगं असा हट्ट करू; न्हाई करमत बाबा मला तुह्या त्या शहरात. दाराची कडी लावून आत बसायचं...नाही आवडत मला ते...’’
‘‘आई, मला काळजी लागून राहते तुझी.’’
‘‘आरं, नगं काळजी करू माही! नानाची माया बी तुझ्यागतच हाये. त्यो घेतो नं माही काळजी. तुही सुमावैनी आईसारखं जपंती मला.’’
अन् आज असा फोन येतो. हे खरं की नाना आणि सुमावहिनी खूप चांगल्या होत्या; तरी गौतमची
सात-आठ दिवसांत गावी फेरी व्हायचीच. कारण, त्याला मातीचा वास नाका-तोंडात भरून घेतल्याशिवाय करमायचंच नाही. शिवाय, लहान मुलाला यावी तशी त्याला आईची आठवण यायची.

तो स्टॅंडवर उतरला. गाव आडमार्गाला होतं. तिथं बस जात नव्हती. तो वाजगाव फाट्यावर येऊन उभा राहिला. तेवढ्यात एक बैलगाडी त्याच्याजवळ येऊन थांबली.
बैलगाडीवाला म्हणाला : ‘‘काय सायब, कुढं जायाचंय?’’
‘‘वाजगावला.’’
‘‘चला मंग, बसा गाडीत; मला म्होरल्या गावाला जायाचंय रेडगावला. मधी सोडतो तुमाला. का तुमी फोरव्हीलरची वाट बघून ऱ्हायलाय? बैलगाडी कह्याची आवडती म्हना तुमाला!’’
‘‘तसं काही नाही.’’
गौतम गाडीत बसला. बैलगाडीत बसण्याची संधी
खूप दिवसांनी चालून आली होती. लहानपणी तर चिक्कार वेळा बसला होता तो बैलगाडीत. फोरव्हीलरला कुठली सर येणार बैलगाडीची? त्याच्या मनात बैलगाडीच्या किती तरी सुखद आठवणी होत्या. गाडीवाल्याला गौतम काही विचारणार तोच गाडीवान उत्साहानं म्हणाला : ‘‘बरं का सायब, शिळी भाकर खाऊन माझं पोर इमानात बसलं आन् आता फारिनला जानारंय पार साता समिंदरापार! आमाला लई कौतुकंय त्येचं! त्येलाच सोडाया आलो व्हतो बसस्टँडवं. भल्या पहाटच्या गाडीनं गेला बी त्यो मुंबैला. तिथून इमानात बसंल आन् जाईल बुंग करीत साता समिंदरापार...’’
हे सांगताना कळकट-मळकट कपड्यातल्या त्या बापाच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले होते. त्याचा ऊर भरून आला होता. मनाला पंख पंख फुटले होते. काय सांगू अन् काय नको, असं त्याला होऊन गेलं होतं.

‘‘तुम्हाला सांगतो, आमच्या सात पिढ्यात कुनी इमान पाह्यलं न्हाई आन् माझं पोर थेट इमानात बसतंय. निसतं बसतच न्हाई तर सायब, फारिनला बी चाललंय नौकरीसाठी. आम्हास्नी तालुक्याचं गाव पाह्यता आलं न्हाई आन् पोर थेट परदेशात! काही म्हना, ही आमच्याच वाडवडलांची पुन्याई! आन् माह्या पोरानं परस्थितीची ठिवलेली जान.’’
‘‘काय करता दादा, तुम्ही?’’
‘‘वाडवडलांनी नेमून दिल्याला शेतीचा गाडा वढीतोय; दुसरं काय करनार? पर माह्या पोरानं नाव कहाडलं! लई नाव कहाडलं, बघा.’’
‘‘मुलाचं शिक्षण काय झालंय?’’
‘‘मोप शिकीवलंय त्येला. पार विंग्रजीबिंग्रजी. विंग्रजीचं ऱ्हाऊं द्या, शाळंचं तोंडसुदिक आमी पाह्यलं न्हाई. पोरगा इंजिनेर झाला, इंजिनेर! आन् शिळी भाकर खाऊन फारिनला गेला. लई मर्जीखोर पोरंय माझं!’’
‘‘शिळी भाकर खाऊन?’’
‘‘हां, त्येचं काय झालं, मुंबैतून त्याला फलाईट व्हती बारा वाजायच्या वक्ती. त्याची आई उठली भल्या पहाटं, तर त्यो म्हनला, ‘मला उशीर व्हईल, शिळी भाकर आसंल ती दी.’ शिळी भाकर खाल्ली नं माह्या पोरानं. पुन्यासारख्या ठिकानी शिरिमंतायच्या पोरांमधी शिकला, पर गरिबीची त्येनं लाज बाळगली न्हाई कधी.’’
गौतमला त्या बापाच्या डोळ्यांतला आनंद मोजता येत नव्हता. आनंद मोजण्याचं मापडं जरी जगात अस्तित्वात असतं तरी ते आनंद मोजण्यात फोल ठरलं असतं. एवढा तो आनंद होता. तो अवकाशाच्या तराजूत तेवढा मोजता आला असता; पण त्यासाठी आकाश तर काही खाली आणता येणार नव्हतं!

