गुळाचा शिरा (ऐश्वर्य पाटेकर)

aishwarya patekar
aishwarya patekar

रात्री कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात आई माझ्या जखमेवर कुठला कुठला झाडपाला औषध म्हणून बांधत होती अन् मी वेदनेनं कळवळत होतो. आईचे डोळे पाणावले. अक्का, तायडी, पमी माझ्याभोवती बसल्या होत्या. आईचा चेहरा हुंबरून आला होता. ती गलबलून म्हणाली : ‘‘आसा नादीपना का करतो माह्या वासरा?’’

माझं नाव शाळेत घातलं तेव्हा गूळ-खोबरं वाटलं गेलं नाही की गावभर दवंडी दिली गेली नाही. शाळेच्या पहिल्या दिवशी माझ्या अंगात ना नवा सदरा होता, ना नवी चड्डी. चड्डी जुनीच, फाटलेली. पाठीमागं दोन्ही बाजूंना दोन थिगळं. सदऱ्याचीही पार अवस्था झालेली. गावडेगुरुजींनी माझं नाव शाळेत दाखल करून घेतलं. धड पाटी, ना दप्तर. पाटीच्या लाकडी चौकटीचे कोपरे गळून पडलेले होते. नुसतंच खापर उरलं होतं. ही पाटी तशी अक्काची; मग तायडीनं वापरली, नंतर तिच्या पाठच्या पमीनंही आणि मी पमीच्या पाठचा म्हणून आता मलाही तीच पाटी!
सिंधूबाईच्या उकिरड्यावरून हुडकून आणलेल्या कोळशानं अक्कानं घासून पाटी लख्खं केली. खोबऱ्याचं तेल आमच्या घरात आणलं जातच नव्हतं. आईनं गोडेतेलच माझ्या डोक्याला चोपडून दिलं, ते एवढं की ते तोंडभर ओघळून तोंड चमचमू लागलं! शाळेच्या त्या नव्या दुनियेत मी पार भांबावून गेलो. एखादा चोर बसावा तसा मी वर्गात बसलो. अक्का बाहेर व्हरांड्यात बसली होती.

आमच्या शाळेला इमारत कुठली आलीय त्या वेळी? मारुतीचं पडकं देऊळ हीच आमची शाळा! सगळ्यांना या शाळेचं फार अप्रूप. शाळेचं घड्याळही खडूस! त्याचा काटा जराही पुढं सरकत नव्हता. नाहीतर शेळ्या चरायला रानात गेलं की कधी दिवस बुडायचा कळत नसे. शाळेतला दिवस तर बुडायलाच तयार नव्हता. तासात बसलेल्या बैलासारखा आडेल; नाहीतर झिंग्याच्या म्हशीसारखा पाण्यात बसल्यासारखा सुस्त. कसातरी घड्याळाचा काटा पाचावर गेला अन् शाळा सुटल्याची घंटा झाली. मला फार आनंद झाला. खूप मोठ्या कोंडवाड्यात आपल्याला बळंच आणून बसवलंय असं वाटलं. अखेर कोंडवाड्याचं दार उघडलं. मी मुक्त झालो!

शाळेत एक बरं झालं की मला सटूबईच्या बरडावरचा पग्या, बारवेवरचा संतू , कवण्याखोरातला दत्तू, शेडावरचा झिंग्या असले सोबती मिळाले. एका नव्या दुनियेची ओळख झाली. रस्त्यानं चालता चालता अक्का सांगू लागली : ‘‘भाऊ, नाव काढ दुनियेत, शाळा शिकून!’’
‘‘व्हय.’’
‘‘आपल्या आईनं लई कष्ट केल्यात, तिचं पांग फेड.’’
‘‘व्हय.’’
‘‘शिकून सायब व्हं.’’
‘‘व्हय.’’
‘‘न्हाई तं तू पोलिसच व्हं.’’
‘‘व्हय.’’
‘‘आपल्या आजीला, बापाला तुरुंगात डांब!’’
‘‘व्हय.’’
‘‘त्या आजीनं मेलीनं आपल्या बापाचं दुसरं लग्नं लावून दिऊन संसार मोडला आपल्या आईचा. चांगला धडा शिकीव त्यायला.’’
‘‘व्हय.’’
‘‘आपलं आपन गुमान शिकायचं.’’
‘‘व्हय.’’
‘‘कुणाशी उगी न्हाई का दुगी न्हाई.’’
‘‘व्हय.’’
आणखी खूप उपदेश अक्कानं केला. तो काही मला कळला नाही. डोक्यात शिरला नाही. तरी मी अक्काला ‘व्हय, व्हय’ म्हणत राहिलो.
घरी आलो. बापानं पिऊन राडा केला होता. तो आईला लाथा-बुक्क्यांनी मारत होता. आई मुकाट गाईवानी मार खात होती. तायडी ओरडत होती. पमीही. माझाही सूर त्यांच्या सुरात मिसळला गेला. सारं गाव जमा झालं होतं. जत्राच जत्रा. बिनपैशाचा तमाशा...असा माझा शाळेचा पहिला दिवस!
* * *

