अस्मानीचा निळा घोडा (ऐश्वर्य पाटेकर)

aishwarya patekar
aishwarya patekar

गणपत विचार करू लागला. काय मागावं? हां, अपार्टमेंटच मागू या. चांगली शंभरेक फ्लॅटची. म्हणजे एकेक फ्लॅट मी भाड्यानं देईन. किती ठरवायचं एकेका फ्लॅटचं भाडं? पाच हजार रुपये. पाच हजार गुणिले शंभर...म्हणजे किती होतील ते पैसे? बाप रे! त्या नोटा मोजता मोजता हात किती दमतील? नको, पैसे मोजण्यात कोण नाहक आयुष्य घालवेल? आयुष्य किती मोलाचं आहे हे घोड्याला काय ठाऊक!

अस्मानीचा निळा घोडा
जंतरमंतर जादू तंतर
माग गणपत, माग गणपत
नाहीतर नुसत्याच बिड्या
ओढत राहशील नंतर...

असं म्हणत अस्मानीच्या निळ्या घोड्यानं त्याच्या येण्याची वर्दी गणपतला दिली अन् त्याच्यासमोर येऊन तो उभा राहिला, तरी गणपतचं लक्ष नव्हतं. हा अस्मानीचा निळा घोडा खरं तर गणपतच्या स्वप्नात यायचा अन् गणपतची मनोकामना पूर्ण करायचा. गणपत निळ्या घोड्याकडे चहा मागायचा. तो त्याला चहा द्यायचा. गणपत बिड्या-काड्या मागायचा. निळा घोडा त्याला बिड्या-काड्या द्यायचा. तोच अस्मानीचा निळा घोडा आज जर जागेपणी आला म्हटल्यावर गणपतचा कुठला विश्वास बसायला? म्हणून त्यानं, आपण जागे आहोत की झोपेत आहोत याची शहानिशा करण्यासाठी आपल्या हाताला बिडीचा चटका दिला. गणपत काही म्हणणार त्याच्या आत निळा घोडाच त्याला म्हणाला :‘‘तू जागाच आहेस गणपत...काय मागायचंय ते माग...’’
गणपत भानावर आला. त्यानं विचार केला, स्वप्नात या घोड्याकडून चहा-पाणी, बिड्या-काड्या खूप मागून झाल्या, आता मोठं काहीतरी मागून घेऊ या. आज तो आपल्या समोर आयताच आलाय तर त्याला आता तसं सोडायचंच नाही! भरपूर श्रीमंत होण्याची ही नामी संधी आहे अन् ती आता दवडायची नाही. गणपतच्या अमर्याद इच्छांंचं विमान आकाशात उडालं. इच्छेच्या अनंत पुड्या तो बांधू लागला...
..अस्मानीचा निळा घोडा
जंतरमंतर जादू तंतर
माग गणपत, माग गणपत
नाहीतर नुसत्याच बिड्या
ओढत राहशील नंतर..

निळ्या घोड्यानं पुन्हा गाणं म्हणत आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली.
‘‘थांब ना रे, घोड्या! काही सुचू देशील की नाही? तुझंच जंतरमंतर चालू दे.. बिड्या-काड्या मागितल्या की सटक्यात देतोस! आता मला दुसरंच काही मागायचं आहे...बघू तुझी दानत कितीय ते!’’
‘‘हा अस्मानीचा निळा घोडा फिदाय गणपत तुझ्यावर. तू माझा जीव वाचवला होतास! मात्र, गणपत...लक्षात ठेव, कुठलीही एकच गोष्ट मी देतो अन् तीही वेळेत. मी वेळेचा बांधलेला आहे!’’
‘‘ही काय सांगायची गोष्ट आहे का? तू इतक्या वेळा स्वप्नात आला आहेस की तुझं वेळेचं बंधन मला चांगलंच माहीत आहे... ’’
‘‘मग, सांग...काय हव आहे तुला? एखादा वाडा?’’
‘‘वाडा घेऊन काय करतोस? त्यातली भुतंखेतं सांभाळत बसायला वेळ आहे का माझ्याकडे?’’
‘‘दूरच्या रानातलं एखादं छानसं जुनं घर, गढी वगैरे?’’
‘‘ते घेऊन काय करू? कोण गवत वाढलंय तिथं!’’
‘‘डोंगर चालेल का?’’
‘‘डोंगराचंही काय करू रे मी?’’
‘‘मग काय हवंय तुला?’’
‘‘मला जरा विचार करू देशील का नाही? असंच डोकं खात बसलास तर मला काही सुचेल का?’’
‘‘कर बाबा, कर विचार...पण वेळेत कर!’’

