esakal | एका रहस्याचा प्रवास (अक्षय दत्त)
sakal

बोलून बातमी शोधा

akshay dutt

एका रहस्याचा प्रवास (अक्षय दत्त)

sakal_logo
By
अक्षय दत्त akshaydatt78@gmail.com

‘रोशन व्हिला’ बंगला मिळवण्यासाठी आम्हाला खूप शोधाशोध करावी लागली. महाबळेश्वरमध्ये एके ठिकाणी आम्हाला हा बंगला सापडला आणि त्या बंगल्याच्या रूपानं नेमकं ‘कॅरेक्टर’सुद्धा सापडलं. तो बंगला तसा फार वापरात नव्हता आणि त्याच्या केअरटेकरना त्याचं नेमकं नाव माहीत नव्हतं. त्याच्याजवळच्या डच बंगल्याच्या नावानंच त्याचा पत्ता सांगितला जायचा. विशेष म्हणजे त्याच्याविषयी चर्चा करत असताना आमचे कला दिग्दर्शक फोटो काढत होते. त्यांनी मला अचानक बोलवलं आणि एक पाटी दाखवली. तिच्यावर लिहिलं होतं : ‘रोशन व्हिला.’ हा अतिशय गमतिशीर योगायोग होता. त्यामुळं आम्ही खऱ्या रोशन व्हिलामध्येच ‘रोशन व्हिला’ चित्रपटाचं चित्रीकरण केलं.

श्रीनिवास भणगे यांचं ‘कॉटेज नंबर ५४’ नावाचं नाटक होतं. निवेदिता जोशी, पंकज विष्णू, अमिता खोपकर अशी तगडी स्टारकास्ट त्याला लाभली होती. भणगे यांनी ते स्वतःच दिग्दर्शित केलं होतं. ते नाटक बघितलं तेव्हा त्याच्याबद्दल काही सांगण्यापूर्वी मी पहिलीच प्रतिक्रिया भणगे यांना दिली होती : ‘‘श्रीकाका, हे नाटक तुम्ही माझ्यासाठी राखून ठेवा. मला याच्यावर चित्रपट करायचा आहे.’’ ते म्हणाले : ‘‘ओके. तुला यात चित्रपट दिसतोय ही चांगली गोष्ट आहे.’’ वास्तविक ते थोडं इंग्लिश स्टाइलचं नाटक होतं. त्यामुळं मला ते आवडलं. भणगे आणि मी आम्ही दोघंही हिचकॉकचे फॅन आहोत. ‘धागेदोरे़’सुद्धा आम्ही तशाच पद्धतीनं काही करायचा प्रयत्न केला होता; पण तो तितकासा पोचला नाही, असं मला वाटतं. तर, या ‘कॉटेज नंबर ५४’ चित्रपटावर आधारित पटकथा भणगे यांनी लिहिली आणि मी ती संहिता घेऊन बऱ्याच निर्मात्यांना भेटलो. मात्र, अनेकांना त्यातला शेवट तितकासा ‘ढासू’ वाटत नव्हता. मी मात्र सांगायचा प्रयत्न करायचो, की मुळात त्या शेवटापर्यंत जाणारा प्रवास हेच या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे- जे हिचकॉकच्या चित्रपटात असतं. ‘धागेदोरे़’ चित्रपटात एका इन्स्पेक्टरची एक भूमिका अजय पूरकर यांनी केली होती. त्यांच्याकडे एके दिवशी निर्माते प्रभाकर भोसले यांनी चित्रपटासाठी काही विषय आहे का अशी विचारणा केली होती. अजयला या नवीन चित्रपटाची संहिता आवडली होती. त्यामुळं त्यानं आमची गाठ घालून दिली. भोसले यांनाही ती आवडली आणि चित्रपटाचा प्रवास सुरू झाला.

