रस्ता आणि अंत्ययात्रा (ऐश्वर्य पाटेकर)

aishwarya patekar
aishwarya patekar

रमेशचं शाळेत बिलकूल लक्ष लागेना. तो सैरभैर झाला. अण्णांचं काही कमी-जास्त तर झालं नसेल ना या शंकेच्या मुंग्या त्याच्या चिंतेचं वारूळ कोरू लागल्या. तो मारकुटा बैल विकून टाका म्हणून
अण्णांना कितीदा सांगितलं आपण; पण अण्णांनी काही ऐकलं नाही...


चौथीचा वर्ग पिंपळाच्या झाडाखाली सुरू होता. रमेश मुलांना शिकवण्यात दंग असतानाचा तिथं येऊन जरा दूर उभ्या राहिलेल्या रघूकडे त्याचं लक्ष गेलं. रघू त्याच्या मळ्यातला सालगडी. रमेशनं मुलांना वाचन करायला सांगितलं आणि तो रघूजवळ येत त्याला म्हणाला :‘‘काय झालं रघू? येवढं तातडीनं येनं केलंस?’’
‘‘बापू, तुम्हाला असंल तसं गावाकडं निंगून यायला सांगितलंय,’’ रघू एवढंसं तोंड करत म्हणाला.
‘‘आरे, आसं काय झालं? दोन दिसांपूर्वी तं येऊन गेलोय नं म्या.’’
‘‘अण्णाला बईलानं मारलंया...’’ रघूला सांगायचं काय होतं आन् तो सांगत काय होता हे त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर स्पष्ट जाणवत होतं.
‘‘कधी?’’ रमेश घाबऱ्या आवाजात म्हणाला.
‘‘कालच्याला.’’
‘‘रघू, खरं सांग... लई सिरीअस तं न्हाई नं?’’ रमेशनं विचारलं.
‘‘बापू, बाकी मला काय म्हायती न्हाई... तुम्हाला जल्दी गावाकडं यायला सांगितलंया,’’ असं म्हणत रघू आपली मळकी पिशवी बगलेत सावरत खाली मान घालून निघून गेला.
रमेशचं शाळेत बिलकूल लक्ष लागेना. तो सैरभैर झाला. अण्णांना काही कमी-जास्त झालं तर नसेल ना असल्या शंकेच्या मुंग्या त्याच्या चिंतेचं वारूळ कोरू लागल्या. तो मारकुटा बैल विकून टाका म्हणून
अण्णांना कितीदा सांगितलं आपण; पण अण्णांनी काही ऐकलं नाही. शिवाय रघू होताच ना बैलांची सोड-बांध करायला; पण अण्णाचा तापट स्वभाव, त्यांना दम निघत नाही. आता मी अण्णांचं ऐकणारच नाही. ठरलं म्हणजे ठरलं, आता त्यांना माझ्याकडेच घेऊन येतो...रमेश स्वत:शीच बोलू लागला. जराशानं विचारांच्या माश्या वारत रमेश तडक उठला. मुख्याध्यापक शाळेत नव्हते. शाळा नवलेमास्तरांच्या भरवशावर सोडून तो गावाकडे निघाला.
गावाकडे जाणारी बस तुडुंब भरलेली होती.
कशीबशी थोडीशी जागा त्याला मिळाली. ------
उभं राहण्यापुरती जागा त्याला मिळाली.------
जवळच्याच सीटवर बसलेल्या आजोबांना एक मुलगा उठवू लागला.
‘‘बाबा... उठा, म्या जागा धरली व्हती.’’
‘‘तू कशी काय जागा धरली, बाळा?’’
‘‘म्या रुमाल टाकला व्हता नं? दिसला न्हाई का? बऱ्या बोलानं उठा बरं.’’
रमेशला राहवलं नाही,
‘‘काय बोलतोस? तुह्या आजोबांच्या वयाचं हायेत ते.’’
‘‘येवढंच वाटत आसंल तं तुमच्या डोक्यावर बसवा त्येन्ला. माही जागाय ती.’’
‘‘आरं, तू येका रुमालात सातबारेच तुह्या नावावर केले, म्हन की!’’
‘‘मला डोकं लावायचं न्हाई, सांगून ठिवतो. उठंय म्हताऱ्या...’’
‘‘काका, माझ्या जागेवर बसा तुमी!’’

