लिंबाचं झाड (ऐश्वर्य पाटेकर)

ऐश्वर्य पाटेकर oviaishpate@gmail.com
रविवार, 5 जानेवारी 2020

कृषिजनसंस्कृतीच्या भावविश्वात झाडं, नदी, डोंगर, गाव-शिवार,
पशू-पक्षी यांना माणसासारखंच व्यक्तिमत्त्व असतं. मात्र, जागतिकीकरणाच्या, आधुनिकीकरणाच्या रेट्यानं ही गावरहाटीच पार बदलून गेली आहे. गावाकडचा माणूस या बाबी गमावत चालला आहे. या नव्या-जुन्याच्या संघर्षात अडकलेल्या ‘गावाकडच्या गोष्टी’ सांगणारं हे साप्ताहिक सदर...

व्हायचं काय की कधी कधी अभ्यासाच्या तंद्रीत तोल जायचा; आधाराची फांदी निसटायची. मात्र, खालची फांदी आम्हा पोरांना वाचवायची. खरं तर त्या वेळी ती फांदी नसायचीच, तर तो असायचा झाडाचा हात! अन्‌ लिंबाच्या झाडाचा तो हातच आम्हाला पडता पडता वाचवायचा.

झाडापेडांनी आपल्या अंगा-खांद्यावर खेळवलेली माझी एक आख्खी पिढी आहे. झाडांशी माझी दोस्ती लहान वयातच झाली. शाळकरी वयात या ना त्या कारणानं सदोदित झाडांशीच आमचे दिवस जोडलेले होते. त्यापैकीच एक झाड म्हणजे म्हसूच्या मळ्यातलं लिंबाचं झाड. हे काही इतर झाडांसारखं नव्हतं. खूप स्पेशल होतं आमच्यासाठी. म्हसू माझ्या वर्गात होता. परीक्षा जवळ आली की आम्ही म्हसूच्या मळ्यातल्या लिंबाच्या झाडावर अभ्यासाला जायचो. म्हसूचा मळा गावापासून हाकेच्या अंतरावर. लिंबाची ज्याची त्याची फांदी ठरून गेलेली असायची. जसा शाळेच्या पहिल्या दिवशी जो बाक ‘पकडला’ जाई त वर्षभर - कुठल्याही कागदपत्रांशिवाय- आपल्याच ‘मालकी’चा होऊन जातो तशी ती फांदी. जो ज्या फांदीवर बसायचा त्यावरून त्या त्या फांदीला त्या त्या पोराची नावं पडली होती. म्हणजे असं की ‘संतूची फांदी’, ‘नित्याची फांदी’, ‘पक्याची फांदी’, ‘हरीची फांदी’, म्हसूची फांदी...’ मग काय बिशाद, कुणी एकमेकांच्या फांदीवर बसेल! लिंबाच्या झाडालाही वाटत असेल की फांद्यांचा भार आपण सोसतोय अन्‌ मालकी मात्र या पोट्ट्यांची! पण खात्रीनं सांगतो, आमच्या झाडाच्या मनात असं काही येऊच शकत नव्हतं. कारण, ते आम्हाला आईच्या मायेनं जपायचं. कित्येकदा वाचलो आहोत आम्ही झाडावरून पडता पडता. व्हायचं काय की कधी कधी अभ्यासाच्या तंद्रीत तोल जायचा; आधाराची फांदी निसटायची. मात्र, खालची फांदी आम्हा पोरांना वाचवायची. खरं तर त्या वेळी ती फांदी नसायचीच, तर तो असायचा झाडाचा हात! अन्‌ लिंबाचा तो हातच आम्हाला पडता पडता वाचवायचा. सांगा मग, असेल का दुनियेत दुसरं असं झाड, आमच्या लिंबाच्या झाडासारखं...!
***