भणगे यांनी जितकी ताकदीची संहिता लिहिली होती, तितकाच चांगला कॅमेरामनही आम्हाला मिळाला. त्यांचं नाव महेश आणे. ‘स्वदेस’बद्दल राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले अणे हे चांगले तंत्रज्ञ आहेत आणि त्यांचं व्यक्तिमत्त्वही तितकंच प्रेमात पाडणारं. सेटवर सगळ्यात सिनिअर असूनही सगळ्यात एनर्जेटिक आणि तितकेच वेळेचे आग्रही. त्यांच्याबरोबर काम करणं हा एक वेगळाच अनुभव असतो. ‘रोशन व्हिला’ इतका सुंदर दिसतोय, तो दिसण्याबद्दल त्यांचे प्रयत्न महत्त्वाचे. ‘रोशन व्हिला’ बंगला मिळवण्यासाठी मात्र आम्हाला खूप शोधाशोध करावी लागली. वाईतल्या मंदार शेंडेनं आम्हाला महाबळेश्वर, पाचगणीचे बंगले दाखवले. महाबळेश्वरमध्ये एके ठिकाणी आम्हाला हा एकांतातला बंगला सापडला आणि त्या बंगल्याच्या रूपानं नेमकं ‘कॅरेक्टर’सुद्धा सापडलं. तो बंगला तसा फार वापरात नव्हता आणि त्याच्या केअरटेकरना त्याचं नेमकं नाव माहीत नव्हतं. त्याच्याजवळच्या डच बंगल्याच्या नावानंच त्याचा पत्ता सांगितला जायचा. विशेष म्हणजे त्याच्याविषयी चर्चा करत असताना आमचे कला दिग्दर्शक फोटो काढत होते. त्यांनी मला अचानक बोलवलं आणि एक पाटी दाखवली. तिच्यावर लिहिलं होतं - ‘रोशन व्हिला.’ हा अतिशय गंमतिशीर योगायोग होता. त्यामुळं आम्ही खऱ्या रोशन व्हिलामध्येच ‘रोशन व्हिला़ चित्रपटाचं चित्रीकरण केलं. आणखी एक गंमत होती. तिथल्या केअरटेकरनं आम्हाला सूचना दिली होती, की इथं नॉन-व्हेज शिजवू नका आणि शिजवलं, तर एका विशिष्ट बेडरूममध्ये जाऊ नका. कारण तिथं काही विचित्र अनुभव आले आहेत. आम्ही त्या बेडरूमचं रूपांतर एक प्रकारे स्टोअर रूममध्ये केलं होतं; पण त्या केअरटेकरची सूचना आणि चित्रपटाचा एकूण प्रभाव यांमुळं आम्ही इतके प्रभावित झालो होतो, की कुणाला छोटी जरी वस्तू आणायची असली, तरी तो दुसऱ्या कुणाला तरी बरोबर घेऊन जायचा. सूचनेचं ‘भूत’ मानगुटीवर बसलं ते असं!

चित्रपट हा व्यवसायच असा आहे, की कुणाची भूमिका कुणाच्या भाळी लिहिली असेल सांगता येत नाही. ज्या अजयमुळं खरं तर आमच्या चित्रपटाचा प्रवास सुरू झाला, तो हा चित्रपट नंतर काही कारणांमुळं करू शकला नाही. तो जी व्यक्तिरेखा साकारणार होता, त्यासाठी आम्ही बरीच धावाधाव केली. अनेक कलाकारांची चाचपणी केली. सुदैवानं प्रसाद ओक हा गुणी कलाकार आम्हाला सापडला, त्याच्या तारखाही मिळाल्या आणि प्रसादनं ही भूमिका सुरेख केली. ‘रोशन व्हिला’मध्ये दोन बहिणींच्या व्यक्तिरेखा आहेत. रेणू आणि रती. त्यातली एक भूमिका तेजस्विनी पंडित करणार हे नक्की होतं. तिच्यासारखीच सुंदर अभिनेत्री कोण याचा शोध घेताना सोनाली खरे ही अभिनेत्री मिळाली. सोनालीचा हा चित्रपट ‘कमबॅक’ चित्रपट होता. तेजस्विनीनं साकारलेली भूमिका अतिशय आव्हानात्मक होती आणि तिनं कमालीच्या तडफेनं ही भूमिका साकारली आहे आणि चित्रपटाला खूप मोठा भाग तोलून धरला आहे. तिलाही या भूमिकेबद्दल सगळ्याच स्तरांवरून मोठी दाद मिळाली.

