वेब-विश्वाची नवी ‘रंजन’शाही (अमोल उदगीरकर)

amol udgirkar
amol udgirkar

यंदा ‘मिशन मंगल’ आणि ‘बाटला हाऊस’ असे बहुचर्चित चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले असताना सगळ्यात जास्त चर्चा होती ती ‘सॅक्रेड गेम्स’ या बहुचर्चित वेब सिरीजच्या दुसऱ्या सीझनची. महानायक अमिताभ बच्चन यांनीही वेब सिरीजमध्ये येण्याचं सूतोवाच केलंय आणि अक्षयकुमार तर या विश्वात प्रवेशासाठी सज्जही झाल्याची चर्चा आहे. एकीकडं दूरसंचार क्रांतीनं भरपूर डेटा प्रत्येकाच्या हाती आला असताना ऑनलाइन स्ट्रीमिंग कंटेंट विलक्षण प्रभावी ठरू लागला आहे. या प्रकाराचा चित्रपटांसारख्या पारंपरिक रंजनमाध्यमाला फटका बसेल का, नक्की काय होईल, भविष्याच्या रंजनाच्या शक्यता कुठल्या दिशेनं फुलतील आदी गोष्टींची चर्चा.

भारतीय मनोरंजन क्षेत्राच्या इतिहासात १५ ऑगस्ट २०१९ ही तारीख महत्त्वाची म्हणून नोंदली जाईल. सणासुदीला आणि लॉंग वीकेंडला दोन मोठ्या स्टार्सचे चित्रपट एकत्र रिलीज होणं ही वर्षाला बाराशेच्या आसपास चित्रपट रिलीज होणाऱ्या देशात तशी नेहमीची गोष्ट. या १५ ऑगस्टलासुद्धा अक्षयकुमारचा ‘मिशन मंगल’ आणि जॉन अब्राहमचा ‘बाटला हाऊस’ हे दोन बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाले. सोबत क्वेन्टीन टेरेन्टिनो या भारतात एका वर्गात लोकप्रिय असणाऱ्या दिग्दर्शकाचा ‘वन्स अपॉन अ टाईम इन...हॉलिवूड’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शित झाला. या मोठ्या चित्रपटांच्या भाऊगर्दीमध्ये आणि जोरदार चालणाऱ्या प्रमोशनमध्येसुद्धा सगळ्यात जास्त चर्चा होती ती ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित होणाऱ्या ‘सॅक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या सीझन्सची. ‘नेटफ्लिक्स’ आल्या viewershipचे आकडे फारच कमी वेळा प्रदर्शित करत असतं. पहिल्या सीझनच्या तुलनेत दुसऱ्या सीझननं प्रेक्षकांची काहीशी निराशा केली असली, तरी ‘सॅक्रेड गेम्स’च्या या सीझनलासुद्धा प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे, हे मानण्यास भरपूर वाव आहे. म्हणजे प्रदर्शनापूर्वीच्या चर्चांमध्ये आणि प्रदर्शनानंतरसुद्धा ‘सॅक्रेड गेम्स’ हा या मोठ्या स्टार्सच्या चित्रपटांसमोरसुद्धा ताठ उभा राहिला. ही भारतीय वेब सिरीजच्या किंवा डिजिटल दृकश्राव्य माध्यमांच्या इतिहासातली एक ‘माइल स्टोन’ ठरू शकेल अशी एक घटना होती. एकीकडं ही घटना आहे, तर दुसरीकडं बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही वेब सिरीजमध्ये येण्याचं सूतोवाच केलंय आणि चित्रपटकमाईच्या निकषांवर अग्रेसर असणारा अक्षयकुमारसारखा कलाकारसुद्धा लवकरच या विश्वात प्रवेश करतोय अशी चर्चा आहे.