आमचा अभ्यास जोरात चालायचा. अभ्यास कितपत आमच्या डोक्यात घुसत होता माहीत नाही; मात्र भूमितीची प्रमेयं, गणिताची सूत्रं, पाठ्यपुस्तकातले धडे, कविता, पाढे असा सगळा गृहपाठ लिंबाच्या झाडाचाही तोंडपाठ झाला असेल. लिंबाचं झाड जर का आमच्याबरोबर परीक्षेला बसलं असतं तर पहिल्या नंबरनं उत्तीर्ण झालं असतं! आम्ही जसे एकेक इयत्ता पुढं सरकत होतो तसंच ते लिंबाचं झाडंही. जिवाचा दोस्त असलेलं हे झाड म्हसूच्या भाऊबंदकीत मात्र वादाचा मुद्दा होऊन बसलं होतं. म्हसूची आजी वारली अन्‌ त्याच्या चार काकांमध्ये जमिनीची अन्‌ घराची वाटणी झाली. वाटणी झाली नव्हती तेवढी लिंबाच्या झाडाची. मग मात्र आमचा साऱ्यांचा जीव टांगणीला लागला. आज ना उद्या आपल्या या लिंबाची वाटणी होणार...त्याची वाटणी करायची तर, हे लोक ते झाड तोडून त्याचे चार वाटे घालतील. या गोष्टीवर मग आम्हा पोरापोरांची एक मीटिंगच झाली.
संतू म्हणाला : ‘‘म्हसूच्या तिन्ही चुलत्यांना चांगलं बुकलून काढू!’’
‘‘ये संत्या, ऱ्हाव दे! ते केवढे, आपण केवढे. आपल्याच चड्ड्या पिवळ्या करून टाकतील ते. हायेस कुडं! नित्या म्हणाला.
‘‘कायी पण आयड्या देऊन ऱ्हायलंय येडबंगू!’’ पक्याही बोललाच.
‘‘न्हायी तं आपुन असं करू, आपलं लिंबाचं झाड उपटून नदीकाठावर मोकळ्या जागेत जाऊन लावू; म्हंजे त्याच्यावर कुनाचीच मालकी ऱ्हानार न्हायी!’’
मी असं म्हणताच पोरांनी जी हसायला सुरुवात केली!
त्यांचं हसणं थांबेनाच. भरीस भर म्हणून संतू जमिनीवर अंग टाकत गडबडा लोळत हसायला लागला. मग मीच कावराबावरा झालो. तसा सगळ्यांवर रागेही भरलो. ही काय हसायची गोष्ट आहे? त्यांच्या हसण्याचा भर ओसरतो न्‌ ओसरतो तोच म्हसूचे वडील आले. आम्ही त्यांच्या कानावर आमचं गाऱ्हाणं घातलं. म्हसूच्या वडिलांनी आम्हाला शब्दच दिला : ‘लिंबाच्या झाडाची वाटणी होणार नाही.’
आता आमचा जीव भांड्यात पडला. गावात आल्यावर मी घरातून फुटाणे चोरून आणले अन्‌ सगळ्यांच्या हातावर मूठ मूठ ठेवून आनंद साजरा केला. तेवढा जीवच होता माझा त्या लिंबाच्या झाडावर!
***