गौतम गाडीतून उतरला. शिळी भाकरी खाऊन परदेशात गेलेल्या पोराच्या बापाला त्यानं निरोपाचा हात हलवला. त्यानं हात जोडले. गौतम घरी आला. पाव्हणे-रावळे जमा झालेले होते. तो आईच्या अंथरुणाजवळ गेला. आई उठून बसली.
‘‘आई, उठून का बसलीस तुला त्रास होतोय तर?’’ आईला पुन्हा अंथरुणावर झोपवून त्यानं आईच्या डोक्याला मांडी दिली.
‘‘गौतमा, ल्येका, म्या काही जास्त दिस जगत न्हाई आता.’’
‘‘असं बोलू नकोस आई. मी आलोय नं तुला न्यायला; चांगल्या डॉक्टरांना दाखवू. ठणठणीत बरी होशील.’’
‘‘न्हाई गौतमा, आता नगं आस लावूस.’’
गौतमच्या डोळ्यांत पाणी आलं. त्याला कळून चुकलं की आई आता जास्त दिवस जगू शकणार नाही.
‘‘आरं, रडतोस कशापायी? समदी सुखं उपभोगल्यात. समदा आनंद तुमी लोकांनी दावला मला. आता कशाचा मोह न्हाई. तुझ्या अप्पांनी इमान धाडलंया मला. तुला माहीतंय, माह्याबिगर तुहे अप्पा राहू शकत न्हाईत. चल, तुह्या हातानं मला इमानात बशीव! न्हाई तर तुहे अप्पा रुसून बसत्याल आन् जात्याल इमान परत घिऊन; चल ल्येका, नगं उशीर करूस...,’’असं म्हणत गौतमच्या आईनं त्याच्या मांडीवर आपला देह ठेवला अन् अप्पांचं विमान गौतमच्या आईला घेऊन गेलं...
***

