वाटा (ऐश्वर्य पाटेकर)

aishwarya patekar
aishwarya patekar

सारजामोठ्याईचा हात दोन्ही लेकांच्या हातात देत अप्पासाहेबांनी जीव
सोडला. सतीगती लावून आल्यावर सारजामोठ्याई खांबाला टेकून बसली. खरंतर तिचा जीव अप्पासाहेबांबरोबरच निघून गेला होता. कुडी तेवढी मागं राहिली होती. बसल्या बसल्या तिला पुन्हा काहीबाही आठवत राहिलं...

अप्पासाहेबांची पत्नी - सारजामोठ्याई - वाटेला डोळे लावून बसली होती. लेक आत्ता येतील; मग येतील...! पण अजूनही तिच्या एकाही लेकाचा पत्ता नव्हता. रस्त्यानं जाणाऱ्या-येणाऱ्याला ती उगा विचारत होती.
‘‘काय रं सुदाम, फाट्यावरच्या गाडीतून कुनी उतारलं न्हाई का?’’
‘‘न्हाई तं मोठ्याई...कुनी येनार व्हतं का?’’
‘‘आरं, अभय आन् इष्णू यायाच्येत; अप्पांचा जीव आडाकला नं त्येंच्यात!’’
‘‘येत्यान येत्यान. शेवटची गाडी यायचीया आजूक,’’ असं म्हणत सुदाम निघून गेला अन् शेवटची गाडीही! सारजामोठ्याई हिरमुसली. तिचं कुंकू उडून जाणार या भयानं आधीच अर्धी झालेली सारजामोठ्याई दु:खी-कष्टी झाली. तिच्या डोळ्यांसमोरून गतकाळ भरभर सरकू लागला...
अप्पासाहेबांबरोबर लग्न करून तिनं या घरात पाऊल टाकलं तेव्हा दोघांनी मिळून झोपडीचा वाडा मोठ्या कष्टानं उभा केला; पण आज त्या वाड्याला तडे जाऊ लागले होते. वाड्याचा खांबच जर असा निखळून धरणीवर पडला तर वाड्यानं कुठवर तग धरावा? तिचे दोन्ही लेक तिच्या पदराखाली वाढले. थोरल्या विष्णूचा बापात जरा जास्तच जीव होता. तिला आठवलं...विष्णू आठ-दहा वर्षांचा असेल तेव्हाची गोष्ट..अप्पासाहेबांचे पाय चिखलानं भरले होते. अप्पासाहेबांनी विष्णूला हाक मारली : ‘‘बाळा इष्णू, पानी आन रं बादली भरून.’’
‘‘अप्पा, तुमचं पाय किती भरल्यात चिखलानं.’’
‘‘आरं, पानी दिऊन आलोया पिकाला; मग पाय भरनारच.’’
‘‘अप्पा, तुम्ही पाय ठिवा दगडावं,’’ असं म्हणत विष्णूनं अप्पासाहेबांचे पाय धुतले. घरात आल्यावर त्यांना लाकडी खुर्चीवर बसायला सांगितलं. अप्पासाहेब नवलानं पोराच्या कृतीकडे पाहत राहिले. विष्णू त्यांच्या पायाजवळ बसला. त्यांचे पाय उपरण्यानं पुसू लागला. सारजामोठ्याई चहा घेऊन आली. तीही अप्रूपानं पाहत राहिली.
‘‘आग्गं बया, तुमचा ल्योक बघा किती सेवा करून राह्यलाय त्यो. बरं का बाळा, अशीच मया राहूं दे मोठेपनी बी. न्हाई तं तव्हा व्हायाची पात्ताळ!’’
‘‘लेक कुनाचाय सारजा? जळू नगं उगा बाप-लेकाच्या मायेवं.’’
‘‘अप्पा, मी मोठा व्हईन तव्हा तं तुमाला कुढलीच कामं करू देनार
न्हाई.’’
