esakal | कणसं न फुटणारं पीक! (ऐश्वर्य पाटेकर)
sakal

बोलून बातमी शोधा

aishwarya patekar

‘‘राही, कनसं फुटत्यात तोपत्तूरच पीक म्हत्वाचं, बाई. त्येला एकदा का कनसं यायाची बंद झाली का मंग त्येची गरज संपती. मंग ती कामाला आलंच तं ढोरा-गुरांची उगळ म्हनून! ढोरं बी खायाला नाथू नाथू करत्यात...’’

कणसं न फुटणारं पीक! (ऐश्वर्य पाटेकर)

sakal_logo
By
ऐश्वर्य पाटेकर oviasishpate@gmail.com

‘‘राही, कनसं फुटत्यात तोपत्तूरच पीक म्हत्वाचं, बाई. त्येला एकदा का कनसं यायाची बंद झाली का मंग त्येची गरज संपती. मंग ती कामाला आलंच तं ढोरा-गुरांची उगळ म्हनून! ढोरं बी खायाला नाथू नाथू करत्यात...’’

ही गोष्ट राही आणि शोभा या दोन म्हाताऱ्या बायांची नाहीये. त्यांच्या म्हातारपणची चित्तरकथा तर बिलकूलच नाही ही! मग कसली आहे ही गोष्ट? याचा छडा तुम्ही लावायचा.
दुपार अशी की उन्हाळ्याचे दिवस नसतानाही, चटाचटा चटके देणारी. काळजाच्या पायात तशाही कुठं चपला असतात काय? त्याचं भाजणं अटळ. वेळ तर भाकरीच्या तव्यासारखी तापलेली. भावनेच्या पिकानं तरी कसा तग धरावा? ते उभं होरपळून गेलंय. काहीतरी करपल्याचा वास येतोय. काय करपलंय ते कसं कळायचं! हुंदक्यांचं रान चहूबाजूंनी लोहकून आलेलं. चिंतेचं आभाळ असं डबडबून आलं की कोणत्याही क्षणी ढगफुटी होऊन अवकाळीचा तडाखा बसावा. धूळधाणीला तर आधीच सुरुवात झालेली. उरात काळजीचं वादळ थपडा देत होतं. आता कोणत्याही क्षणी भिंती कोसळून मनाचं घर जमीनदोस्त होऊ शकतं! त्याचं कोसळलेपण कुणाला कसं दिसावं? कारण, ते मनाचं घर आहे. जगाला ते दिसणार नाहीच!

त्या दोघी शेणा-मातीच्या नव्हत्या; त्यामुळे होरपळणं अटळ. इंधनात जळून जळून गोवरी काळी ठिक्कर पडावी, तसलं काहीसं प्रारब्ध कपाळी बांधून आल्यासारख्या. भिंतींना मातीचा गिलावा दिला तरी तो पोपडे धरून भुईवरच येऊन पडतो, म्हणून गिलावा द्यायचं कुणी थांबतं का? दुपारीच्या कहरात दोघी जिवाची उसवण करत बसलेल्या. काळजाचं अस्तर जे आतापर्यंत निगुतीनं टाचत आल्या; आज तेच त्या तडातडा उसवू लागल्या. शिवण काही कच्च्या दोऱ्याची नव्हती. त्यामुळे उसवताना त्यांना कमी त्रास होत नव्हता! हे करायला त्यांना खूप मोठा आनंद वाटत होता असं काही आहे काय? त्यांनी ते उसवावं अशी वेळच जर येऊन ठेपली होती तर त्याला त्या तरी काय करणार? नाहीतरी कुठल्या कुठल्या दु:खानं जगाचं तोंड भरलेलंच असतं. काहींना ते सांगता येतं; काही मुकाटपणे गिळत राहतात. दु:खं वाटल्यानं कमी होतं असं म्हणतात; पण त्यांचा भार आणखीच वाढत जातो. पाच-पन्नास वर्षांचं आभाळ या गावात येऊन दोघींनी डोक्यावर घेतलं. आज मात्र दिवस दोघींचाही कलला होता. साठ-सत्तर वर्षांच्या या दोघी म्हाताऱ्या. चितागती. शोभा म्हातारीचा दु:खानं आटोकाट भरलेला शब्द उमटला : ‘‘आनलं न्हाई का माह्या दिराला, दवखान्यातून?’’
‘‘आनून ऱ्हायले नं बाई, आता काय!’’ राही म्हातारीनं उसासा टाकला.
‘‘आसं का म्हनते गं राही तू?’’ दम घेत शोभा म्हातारी म्हणाली.

