करंज्या (ऐश्वर्य पाटेकर)

ऐश्वर्य पाटेकर oviasishpate@gmail.com
रविवार, 2 ऑगस्ट 2020

भाना हातवारे करत इतर प्राध्यापकांना काही तरी सांगत होता. हे पाहून राणूचं काळीज सुपाएवढं झालं. आपला पोरगा तर खूप मोठा साहेब झाला...राणूच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. त्यानं त्याच आनंदाच्या भरात दरवाजा धाडकन् लोटला व तो आत गेला.

भाना हातवारे करत इतर प्राध्यापकांना काही तरी सांगत होता. हे पाहून राणूचं काळीज सुपाएवढं झालं. आपला पोरगा तर खूप मोठा साहेब झाला...राणूच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. त्यानं त्याच आनंदाच्या भरात दरवाजा धाडकन् लोटला व तो आत गेला. सगळे अवाक् होऊन त्याच्याकडे पाहू लागले. भानानं बापाला पाहिलं. तो गडबडला. तरी त्यानं प्रसंगावधान राखलं.

‘‘सीता, आवर की पटदिशी. जसं तुह्या गुणाच्या लेकाला सारं गावच बांधून देनारैस गठुड्यात!’’
‘‘आवं, तसं नव्हं, पर माह्या भानाला करंज्या लई आवडत्या.’’
‘‘तुहा लेक करंज्यायला गेल्या गेल्या बिलगनारचंय.’’
‘‘बिलगलंच. बघत ऱ्हावा तुमी.’’
राणूनं पिशवी घेतली. करंज्यांचं गाठोडं व्यवस्थित ठेवलं. सुदामाचंही नाशकात काही काम होतं. तोही बरोबर निघाला.
आपला लेक भाना याला भेटायला राणू निघाला होता. राणू आता चऱ्हाट वळणारा राणू राहिला नव्हता. तो प्राध्यापकाचा बाप झाला होता. ही ओळख त्याला त्याच्या गुणाच्या लेकानं दिली होती. राणूनं आयुष्यभर चऱ्हाटं वळली. बाजारात नेऊन विकली. याच कष्टांचे पांग त्याच्या मुलानं फेडले होते. राणू स्टँडवर आला. नाशिकला जाणारी एसटी लागली होती. तो एसटीच्या दिशेनं निघाला नाही तोच गणू कांबळेनं त्याला हटकलं.
‘‘ऐ, मास्तराच्या बापा, कुढं निंगाला?’’
‘‘मास्तर न्हाई गणूदा, माझा भाना प्रोपेसरंय कालेजात!’’
‘‘हाव रं गड्या, तू काय आता प्रोपेसराचा बाप झाला. आमी बसलो च्येपला शिवीत. माह्या पोरानं काई साळा केली न्हाई. केली आसती तं तुह्या भानासारखाच मोठ्या नोकरीला लागला आसता. आता बसलाय रापीनं कातडं कापीत!’’
‘‘आरं बाबा, शिकला न्हाई त्येच बरं झालं. च्येपला शिवायला तरी तुहा लेक
तुह्या मदतीला हाताशी हाये. याचं पोरगं गंज मास्तर झालं आसंल, पर येच्या हातातलं चऱ्हाट सुटलं का? अजून बी चऱ्हाटच वळीतो आन् म्हनं प्रोपेसराचा बाप!’’ विष्णूनं चिमटा काढला.

विष्णूचं ऐकलं न ऐकलं करत राणू सुदामासह गाडीत बसला. गाडीही अशी की त्याला आपल्या पोराच्या गावाला वेगानं घेऊन गेली.
राणू गाडीतून उतरला. हातातली पिशवी सुदामाच्या हातात देत, भक्तिभावनेनं त्यानं मातीला डोकं लावलं. तिचं दर्शन घेतलं.
‘‘काय रं ही तात्या?’’
‘‘सुदामा, आता हीच माही कर्मभूमी. ह्याच मातीवं शेवटचा श्वास घ्यायाचा; मग तिचं दर्शन नगं व्हय रं घ्यायाला?’’
‘‘म्हंजी तात्या, तू आपलं गाव सोडनार?’’
‘‘आरं, भाना का आता आमास्नी तिथं ऱ्हाऊ दिईल? भानाचं गाव ते आमचं गाव. सुदामा, ह्योच दिस बघायसाठी हाडं झिजवली, ल्येका!’’
राणू जगातला श्रीमंत बाप झाला होता, त्यामुळे त्याची पावलं दमदार पडत होती. भानाचं कॉलेज आलं. कधी एकदाचा भानाच्या कॉलेजात शिरतोय, भानाला डोळे भरून बघतोय असं राणूला झालं होतं.
आपण येतोय हे भानाला माहीतही नाही...आपल्याला अचानक पाहिल्यावर त्याला केवढा आनंद होईल...आकाश ठेगणं होईल ठेगणं! करंज्यांचं गाठोडं तर तो आपल्या हातून हिसकावूनच घेईल...विचारांच्या अशा तंद्रीतच राणूनं पुन्हा गाठोडं चाचपून पाहिलं.