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काही प्रश्न भविष्यकाळात समोर येऊ शकतात. ‘नेटफ्लिक्स’, ‘ॲमेझॉन प्राईम’, ‘हॉटस्टार’ आणि इतर ऑनलाईन स्ट्रीमिंग कंपन्या यांच्यात आणि ‘भारतीय प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू’ असं ज्याच्याबद्दल बोललं जात त्या चित्रपटामध्ये (इथं मोठ्या पडद्यावर आवर्जून बघितला जाणारा चित्रपट अपेक्षित आहे) सुरू होणाऱ्या प्रत्यक्ष युद्धाची ही नांदी ठरू शकते का? वेब सिरीज या वेगानं प्रसिद्ध होणाऱ्या प्रकाराचा फटका चित्रपटाला बसू शकतो का? ऑनलाईन स्ट्रीमिंगचा सिनेमावर आर्थिक, सामाजिक (चित्रपट हा आपल्याकडे social influencer म्हणून बघितला जातो, या अर्थानं) पातळ्यांवर चांगल्या-वाईट अर्थानं कसा प्रभाव पडू शकतो, हे ते प्रश्न.
ऑनलाईन स्ट्रीमिंगवरच्या कंटेंटचा चित्रपटांवर पडू शकणारा प्रभाव हा मुद्दा आपल्याकडं आताशी कुठं चर्चेला येऊ लागला असला, तरी हॉलिवूडमध्ये वादाचा धुरळा अगोदरच उडू लागलाय. स्टीव्हन स्पीलबर्ग जे बोलतो त्याची बातमी होते आणि तो जे मत मांडतो त्यावर चर्चा होतात. स्पीलबर्गनं काही दिवसांपूर्वी असंच एक विधान केलं आणि चर्चेचा धुरळा उडाला. स्पीलबर्गचं ‘नेटफ्लिक्स’ आणि तत्सम ऑनलाईन स्ट्रीमिंग कंपन्यांबद्दल असलेलं प्रतिकूल मत हे काही लपून राहिलेलं नाही. ‘नेटफ्लिक्स’च्या ‘रोमा’ चित्रपटाला ऑस्कर नॉमिनेशन मिळाल्यावर स्पीलबर्गनं जाहीर नापसंती व्यक्त केली होती. स्पीलबर्गचा हा ‘नेटफ्लिक्स’वरचा आकस नेमका कुठून आलाय? तर स्पीलबर्गच्या मते, ‘चित्रपट हा चित्रपटगृहांमध्ये जाऊनच अनुभवायची गोष्ट आहे. तुमच्या टीव्हीवर किंवा कॉंप्युटर स्क्रीनवर अनुभवण्याची नाही.’ ‘नेटफ्लिक्स’मुळं चित्रपटांच्या रेव्हेन्‍यू मॉडेलला धक्का बसू शकतो, या भीतीनं हॉलिवूडनं बिझनेस मॉडेलमध्ये बदल करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. मात्र, इथं चर्चेचा विषय आहे, तो म्हणजे भारतीय चित्रपटावर (बॉलिवूड आणि देशातले इतर प्रादेशिक चित्रपट उद्योग) या ‘वेब’क्रांतीचा काय परिणाम होईल हा!