‘‘शोभा, जोपत्तूर हाता-पायात तकवा हाये तोपत्तूर दिस आपलं दास असत्यात गं बाई, यकदा का हात-पाय थकलं का दिस पाठीत आसूड मारायला सुरुवात करत्यात, घडूघटक्या ताब्यात ठिवत्यात. त्वांडाला बी गच टाका घालून शिवून टाकत्यात. जगाचा आरसा असतो गं आपल्यापास; पर आपुन डोकून न्हाई बघत त्यात.’’
‘‘राही, माह्या दिराला बरं लागतं का?’’
‘‘कशाचं काय बाई, शोभा? तुह्या दिराच्या नावची यक भाकर कमी व्हनार. इथला शेर संपनार,’’ डोळ्याला पदर लावत अन् मनातले कढ आवरत शोभा म्हातारी म्हणाली.
‘‘असं काय गं कोड्यात बोलून ऱ्हायलीस? मला जरा उमजून सांगशील का न्हाई? यवढ्यात कसा गं संपन शेर? नगं यड्यावानी काई बी बोलू. माहा जीव घाबरा व्हून ऱ्हायलाय. माहं काळीज पालथं पडंल अशी बात का करून ऱ्हायली तू? सुखाचं सांग बाई!’’ राही म्हातारी खरं कळूनही उसनं बळ भरायचा प्रयत्न करत होती.
‘‘शोभा, नाहक कशाला आगळ घालायची? आजपत्तूर ह्येच करत आलो...आन् आता ही वाईट-वखटं दिस नशिबात आल्यात... ’’
‘‘वाईट दिस तू का कमी-जास्त पाह्यले का? त्यायची तं गिनतीच न्हाई. मंग आजच का यवढी ढासळलीयास?’’ म्हातारी स्वत:चीच समजूत घातल्यासारखं म्हणाली. ते राही म्हातारीपर्यंत पोहोचलं नसावंच किंवा पोहोचलंही असलं तरी त्याचं आता काय?
‘‘त्येनं समद्यांसाठी समदं केलं गं बाई, हातचं काई राखून ठिवलं न्हाई. निसता भोळा सांब. पाठच्या भावा-भैनीयला अंतर देलं न्हाई का कधी घासाला इसारला न्हाई. त्यायचं दुख पदरात घिऊन सुखात सुख मानलं. पोरायला मार्गी लावलं. खिशात दिडकीसुदीक शिल्लक ठिवली न्हाई आन् आता असा मरनादारी हाये. दवखान्याचा खर्च निपाटला तं जगन बी...’’