गणपत विचार करू लागला. काय मागावं? हां, अपार्टमेंटच मागू या. चांगली शंभरेक फ्लॅटची. म्हणजे एकेक फ्लॅट मी भाड्यानं देईन. किती ठरवायचं एकेका फ्लॅटचं भाडं? पाच हजार रुपये. पाच हजार गुणिले शंभर...म्हणजे किती होतील ते पैसे? बाप रे! त्या नोटा मोजता मोजता हात किती दमतील? नको, पैसे मोजण्यात कोण नाहक आयुष्य घालवेल? आयुष्य किती मोलाचं आहे हे घोड्याला काय ठाऊक! शिवाय, शंभर फ्लॅट म्हटले म्हणजे शंभर माणसं. एवढ्या लोकांकडे जाऊन पैसे मागायचे म्हणजे पाय राहतील का आपले? शिवाय, एखाद्यानं फ्लॅट बळकावला तर कोर्ट-कचेरीचं झंझट कोण करत बसेल? वकिलाची फी ती वेगळीच...शिवाय तारखा करत बसायला वेळ आहे कुणाकडे? त्यापेक्षा जमीन मागू? हां, जमीनच! पण किती मागायची? पाचशे एकर की आणखी? नको, पाचशे एकरच बास होईल; पण पाचशे एकर जमिनीच्या मशागतीला शंभर-दोनशे बैल तर सहज लागतील. त्यांचं चारापाणी पुन्हा कोण करत बसेल? शिवाय, उन्हाळ्याच्या दिवसांत एवढे बैल नाहक बसवून ठेवायचे. चारा-पाण्याला भार होतील. तसा ट्रॅक्टरचा पर्याय आहे म्हणा! पण ट्रॅक्टरही का थोडेथोडके लागतील? पाच-पन्नास तरी! पुन्हा तेवढेच ड्रायव्हर ठेवावे लागतील. ठेवले समजा, तरी त्यांना ‘बाबा-पुता’ करत बसावं लागेल... शिवाय, ट्रॅक्टरना डिझेलही किती लागेल! ते टाकायला हा अस्मानीचा निळा घोडा येणार आहे का? सगळं आपल्यालाच करावं लागेल. याचं काय जातंय मनोकामना पूर्ण करायला! तो झटक्यात पूर्ण करेल...मात्र, आपल्यालाच नंतर निस्तरावं लागणार सगळं. समजा घेतलीच जमीन तर माल पिकवावाच लागेल. त्याला मनुष्यबळ किती लागणार? एवढी माणसं आणायची कुठून? शिवाय, माल पिकवलाच तर त्याला एवढी मोठी बाजारपेठ लाभणार कुठं? तो काय वावरातंच सडू द्यायचा का? शिवाय, गारपीट झाली तर आपल्यालाही आत्महत्या करावी लागेल. आत्महत्याच करायची पाळी येणार असेल तर भूमिहीन मेलेलं काय वाईट? आपल्याला काही एवढ्यात मरायचं नाही. ते शेतकरी असणंच वाईट. कशाला ते मातीचं दु:ख पाठीमागं लावून घायचं? जमीन नकोच!
...अस्मानीचा निळा घोडा
जंतरमंतर जादू तंतर
माग गणपत, माग गणपत
नाहीतर नुसत्याच बिड्या
ओढत राहशील नंतर..

‘‘थांब ना घोड्या, सुचू दे तर खरं’’ असं म्हणत गणपतनं पुन्हा एकदा बिडी शिलगावली. काय मागाव बरं...? धूर सोडत तो विचार करू लागला...