मोठ्या पडद्यावर दाखवला जाणारा चित्रपट भारतीय प्रेक्षकांच्या मानसिकतेवर राज्य करतो, असं मानलं जातं. चित्रपट हे आपल्या देशासाठी फक्त मनोरंजनाचं एक साधन कधीच नव्हतं. पलायनवादी, चकचकीत स्वप्नं विकणारा आपला व्यवसायिक चित्रपट आपल्या प्रेक्षकांचं पिढ्यानपिढ्या आयुष्य व्यापून राहिला आहे. मोठ्या पडद्यावरच्या नायक-नायिकांमध्ये भारतीय प्रेक्षकांचा एक मोठा वर्ग नेहमी स्वतःला पाहत आला आहे. या नायक-नायिकांमध्ये स्वतःला बघून आपल्या अप्राप्य फॅंटसीज आपला प्रेक्षक पूर्ण करत आला आहे. मात्र, तरी मोठ्या पडद्यावरच्या चित्रपटांच्या या वर्चस्वाला एका ठराविक काळानंतर सतत आव्हानं मिळत असतात, असं एक निरीक्षण. कधी ते आव्हान व्हिडिओ प्लेअर्सकडून मिळालं, कधी केबल इंडस्ट्रीकडून, तर कधी टेलिव्हिजन इंडस्ट्रीकडून. ‘सिनेमा पायरसी’कडून मिळालेलं आव्हान हे जितकं बेकायदा होतं, तितकंच गंभीर होतं. मात्र, चित्रपट या सगळ्या आव्हानांना पुरून उरत आलाय. मात्र, यावेळचं वेब स्ट्रीमिंग कंपन्यांकडून मिळणार आव्हान थोडं वेगळं आणि जास्त धोकादायक आहे. कारण या आव्हानाला देशात होणाऱ्या प्रचंड प्रभावी दूरसंचार क्रांतीचा थेट पाठिंबा आहे. कसा? मोबाइल हा आता सध्या एक अवयवच बनल्यासारखा झाला आहे. अगदी अपवादात्मक परिस्थिती वगळता जिथं जिथं आपण जातो तिथं आपला मोबाईल आपल्यासोबतच असतो. एकेकाळी फक्त इनकमिंग कॉल उचलण्यापुरता उपयोग असणारा मोबाइल आता आपल्याला वेळसुद्धा दाखवतो, सकाळी अलार्म वाजवून आपल्याला उठवतो, आपला दिवस प्लॅन करून देतो, व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात आपल्या जबाबदाऱ्यांचं ओझं कमी करतो. याच मोबाइल हँडसेटनं आपल्याला दिलेली मोठी सोय म्हणजे आपल्याला मोबाइलच्या स्क्रीनवर चित्रपट आणि गाजलेल्या मालिकाही बघता येतात. ‘रिलायन्स जिओ’नं एकूणच सेल्युलर क्षेत्रात जी क्रांती आणली, त्याचे अनेक दूरगामी परिणाम झाले. अतिशय स्वस्त सेल्युलर डेटा जिओनं आपल्या ग्राहकांना द्यायला सुरवात केली. नाइलाजानं का होईना, इतर सेल्युलर कंपन्यांनासुद्धा जिओचा कित्ता गिरवावा लागलाच. त्यांनी तसं केलं नसतं, तर त्यांचा बाजारपेठेतला टक्का घसरून जिओची मक्तेदारी प्रस्थापित होण्याचा धोका होता. या स्वस्त झालेल्या डेटामुळंच ‘नेटफ्लिक्स’, ‘ॲमेझॉन प्राइम’, ‘हॉटस्टार’ यांचे सुगीचे दिवस सुरू झालेत. आपल्या देशात झालेल्या स्मार्टफोन आणि फोर-जी क्रांतीचा सर्वाधिक फायदा ज्या क्षेत्रांना झाला, त्यामध्ये या ऑनलाइन स्ट्रीमिंग क्षेत्राचा समावेश आहे. फिक्कीच्या एका अहवालानुसार, भारतात स्मार्टफोनवर व्हिडिओ पाहणाऱ्यांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. मोबाइलवर वेळ घालवण्याचा सरासरी वेळ आपल्या देशात सातत्यानं वाढत आहे. आपण स्वतःचाच विचार केला, तर दिवसभरात आपण किती तरी वेळ मोबाईलच्या स्क्रीनकडं बघण्यात घालवतो. एरवी आपल्या देशात ग्रामीण-शहरी, राजकीय, सामाजिक, भाषिक असे जे अनेक स्तर आहेत, त्या सगळ्यांमध्ये हा ‘कॉमन ट्रेंड’ आहे. प्रचंड विविधता असणारा खंडप्राय देश जेव्हा एकच ट्रेंड दाखवायला लागतो, तेव्हा त्याची नोंद घेणं भाग पडतंच. थोडक्यात ‘इंडिया’ आणि ‘भारत’ दोन्हींकडं स्मार्टफोनवर व्हिडिओ पाहण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. याच अहवालात म्हटल्यानुसार, भारतात जवळपास वीस कोटी लोक फोनवर व्हिडिओ बघतात. थोडक्यात वेब स्ट्रीमिंगचं क्षेत्र सोन्याचं अंडं देणारी कोंबडी ठरणार आहे. या क्षेत्रातून मिळणाऱ्या महसुलाचे आकडे डोळे विस्फारून टाकणारे असतील हे नक्की.