कॉलेजची इमारत भलीमोठी आणि दगडी होती.
आपलं पोरगं एवढ्या टोलेजंग जागी शिकीवतय पोरान्ला! रस्ता ह्येच आजवर आपल्या पोटाचं साधन हुतं...आपल्या पोरानं आपल्याला रस्त्यावरून उचलून आनलं या जागेत...ज्याचं आपुन कंदी सपान बी बघितलं नव्हतं.
राणूचा ऊर अभिमानानं आणखीच भरून आला. कॉलेजच्या गेटच्या आत तो ऐटीत पाऊल टाकणार तोच गेटवरच्या सिक्युरिटीनं त्याला हटकलं :
‘‘ऐ बाबा, कुढं निघाला? कुणाकड कामंय तुहं?’’
‘‘माह्या पोराकड.’’
‘‘कुढल्या वर्गात शिकंतोय त्याे?’’
‘‘आर्र्, तुमचा काय तरी घोटाळा झालाया. म्या प्रोपेसराचा बापंय. माहा पोरगा इथं प्रोपेसरंय. त्यो शिकत न्हाई, तर त्यो पोरायला शिकीवतो!’’
सिक्युरिटी त्याच्याकडे संशयानं पाहू लागला, तेव्हा सुदाम म्हणाला : ‘‘प्रा. भानुदास खैरनार हायेत ना, त्यांचे ह्ये वडील हायेत.’’
‘‘आसं व्हय! काका, स्वारी बरं का. खरंच, मला माफ करा!’’
‘‘आसूं द्या. तुमची काय बी चुकी न्हाई, कपाळावं थोडंच लिव्हलेलं आसतंय!’’
राणू कॉलेजच्या पायऱ्या चढला. पोर्चमधल्या फरशीवरून चालू लागला. फरशी तर अशी शुभ्र की काचच. तीत तोंड पाहून घ्यावं. राणूनं पायताण हातात घेतलं.
सुदाम म्हणाला : ‘‘तात्या, ही काय करतुयास? त्या च्येपला पायात घाल!’’
‘‘येडा झाला का सुदाम? भानाच्या कॉलेजची फर्ची खराब व्हऊन ऱ्हायलीया.’’
‘‘उलट, तुह्या पावट्या उमटून ऱ्हायल्यात फर्चीवर.’’
“आरं, तिच्या मायला!’’ असं म्हणत राणूनं चपला पायात घातल्या. मीटिंग हॉल आला. राणू तिथं थबकला. काचेची भिंत असल्यामुळे त्याला भाना दिसला. हीऽऽ भारीतली खुर्ची...राजाच्या सिंहासनाची बरोबरी करणारी. त्यावर एखाद्या राजासारखाच भाना ऐटीत बसला होता. बाकी लोकही भारीच होते. मात्र, ते सारे राजासमोर प्रजेनं बसावं तसे बसलेले होते!
भाना हातवारे करत त्यांना काही तरी सांगत होता. हे पाहून राणूचं काळीज सुपाएवढं झालं. आपला पोरगा तर खूप मोठा साहेब झाला...राणूच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. त्यानं त्याच आनंदाच्या भरात दरवाजा धाडकन् लोटला व तो आत गेला. सगळे अवाक् होऊन त्याच्याकडे पाहू लागले. भानानं बापाला पाहिलं. तो गडबडला. तरी त्यानं प्रसंगावधान राखलं.
एक प्राध्यापक म्हणाला ‌: ‘‘कुणी सोडलं रे याला आतमध्ये? हे प्यून कुठं गेले कुणास ठाऊक!’’
प्राध्यापकांमध्ये चुळबूळ सुरू झाली.
‘‘अरे, कोणंय हा म्हातारा?’’
‘‘प्यून लोक फुकटचा पगार घेतात का? एवढी महत्त्वाची मीटिंग चाललीय...’’
‘‘नाहीतर काय? यूसलेस!’’
‘‘म्या भानाचा...’’ आपली पिशवी सांभाळत राणू सांगू लागला.
भानानं बापाला पुढं बोलू न देता सांगितलं : ‘‘ही इज माय सर्व्हंट!’’
‘‘ओह, आय सी’’
‘‘हां, हां. म्या ह्येचा सर्व्हंट हाय!’’ राणू भाबडेपणानं म्हणाला.