मात्र, एक दिवस पक्यानं लिंबाच्या झाडावरून झालेली कुरबुर माझ्या
कानावर घातली; मग मला काही राहवलं नाही. माझ्या मनाची चलबिचल सुरू झाली. काळीज थरथरू लागलं. लिंबाच्या झाडाविषयीची एक हुरहूर मनाला अशी बिलगून आली की काही करमेनाच!
कधी एकदा म्हसूला गाठतो अन्‌ असं काही वाईट घडणार नाही असं
ऐकतो, असं मला होऊन गेलं होतं. कारण, प्रश्न माझ्या लिंबाच्या झाडाचा होता आणि ते झाड म्हणजे माझा जिवलग दोस्त! शाळेच्या मधल्या सुटीत मी म्हसूला गाठलंच.
‘‘काय रे म्हसू, वाचणार का आपलं लिंबाचं झाड?’’
‘‘अवघडंय बाबा...माझा तो चुल्ताय नं मुंबैवाला; तो म्हण्तो
तोडा ते झाड! करा त्याचे चार वाटे! फार दुष्टंय रे तो!’’
म्हसूनं असं म्हटल्यावर माझ्या काळजात धस्स झालं. आपल्या लिंबाचं मरण काही टळत नाही असं मला वाटून गेलं. तरी उसनं अवसान आणून मी त्याला म्हणालो :‘‘लिंबाला माणसांसारखे हात पाह्यजेल व्हते! म्हंजे, तुझ्या त्या चुलत्याला त्यानं चांगलंच बदडून कहाडलं असतं!’’
‘‘पन न्हायीत ना बाबा त्याला हात!’’
शाळेची घंटा झाली. तो त्याच्या वर्गात पळाला अन्‌ मी माझ्या. वर्गात माझं काही मन लागेना. कुऱ्हाडीनं घाव घालून लिंबाचे चार तुकडे केले गेलेले अन्‌ म्हसूच्या चुलत्यांमध्ये वाटले गेलेले मला दिसू लागले... लिंबाची ‘हत्या’ मला डोळ्यांसमोर दिसत होती. जिवाची कालवाकालव होत होती. काही करून आपला लिंब वाचायला हवा; पण म्हसूचे चुलते तर मारेकरी व्हायला बघत होते.
माझ्या दुसऱ्या मित्राला, विष्णूला मी म्हणालो : ‘‘विष्णू, तुला माहितीय का? अरे, म्हसूचं लिंबाचं झाड तोडलं जाणारय!’’
‘‘माहितीय. खूप भांडणं होऊन ऱ्हायली त्यांची त्या लिंबावरून!’’
‘‘किती दुष्टैत रे म्हसूचे चुलते!’’
‘‘जाव दे नं यार, त्यांचं झाड आहे, तोडणारच ते; त्यानं असं काय व्हईल!’’
‘‘हत्या करण्याचं पाप लागंल त्यांना!’’
‘‘ये यड्या, हत्या माणसाची केली जाते. झाडाची कधी हत्या झाली, असं आयकलंय का तू? येडं न्हाय तर!’’
***