वेब सिरीज या प्रकारानं सध्या आपल्या मनोरंजन उद्योगामधल्या लोकांना झपाटून टाकलं आहे, असं एकूण चित्र आहे. विनोदानं असं एक विधान केलं जातं, की मुंबईतल्या अंधेरी-ओशिवरा भागात (जिथं मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असणारे बहुसंख्य लोक वावरत असतात) जर तुम्ही अंदाजानं एखादा दगड भिरकावलात, तर तो वेब सिरीज बनवणाऱ्या माणसाला लागण्याची शक्यता दहापैकी चार आहे. वेब सिरीज या माध्यमाला सेन्सॉरशिप (सध्या तरी) नसणं, वेळेची मर्यादा नसणं आणि यामुळं प्रयोग करण्याला असलेला अधिक वाव आदी कारणांमुळं सध्या वेब सिरीज या प्रकाराला सुगीचे दिवस आले आहेत असं वरकरणी तरी दिसतं; पण ही वाढ गुणात्मक किती आणि संख्यात्मक किती हे बघायला पाहिजे. ‘सॅक्रेड गेम्स’, ‘मेड इन हेवन’ यासारखे क्वचित अपवाद वगळता आपल्या वेब सिरीज बाहेरच्या देशातल्या समकालीन वेब सिरीजच्या (‘नार्कोस’, ‘चेर्नोबिल’, ‘गेम ऑफ थ्रोन्स’ इत्यादी) पासंगालासुद्धा पुरत नाहीत, हे कटू सत्य आहे.

मोठा पडदा, छोटा पडदा
चित्रपट या माध्यमाला या वेब सिरीज आत्ताच स्पर्धा देऊ शकतील, असं मानणं धाडसाचं ठरेल. भारतीय समाज हा सर्वच क्षेत्रांत व्यक्तिपूजक आहे . चित्रपट क्षेत्रसुद्धा याला अपवाद नाही. रजनीकांत, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, महेशबाबू आणि देशातल्या सर्व चित्रपट उद्योगांमध्ये लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सुपरस्टार्स चित्रपटांतच कार्यरत आहेत. वेब सिरीजमध्ये काम करणं त्यांना कमीपणाचं वाटत असावं. या बाबतीत सन १९९९ च्या काळातली टेलिव्हिजन इंडस्ट्री आणि सध्याची वेब कंटेंट इंडस्ट्री यांच्यात काही मोठी साम्यं आढळतात. सन १९९९ च्या पुढंमागं टेलिव्हिजन इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर प्रसरण पावत होती. तिला मोठ्या प्रमाणावर जनाश्रय लाभत होता; पण आपल्याच धुंदीत असणारा मोठा पडदा छोट्या पडद्याकडं लक्ष द्यायलाच तयार नव्हता. मोठ्या पडद्यावरचे कलाकार छोट्या पडद्याला आणि त्यात काम करणाऱ्या कलावंतांना तुच्छ समजायचे. परिस्थिती बदलली ती ‘कौन बनेगा करोडपती’ या गेम शोपासून. छोट्या पडद्याचं महत्त्व ओळखून अमिताभ बच्चन या महानायकानं हा गेम शो होस्ट करायला घेतला आणि खेळाचे सगळेच नियम बदलून गेले. बच्चनचं हे ‘न भूतो न भविष्यती’ यश बघून नंतर गोविंदा, शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान असे अनेक नायक छोट्या पडद्याकडं वळले. भारतीय वेब सीरिजला जितकी गरज चांगल्या कन्टेन्टची आहे, तितकीच तो कंटेंट आपल्या खांद्यावरून वाहून नेणाऱ्या सुपरस्टारची आहे. हे थोडं विचित्र वाटू शकतं; पण व्यवस्थेपेक्षा व्यक्ती मोठ्या मानणाऱ्या व्यक्तिपूजक समाजाचं हेच वास्तव आहे. अक्षयकुमार एका वेब सिरीजमध्ये काम करत असल्याच्या बातम्या मध्यंतरी झळकल्या होत्या. अक्षयकुमार ‘वेब सिरीजचा बच्चन’ होऊ शकतो का हे बघणं औत्सुक्याचं राहील.

