esakal | सुक्या कुणालाच दिसला नाही..! (ऐश्वर्य पाटेकर)
sakal

बोलून बातमी शोधा

aishwarya patekar

गावालाही सुक्‍याविषयी खूप वाईट वाटत राहिलं. हे आणखी किती दिवस चालायचं? कारण, त्याच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली होती. काय करावं ते सुक्‍याच्या बायकोला कळत नव्हतं. ती बिचारी कुठून कुठून अंगारा आणून सुक्‍याला लावत होती.

सुक्या कुणालाच दिसला नाही..! (ऐश्वर्य पाटेकर)

sakal_logo
By
ऐश्वर्य पाटेकर oviasishpate@gmail.com

गावालाही सुक्‍याविषयी खूप वाईट वाटत राहिलं. हे आणखी किती दिवस चालायचं? कारण, त्याच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली होती. काय करावं ते सुक्‍याच्या बायकोला कळत नव्हतं. ती बिचारी कुठून कुठून अंगारा आणून सुक्‍याला लावत होती. सुक्‍या ज्या कशानं चांगला होऊ शकेल ती गोष्ट ती करत होती; पण सुक्‍या काही चांगला होईना. शेवटी, केवळाईनंच उपाय सांगितला म्हणून सुक्‍याच्या बायकोनं आपल्या भावाला बोलावून घेतलं...