इयत्ता सहावीपर्यंत कसाबसा मन मारून मी वर्गात बसलो; पण मग मनच लागेना. चित्तं ठैरेना. रोज वेगवेगळी कारणं काढत मी शाळेत जाणं टाळायचो. कधी पोटदुखी, तर कधी डोकंदुखी. कधी काय तर कधी काय!
‘शाळेला आज सुटी आहे,’ अशी थाप मारून मी त्या दिवशी घरी बसलो. संप्या, गुण्या बोलवायला आले.
‘‘काकू, भावड्याला शाळेत बोलीवलंय गावडेगुरजीनं.’’
‘‘म्हंजी? साळंला सुटी न्हाई व्हय?’’
‘‘कोन म्हनी?’’
मी मूग गिळून बसलो. चाकटलो.
‘‘आईसंगं खोटं बोलतो व्हय रं, इपितरा? बापाचंच बेणं! तूही तसाच निपाजला व्हय रं? झालं तव्हाच मेलं बरं न्हाई, ऱ्हायला माहा जीव खाऊन!’’
माझी अवस्था पाहण्यासारखी होती. आईनं चंडिकेचा अवतार धारण केला होता. आता माझं काही खरं नव्हतं. एक शिवी हासडून आई दरडावून म्हणाली :
‘‘भावड्या, साळंत नीघ, चल, उच्यल दप्तर.’’
‘‘म्या न्हाई जानार.’’
‘‘घरी ऱ्हाऊन काय करशीन?’’
‘‘मला न्हाई जायाचं साळंत.’’
‘‘बिनलाज्यासारखा वर तोंड करून बोलतोय शिप्तरतोंड्या.’’
आईनं पाठीत निबर धपाटा घातला. तरीही मी ढिम्म. जे होईल ते होईल; पण शाळेत जायचं नाही असा निर्धार करून मी भुईला पक्का रोवून बसलो. आईही जिद्दीला पेटली. माझा खवाटा धरून ती मला फराफरा ओढू लागली.
‘‘कसा जात न्हाई तेच म्या पघते. न्हाई साळून काढला तं काह्ये!’’
आपली आता काही धडगत नाही हे मला पुरतं कळून चुकलं. मी हात-पाय गाळले; मात्र उंबऱ्याला येऊन अडलो. आईला ओढणं शक्य होईना. आईनं काही उपाय शोधायच्या आतच मी संधी साधली. उंबऱ्याला पायाची अट लावून आईच्या हाताला हिसडा देऊन, पुन्हा कोपऱ्यात पळालो. कोपऱ्यातला खांब कवळीत धरला. त्याला पक्का चिकटलो. घोरपडीसारखा. आता तोच एकमेव माझा आधार. आईनं दप्तर आणलं : ‘‘धर दप्तर. बऱ्या बोलानं साळंत नीघ.’’
‘‘म्या न्हाई जानार.’’
आईनं लाथ घातली. मी खांब सोडला. धुधाट पळत सुटलो दरवाजातून बाहेर. आईनं लोखंडी फुंकणी उचलली. लागली माझ्या मागं. ती माघार घेणार नव्हती. मीही तिचाच लेक.
पळता पळता आई म्हणाली : ‘‘भावड्या, मागं फीर. फुकनी पाह्यली का? फेकून मारीन म्या.’’
मी वळलोच नाही. आईची सहनशीलता संपली. आईनं मला फुंकणी फेकून मारली. लोखंडी फुंकणीची एक बाजू माझ्या पोटरीत सहजी रुतली. मी कळवळून पडलो. आईनं खसकन् तिच्या लुगड्याचा पदर फाडला. भळभळत्या जखमेवर बांधला. एवढं लागलं तर आईनं थांबावं ना!
पण नाहीच. ती गण्याला म्हणाली : ‘‘गण्या, पघत काय बसलाय? दप्तर आन त्याचं.’’
खूप मोठी शिक्षा भोगायला मी कोंडवाड्याच्या दिशेनं लंगडत लंगडत निघालो..
***