तंत्रज्ञान आणि सवयींचाही अडसर
दुसरं म्हणजे आपल्या दूरसंचार कंपन्यांनी स्वस्त डेटाची लयलूट आपल्या ग्राहकांवर चालवली असली, तरी त्यांची अतिशय अकार्यक्षम, खुरडत खुरडत चालणारी सेवा (विशेषतः ग्रामीण भागात) हा एकूणच वेब स्ट्रीमिंग कंपन्यांच्या वाटचालीमधला मोठा अडथळा आहे. याउलट मोठा देदीप्यमान इतिहास असणाऱ्या चित्रपटांचं इन्फ्रास्ट्रक्चर खेडोपाड्यापर्यंत पसरलं आहे. आपल्या प्रेक्षकाला अजूनसुद्धा चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट बघणं या प्रकाराबद्दल प्रचंड आपुलकी आहे. मोबाईलच्या छोट्या स्क्रीनपेक्षा अनेकांना अजूनही चित्रपटगृहांत (भले ते ढेकणांनी भरलेलं, अस्वच्छ प्रसाधनगृह असणारं, गळकं थिएटर का असेना) जाऊन चित्रपट बघण्यातून एक ‘किक’ मिळते.

वेबचा विशिष्ट प्रेक्षक
याशिवाय आपल्याकडं बनवल्या जाणाऱ्या वेब सिरीज या एका विशिष्ट उच्चभ्रू किंवा मेट्रो शहरांमध्ये राहणाऱ्या ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून बनवल्या जातात, असं एक निरीक्षण आहे. ग्रामीण-निमशहरी भाग (जिथं आपली जास्त लोकसंख्या राहते) भागात राहणाऱ्या ग्राहकांना हा वेब स्ट्रीमिंग कंटेंट फारसा रुचण्याची शक्यता नाही. देशात सर्वमान्यता मिळवण्यासाठी वेब सीरिजला देशाच्या या भागातसुद्धा जनाश्रय मिळणं आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना या भागात राहणाऱ्या जनतेला आवडेल असा कंटेंट बनवणंही तितकंच आवश्यक आहे.
भारत हा प्रचंड विरोधाभासांनी भरलेला देश आहे. या देशात अणुऊर्जा वापरली जाते आणि शेणाच्या गोवऱ्या जाळूनही ऊर्जानिर्मिती केली जाते. याचं देशात नरिमन पॉईंट आहे, आणि याच देशात धारावीची झोपडपट्टीही आहे. जगातले काही सर्वाधिक श्रीमंत लोक याच देशात आहेत आणि याच देशात कित्येकांचं दरडोई उत्पन्न बावीस रुपयेही नाही. तंबूतले चित्रपट आणि व्हिडिओ पार्लर अजूनही लोकप्रिय असताना ‘नेटफ्लिक्स’, ‘ॲमेझॉन प्राइम’, ‘हॉटस्टार’सारख्या ऑनलाइन स्ट्रीमिंग कंपन्यांचाही भारतीय मनोरंजनाच्या बाजारपेठेत टक्का वाढणं, हे याच अंतर्विरोधाचं अजून एक उदाहरण. आपल्या देशाची लोकसंख्याच इतकी आहे, की इथं मनोरंजनाच्या प्रत्येक प्रकाराला आपली अशी एक स्पेस आहे. इथं एकाच वेळेस तमाशा, भारूड, नाटक, चित्रपट, वेब सिरीज आणि कित्येक मनोरंजनाची माध्यम गुण्यागोविंदानं एकत्र राहू शकतात.