भाना बापाला खेचतच बाहेर घेऊन आला अन् रागानं बापाला म्हणाला : ‘‘दादा, तू निरोप न धाडता कसा काय आलास?’’
‘‘आरं, पोराला भेटाया का कुढं निरोप धाडीत्यात?’’
भानानं खिशातून दोन हजारांची नोट काढली. बापाचा हात बळंच हातात धरून त्यात घाईघाईनं नोट कोंबली अन् चिडचिड करत म्हणाला: ‘‘दादा, तू जा बरं! मी येतोच उद्याच्याला गावाकड.’’
‘‘आरं पर...’’
‘‘मला एका मिनिटाचाही वेळ नाही. जरा महत्त्वाची मीटिंगंय.’’
‘‘आरं, तुह्या मीटिंगीचा न्हाई खोळंबा करनार म्या; पर काई बोलशील का न्हाई?’’
‘‘तेच तर सांगतोय...जराही वेळ नाही!’’
‘‘बरं बाबा, पर ह्या करंज्या तं ठुशीन का न्हाई तुह्या आईनं दिल्याल्या?’’ असं म्हणत राणू फडकं सोडायला लागला.
‘‘नको...नको दादा, त्या बी घिऊन जाय!’’
‘‘आरं आसं कसं? तुह्या आईनं लई मायेनं दिलत्या...’’
‘‘ ‘नको’ म्हन्तोय नं मी दादा? काई कळतं का? सुदाम, जा रं घिऊन, दादाला. मी येतो उद्या...’’
केबिनचा दरवाजा लोटून भाना आतमध्ये निघूनही गेला. त्याची मीटिंग सुरू झाली असावी. इकडे राणू अन् सुदामही निघाले.
‘‘पाह्यलं का सुदाम? भानाला उलीसा बी यळ न्हाई. याला म्हन्त्यात काम!’’

खरंतर सुदामाला भानाचा खूप राग आला होता. तो त्यानं आतल्या आत कसाबसा गिळला. त्याला राणूच्या भाबड्या स्वभावाचासुद्धा राग आला. माणसानं इतकंही भाबडं असू नये, असं मनात म्हणत त्यानं राणूच्या म्हणण्याला कसनुसा हुंकार भरला.
‘‘हा नं!’’
बोलत बोलत दोघं गेटजवळ येऊन थांबले. राणूनं आता तरी गप्प बसावं ना? तर नाहीच! तो डबडबल्या डोळ्यांनी म्हणाला : ‘‘सुदामा, डोळं निवलं गड्या, पोराचं सुख बघून. आता मरान आलं तरी चालतंय.’’
‘‘हं’’ सुदामाच्या रागाची तर आता वाफच झाली होती, तरीही त्यानं ती पुन्हा दाबत हुंकार भरला. त्याचा सारा मूडच गेला होता. त्याला राणूविषयी करुणा वाटू लागली.
‘‘आपला ल्येक सायेब झाला. काय त्याचा थाट! त्यो भाना वाटतंच न्हवता, दुसराच कुनी तरी...’’ राणूचं सुरूच होतं.
आता मात्र हद्द झाली अन् सुदामाचा राग उफाळून आला. तो म्हणाला : ‘‘हां तात्या, भाना आता भाना न्हाई ऱ्हायला. त्यो दुसराच कुनीतरी व्हता म्हनून तर त्येनं तुला सर्व्हंट केलं येड्या, सर्व्हंट!’’
‘‘हायेच म्या सर्व्हंट! काय विंग्रजी झोडत व्हता फाडफाड!’’
‘‘तात्या, येवढा कसा रं खुळा तू?’’
‘‘ऐ बाबा? काय आगळीक घडली का माह्याकून?’’
‘‘तात्या, तुला तुह्या त्या प्रोपेसर पोरानं घरगडी केलं, घरगडी!’’
‘‘आरं, कायच्या काय!’’
‘‘आरं येड्या, सर्व्हंट म्हंजी घरगडी!’’

राणूच्या हातातलं करंज्यांचं गाठोडं गळून पडलं. करंज्या विखुरल्या. काही फुटल्या. सुदामानं त्याला सावरलं. एवढ्यात कॉलेजची बेल झाली. पोरांचा लोंढा बाहेर पडला. करंज्या पोरांच्या पायाखाली तुडवल्या गेल्या. राणू डोकं धरून, पायावर उकिडवं बसून पाहत होता. त्याला त्या विखुरलेल्या-फुटलेल्या करंज्यांमध्ये शाळकरी भाना दिसू लागला. त्याची विविध रूपं दिसू लागली. राणूला रडावंसं वाटलं; पण त्यानं स्वत:ला सावरलं. भानानं दिलेल्या दोन हजारांच्या नोटेची राणूनं चुरगळी केली आणि तिथंच टाकून दिली; फडकं तेवढं उचललं...

राणू सुदामासह बसस्टँडवर आला. गावाकडे जाणारी एसटी गाडी लागलीच होती. राणूच्या हाता-पायातलं अवसानच गेलं होतं. भानाला भेटायला येण्याआधीचा त्याचा उत्साह आता मरून गेला होता! तो तसाच पाय ओढत गाडीजवळ आला. गाडीचं दार कसंबसं धरून त्यानं पहिल्या पायरीवर पाय ठेवला...दुसरा पाय अधांतरीच...
सकाळी याच शहरात पाऊल ठेवलं तेव्हा तो एका प्रोफेसरचा बाप होता. आता या शहरातून पाऊल उचलताना तो प्रोफेसरचा बाप राहिला नव्हता. तो बाप या शहरानं हिसकावून घेतला होता.
असं काही राणूच्या मनात आलं होतं का? माहीत नाही!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang aishwarya patekar write gawakadchya gosti article