‘‘काम नाही करायचं तं आयतं खायाला कोन दिईल?’’ सारजामोठ्याई म्हणाली.
‘‘राजासारखं खुर्चीवं बसायचं आन् हुकूम द्येयाचा. सगळी कामं करीन म्या,’’ विष्णू म्हणाला.
अप्पासाहेबांचा तो मूठभर आनंद अजूनही मोठ्याईच्या काळजाच्या
कागदावरून पुसला गेला नव्हता. तो तसाच ताजा होता. मात्र, आज सारजामोठ्याईच्या काळजात दुखरी कळ उठली. बापावर डोंगराएवढी माया असलेल्या विष्णूला, बाप मरणदारी असल्याचा निरोप मिळूनही यायला उशीर होत होता...ती स्वत:शीच उदास हसली अन् पुन्हा एकदा आठवणींची गाठ सोडवू लागली...
थोरला विष्णू अप्पांचा; तर धाकला अभय आईचा अशीच जणू वाटणी आपापतःच झाली होती. अभयला सर्वच गोष्टींत आई हवी असायची. एकदा तर चिडून अप्पासाहेब त्याला म्हणाले होते : ‘‘तुझी आई मेली तं काय करशील रं? सारखं आईच्या नावाचं पुंगानं
लावतूस त्ये?’’
‘‘मी आईला मरूच द्यायाचो न्हाई.’’
‘‘कसला ह्यो ‘आई आई’चा जप? पे तू दूध मुकाट्यानी. नसतं लाड केल्यानं शेफारलंय कार्टं.’’
‘‘मी न्हाई प्यायाचो मावशीच्या हातून दूध. मी आईच्या हातूनच पिनार.’’
‘‘आरं राजा, नगं असा हट्ट करूस,’’ सुमनमावशी अभयला समजावत
म्हणाली.
‘‘एकदा सांगितलं ना मावशी...मी आईच्या हातूनच दूध पिनार; न्हाई तं न्हाईच पिनार म्हून.’’
तेव्हा सारजामोठ्याई माहेरी गेली होती. सकाळी जाऊन संध्याकाळी
यायचंच होतं; पण बैलाचा पाय दुमता झाला म्हणून आणखी एक दिवस तिला राहावं लागलं होतं.
आल्या आल्या सुमनमावशीनं गाऱ्हाणं घातलं तिच्या कानावर.
‘‘ताई, तुझा ल्योक रात्री उपाशीच झोपला बाई.’’
‘‘काय रं आभा? असं न्हाई करायचं बाळा.’’
‘‘ताई, तू नशीबवान गं बाई. तुझ्यावं तुह्या ल्योकाची लई मया...’’
‘‘आभा, आसं रं काय? मावशीचं ऐकायचं नं? असा हट्ट करायचा नसतो राजा... समजा, मी जर मेलेच तर?’’
‘‘मी मरूच न्हाई द्यायाचो तुला. का गं मावशी?’’
‘‘व्हय रं बाबा.’’
‘‘मरान म्हंजी देवाघरचं बोलिवनं...त्येला टाळता थोडंच येतं, बाळा?’’
‘‘तुला न्यायाला येनाऱ्या देवाला मी म्हनंल, ‘मला नी; पर माह्या आईला निऊ नगं.’ त्येनं ऐकलंच न्हाई तं मंग मी त्येच्याशी युध करीन...त्येला हरवीन!’’
सारजामोठ्याईनं त्याला कुशीत घेतलं. त्याचे पटापटा मुके घेतले...
आई डोळ्यांआड झाली की एकेकाळी कासावीस होणारा हा लेक... आज आईचे डोळे त्याची वाट पाहून थकून गेले तरी त्याचा पत्ता नव्हता. माया कापरासारखी उडून जाते म्हणतात. त्याचा प्रत्यय आज सारजामोठ्याईला येत होता. अजूनही आठवणींच्या कितीतरी गाठी होत्या; पण त्या तिला सोडवाव्याशा वाटेनात. वाट पाहणं तिनं काही सोडलं नव्हतं. म्हादू चहा घेऊन आला.