खूप चांगला चित्रपट करूनसुद्धा चित्रपटाला म्हणावं तितकं यश मिळू शकलं नाही, ही खंत माझ्या मनात आहे. बहुतेक वेळा नाटकांचं चित्रपटांत माध्यमांतर केलं जातं तेव्हा ते माध्यमांतर फसतं असं म्हटलं जातं. कारण नाटक लिहिताना बंदिस्त प्रकारचं नाट्यगृह लक्षात घेऊन लिहिलेलं असतं आणि चित्रपट तयार होताना ते तशाच पद्धतीनं केलं जाऊ शकतं. मात्र, ‘कॉटेज’ नाटकाचं माध्यमांतर करताना आम्ही तो चित्रपटच असेल याची पुरेपूर काळजी घेतली होती. भणगे यांनी चित्रपट लिहितानाच तशा प्रकारे लिहिला होता आणि मीही त्या पद्धतीनंच त्याला ट्रीटमेंट दिली होती. कला दिग्दर्शक पद्मनाभ दामले आणि कॅमेरामन महेश आणे यांचा खूप मोठा हातभार त्यासाठी लाभला. या चित्रपटात बहुतेक वेळ दोन व्यक्तिरेखांमध्ये संभाषण होतं. त्यामुळं ती एक प्रकारे रिस्कही होती. मात्र, तरीही चित्रपट करताना आम्ही त्याचं भान राखलं, त्यातलं टेन्शन कायम राहील याची काळजी घेतली आणि एक परिपूर्ण चित्रपट करता आला.

‘रोशन व्हिला’चं संगीत आणि पार्श्वसंगीत अविनाश-विश्वजीत यांचं आहे. चित्रपटात ‘माइंड गेम’ हा मूळ गाभा होता. चित्रपट मराठी असला, तरी त्याचं अपील युनिव्हर्सल असावं असा आमचा विचार होता. अविनाश-विश्वजीत यांनी या सगळ्या गोष्टींचा अतिशय बारकाईनं विचार करून संगीत तयार केलं. आम्ही अक्षरशः व्हॉट्सॲपवर छोट्याछोट्या गोष्टीवर चर्चा करत ते संगीत फायनल केलं. या चित्रपटात दोन गाणी आहेत. एक श्रेया घोषालनं गायलंय, तर दुसरं म्हणजे टायटल सॉंग बेला शेंडेनं गायलंय. ते अतिशय छान जमून आलेलं गाणं आहे. आमच्या चित्रपटाचं संकलन भक्ती मायाळू करत होत्या, तेव्हा त्या ‘२४’ या मालिकेचंही संकलन करत होत्या. त्या मालिकेचे सगळे लोक ते गाणं ऐकून आम्हाला दाद द्यायचे इतकं ते भन्नाट जमलेलं गाणं आहे. आमचा चित्रपट नीट न चालण्याचं कारण म्हणजे अनप्लॅन्ड रिलीज. अनेकांपर्यंत हा चित्रपट योग्य पद्धतीनं पोचू शकला नाही. मात्र, आता तो युट्यूबच्या माध्यमातून पोचतोय हे त्यातल्या त्यात समाधान. या चित्रपटाचं कौतुक करताना अनेक जणांनी ‘मराठीत इतका चांगला प्रयत्न होऊनही तो लोकांपर्यंत नीट पोचला नाही’ अशी खंत व्यक्त केली, पण चित्रपट चांगला जमला याचं समाधान मात्र गाठी आहे. या चित्रपटाचं आणखी एक विशेष आहे. त्याची कोरिओग्राफी माझी पत्नी वेदांती भागवतनं केली. त्यामुळं हा एकत्र काम करण्याचाही आनंद घेता आला.

या चित्रपटाचा शेवट करताना मी वेगळा विचार केला. त्यात नायिका तिला त्रास देणाऱ्यांना शेवटी मारणार असं मी भणगे यांना सुचवलं. प्रेक्षकांना ते कितपत रुचेल, असा प्रश्न त्यांनी विचारला; पण आम्ही दोघंही कन्व्हिन्स झालो आणि त्या पद्धतीनं आम्ही शेवट केला. तो लोकांना पटला आणि आवडला हेही महत्त्वाचं.

loading image