यंत्र आणि ‘मानव’ (आनंद घैसास)

आनंद घैसास anandghaisas@gmail.com
रविवार, 19 जानेवारी 2020

काही प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्ता असणारं आणि नेमून दिलेलं काम करणारं, जगातलं पहिलं कृत्रिम-सजीव-यंत्र तयार केलं गेलं असल्याचा दावा ‘प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ या संस्थेमार्फत प्रसिद्ध झालेल्या एका संशोधन अहवालात करण्यात आला आहे. या प्रयोगात संगणकीय प्रणाली वापरून एका जिवंत पेशीची, किंवा त्यातल्या मूलभूत पेशीद्रव्यांची विशिष्ट पद्धतीनं, मार्गानं वाढ जोपासत हे कृत्रिम-सजीव-यंत्र तयार करण्यात आलं आहे.

काही प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्ता असणारं आणि नेमून दिलेलं काम करणारं, जगातलं पहिलं कृत्रिम-सजीव-यंत्र तयार केलं गेलं असल्याचा दावा ‘प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ या संस्थेमार्फत प्रसिद्ध झालेल्या एका संशोधन अहवालात करण्यात आला आहे. या प्रयोगात संगणकीय प्रणाली वापरून एका जिवंत पेशीची, किंवा त्यातल्या मूलभूत पेशीद्रव्यांची विशिष्ट पद्धतीनं, मार्गानं वाढ जोपासत हे कृत्रिम-सजीव-यंत्र तयार करण्यात आलं आहे. या प्रयोगाबाबत चिकित्सा आणि एकूणच यंत्र आणि मानव यांचं नातं कुठवर आलं आहे, कुठपर्यंत जाऊ शकतं, यंत्रमानव पूर्णपणे मानवासारखा होऊ शकतो का आदी गोष्टींबाबत चर्चा.

काही प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्ता असणारं आणि नेमून दिलेलं काम करणारं, जगातलं पहिलं कृत्रिम-सजीव-यंत्र तयार केलं गेलं असल्याचा दावा नुकताच म्हणजे १३ जानेवारी २०२० च्या ‘प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ या संस्थेमार्फत प्रसिद्ध झालेल्या एका संशोधन अहवालात करण्यात आला आहे. गेल्या वर्षी २४ जानेवारी २०१९ ला खरं तर हा संशोधन अहवाल त्यांच्याकडं सादर करण्यात आला होता; पण त्याची तपासणी, छाननी होऊन, त्याचा वैज्ञानिक खरेपणा तपासून तो अहवाल खुला करण्यासाठी हे सहा महिने खर्च झाले, हेही लक्षात घ्यायला हवं.
सॅम क्रिगमन आणि जोश बॉनगार्ड, डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर सायन्स, युनिव्हर्सिटी ऑफ व्हरमाँट, बर्लिंगटन; डग्लस ब्लॅकिस्टन, डिपार्टमेंट ऑफ बायॉलॉजी, टफ्ट्स युनिव्हर्सिटी, मेडफोर्ड, मॅसेच्युसेट; मायकेल लेव्हिन, अॅलन डिस्कव्हरी सेंटर आणि डिपार्टमेंट ऑफ बायॉलॉजी, टफ्ट्स युनिव्हर्सिटी, मेडफोर्ड, मॅसेच्युसेट तसेच विस इन्स्टिट्यूट ऑफ बायॉलॉजिकली इन्सपायर्ड इंजिनिअरिंग, हारवर्ड युनिव्हर्सिटी, बोस्टन यांनी एकत्रितपणे केलेल्या संशोधनाचा हा अहवाल आहे. या संशोधनाला आर्थिक साह्य डिफेन्स अॅडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्टस एजन्सी, युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिकेनं दिलं होतं.

या प्रयोगात संगणकीय प्रणाली वापरून एका जिवंत पेशीची, किंवा त्यातल्या मूलभूत पेशीद्रव्यांची विशिष्ट पद्धतीनं, मार्गानं वाढ जोपासत हे कृत्रिम-सजीव-यंत्र तयार करण्यात आलं आहे. एका आफ्रिकन बेडकाच्या पेशीतून जरी याची वाढ करण्यात आली असली, तरी तो काही बेडूक नाही, तर एक अगदी लहानसा म्हणजे ०.०४ (चार शतांश) इंच किंवा सुमारे एक मिलिमीटर लांबी-रुंदीचा काही प्रमाणात त्याला ‘सजीव’ म्हणावं असा एक सूक्ष्मजीव आहे. ‘काही प्रमाणात सजीव असणारं यंत्र’ असं याला म्हटलं आहे, कारण तो जीव काही प्रमाणात त्याच्या सभोवती असणाऱ्या वातावरणाचं आकलन करून घेतो आणि त्याचा त्यावर होणारा परिणाम दाखवतो, आसपासच्या परिसरातून ठराविक प्रकारे हालचाल करत एका जागेवरून दुसरीकडे प्रवास करू शकतो. स्वत:ची होणारी शारीरिक हानी किंवा इजा, जखम आपणहून भरून काढू शकतो, सोबत ठेवलेलं सामान किंवा वस्तू घेऊन जाऊ शकतो. शिवाय साधारणत: एक आठवडाभर त्याचं आयुष्य आहे (बायोडिग्रेडेबल आहे), असा हा कृत्रिम सूक्ष्मजीव आहे.