‘‘मंग करायचा ना खर्च. तुला काय कमी हाय? माह्यासारखीची गोष्ट सोड, सोन्यानं दात किसून ऱ्हायले तुम्ही! ज्येनं कमीवलं त्येलाच उपेगी पडनार नसंल तं चाटायचं का ते? कशापायी म्हनते यवढा मोलभाव?’’
‘‘शोभा, तू पाह्यलंय पह्यलापासून...फुटका तांब्या बी नव्हता घरात म्या माप वलांडून आले होते तव्हा. सोन्यानं दात किसायचे दिस उगाच आले न्हाईत. समद्यांसाठी समदं केलं. भावा-भैनीयचे संव्सार मार्गी लावले. आम्ही अंगात फाटकं घातलं; पर पोरायचं अंग उघडं पडू देलं न्हाई. आम्ही एक सांज उपाशी निजलो आसंल; पर पोरायच्या पोटात घासकुटका भरूनच. वाडवडलांचं चिरुटीभर वावर तेवढं वाट्याला आलं, त्याला जोडत पाच-पन्नास एकर जिमीन उभी केली. पोरांच्या शाळा, त्यायचं शिक्षान, त्यायची लगीनकार्यं...कशातच माझा मानूस उना पडला नाही. डॉक्टर म्हनलं, ‘यवढ्यानं यवढा खर्च व्हईल...काय दोन-चार लाखांची बात; पर साऱ्यायनीच हात झटाकलं. लेकीला काही कमीय का माह्या? तरी म्हनती, ‘म्या घर बांधाया काढलंया...’
थोरला म्हनतो, ‘म्याच बॅंकंचं हप्तं फेडून राह्यलोय...’
‘‘जिमिनीला काय धरून बसलीस? दहापांड वावर इकाया काढलं तरी आडचन दूर व्हईन...’’
‘‘माह्या मनात का आला नसंन ह्यो इच्यार? म्या त्येन्ला ह्यो इच्यार बोलून दाखिवला तव्हा धाकला म्हनला : ‘वय झालंय आई त्येंचं, कह्याला उगा खर्चात पाडितीस आम्हाला? मोलामहागाची जिमीन सस्ती इकायला का लावतीस? लोक मूस धरत्यान आन् ठिवत्यान कवड्या हातावं. दादान्ला का आता कनसं फुटणारैत का? नाहक कह्याला पैसं घालवायच्यात...? वय झालं त्यायचं आता, गंज दुनया पाह्यली. आम्ही तं किती दिस जगतो न् किती न्हाई...’’
‘‘वाऱ्यानं दिशा बदलली बाई; पर नगं मनाला लावून घिऊ,’’ राही म्हातारी आतल्या आत ढासळत गेली.
‘‘शोभा, धाकट्याचं बोलनं लईच लागलं गं मनाला. काही केल्या इसारता येत न्हाई. कान पक्कं दाबून घ्यावात तरी बी कानाचं पडदं फाडून पार मस्ताकात घुसून ऱ्हायलंय त्येचं ती बोलनं.’’
‘‘कसं इसारता यिईन, शोभा? मी तं परकी असून माह्या बी काळजाच्या खापऱ्या उडाल्या. आपुन म्हनतो, जग-दुनया दगुड झाली, दुनयाच ती! ती तं भारी परकी; पर आसं रक्ताचं नातं दगुड झालं ना बाई आता...जाऊं दी. नगं आपटू बाई मस्ताक...’’
‘‘राही, कनसं फुटत्यात तोपत्तूरच पीक म्हत्वाचं, बाई. त्येला एकदा का कनसं यायाची बंद झाली का मंग त्येची गरज संपती. मंग ती कामाला आलंच तं ढोरा-गुरांची उगळ म्हनून! ढोरं बी खायाला नाथू नाथू करत्यात...’’
‘‘कसा गं यवढा निकरट निघाला? त्येला असं बोलवलं तरी कसं? ज्येंच्यासाठी फुलांच्या वाट्या केल्या ते तं काळजावं दु:खाचं कुरूप करून ऱ्हायले...’’
‘‘आपुन सुतळीचा तोडा घरातून हालू देत न्हाई. आपलं आपलं म्हनताना आज आपली चिरुटीभर वावरावं सत्ता न्हाई.’’
‘‘जमाना बदलला, बाई...’’
‘‘शोभा, जमाना काई बदलत न्हाई, त्यो हाय तसाच आसतो. आपुनच डोळ्यावं गच पट्टी बांधून घेतो. ती सोडायची यळ यक ना यक दिस येनारच आसती. आपुन मनुमन देवाचा धावा करत आसतो का ती यळ यिऊ न्हाई...ती आली का मंग देवाचं बी हात बांधल्यालं आसत्यात. मला आज अशी पट्टी सोडावाच लागली, शोभा...काळीज कोरड्या जागी पडून माशागत तडफड करंतय! कुडीतला आत्मा जोपत्तूर उडून जात न्हाई तोपत्तूर हे समदं सोसावंच लागंल. देवादिकान्ला बी चुकलं न्हाई...आपुन तं मातीची मानसं!’’
‘‘राही, बुजाटा दे बाई तुह्या दु:खाला...’’
‘‘किती बुजाटा द्यायाचा शोभा आन् कह्यासाठी?’’
‘‘......................’’ शोभा म्हातारीची शिळा झाली. तिचे शब्दच संपले.
‘‘पाह्य, मी बी कशी गं अशी? तुला च्याचं बी इच्यारलं न्हाई!’’
‘‘राही, ऱ्हाऊं दी च्याचं. त्यो कसा घोटल गं? म्याच तुह्यासाठी काय तरी करून आनीते माह्या घरून!’’
‘‘काई आनू नगं...आन् मला काय कळत न्हाई का, मघापून तोंड लपून रडून ऱ्हायलीस ती...आपली जात परकी हाय; पर आतडं तं यकचंय ना, शोभा!’’

‘‘......................’’ शोभा म्हातारीनं पदर तोंडात गच्च धरून ठेवला अन् भिंतीला रेटा देऊन बसली. असा किती तरी वेळ नुसताच गेला. कुणीच कुणाशी काही बोललं नाही. बोलायचंही काय राहिलं होतं? बोलून तर झालंच होतं. शोभा म्हातारीनं उसासा टाकला, त्यासरशी शब्दही घरंगळून आले : ‘‘तू तुह्या दु:खाचा दगुड फोडून ऱ्हायलीस, राही...पर माह्या बी दु:खाचा दगुड बनून ऱ्हायलाय, बाई. ‘नगं मनाला लावून घिऊ,’ असं तरी कसं म्हनून धीर दिऊ तुला? आला दिस कलला समजायचा. त्याला उजूक सूर्व्या न्हाई! म्या आले व्हते तुहं दुख वाटून घ्यायाला. मातुर, म्याच आता तुह्या दु:खाखाली पुरती दबले, बाई. माह्या तं नावावं चिरुटी बी न्हाई! उद्या असा प्ररसंग माह्यावं गुदारला तं करायचं काय?’’

शोभा म्हातारी उठली. तिचे गुडघे कुरकुर करत होते. मात्र, ती तशीच पाय ओढत निघाली...तिच्या काळजात खड्डा पडला. तो बुजवता येणार नव्हताच; पण ती कसाबसा बुजाटा देऊ लागली. तिला तिच्या कणसं न फुटणाऱ्या पिकाची काळजी वाटू लागली...