सुक्याची गाय एका रात्री खुंट्यावरून नाहीशी झाली. सुक्याचा जीव कासावीस झाला. सुक्याची गाय खुंट्यावरून नाहीशी होणं, या घटनेनं सुक्याचं काय होऊ शकतं हे फक्त त्याच्या गावातल्यांनाच ठाऊक. सुक्याची गाय हरवणं हे गावासाठीसुद्धा एक दुखणंच होऊन बसलं अन् गावही सुक्याच्या चिंतेत बुडालं. झालं ते वाईटच झालं!
सुक्‍याची गाय सगळ्या गावात प्रसिद्ध. सुक्‍याची गाय ओळखता न येणारा एकही माणूस गावात नसावा. समजा, एखाद्याला ओळखता आली नाही तर इतरांच्या दृष्टीनं ते नवल ठरायचं किंवा चेष्टेचा विषय तरी. सुक्‍याच्या गाईचं नावच ‘सुक्‍याची गाय’ असं पडलं होतं. स्वतः सुक्‍याही तिला ‘सुक्‍याची गाय’ म्हणूनच ओळखत होता! एकदा तर काय झालं...गावातल्या गेनू तोंडल्याच्या वावरात चरता चरता सुक्‍याची गाय पाय घसरून नाडग्यात पडली, तेव्हा तिला वाचवून लोकांनी घरी सुखरूप पोचती केली होती. या वेळेलाही सुक्‍याला असंच काही वाटून गेलं. म्हणून त्यानं वाट पाहिली; पण गाय काही घरी कुणी आणून सोडली नाही. मग मात्र सुक्‍यानं अन्न-पाणी बंद केलं. तो झुरणीला लागला. त्याला अनेकांनी समजावून पाहिलं; पण सुक्‍या कुणाचंच ऐकायला तयार नव्हता. त्यानं गाईसाठी खूप आकांत केला. पायाला भिंगरी बांधून याचे त्याचे मळे धुंडाळले. सारा गाव पिंजून काढला, तरी गाईचा शोध काही लागला नाही. तरी सुक्‍यानं आस काही सोडली नव्हती. आजूबाजूची चार-दोन गावंही त्यानं पालथी घातली. रस्त्यानं चालता चालता त्याला तात्या कोकणे भेटला.
‘‘तात्या, माही गाय दिसली काय रं तुला?’’
‘‘न्हाई तं बाबा.’’
‘‘लाल रंगाची हाय बग.’’
‘‘सुक्‍या, तुही गाय कुनाला ठावं न्हाई का लका!’’
‘‘तात्या, कुढं कानू गेली रं...’’
‘‘कुढं कशाला? आरं, ऐतवारच्या बाजारात जाऊन पाह्य; एखांद्यानं चोरली आसंल तं बाजारात घावंल तुला...’’
सुक्‍यानं रविवारचा गुरांचा आख्खा बाजार पालथा घातला; पण त्याला गाय काही दिसली नाही. आता तरी सुक्‍यानं गाईचा नाद सोडावा ना? पण तो आणखी वाढतंच गेला. रात्री-अपरात्री उठून तो गाईचा कानोसा घेऊ लागला.
‘‘काय वं?’’
‘‘मला गाईचा आवाज आल्यासारखा वाटला!’’
‘‘भरम झालाया बाई तुमाला...’’
‘‘सुमन, कुढं गेली असंल गं गाय? तिनं चारा-पानी केला आसंल का? कुनी तिला पानी पाजलं आसंल का? गळ्याची पोळवी खाजवत तिच्याशी कुनी बोललं आसंल का?’’
‘‘बास झालं बाई गाईचं! न्हाई तं काय...जसं तुमच्या कर्माचं कातडंच गेलं...’’
‘‘आसं काय करतीस सुमन? माझी गाय हाय ती.’’
‘‘तुमचं बाई इपरीतच. कुनाची गाय काय चोरीला जात न्हाई का?’’
‘‘जात आसंल; पर ही सुक्याची गाय हाय.’’
‘‘मंग आता त्या गाईच्या मागं जाता का काय! ती समजा मेली आसंल तंं तुमी बी मरनार काय?’’ सुमन वैतागून म्हणाली.
वास्तविक, गाय गायब झाल्याबद्दल सुमनलाही वाईट वाटत होतं; पण ती तरी काय करणार?
बायको आहे...पोरं आहेत...आई आहे...नुसती गायच होती का काय या माणसाला? सारखा तिचाच लाव्हो.
सुक्‍या अंथरुणावर बसल्या बसल्या रडायलाच लागला. सुक्‍याची बायको कावरीबावरी झाली. त्याला समजावत ती म्हणाली : ‘‘आवं, रडायचं काय त्यात आसं ल्हान पोरागत?’’
‘‘सुक्याची गाय मरनार न्हाई!’’असं म्हणत सुखदेव गुडघ्यात मान घालून आणखीच रडायला लागला. त्याची छोटी छोटी दोन पोरं अन्‌ म्हातारी आई त्याच्याभोवती येऊन उभी राहिली. आई पाठीवर हात फिरवत म्हणाली : ‘‘रडायला काय झालं, सुकदेवा? लेका गाय गेली; वाईटच झालं, पर संंकाट कुनावर येत न्हाई?
‘‘आई, काय करू? मला बिलकूल गमंना गाईवाचून!’’
‘‘मला का ठावं न्हाई का ल्येका? ल्हान वासरी व्हती तव्हापून तुला तिचा लळा!’’
‘‘आई, कुढं गेली आसंल माही गाय?’’
‘‘त्या देवाला ठावं बाबा!’’
‘‘मग इचार त्येला. त्येला म्हनावा, ‘कुढं हाय सुक्याची गाय?’ ’’
‘‘........................’’
‘‘ऐ आई, इच्यार नं तुह्या देवाला माह्या गाईचा ठावठिकाना...’’
‘‘हां इच्यारते, ल्येका...पर आता तू झोप. देव बी झोपला आसंल! सकाळ झाली का इच्यारते,’’ आईनं डोळे पुसले. ती अंथरुणावर जाऊन पडली; पण तिला झोप काही लागली नाही...
सकाळ झाली. आईला वाटलं, सुक्याला आता जरा विसर पडला असेल; पण तो कुठला विसरतोय? तो आईजवळ आला अन् म्हणाला :‘‘कुढंं हाय गाय? सांगितलं का काही देवानं?’’
‘‘आरं, देवाला बी ठाव न्हाई!’’
‘‘आसं कसं? देव हाय त्यो. सुक्याच्या गाईवर लक्ष ठिवायला नगं का?’’
‘‘.................’’
आईचं काळीज हुंदकून आलं. शब्द काही फुटला नाही.
सुक्याचा गाईसाठीचा लाव्हो दिवसेंदिवस वाढतच गेला...
खरं तर गाय कुणाची हरवत नाही? पण सुक्याला कुणी सांगावं!
सुक्या दिवसेंदिवस खंगत चालला.
सुक्या आणि सुक्याची गाय हे समीकरण कुणीच सोडवू शकत नव्हतं!
जो सोडवायला जाईल तो त्या गुंतवळ्यात हरवल्याशिवाय राहणार नाही...
***
सुक्‍या तेरा-चौदा वर्षांचा असेल तेव्हाची गोष्ट. झालं असं की त्याच्या वडिलांच्या बैलगाडीला अपघात झाला. बैलगाडीच्या चाकाखाली पाय सापडून त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले. ते कायमचे खाटेला खिळले. साहजिकच घराची सारी जबाबदारी एवढ्याशा सुखदेवाच्या अंगावर आली. शाळेची पाटी सुटली अन्‌ मजुरीची पाटी त्याच्या हाती आली. तो डोंगराच्या पोटाशी माती खोदायला गेला. तिथं ही गाय त्याला आढळली. तेव्हा ती असेल सात-आठ महिन्यांची. एवढीशी वासरी. तिचा पाय मोडला होता. तिला बैलगाडीत घालून घेऊन तो घरी आला. मोडक्‍या पायाला त्यानं औषधपाणी केलं. सुक्‍याला भावंडं नव्हती, त्यामुळे सुक्‍याचा सगळा वेळ गाईबरोबरच जात असे. सुक्‍या जाईल तिथं त्याची गाय. गाईशिवाय सुक्‍या कुणाला आढळलाच नाही. सुक्‍या जसा मोठा होत गेला; तशी त्याची गायही. लोक तर त्याच्या आईला म्हणायचे :
‘केवळाई, सुक्‍याला गाईबिगर दुसरं काई सुचतं का न्हाई?’
‘या गाईच्या नादापायी त्यो परक्‍याची पोर काई संभळायचा न्हाई.’
‘ही गाय दूर कर त्येच्यापून. न्हाई तं पुढं अवघड व्हायाचं.’
‘बरेच नाद असत्यात मानसाला; पर सुक्याचं येगळंच.’
‘यक मिनिट बी त्यो गाईबिगर ऱ्हाऊ शकत न्हाई म्हंजी काय.’
‘अशानं असं व्हऊन बसंल अन् तुहं पोरगं हातचं जाईल.’
‘लग्न तरी व्हईल का त्येचं?’
‘‘केवळाई, तुह्या सुक्‍याचं त्या गाईसंगच लगीन लावून दी!’’
ही विनोदाची गोष्ट नव्हतीच. त्याला खरोखरच बायको मिळेना. जिथं जमत आलं तिथं काहीतरी मोडता यायचा. मग तर केवळाईची खात्रीच झाली की गाईच्या नादापायीच आपल्या पोराचं जमत नाही. एकदा तर केवळाई त्याला म्हणाली :
‘‘सुकदेवा, या गाईमुळं तू कुंवाराच ऱ्हाशील!’’
‘‘ऱ्हाईल आई म्या कुंवारा!’’
‘‘आरं, सोड नाद त्या गाईचा.’’
‘‘आई, तिनं काय केलं आसं?’’
‘‘आरं, सौंसारबिंसार करायचा हाय का न्हाई तुला? थांब, तिला बाजारच दावते म्या! तव्हा तुहं ह्ये येडेपन जाईल.’’
सुक्या चवताळला आईवर...‘‘ माही गाय इकायचं नाव पुन्हा काढशील तं म्या घरच सोडून जाईन!’’
त्याच्या आईसाठी सुक्‍याची गाय ही मोठी भानगडच होऊन बसली होती; पण अखेर नात्यातली मुलगी मिळाली. सुक्‍याच्या अंगाला हळद लागली. मग काही केवळाईला सुक्‍याची चिंता राहिली नाही. सुक्याचा संसार सुरळीत सुरू होता; पण आता ही चिंता उभी राहिली. एखाद्या आजारावर औषध असतं; पण यावर तर कुठलंच औषध नव्हतं. बायको-पोरांत रमायचं सोडून सुक्यानं गाईसाठी खूळ घेतलं होतं. झालं ते काही चांगलं झालं नाही. कधी तरी केवळाईचा डोळा लागला असेल अन्‌ तिच्या सुनेच्या हाकेनं केवळाईला जाग आली. दिवस उगवला होता..
‘‘आत्याबाई ऽऽ वो आत्याबाई, इकडं या.’’
‘‘काय गं म्हंते सुमन?’’ केवळाई बाहेर येत म्हणाली.
‘‘तुमचा ल्योक बघा...’’