आपल्याकडच्या अनेक आघाडीच्या प्रॉडक्शन हाऊसेसनी (उदाहरणार्थ, करण जोहरची धर्मा प्रोडक्शन्स, फरहान अख्तरची एक्सेल एंटरटेनमेंट, इरॉस आणि कित्येक) स्वतःची डिजिटल स्ट्रीमिंग कंटेंट निर्मिती सुरू केली आहे. अनेक नव्या दमाचे दिग्दर्शक डिजिटल निर्मिती करण्यास उत्सुक आहेत, कारण यात तुमच्या खांद्यावर सेन्सॉरचं जोखड नसतं, त्यामुळं तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे स्वतःची कलाकृती अभिव्यक्त करू शकता. प्रस्थापित लेखक-दिग्दर्शकांपेक्षा नवनवीन अभिनव कल्पना मांडणाऱ्या नवोदित लेखक-दिग्दर्शकांना इथं अधिक संधी आहेत. थोडक्यात टेलिव्हिजन इंडस्ट्री आणि फिल्म इंडस्ट्रीला समांतर अशी वेब स्ट्रीमिंगची अर्थव्यवस्था तयार होत आहे. याचा प्रत्यक्ष फटका टीव्ही आणि चित्रपटांच्या व्यवसायाला बसणार हे उघडच आहे.

पारंपरिक बंधनं दूर
काही दिवसांपूर्वी शाहरुख खानच्या अनेक जुन्या गाजलेल्या चित्रपटांचे आणि आगामी चित्रपटांचे हक्क ‘नेटफ्लिक्स’नं विकत घेतले. त्याच वेळेस ब्रॅड पीट या आपल्याकडंसुद्धा लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्याच्या ‘वॉर मशिन’ या चित्रपटाचं प्रॉडक्शन ‘नेटफ्लिक्स’नं केलं होतं. त्याच्या प्रमोशनसाठी पीट भारतात आला असताना शाहरुख खाननं त्याच्या सन्मानार्थ पार्टी दिली होती. त्या वेळेस पत्रकारांशी बोलताना शाहरुख आणि पीट या दोघांनीही वेब स्ट्रीमिंगची भलामण केली. त्या वेळेस शाहरुख म्हणाला : ‘‘मी बॉलिवूडमध्ये आलो होतो, तेव्हा तुम्हाला चित्रपट बनवायचा असेल तर तुम्ही व्यवस्थेचा किंवा कुठल्यातरी कॅम्पचा भाग बनणं आवश्यक होतं. मात्र आता हे बंधन दूर झालं आहे.’’ थोडक्यात, एकूणच बॉलिवूडमधली प्रेक्षकांच्या माथी मारली जाणारी सुमार घराणेशाही, ब्रेक मिळण्यासाठी कुणी गॉडफादर असणं, पैसा बाळगून असल्यावर इंडस्ट्रीच्या नाड्या आवळणं हे जे प्रकार आहेत त्यावर वेब स्ट्रीमिंग कंपन्या हा चांगला उतारा आहेत. इथं केवळ (तूर्त तरी) दर्जाला किंमत आहे. अर्थात, स्टुडिओ पद्धत भारतात पुन्हा आल्यावरही असेच दावे केले जात होते. प्रत्यक्षात ‘स्टार सिस्टिम’ आणि घराणेशाहीनं या स्टुडिओ व्यवस्थेला गिळंकृत केलं. वेब स्ट्रीमिंग कंपन्या हा पर्वत हलवू शकतात का, हे पाहणं हा भविष्यातला औत्सुक्याचा प्रश्न असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com