‘‘आयसायब, च्या घ्या.’’
‘‘काय रं म्हादू, कधी येत्याल ही पोरं?’’
‘‘येत्यान, येत्यान. नौकरीची मानसं ती! आपल्यासारखी रिकामी थोडीच हायेतं? सुटीसाठी आर्जफाटं करावं लागतं त्येस्नी; त्यात येळ जानारंच.’’
तेवढ्यात दारात अभयची गाडी उभी राहिली. गाडीतून उतरल्या
उतरल्या अभयनं आईच्या पाया पडावं, गहिवरून बापाकडे धाव घ्यावी...पण तसं काहीच झालं नाही.
त्यानं विचारलं : ‘‘आई, काय गं, विष्णूदादा नाही आला का अजून?’’
‘‘तू आला नं! यिईन त्यो बी. निघालं आसंन काही काम.’’
‘‘त्याला फोन करून कळवलं होतं मी; की मला सुटी नाहीये म्हणून... पण त्याचं असचंय.’’
‘‘सूनबाई, पोरान्ला न्हाई आनलं का बरूबर?’’
‘‘त्यांचं काय काम आहे आई? मी आलोय ना...मग बास झालं तर!’’
‘‘आरं व्हय रं, मह्या मेलीच्या लक्षात कुढं आलं? का अप्पांचा जीव तुम्हा दोन पोरांत अडाकला हाये, तुमच्या लेकरा-बाळांत थोडाच अडाकलाय!’’
‘‘आई, टोमणे नको मारूस. त्यांचा जीव रमला नसता इथं म्हणून नाही आणलं. मीसुद्धा मोठ्या मुश्किलीनं आलोय.’’
‘‘आरं, रमायचाबिमायचा इच्यार करायची येळ हाये का ही? काय बोलतोय तू? तुहं तुला तरी कळंतय का?’’
‘‘आल्यापावली जाऊ का आई निघून?’’अभय रागानं म्हणाला.
‘‘नगं बाबा, आसं नगं करूस. तू आला ह्येच काय कमी झालं? आल्यासरशी आधी च्या-पानी घी. थकला आसशीन.’’
‘‘माझं चहापाणी रस्त्यातच झालंय आई!’’
सारजामोठ्याईच्या जिवाला फार लागलं. तिच्या मनात विचार आला...बापाचा असा निरोप मिळाल्यावं घशाच्या खाली घास उतारला नसता एखांद्याच्या. जग लईच निकरट व्हत चाललंया दिसूंदिस. आपन तर त्येच मागचंच दिस काळजाशी कवटाळून बसलोया आजूक. ज्या पोराचं आईबिगार पान बी हालत नव्हतं; त्येला आता आईची बी गरज वाटंनाशी झालीया...आल्या आल्या बापाकडं जाऊन साधी चौकशी करावा तं त्ये बी न्हाई. काळ लईच बदालला. मानसाला मानसाची कवडीची बी गरज उरल्याली न्हाई...अभय लईच मोठा झालाया...
सारजामोठ्याई अशी विचारात असतानाच
जरा वेळानं विष्णूही आला. तोही एकटाच...
सारजामोठ्याईचा हात दोन्ही लेकांच्या हातात देत अप्पासाहेबांनी जीव
सोडला. सतीगती लावून आल्यावर सारजामोठ्याई खांबाला टेकून बसली. खरंतर तिचा जीव अप्पासाहेबांबरोबरच निघून गेला होता. कुडी तेवढी मागं राहिली होती. बसल्या बसल्या तिला पुन्हा काहीबाही आठवत राहिलं...
‘‘सारजा, माहे दोन्ही ल्योक लई गुनी हायेत. आपल्याला कंदीच आंतर द्येयाचं न्हाईत त्ये.’’