केवळाई डोळे विस्फारून पाहू लागली. सुक्‍या गाईचं दूध काढत होता; पण गाय कुठं होती! सुक्‍याला वेड लागलं अन्‌ ते इतकं की वाढत गेलं की तो आता गाय शोधत नव्हता की गायीसाठी झुरतही नव्हता. त्याची गाय त्यानं कल्पनेनं खुंट्याला बांधलेली होती. तो रोज तिची चारा-वैरण करू लागला. गावालाही सुक्‍याविषयी खूप वाईट वाटत राहिलं. हे आणखी किती दिवस चालायचं? कारण, त्याच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली होती. काय करावं ते सुक्‍याच्या बायकोला कळत नव्हतं. ती बिचारी कुठून कुठून अंगारा आणून सुक्‍याला लावत होती. सुक्‍या ज्या कशानं चांगला होऊ शकेल ती गोष्ट ती करत होती; पण सुक्‍या काही चांगला होईना. शेवटी केवळाईनंच उपाय सांगितला म्हणून सुक्‍याच्या बायकोनं आपल्या भावाला बोलावून घेतलं अन्‌ रात्रीतून गाईचा गोठा उखडून टाकला. ज्या खुंट्याला गाय बांधली जायची तो खुंटाही उपटून जाळून टाकला. म्हणजे आता तरी सुक्‍या ताळ्यावर येईल अशी बिचारीला आशा होती. तिच्या आशेच्या चिंध्या व्हाव्या असंच घडू नये ते घडलं. सुक्‍या पहाटेच पसार झाला. त्या दिवसानंतर सुक्‍या कुणालाच दिसला नाही. अफवा येत राहिल्या. सुक्‍या इथं दिसला, तिथं दिसला, त्याच्याबरोबर गाय होती वगैरे वगैरे...एवढं मात्र झालं की सुक्‍याच्या बायकोला कपाळावरचं कुंकू पुसता आलं नाही! पोरांना बाप नसूनही ‘तो मेला’ असं सांगता आलं नाही...म्हाताऱ्या आईला ‘माझी म्हातारपणाची काठी हरवली आहे’ असं जरी जगाला सांगता आलं असतं तरी तिला सुक्‍याविषयी कुणी काहीच विचारलं नाही. त्याच्या गाईविषयी कुणी काही विचारण्याचा तर प्रश्‍नच नव्हता...!