पोशिंदा (ऐश्वर्य पाटेकर)

aishwarya patekar
aishwarya patekar

होता-करता सारंच गाव आयुष्य पाठीवर घेऊन निघून गेलं. उरलं एकटं दादांचं घर; पण दादा अडून बसले. ते काही केल्या गाव सोडायला तयार नव्हते. रखमाकाकू दादांच्या पुढ्यात बसल्या अन्‌ जमीन टोकरत म्हणाल्या : ‘‘म्या काय म्हंते, सारं गाव रिकामं झालंया. आपुनच उरलोय; आपुन बी जाऊ...’’

दुष्काळ असा की राक्षसागत अक्राळविक्राळ. माणसांनाच खायला उठला होता. त्याच्या महाकाय तोंडात तो सगळंच घ्यायला लागला. दाताखाली काय काय कराकरा चावून टाकत होता...त्याची गणती करायची कशी अन्‌ कुणी? गणती करायला माणूस तर शिल्लक राहायला हवा. आधी गुराढोरांच्या चाऱ्याची चिंता; नंतर तोही संपून गेला! गवताची वाळलेली काडी उरली नाही. दावणीच्या जित्राबांच्या गळ्यात चिठ्ठ्या बांधून ती सोडून देण्यात येऊ लागली. दावणीच्या जित्राबांसाठी जीव तीळ तीळ तुटू लागला. गव्हाणी रित्या झाल्या. गव्हाणीतले मुके खुंटे पाहून काळजात कालवाकालव होऊ लागली. ज्याचा जीव गावात गुंतून पडू लागला, त्याला इतरजण बळजोरीनं गाडीत घालू लागले. त्याचे पाय मातीत रुतून पडले. मातीला कवटाळून त्यानं फोडलेला हंबरडा मनं हेलावून टाकू लागला. घर न्‌ घर माणसांशिवाय ओस पडू लागलं.
ज्या दादांनी गावाला शेरापाण्याला लावलं, असा साऱ्या गावाचा हा पोशिंदा...त्याच्या दारीसुद्धा ही कथा सुरू झाली होती. ती सहजी संपणारी नव्हती.

गाईच्या गळ्यात पडून लहानगा शरू रडत होता. मोठ्याधाट्यांची आसवं पापण्यांआड दडली होती अन्‌ गळ्यात हुंदके अडले होते. शरूनं हंबरडा फोडला होता. त्याच्या कोवळ्या हंबराचे चर भेगाळलेल्या भुईला आणखीच तडे पाडत गेले. कनवाळू काळजाची माती कलाकला उलत गेली. तिला आता गिलावा नाहीच...
‘‘आपली कपिली सोडायची न्हाई,’’ शरूनं रडता रडता जाहीर करून टाकलं.
‘‘शरू, ऐ लेकरा, आरं ती खुट्यावरच मरून जाईन अशानं.’’ रखमाकाकूंनी डोळे पुसत त्याला समजावू पाहिलं.
‘‘कुढं का व्हईना, तिला गवतकाडी घावंल आन्‌ जतंल बिचारी,’’ थोरला लेक म्हणाला.
‘‘न्हाई सोडायची, म्हंजी न्हाई सोडायची. सांगा वो दादा यांना,’’ शरू हटायला बिलकूल तयार नव्हता.
दादांचे डोळेही भरून आले. साऱ्या गावाला दादांचा आसरा; पण ते दादाही आज असहाय्य होते. थोरल्या सुखदेवानं शरूला बाजूला ओढलं अन् कपिला गाईला सोडून देण्यात आलं. शरूचं चिमुकलं आंदोलन निवलं...त्याचा चिमुकला हंबरडा हतबल ठरला...शरू कपिलाला कायमचा दुरावला...
होता-करता सारंच गाव आयुष्य पाठीवर घेऊन निघून गेलं. उरलं एकटं दादांचं घर; पण दादा अडून बसले. ते काही केल्या गाव सोडायला तयार नव्हते. रखमाकाकू दादांच्या पुढ्यात बसल्या अन्‌ जमीन टोकरत म्हणाल्या : ‘‘म्या काय म्हंते, सारं गाव रिकामं झालंया. आपुनच उरलोय; आपुन बी जाऊ. आता माती धरून बसन्यात काई हंशील न्हाई.’’
‘‘हरी, हरी...’’ दादा डोळे मिटून घेत म्हणाले.
‘‘काय ठरीवलंय तुमी? आमाला बी कळूं द्या तरी...’’
‘‘मी कोन ठरीवनारा? सारं त्याच्या हातात. त्यानं ठरवलं तं‌ माती हिर्वी व्हईल आन्‌ गाव बी जतंल.’’
‘‘काई गाव जतनार न्हाई; सोडा मव्ह मातीचा.’’
‘‘रखमा, न्हाई निघायचं माहं पाऊल; न्हाई सुटायची माती.’’
‘‘मग मरता का मातीला कवटाळून?’’
‘‘हरी, तूच वाचीव रं बाबा आता ह्ये गाव,’’ ते पुन्हा डोळे मिटून बसले.
‘‘ ‘हरी, हरी’ करत मारून टाका साऱ्यायला; मानसानं येवढं बी हेकेखोर नसावा.’’
‘‘रखमा, आनखी एक दिस वाट बघू...’’
‘‘दोन दिसांपून चूल पेटली न्हाई. दाताखाली धरायला घरात चार दानं उरलं न्हाईत.’’
‘‘जगू कसं बी.’’
‘‘न्हाई बाई, हेका सोडा. आयुक्षभर तुमचं आयकत आले.’’
***