‘‘आवं, पर शहराचा वारा लागला नं त्येन्ला. मातीत करमनार न्हाई त्येन्ला. म्हनून म्हनते, पुरं झाली शाळा त्येंची. आपन येवढं कुनासाठी कमवून ठिवलंय?’’
‘‘माती काही कुनी खंदून न्हेनार न्हाई, सारजा. ती जागच्या जागीच राहीन. पोरं शिकली-सवरली तं शहरात मोठ्या हुद्द्यावं नोकरी करत्याल आन् म्हतारपनी आपल्या हाडान्ला सुखाचा वारा लागंल.’’
‘‘आवं, पर मला न्हाई गमायचं बाई ल्योकांबिगर! शाळा काय गावात राहून बी करता यईन की...’’
‘‘गावात काय, धाव्वीपोत्तोरच शाळा हाये. जगाच्या बाजारात धाव्वीचं पुढं काय मोल असनार न्हाई. नाहक नुसकान व्हईल त्येंचं.’’
‘‘काय नुसकान व्हनार न्हाई. उलट, झालं तर शहरच नुसकान करीन त्येंचं.’’
‘‘सारजा, मला तुहं कळतंय; पर आपले ल्योक तसं न्हाईत. संस्कारी हायेत...नीतीचे हायेत’’
‘‘करा बाई तुमच्या मनासारखं. पुढं काय, सोन्याचा पाळना करूनच घिऊन जात्याल आपल्याला काशीयात्रंला...’’
‘‘नेत्याल, नेत्याल. माहं म्हननं आठवंल तुला.’’

सारजामोठ्याईला आज सारंच आठवत होतं. त्याचं काय करायचं?
दशक्रियाविधी झाला नाही तोच दोन्ही लेकांमध्ये वाटणीवर चर्चा सुरू झाली. सारजामोठ्याईच्या काळजाचा धागा धागा उसवला...
‘‘दादा, वाटणीचं काय?’’
‘‘ते आत्ताच मिटवून टाकू. परत काही येणं होणार आहे का आपलं?’’
‘‘मलाही तेच वाटतंय. लवकर सुट्टी काही मिळणार नाही आपल्याला.’’
‘‘वाटणीसाठी भावकीतलं कुणी वडीलधारं बोलावून घेऊ, म्हणजे वाद नको.’’
‘‘अरे, मी काही तुझ्या शब्दाबाहेर जाणार आहे का?’’
‘‘तुझंही बरोबर आहे. चार तोंडं एकत्र आली की होणाऱ्या कामालाही मोडता बसतो.’’
‘‘नाहीतर काय? इस्टेट आपली अन्‌ ते काय ठरवणार!’’
‘‘नाहीतरी लहानपणापासून आपल्यात कधीही कुठल्याच गोष्टीवरून भांडण झालं नाही.’’
‘‘म्हणूनच म्हणतो...तू सांग, मी ऐकतो.’’
‘‘हे बघ, आंब्याचा मळा अन् म्हसोबाचं पन्नास एकर मी घेतो. हा वाडा अन् सत्तर एकराचं वाड्याचं वावर तुझ्या वाट्यावर.’’
‘‘मान्य आहे मला!’’
वकिलाला अन्‌ तलाठ्याला वाड्यात बोलावून वाटणी कागदोपत्री केली गेली. थोरल्याला काहीतरी काम होतं. तो घाईघाईनं निघूनही गेला. धाकल्याच्या वाट्याला वाडा आला होता. त्यानं दाराला कुलूप लावलं अन्‌ गाडीचा धुरळा उडवत तोही निघून गेला...
आई मागं एकटीच उरली होती. तुळशीवृंदावनाला टेकून बसलेली. म्हादू
आला. म्हणाला : ‘‘आयसायब, चलावं माह्या घरी.’’
आई काहीच बोलली नाही. म्हादूनं हात लावला तशी आई जमिनीवर
कलंडली! या आख्ख्या वाटणीत तिच्या वाट्याला काहीच आलं नाही.
की आईला वाटा नसतोच...?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com