रमेशनं त्याची जागा आजोबांना दिली व तो उभा राहिला. त्याच्या मनात आलं, ‘आपली मास्तरकी ही कामाची नाही. जर का अशी पिढी घडणार असेल तर काय करतो आहोत आपण? माणूस किती संकुचित आणि मूल्यहीन होत चालाल आहे! माणूस फक्त स्वत:पुरतं पाहतो आहे. आपल्याला आपल्या पोरांना संस्काराच्या आणखी गोष्टी सांगाव्या लागतील...’ असा विचार करत रमेश गाडीतून बाहेर पाहू लागला. तो अण्णांच्या चिंतेत बुडाला होता की त्याच्या मनात आणखी काही सुरू झालं होतं?
रमेशचं गाव आलं. मध्ये कुठेच न थांबता तो मधल्या बोळातून गावकुसाला असलेल्या आपल्या मळ्याकडे निघाला, तर वाण्याच्या दुकानासमोर दोन बारक्या पोरांचं भांडण... त्यानं लहानग्याला उचलून कडेवर घेतलं.
‘‘आरं, कामून भांडताय?’’
‘‘यानं माहा बैल घेतला...’’ लहानगा रडत म्हणाला.
‘‘का रं त्याचा बैल घेतला?’’
‘‘मला सापाडलाय. आता माझा हायं त्यो. हा खोटं सांगून ऱ्हायला.’’
‘‘हा तुझा भाऊ हाय ना?’’
‘‘हा.’’
‘‘मंग दे त्याला बैल.’’
‘‘म्या बरा दिईन? त्या बैलावर आता माझा हक्क हाये.’’
रमेशनं लहानग्याच्या हातावर पाच रुपये ठेवले आणि बिस्कीटपुडा आणायला त्याला दुकानात पिटाळलं. त्यांच्यात समझोता घडवून आणत तो निघाला खरा; पण त्या लहान मुलाच्या तोंडून आलेल्या ‘हक्क’ या शब्दानं त्याच्या काळजात धडी मारली. त्याला आठवलं...

लहानपणी अण्णांनी आपल्याला आणि चुलतभाऊ विलासला खेळण्यातली मोटार आणली होती. विलासची तुटली. तो रडायला लागला, तेव्हा आपण त्याला म्हणालो :‘‘इलू, ही घे माही मोटार तुला!’’
‘‘तुला राहील का मंग?’’
‘‘आपल्याच तं घरात हाये. तुही खेळून झाली का म्या खेळंन.’’
‘हक्क’ या शब्दानं रमेश आठवणीत कुठल्या कुठं हरवून गेला.
रमेश घरात आला. अण्णा खाटेवर कण्हत पडले होते. त्यांच्या पायाशी तो बसला.
‘‘कोन त्ये?’’ अण्णांनी खोल आवातात विचारलं.
‘‘आवं आयकलं का? रमा आलाया... आता तरी घास-कुटका खाऊन घ्या बरं. गोळ्या-औषीद रिकाम्या पोटी कसं घ्यायाचं? रमा, तूच सांग बाबा तुह्या बापाला. तुहं तरी आयकतील.’’
‘‘अण्णा, हे कसं झालं?’’
‘‘त्या रस्त्याच्या पायी झालं, बाबा. काई करता काई झालं आसतं म्हंजी कुणाचं तोंड पाह्यलं आसतं? चेटू द्या तो रस्ता. राकेल पडू द्या त्याच्यावं, क्यवढं इघीन आलं व्हतं. माहं कुकू पुसलं गेलं आसतं. त्येच्या परीस त्यो रस्ता म्हत्त्वाचा न्हाई,’’ अंजनाईनं डोळ्याला पदर लावला. आतापर्यंत रोखून धरलेलं रडू रमेश आल्यानंतर अंजनाईला रोखता आलं नाही.
‘‘अंजना, कशापायी रडतीस? म्या धडधाकट हाये. यवढ्या त्यवढ्या मारानं मरायला म्या काई मातीचा न्हाई.’’
‘‘काय भानगडंय रस्त्याची? मला तर रघून सांगितलं का अण्णान्ला बैलानं मारलं म्हून.’’
‘‘तू का थोडा गरम डोक्याचाय का? तुहा बाप तसा तू. तुला जरा बी खोटं सहन व्हत न्हाई.’’
‘‘मला निस्तरून सांगशील का, काय झालं ते?’’
‘‘जाऊं दे लेका, आला तसा हात-पाय धुऊन घे... चार घास खा. नको डोक्याला नस्ता ताप करून घिऊ.’’
‘‘घास गोड लागंल का मला?’’
‘‘आरं, तुह्या चुलत्याची आन् यायची मारामारी झाली बाबा रस्त्यावरून. त्या मेल्यानं उलीशी बी दयामाया दाखविली न्हाई.’’
‘‘अण्णा, तुमी येवढं केलं त्यायच्यासाठी आन् त्ये ह्ये आसे? त्यायची हिंमत तरी कशी झाली तुमच्यावर हात टाकायची?’’ रमेश रागानं लाल झाला.
‘‘कलीचा वारा, रमा! भाऊ भावाचा वैरी झाला. देवा ह्ये पाहन्यापरीस उचल रं, बाबा...’’ रमेशची म्हातारी आजी खोकत म्हणाली.
‘‘अण्णा, ते जास्तच मातलेत बरं का. जरा दावतो त्यायला.’’
‘‘जाऊं दे रमा. तू नोकरीचा धनी हायेस बाबा. आमी आमचा जीव हाये तव्हर करू जिमीन. तुला थोडच ऱ्हायचं हाये इथं?’’
‘‘अण्णा, रस्ता काय उरावर घेऊन जाणारंय का ते? आपल्या वाड-वडिलांपासूनचा रस्ताय त्यो.’’
‘‘रमा, त्यायनी माती खाल्ली म्हून आपुन बी खायाची न्हाई!’’
‘‘तुम्च्या ह्याच चांगुलपनाचा फायदा उच्यललाय त्यायनी.’’
‘‘जाऊं दे... वरच्याला डोळं हायेत, त्यो पाहून घिईन.’’
‘‘अण्णा, शिक्याची सुई घ्यायची दानत न्हवती त्यायची. तुमीच सारं उभं करून देलं! गळ्यापत्तोर हात घालून बी हा असा कोरडाच निघाला!’’
‘‘जाऊं दे, नसू दे आपल्यायला रस्ता. पर तू नगं त्रागा करून घिऊ,’’ अंजनाई म्हणाली.
‘‘अण्णा, त्यायला रस्ताच दावतो आता,’’ असं म्हणत रमेशनं ओसरीतली काठी उचलली अन् तो तावातावानं चुलत्याच्या घराकडे निघाला. अंजानाई आडवी आली.
‘‘रमा, तुह्या पाया पडंते... नगं दादा असा डोक्यात राख घालून घिऊ. कुढं डोंबल्यावं न्यायाचाय त्यो रस्ता?’’