तिन्ही लेकांच्या जिवाची कालवाकालव झाली. त्यांना ठाऊक होतं की आपले दादा फार जिद्दी आहेत. ते काही गाव सोडायचे नाहीत. तिन्ही सुना खाली मान घालून उभ्या. लेका-सुनांच्या वतीनं रखमाकाकू दादांशी बोलत होत्या अन्‌ त्यांना त्यांच्या डोळ्यांसमोर आपले लेक ‘भूक, भूक’ करत माना टाकत आहेत असं चित्र तरळलं. दादांसमोर रखमाकाकूंना हार मानावी लागणार होती. हार मानली तर डोळ्यांसमोर तरळलेलं चित्र खरं होणार होतं म्हणून शेवटचं अस्त्र रखमाकाकूंनी वापरून पाहिलं.
‘‘आजची रात काढायचा तुमचा जर इच्यार आसंलच तं‌ ती बियानं तरी करा माह्या हवाली. जात्यावर दळून काढीते. व्हतीन तेवढ्याच्या चार-दोन भाकरी. आजची रात तरी निगंल.’’
दोन शेर बियाण्याचं नाव काढताच दादा असे काही कडाडले की त्यांची खूप मोठी दौलत जणू लुटली जाणार होती. पीक-पाण्याची सृष्टी निर्माण करण्याचा त्यांच्या लेखी तेवढाच तर एक धागा होता.
तो धागाच असा निसटला तर सृष्टी कधीच हिरवी होणार नाही. तिच्या सर्जनाचा मार्गच बंद होईल! मग गावात राहूनही उपयोग काय? दादा रागानं थरथरले. त्यांचं हे रूप रखमाकाकूंसाठी नवं होतं. तरी मरणसागरातला हा जिवंत राहण्याचा ओंडका त्यांनी पक्का धरून ठेवला होता! दादांची कुठलीच मात्रा चालू द्यायची नाही असा रखमाकाकूंनी निश्चयच केला होता जणू. गाव सोडायच्या निर्णयापासून तसूभरही मागं हटायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं.
‘‘त्या दोन शेर बियान्याला हात लावायचा न्हाई, सांगून ठिवतो,’’ दादांच्या रागाची वीज कडाडली.
‘‘आमी मेलं त्‌ चालंल बा!’’ रखमाकाकू फणकाऱ्यानं म्हणाल्या; पण आता त्यांचा इलाजच खुंटला होता. दादा उठले. गाडग्यात ठेवलेलं बियाणं त्यांनी चाचपून पाहिलं. नव्हे, ते गाडगं ते स्वतःजवळच घेऊन बसले. भुकेचं काही सांगता येत नाही; हेच बियाणं उरलंय, ज्याच्या जिवावर आपल्याला गाव उगवून आणता येणार होतं. त्याच्याच भाकरी करून खाल्ल्या तर पाऊस आला तर पेरायचं काय? दादांना वाटत होतं, साऱ्यांनी आजची रात्र दम धरावा; पण नाहीच पाऊस पडला तर काय, या विचारानं सारा दुष्काळ त्यांच्या अंगावर धावून आल्यासारखा झाला. तो इतका जिव्हारी लागला की दादांचं भलंथोरलं आभाळ गदगदलं. बियाण्यांचं मडकं कवटाळून ते असे काही आरंदळून उठले की लहान मुलासारखं रडत राहिले. रखमाकाकूंनी ते हंबरणारं आभाळ सावरलं!
जराशानं रखमाकाकूंनी जड मनानं आपल्या धाकल्या लेकाला, बैलगाडी गळा घालून आणायला लावली. सारेच एकेक करत बैलगाडीत जाऊन बसले. लहानगा शरू काही तयार होईना. तो दादांना जाऊन बिलगला.
‘‘दादा, तुमी पन चला ना आमच्यासंगं.’’
‘‘न्हाई शरू, मला थांबलं पाह्यजे; न्हाई तं गाव कसं तगनार?’’
‘‘न्हाई दादा, तुमी न्हाई आले तं मी पन न्हाई जानार. का गं आजी?’’
‘‘शरू बाळा, दादा तुला लाडू घिऊन येत्याल मागून.’’
‘‘हां, दादा?’’
‘‘तुह्या दादांनी तुहा कुढला हट पुरवला न्हाई?’’
‘‘माह्या दादांसारखे दादा न्हाईचैत आख्ख्या दुनियेत.’
दादांनी हुंदका आतल्या आत दाबला. शरूला सुखदेवानं गाडीत बसवलं अन्‌ तिन्ही लेक आईसाठी घोटाळले.
थोरला सुभाष म्हणाला : ‘‘चल्, बय.’’
‘‘मी कशी येनार लेकायवो, धन्याला सोडून?’’
तिन्ही लेकांच्या काळजाची कालवाकालव झाली. मनाची माती उलली अन्‌ शेवटची बैलगाडीही गावातून निघून गेली.
गाव जगवण्यासाठी गावाचा पोशिंदा तेवढा मागं राहिला. त्याची सावली होऊन जगणाऱ्या रखमाकाकू...पहाटच्याला सूर्यातळी वीज चमकली अन्‌ पावसाच्या धाराही कोसळू लागल्या. दादा ताडक्‌न उठले. त्यांनी रखमाकाकूंना उठवलं.
‘‘रखमा ऽऽ रखमा ऽऽ ऊठ, ऊठ...’’
‘‘काय झालं?’’
‘‘आगं, मेघराजा बरसून ऱ्हायलाय...’’
‘‘हाव नं बाई!’’ रखमाकाकूंचाही ऊर आनंदानं भरून आला.
‘‘रखमा, रखमा...पोरांनी आजची रात भूक मारली असती तर!’’
‘‘.............................’’