सोन्याची खाण मागावी का? देईल का पण अस्मानीचा निळा घोडा आपल्याला सोन्याची खाण? न द्यायला काय झालं? त्याला कुठं त्याची वडिलोपार्जित इस्टेट आपल्याला द्यायची आहे? आपण जे मागू ते देणार म्हटल्यावर मिळालीच पाहिजे आपल्याला सोन्याची खाण. बस्! आता ठरलं... सोन्याची खाणच. हां, सोन्याची खाणच! नाहीतरी आपली बायको आपल्याला नेहमी टोमणे मारत असते, की तुमच्या घरच्यांनी सोन्याचा फुटका मणी तरी घातला का माझ्या गळ्यात? सगळा भिकारखरका! आता तिला सोन्यानं मढवूनच टाकतो. म्हणजे तिचं टोमणे मारणं बंद होईल. मात्र, आपली बायको म्हणजे काही विचारू नका! वाटत सुटेल तिच्या नातलगांना किलोकिलोनं सोनं. त्यांच्याकडून तसं मी परतही घेईन म्हणा; पण त्यात माझी किती शक्ती खर्च होईल? शिवाय, सोनं म्हटलं की चोराचिलटाची भीती...सोनं, तेही काही किलो-दोन किलो नाही; आख्खी खाण म्हणजे बंदोबस्त किती कडक ठेवावा लागेल. शिवाय, बंदोबस्ताचे पहारेकरीच रोजचं गुंज, दोन गुंज सोनं खिशात घालून नेणार नाहीत कशावरून? त्यांच्यावर कुणी लक्ष ठेवायचं? शिवाय सरकार? त्याचा ससेमिरा मागं लागणारच लागणार. अस्मानीच्या घोड्याला काही इथं राहायचं नाही, तेव्हा तो काही यात पडणार नाही. हात झटकून मोकळा...त्याला कुठं हात आहेत? शेपूट उडवून तो नामानिराळा होईल! नकोच ती सोन्याची खाण. नाहक बलामत! काय बरं मागावं मग? आता मोठा पेच निर्माण झाला. म्हणजे डोकंच चालेनासं झालं. लोक काय काय मागत असतात...आपल्याला बिड्या-काड्या सोडून दुसरं काही मागायची सवयच नाही. सवय करून घ्यायला पाहिजे होती. शाळेतही शिकवलं गेलं नाही, की तुम्ही काय काय मागितलं पाहिजे ते...
...अस्मानीचा निळा घोडा
जंतरमंतर जादू तंतर
माग गणपत, माग गणपत
नाहीतर नुसत्याच बिड्या
ओढत राहशील नंतर...
‘‘अरे, सुचू दे ना बाबा! तू तर मानगुटीवरच बसला आहेस, जरा धीर धर...’’
‘‘अरे, काहीतरी मागून टाकायचं!’’
‘‘एवढं सोप्पय का ते, घोडेराव!’’
‘‘मी सुचवलं तुला तर तेही मान्य नाही, मग असं मागणार तरी काय आहेस?’’
‘‘तोच तर विचार करतोय. काय मागायचं ते! सारासार विचार करून मागावं लागतं बाबा!’’
‘‘कर मग सारासार विचार!’’

गणपतनं पुन्हा एकदा बिडी शिलगावली अन् इच्छेचं सारं आभाळ धुरानं भरून टाकलं. तेवढ्यात गाईच्या हंबरण्याचा आवाज आला. गणपतच्या बुद्धीची शेगडी पेटली! हांं, गाईच मागू या. पाचेकशे. आपल्याला कुठं पैसे मोजायचे आहेत? हजार गाई मागू या. ठरलं, हजार गाई! नाहीतरी बायको म्हणतेच, दुधाचा चहा तो प्यायला मिळणार नाही तुमच्या जिवावर. एखादी शेळी घ्यायची दानत नाही तुमच्यात. आपली फारच दानत काढली आपली बायकोनं आजवर. दुधाचा चहा काय पितेस? दुधाची आंघोळच कर आता! दुधाचे भावही काय तेजीत आहेत. शिवाय, पाणी घालून दुपटीनं वाढवताही येईल...पण एवढ्या गाई घ्यायच्या तर त्यांचं शेण-शेणकूर कोण करणार? माणसं कामाला ठेवता येतील. म्हणजे पुन्हा देखरेख आलीच. असं नको! आयतं असं काहीतरी पाहिजे. गाई नकोतच. मग काय मागायचं? पुन्हा एकदा गणपतचं डोकं चालेनासं झालं. तो खूप प्रयत्न करू लागला; पण काहीच सुचेना. मग त्यानं पुन्हा बिडी शिलगावली. खरंतर त्याची ही शंभरावी बिडी होती! एवढ्या वेळातच त्यानं नव्व्याण्णव बिड्या ओढल्या होत्या. त्याच्या घोड्याचीही कमाल, की एवढ्या धुरात त्यानं दम धरला होता. पुन्हा भरपूर धूर सोडून तो विचार करू लागला...की काय मागायचं? शेवटी,
आपल्यासाठी काय मागणं योग्य राहील ते आपण घोड्यालाच का विचारू नये, असा विचार गणपतला सुचला! अस्मानीच्या निळ्या घोड्याला विचारण्यासाठी त्यानं मान वर उचलून पाहिलं तर अस्मानीचा निळा घोडा अंतर्धान पावला होता..त्याच्या खुरांचे ठसेही दिसत नव्हते..
...शेवटी गणपत पुन्हा बिडी ओढू लागला अन भपाभप धूर सोडू लागला...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com