‘‘प्रश्न रस्त्याचा न्हाई आई... पाठीला पाठ लावून आला अण्णांच्या अन् त्यांच्याच जिवावर उठला? त्यानं हात उचललाच कसा?’’
सारं घर त्याच्यामागं धावत आलं अन् तो त्याच्या चुलत्याच्या - ईशातात्याच्या - घरासमोर उभा राहिला.
‘‘तात्या, घराभाईर या!’’
ईशातात्या अन् त्याचा एकुलता एक मुलगा विलास हे बाहेर आले; पण त्यांची गुरमाई जराही कमी झाली नव्हती. ईशातात्या दात कोरता कोरता म्हणाला :
‘‘तुह्या बापाला मार कमी झाला का? तू आला कैवार घ्यायाला?’’
रमेशच्या रागाचा पारा आता चांगलाच चढला.
‘‘आरं, उपकार फेडून रस्त्यावर ठिवल्यात का?’’
‘‘कुढ्ल्या उपकाराची भाषा करून ऱ्हायला रं? समदे एकत्र ऱ्हात असतानी तुहा बाप बुडाखाली बरंच दाबून बसला...’’
ईशातात्या अरेरावीत म्हणाला.

त्यासरशी रमेश आणखीच खवळला. आता देव जरी मध्यस्थी करायला आला असता तरी रमेशनं ऐकून घेतलं नसतं! त्याच्या रक्तात मुरलेल्या संस्कारांचा चिखल झाला. ज्या संस्कारांचं बीज तो त्याच्या, शाळेत समाजात पेरत होता त्या पिकाची सोंगनी त्याच्याच माणसांनी केली होती. तो चुलत्याच्या अंगावर धावून गेला. विलास आडवा आला. दोघंही एकमेकांना असे भिडले की जशी काही बैलांची झुंज. अंगावर काटा आणणारी. दोघांना आवरणं आता कुणाच्याच हातात नव्हतं. कुणीच मध्ये पडू शकत नव्हतं. एकमेकांच्या नरडीचा घोट घेण्यासाठी ते सरसावले होते. तो घोट घेऊनच हे युद्ध शांत होणार होतं असं चिन्ह दिसत होतं. एका ताटात जेवणारे चुलतभाऊ आज एका रस्त्यामुळे ताट लाथाळून बसले होते. नातंगोतं विसरले होते. आधी फक्त झटापट झाली होती. आता विलासच्या हातात फावडं आलं. त्यानं ते रागाच्या भरात घातलं रमेशच्या डोक्यात. घाव वर्मी बसला. रमेश गरगरला; मात्र तेवढ्या क्षणातही त्याच्या हातात दावणीचा धारदार लोखंडी खुंटा उपसून आला. त्यानं तो खुपसला विलासच्या पोटात..गर्दी करून उभ्या असणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला.

दोघांच्या भोवती रक्ताचं थारोळं झालं. दोघांना दवाखान्यात नेण्यासाठी घाई सुरू झाली खरी; पण दोघांनी आधीच त्यांनी जीव सोडला होता.
ज्या रस्त्यावरून दोघां भावांचं भांडण झालं होतं, त्याच रस्त्यानं दोघांच्या मुलांची अंत्ययात्रा निघाली होती. एक दिवस हाच रस्ता आपल्याला असा निर्वंश करील असं दोघा भावांना वाटलंही नव्हतं.
पुढं भलेही तो रस्ता वहिवाटीतून पुसला जाईल... मात्र, दोघांच्या काळजावर जो रस्ता उमटला त्याचं काय?
तो पुसण्याची ताकद आणखी कशातच नाही...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com