शाळा सुटली. मी घरी आलो; पण मन कशातच लागेना. सारखा लिंब डोळ्यासमोर येत होता. विष्णू म्हणाला ते काही मला पटलं नाही. म्हणे, हत्या माणसाची होते, झाडाची नाही! झाडाला का जीव नाही? झाडालाही माणसासारखाच जीव असतो. त्यालाही मन असतं. आपल्या लिंबाच्या झाडाला तर आहेच; पण माणसाच्या जगातले नियमच वेगळे. आपल्या झाडाची हत्या होणार याची आता तर माझी खात्रीच झालीय. रात्री जेवण न करताच मी झोपलो. जेवण कसं जाणार? जर माझ्या लिंबाची हत्या होणार असेल तर? आई उठवायला आली. म्हणाली : ‘‘काय रे, जेवण न करताच झोपलास? ऊठ बबड्या, असं उपाशी पोटी झोपू न्हायी.’’
‘‘मला भूक न्हायीये, आई!’’
‘‘कुडून जेवून आला का काय?’’
‘‘न्हायी आई. माझं लिंबाचं झाड तोडणारैत!’’
‘‘त्याचं तुला काय?’’
‘‘आई, त्याचं तुला काय म्हंजे? काय बोलून ऱ्हायलीय तू? आम्चा लिंब आहे तो!’’
‘‘अरे, पण मालकी त्यांची हाये त्याच्यावर! लेका, जित्या माणसावर घाव घालायला माणूस मागं-पुढं पाह्यत न्हायी; ते तर भारी झाडंय; तू आपला जेवून घे दोन घास’’
‘‘झाडंय म्हंजे काय, आई? त्याला का जीव न्हायी?’’
‘‘हाये नं बाबा, म्या कुडं न्हायी म्हन्ते? पर माणसातली वल आटली!भाऊ भावाच्या जिवावर उठला, हे तं भारी झाड हाये!’’
‘‘म्या केस करीन म्हसूच्या चुलत्यावर!’’
‘‘त्यानं काय व्हईन?’’
‘‘झाडाची हत्या केली म्हनून त्याला खडी फोडायची शिक्षा व्हईल!’’
‘‘तुह्या डोक्यात फरक पडलाय बाबा! कायी बी बरळून ऱ्हायलाय तू!’’ असं म्हणत आई तिच्या कामात गुंतून गेली. आता तर मला बिलकूल झोप लागेना. शेवटी व्हायचं तेच झालं. म्हसूच्या लिंबाचं झाड तोडलं गेलं. ही खबर माझ्यापर्यंत आली अन्‌ मी धोधाट पळत सुटलो म्हसूच्या मळ्याकडे. दमोदम भरलो. पुढचं दृश्य पाहून, जवळच्या दगावलेल्या माणसाचं शेवटचं अंत्यदर्शन घ्यावं तसे लिंबाचे चार तुकडे झालेले पाहून मी रडायला लागलो, तर पोरं हसायला लागली. म्हणाली : ‘‘अरे, ह्ये येडं पाह्यलं का? रडून ऱ्हायलंय! जसं कुणी माणूस मेलंय!’’
खरंच, कुणी नात्यातलं माणूस दगावावं; तसंच तर होतं ते. जवळचं माणूस गेल्यानंतर त्याच्या आठवणी काढून आपण रडतो. मग झाडाच्या नसतात का आठवणी? त्या तर कितीतरी होत्या. हे पोरांना सांगितलं असतं तर ते आणखी हसले असते; पण मला खात्रीनं वाटतं की झाडं बोलतात, झाड हसतात, झाडं राग व्यक्त करतात अन्‌ झाडांनाही दु:ख होतं. मात्र, हे माणसाच्या गावीच नसतं. म्हसूचे चुलते म्हणजे हत्यारेच. त्यांनीच केली लिंबाची हत्या. माझ्या मनानं हंबरडा फोडला! भलेही त्याचा आवाज माणसाच्या कानापर्यंत पोचला नसेल, मात्र देवाच्या कानापर्यंत तर नक्कीच पोचला असेल. आज ना उद्या या अपराधाची शिक्षा देव त्यांना करणारच आहे! माणूस गेल्यानंतर काही दिवस उलटले की घरातली माणसंही सावरतात. मी मात्र फार मनाला लावून घेतलं होतं; म्हणून की काय, एक दिवस आईनं म्हसूच्या लिंबाच्या झाडाची लिंबोळी उचलून आणली. अंगणात आळं करता करता तिनं मला बादलीभर पाणी आणायला सांगितलं. मी पाणी घेऊन गेलो तर मला म्हणाली : ‘‘लेका, ही घे लिंबोळी. लाव या आळ्यात! तुझ्या लिंबाच्या झाडाची आणलीय! हे तुझं लिंबाचं झाड कुणीच तोडणार न्हायी!’’
मला वाटलं. आपल्याला का सुचलं नाही हे!
***

मी मोठा झालो; तसं माझं लिंबाचं झाडंही. भलेही मी या झाडावर अभ्यास केला नाही, तरी मला वाटतं की ते मला भूमितीची प्रमेयं, गणिताची सूत्रं, धडे, कविता, पाढे ऐकवतंय... शिवाय,
मी माझ्या आई-बापाचा एकुलता एक. मला चार भाऊ नसल्यामुळे वाटणीवरून कधीच हत्या होणार नाही माझ्या या लिंबाच्या झाडाची...!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang aishwarya patekar write gawakadil gosti article