आज एवढी वर्षं उलटून गेली म्हटल्यावर गौतमच्या लक्षात राहिलं असेल का अप्पाचं विमान अन् शिळी भाकरी खाऊन विमानात बसलेल्या पोराच्या बापाचं ‘शिळ्या भाकरीचं विमान’? तर गौतम काहीच विसरला नव्हता. शिळी भाकरी खाऊन विमानात बसलेल्या पोराच्या बापाला तर तो बिलकूलच विसरला नव्हता. गौतम खूप दिवसांनतर गावाकडे येत होता. आई-अप्पा होते तोपर्यंत तो वरचे वर येत असे. मात्र, आई-अप्पा गेले, मग गावाकडे येण्याचं काही कारणच उरलं नाही. स्टँडवर त्याची गाडी थांबली. तो खाली उतरला, तर पोरांचा हा मोठा लोंढा गलका करत इकडून तिकडे धावत होता. एक माणूस तोंडानं विमानाचा आवाज काढत अन् हाताचे पंख करत विमान उडवत पळत होता अन् पोरांचा गलका त्याच्यामागं धावत होता. गौतमनं पोरांना हटकून पाहिलं; पण पोरं कसली ऐकतात? गौतमला कळलं की तो माणूस वेडा झालेला आहे अन् पोरं त्याला उगाच त्रास देत आहेत. गौतमनं चपळाईनं धरलंच एका पोराचं बखोट.
‘‘काय रे, का त्रास देताय त्याला?’’
‘‘आम्ही कुढं तरास देतोय? त्योच आम्हाला म्हनतोय,‘इमानात बसा!’ ’’
बाकीची पोरंही गौतमभोवती गोळा झाली अन् विमान चालवणारा तो माणूसही.
‘‘सायब, सोडा त्येला, न्हाईतर फलाईट हुकंल नं त्येची! त्येला फारिनला जायाचंय; न्हाई तर ऱ्हाईल इथंच शिळ्या भाकरी खात!’’
गौतम त्या माणसाला न्याहाळून पाहून लागला. या माणसाला कुठं तरी पाहिलंय, असं त्याला जाणवलं. तो आठवू लागला.
तेवढ्यात ‘‘बुंग...बसा रं जल्दी इमानात. निंगालं बरं का इमान...’’
बुंग करत त्याचं विमान निघालं अन् पोरांचा लोंढा त्याच्यामागं निघाला.
आपण या माणसाला कुठं बरं पाहिलंय...गौतम पुन्हा विचार करू लागला.
शेवटी त्यानं बसस्टँडवरच्या एका प्रवाशाला विचारलं. बिडीची राख झटकत तो प्रवासी म्हणाला : ‘‘त्यो आमच्या गावचा गणू पानसरे हाय. त्येनं त्येच्या पोराला मोप शिकीवलं. लई हुशार! आमच्या रेडगावात सोडा; पुऱ्या तालुक्यात कुनी फारिनला गेलं न्हाई. गावानं मोठा सत्कार केला त्येचा; पर पोरगं जे फारिनला गेलं ते परत आलंच न्हाई. पार इसारलं माय-बापाला. त्येला लाजच वाटाया लागली माय-बापाची! गणू रोज स्टँडवर जाऊन वाट बघायचा पोराची. लोकांनी लई समजीवलं; पर ह्यो आयकायलाच तयार न्हाई. तशातच येक दिस याड लागलं गणूला. तव्हापासून घरी गेलाच न्हाई त्यो. त्याचं इमान हे असं स्टँडवरच चालंतं. कुनी घास-कुटका दिला की खातो. लई वाईट झालं. सायब, पोटी संतती नसली तरी चालंती; पर जे मायमातीलाच इसारतं आसं पोर दिऊ न्हाई देवानं कुनाला. आसं पोर काय कामाचं?’’
हे सांगताना त्या माणसाचे डोळे भरून आले होते अन् गौतमचेही! तेवढ्यात, शिळी भाकरी खाऊन फॉरिनला गेलेल्या पोराच्या बापाचं विमान गौतमजवळून जाऊ लागलं. गौतमनं त्याला धरलं.
‘‘सोडा सायब, इमान असं मधीच थांबीवता येत न्हाई.’’
‘‘विमानाच्या पायलटला भूक लागली असेल नं!’’
‘‘हां...हां, पायलटला भूक लागली...भूक लागली पायलटला.’’
‘‘जा रं पोरांनू, पायलटचं जेवान हुईपरेंत इमान थांबंल.’’
पोरं बाजूला झाली अन् गणूला घेऊन गौतम जवळच्या उपाहारगृहामध्ये गेला. गौतमची भूक तर मेलीच होती. शिळी भाकरी खाऊन फॉरिनला गेलेल्या पोराच्या बापासाठी त्यानं जेवण मागवलं. खूप वर्षांचा भुकेला असल्यासारखा गणू जेवण करू लागला. मध्येच त्याला ठसका लागला. गौतमनं त्याच्या पाठीवर हात फिरव त्याला पाणी पाजलं.
‘‘सायब, माहं पोर शिळी भाकर खाऊन इमानात बसलं अन् फारिनला गेलं...’’
‘‘........................’’

‘‘तुमाला जायाचं का सायब, फारिनला? म्या चाललोया! म्या घिऊन जाईन तुमाला. पोराला आनाया जायाचंय मला. गर्दी न्हायी व्हनार. एकट्या पोराला कितीक जागा लागंल? आन् इमान काय बैलगाडीवानी बारीक आसतं काय? न्हाई, न्हाई लई मोठं आसतंया. खंडीभर बैलगाड्या गडप व्ह्तील त्येच्यात. तरी बी जागा शिल्लक ऱ्हाईलच. म्या घिऊन जाईन तुमाला!’’

शिळी भाकरी खाऊन विमानात बसणाऱ्या पोराच्या बापाविषयी गौतमला खूप वाईट वाटलं अन् शिळी भाकरी खाऊन परदेशात गेलेल्या पोराला शिळ्या भाकरीचीच लाज वाटायला लागली हे ऐकून तर त्या पोराविषयी तर आणखीच वाईट वाटायला लागलं!

विमान उडवायला गणूच्या हाता-पायांत आता बळ आलं होतं. तो गौतमच्या समोरून विमान उडवत निघून गेला. त्याचं विमान एका जागी थोडंच थांबणार होतं...!
तुम्ही आतापर्यंत किती तरी कंपन्यांची विमानं पाहिली असतील; मात्र शिळ्या भाकरीचं विमान जर का पहिल्यांदाच पाहत असाल तर अशी विमानं गावोगाव खूप आहेत...!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com