रात्री कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात आई माझ्या जखमेवर कुठला कुठला झाडपाला औषध म्हणून बांधत होती अन् मी वेदनेनं कळवळत होतो. आईचे डोळे पाणावले. अक्का, तायडी, पमी माझ्याभोवती बसल्या होत्या. आईचा चेहरा हुंबरून आला होता. ती गलबलून म्हणाली : ‘आसा नादीपना का करतो माह्या वासरा?’’
‘‘म्या न्हाई जानार साळंत, ना धड सदरा, ना चड्डी. पोरं हसत्या मला.’’
‘‘त्ये येवढं का मनाला लावून घियाचं, लेकरा? हसूं दी की!’’
‘‘म्हनं, हसूं दी की. पोरं मला ‘फाटका’ म्हनत्या, त्याचं काय?’’ मी गालाचा चंबू करत म्हणालो.
‘‘येवढंच ना?’’
‘‘फाटका म्हनत्या, फाटका’’ मी रडक्या रागात म्हणालो.
‘‘कळलं माह्या लेकरा...आरं, तुला फाटेल म्हनत्या, पर बाटेल तं न्हाई म्हनत ना? तुह्या आईला बी लोक फाटेल म्हनत्या, पर बाटेल तं न्हायी म्हनत?’’
आईचं बोलणं माझ्या काही ध्यानात आलं नाही हे तिचं तिलाच उमगून आई म्हणाली : ‘‘तुला नवा सदरा, नवी चड्डी बी घिईन; पन साळा शीक.’’
‘‘मला न्हाई शिकायची साळा. साळा शिकून कुनाचं भलं झालं, तं माहं व्हनारंय?’’
‘‘पुन्ह्यांदा तीच! ल्येका, साळा शिकून तू शाना व्हशील!’’
‘‘तू साळा बी न शिकता शानी कशी हायेस?’’
‘‘कशाची शानी, ल्येका? म्हनून तं परुडे झाले माह्या आयुक्षाचे. शिकले आसते चार बुकं तं शिलाईकाम केलं नसतं का मशिनीवर? लोकायच्या वावरांत अशी हाडाची माती नसती करावा लागली. माझ्या अडानीपनाचा गैरफायदा उच्यालला तुह्या बापानं म्हनून तं माहं आयुक्ष मातीत गेलं. हेच दिस तुह्या वाट्याला नगं म्हनून तू साळा शीक.’’

बापाला आई शिव्या घालत होती. त्याच्या कुळाचा उद्धार करत होती. मी फक्त ऐकत होतो. मला शाळा शिकायची नव्हती; पण आईचं दु:खही पाहवत नव्हतं. आईच्या दु:खावर दुसरा काही तरी उतारा हवा होता. मला शाळा नको होती. त्यापेक्षा मला शेती करावीशी वाटत होती.
‘‘आई, मला न्हाई शिकायची पर साळा. म्या शेती करनार.’’
‘‘मातीत सोनं व्हयाचे दिस आता गेले, पुता. आता मातीत माती व्हते जिनगानीची! निऱ्ही माती! म्हनून सांगते, लई आनुभव इकत घ्याया लागत्यात. म्हनून शीक, मोठा व्हं. मातीचं नाव नगं काढू पुऱ्या जिंदगीत! माह्या आयुक्षाचं मात्यारं झाल्यालं दिसत न्हाई का तुला? आजून तरी शाना व्हं. मातीला तुही मती नगं खाऊ दिऊ! चार बुकं शीक. भलं व्हईल तुहं,’’ असं म्हणत आई रडू लागली.

काय करावं ते मला समजेना. तिचा त्रागा खरा होता. तिचा सल खरा होता. आणि, मला शाळा नको होती हेही खरं होतं. मला माती प्यारी होती. आईनं मांडलेलं गाऱ्हाणंही खरं होतं. मला ते कळत होतं; पण उमगत नव्हतं हेच खरं!
‘‘तुह्या बापानं, आजीनं, चुलत्या-काक्यांनी चिंध्या केल्या रं माह्या जिन्याच्या, चिंध्या! जोडता जोडवत न्हाईत रं. अस्तरावर अस्तर टाचते; पर काय उपेग? ते तं फाडायलाच टपल्याले. आन् तू येक असा! तुह्यावर तं माही सारी मदार हाये. मंग सांग बरं, तूच जर का आसा आडून बसला तं म्या कुनाचं तोंड पघायचं?’’
आईनं तोंडाला पदर लावला. आम्ही भावंडं कावरीबावरी झालो. आई कुठल्या संकटानं वाकणारी नव्हती हे मी पाहत आलो होतो. ती आमच्या मोडणाऱ्या घराची मेढ होती. किती तरी दु:खं तिनं झेलली होती. रडणं तिला माहीत नव्हतं. माझं मलाच फार वाईट वाटलं. न रडणाऱ्या आईला आपण रडायला लावलं म्हणून. मी आईच्या पुढ्यात जाऊन म्हणालो : ‘‘आई, रडू नगं. खरंच रडू नगं. म्या जाईन साळंत. खरंच जाईन!’’
आईनं आवेगानं मला खसकन् कुशीत घेतलं. ती अजूनच हुंदके देत रडू लागली. रडली, रडली अन् शांत झाली. माझ्या पोटरीची जखम निवळत गेली. अक्का, तायडी, पमी तिघीही आम्हाला बिलगल्या. आईच्या आभाळानं
आम्हा सगळ्या भावंडांना कवेत घेतलं. आईनं गुळाचा शिरा केला. कडू कडू वाटणारा दिवस गुळचट होत गेला. आणखीच गुळचट..
‘उद्यापासून नितनेमानं शाळेला जाईन,’ हा वसा घेऊन मी आईच्या कुशीत निवांत झोपी गेलो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com