‘झेनोपस लाएव्हिस’ बेडकाच्या पेशी
‘झेनोपस लाएव्हिस’ या पंजे असलेल्या आफ्रिकन जातीच्या बेडकाच्या हृदयातल्या आणि कातडीतल्या; तसंच फलधारणा झालेल्या बीजांडातल्या ‘स्टेम सेल’ या भराभर वर्धित होणाऱ्या प्रकारच्या पेशी या प्रयोगासाठी वापरण्यात आल्या आहेत. या बेडकांच्या पेशींचा वापर या सूक्ष्मजीवांची वाढ करण्यासाठी करण्यात आला असला, तरी हे सजीव जगात अस्तित्वात असणाऱ्या कोणत्याही उभयचर प्राण्यांसारखे नाहीत. दिसण्यात आणि वागण्यातही. सुमारे एक मिलिमीटर लांबी रुंदी आणि उंची असणारा, वरून मऊसर पेशीआवरण असलेला, पूजेत वापरल्या जाणाऱ्या चौरंगासारखा यांचा आकार आहे. स्टेम सेलच्या मूळ पेशीतली मूलभूत जडणघडण करणारी पेशीद्रव्यं जेव्हा एकमेकांशी जोडकाम करत उत्क्रांत होत असतात, त्यावेळी ठराविक संगणकीय प्रणाली वापरून त्यांच्या क्रियाकलापावर नियंत्रण आणत हे आकार बनवले, वाढू दिले आहेत.

पेशीद्रव्यानं बनलेल्या या सूक्ष्मवस्तू एकट्या किंवा समूहामध्ये विशिष्ट प्रकारे आपल्या शारीरिक हालचाली करत एका ठिकाणाहून दुसरीकडं जाऊ शकतात. समजा एखाद्याच्या शरीरात त्या ठेवल्या, तर त्या ठराविक मार्गानंच जाऊ शकतात आणि त्यांच्यासोबत जर एखादं औषध पाठवलं, तर ते त्या औषधाला योग्य जागी घेऊन जाऊ शकतात, असं त्या अहवालात म्हटलं आहे.
पारंपरिक रोबो किंवा यंत्रमानव हे सहसा लोह, तांबे अशा धातूंचे, विविध प्लॅस्टिकचा वापर करून बनवलेले आणि विद्युतऊर्जा वापरून, चक्रांच्या साह्यानं हालचाली करत काम करतात. मात्र, हे सूक्ष्म-कृत्रिम-सजीव कोणत्याही पारंपरिक रोबोसारखे नाहीत, शिवाय कोणत्याही ज्ञात सजीवांसारखेही नाहीत. मात्र, नेमून दिलेली कामं करणारे, नव्या प्रकारचे सजीव आहेत, असं या अभ्यासात सहभागी असणारे जोश बॉनगार्ड यांनी त्यांच्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.
यात वापरलेल्या स्टेम सेल ज्या बेडकाच्या होत्या, त्याच्या नावावरून आणि रोबो या शब्दांची जोडणी करून या नव्या कृत्रिम-सजीवाला ‘झेनोबोट’ असं नाव देण्यात आलं आहे.