पावसाचा जोर असा काही वाढला की आभाळच्या आभाळ ढासळून भुईवर येऊन आदळतंय जणू. खिडकीतून विजेचा उजेड घराला थरथरून सोडत होता! दादांच्या अंगात सत्तर हत्तींचं बळ आलं होतं. गावाचा हा पोशिंदा आनंदानं नाचू लागला होता. रखमाकाकूंना वाटलं की आपल्या धन्याला वेड लागलंय.
त्या म्हणाल्या : ‘‘आवं, काय नाचताय ल्हान पोरागत?’’
‘‘रखमा...आगं, तू बी नाच! समदी सृष्टीच नाचू लागलीया,’’ रखमाकाकूंचे दंड धरून दादा नाचू लागले.
‘‘तुमचं तं काई तरीच बाई, शोभतं का तुम्हाला?’’ रखमाकाकू नव्या नवरीसारख्या लाजल्या. उभ्या आयुष्यात नवऱ्याला एवढं आनंदी होताना कधी पाहिलं नव्हतं; पण हा आनंद मावेल असा पदरही नाहीये आपल्याजवळ याचीही जाणीव त्यांना झाली.
‘‘रखमा, माझा गाव वाचला बघ...माझा गाव वाचला,’’ असं म्हणत दादा आणखीच नाचू लागले. विजेचा असा काही कडकडाट झाला की ‘आसपास वीज कोसळली असावी,’ असं म्हणेपर्यंत खिडकीतून विजेचा लोळ घरात आला. थेट दादांच्या खांद्यावर बसला. दादा कोसळले. अर्धे होरपळले. रखमाकाकूंनी हंबरडा फोडत दादांना मांडी दिली. दादा शेवटचं म्हणाले : ‘‘रखमा, तू गाव वाचव! आता गाव वाचवायची जबाबदारी तुह्या येकटीची. हे दोन शेर बियानं मोघून दे मातीत!’’
‘‘न्हाई, आसं नका बोलू निर्वानीचं...,’’ रखमाकाकू जड अंतःकरणानं म्हणाल्या.
‘‘रखमा, माझी शपथंय तुला. गाव वाचलं पाह्यजे...,’’ असं म्हणत दादांनी मान टाकली अन्‌ ते बैलगाडीशिवाय गावातून कायमचे निघून गेले. रखमाकाकू सुन्न झाल्या.
दादांचे अंत्यसंस्कार करायला गावात उरलंच कोण होतं? रखमाकाकूंनी कुंकू पुसलं. बांगड्या फोडल्या अन्‌ पदर कमरेला खोचत एकटीनंच दादांवर अंत्यसंस्कार केले. दुखवटा धरून न बसता, चार दिवसांनी वाफसा आलेल्या मातीत बियाणं हातानंच मोघलं... रखमाकाकूंचं पीक उगवून आलं. पाखरांच्या चोचीला सुगावा लागला तसं हळूहळू गावही गावात परतून आलं. रखमाकाकूंनी हिरव्या पिकाला हात जोडत पोरांना म्हटलं : ‘‘हात जोडून दर्शन घ्या तुमच्या बापाचं.’’
लेका-सुनांनी हात जोडले. दादा खरोखरंच पिकातून उगवून आल्यासारखे; हिरव्या पानांच्या हातांनी आपल्या लेकरांसकट गावाला आशीर्वाद देत होते! लहानगा शरू आजोबांच्या मांडीवर बसल्यासारखा खिदळत होता. कपिला गाय तिच्या वासराला चाटत होती, गाव जतलं होतं...गावाच्या पोशिंद्यानं आकाश व्यापलं होतं...!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com