संगणकीय प्रणाली, आज्ञावलींच्या वापरातून या ‘झेनोबोट्स’ची उत्क्रांती घडवून आणण्यात आली आहे. आधी या फलधारणा झालेल्या ‘स्टेम सेल’ पेशींची नेहमीप्रमाणं ‘कल्चर’ पद्धतीप्रमाणं वाढ करून शेकडोंच्या प्रमाणात त्यांच्या उतींच्या स्वरूपातील (टिश्शू) गुठळ्या तयार करण्यात आल्या- ज्यांना हृदयात स्पंदन करणाऱ्या पेशींच्या वापरातून सतत हलतं ठेवण्यात आलं होतं. त्यातून एका ठराविक मार्गानं त्यांची वाढ होईल, असं नंतर पाहिलं गेलं. या प्रयोगात जीवशास्त्रज्ञांनी काही संगणकीय मर्यादा कार्यान्वित केल्या होत्या. प्रत्येक झेनोबोट्ससाठी त्यांच्या वाढीच्या वेळी तयार होणाऱ्या उतींमधील ऊर्जेची मर्यादा आणि पाण्यामधून त्यांची प्रवासाची गती कशी असेल, त्याची मर्यादा आखून देण्यात आली होती. त्यामुळे ठराविक गुणधर्म दर्शविणाऱ्या मूलभूत घटकांचीच वाढ होईल, इतरांची नाही असा एक मार्ग आखण्यात आला होता. त्यातून या हव्या असणाऱ्या झेनोबोट्सची प्रगती होत गेली. मग त्यांना इतरांमधून वेगळं काढून त्यांचं पुनरुत्पादन केलं गेलं. नवीन तयार झालेल्या झेनोबोट्समधूनही उत्कृष्ट गुणवत्तेचे झेनोबोट्स संगणकीय निवडीनं वेगळे करण्यात आले. अशा प्रकारे संगणकीय प्रणालींची तपासणी आधी करण्यात आली. त्यातून कशा प्रकारे या पेशी वाढवल्या जाऊ शकतात त्याचा मार्ग सापडला. मग या प्रणालींचा प्रत्यक्ष पेशींसाठी वापर करून हे त्रिमित आकार पेशी स्वत: निर्माण करतील, हे पाहिलं गेलं. यासाठी हे तयार होणारे झेनोबोट्स एकत्रित राखण्यासाठी कातडीतल्या उतींचा वापर करण्यात आला, तर त्यांच्यात ठराविक प्रकारे हालचाल उद्युक्त करण्यासाठी हृदयात धडधड निर्माण करणाऱ्या पेशींचा स्पंदनं निर्माण होण्यासाठी वापर केला गेला. या प्रयोगात तयार झालेल्या झेनोबोट्सना बाहेरून कोणत्याही पोषक पदार्थांची गरज सुमारे आठवडाभराच्या त्यांच्या आयुष्यात लागत नाही. ते त्यांना ठेवलेल्या तबकडीमध्ये (पेट्रिडिशमध्ये) ठराविक मार्गानं आठवडाभर हिंडताना दिसून आलं. तसंच त्यांना झालेली इजाही ते आपणहून भरून काढू शकत होते, असं दिसून आलं. सूक्ष्म चाकूनं त्यातल्या झेनोबोट्सचे जेव्हा चिरून दोन तुकडे करण्यात आले, तेव्हा आपण झिपरनं जसं बॅगेचं तोंड जोडून घेतो, तसे आपसूकच त्याचे दोन भाग सांधले गेले, जुळून एकसंध झालेले दिसून आले.

इतर रोबोंमध्ये जसा त्यांच्यावर बाहेरून विद्युत किंवा रेडिओ प्रारणं वापरून ताबा ठेवला जातो, तसा कोणताही प्रकार या कृत्रिम-सजीवांबाबत वापरात येत नाही. इतर रोबोंमध्ये त्यांच्या हालचालींसाठी मुख्यत: विद्युतऊर्जा- मग ती बाहेरून दिलेली असेल, नाही तर अंतर्गत विद्युतघटांमधून मिळणारी असेल, तशी- किंवा बायोइलेक्ट्रिसिटीचाही वापर या कृत्रिम-सजीवांमध्ये केलेला नाही. जणू काही यांच्या निर्मितीनंतर त्यांचा वापर म्हणजे एखाद्या जुन्या स्प्रिंगच्या खेळण्यासारखा आहे. स्प्रिंगची गुंडाळी सुटेपर्यंत जसं ते कार्यान्वित राहतं; तसंच हा कृत्रिम-सजीव आठवडाभर त्याचं आयुष्य असेपर्यंत काम करणार... असं या संशोधन अभ्यासाचं नेतृत्व करणारे सॅम क्रिगमन, जे व्हरमाँट युनिव्हर्सिटीत रोबोटच्या संगणकीय उत्क्रांती या विषयात सध्या पीएचडी करत आहेत, त्यांनी विशद केलं आहे.

पुढं मोठा उपयोग
या प्रयोगामुळं अशा प्रकारच्या कृत्रिम-सजीवांचा, सजीव रोबोंचा पुढं मोठा उपयोग होऊ शकतो. महासागरातल्या तेलगळतीवर उपाय म्हणून, सूक्ष्म प्लॅस्टिकचं समुद्रातलं प्रदूषण रोखण्यापासून ते मानवी शरीरात ठराविक औषधं ठराविक ठिकाणी नेण्यासारख्या कामांपर्यंत जर हे कृत्रिम-सजीव कामाला लावले, तर रक्तवाहिन्यांमध्ये जमणाऱ्या नको असलेल्या अडथळ्यांनाही दूर करण्यात ते वापरता येतील, असं या बाबतीत टफ्ट युनिव्हर्सिटीचे सेंटर फॉर रीजनरेटिव्ह अँड डेव्हलपमेंटल बायॉलॉजी केंद्राचे संचालक असणाऱ्या संशोधकांनी म्हटलं आहे.
रोबो म्हणजे यंत्रमानवाच्या बाबतीत सध्या बऱ्याच ठिकाणी आणि बरेच संशोधन होत आहे. साधी मोटार आता खरोखरीची स्वयंचलित, चालकविरहित होऊ घातली आहे. अनेक कारखान्यांमध्ये हातानं काम करणारी माणसं कमी, तर एकापुढं एक कामांची मालिकाच सांभाळणारी, सुसूत्रता असणारी यंत्रंच संगणकीय प्रणालींवर नेमून दिलेली कामं करत आहेत.

काही मर्यादाही
जशी अशा नव्या संशोधनांची उपयुक्तता आहे, तशाच काही समस्याही व्यक्त केल्या गेल्या आहेत... जैविक अभियांत्रिकी हे तर या बाबतीत मोठं आव्हानच आहे. नैसर्गिक पुनरुत्पादनाखेरीज जर असे जीव आपण प्रयोगशाळेत तयार करू शकत असलो, तर आपण एका नव्या युगात शिरत आहोत हे खरं; पण ते किती योग्य तेही ठरवावे लागेल. कारण जर असे कृत्रिम सूक्ष्मजीव माणसाला जसं आरोग्य राखण्यास मदत करू शकतात, असं जरी म्हटलं गेलं असलं, तरी ते शरीरात त्याच प्रकारे दोष निर्माणही करू शकणारे होऊ शकतात. कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषयच या बाबतीत महत्त्वाचा ठरतो, कारण स्वत: निर्णय घेण्याची क्षमता असणारं यंत्र, तो निर्णय मानवाला योग्य ठरेल असाच घेईल की नाही हे आजही नक्की ठरवता येणार नाही. मानवी जीवनाला अधिक समृद्ध, आनंददायी आणि आरोग्यदायी करणाऱ्या सौहार्दपणे काम करणाऱ्या रोबोंचं स्वागत तर व्हायलाच हवं; पण या तंत्रज्ञानाचा अनिष्ट परिणामही भविष्यात टाळता आला पाहिजे.
- आनंद घैसास

‘जिवंत’ रोबोंचं पुढं काय?
रोबो आणि सजीव यांच्यातली सीमारेषा पुसणारे अनेक जीव वेगवेगळ्या चित्रपटांत दाखवले आहेत. ‘टर्मिनेटर’सारख्या अनेक चित्रपटांत त्याच्याबाबत दाखवण्यात आलं आहे. एकीकडं यंत्रमानवांत ‘जीव’न भरण्याचा प्रयोग संशोधनाच्या पातळीवर होत असताना या चित्रपटांत दाखवण्यात आलं आहे तसं तर होणार नाही ना, अशीही चर्चा सगळीकडंच सुरू आहे. मायकेल लेविन यांनी ही चर्चा किंवा भीती सरसकट फेटाळून लावलेली नाही. ‘‘ही भीती किंवा चिंता अकारण आहे, असं म्हणता येणार नाही. आपण जेव्हा ज्या सिस्टिम्स समजून घेऊ शकत नाही अशा सिस्टिमशी ‘खेळू’ लागतो, तेव्हा आपला जो हेतू नाही असे परिणामही होऊ शकतात,’’ असं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र, ‘‘झेनोबोट्ससारखे छोटे जीव तयार करण्यामुळं नंतर अनेक उपयोगी शोधही लागू शकतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मानव भविष्यकाळात टिकून राहायची असेल तर आपल्याला या सगळ्या गुंतागुंतीच्या सिस्टिम्स छोट्या नियमांद्वारे तयार होऊ शकतात याचंही आकलन आपण करून घेण्याची आवश्यकता आहे,’’ असं त्यांचं मत आहे. थोडक्यात आपण एका ‘अननोन टेरिटरी’मध्ये घुसत आहोत. त्यात काहीही होऊ शकतं हे खरं असलं, तरी ही ‘टेरिटरी’ आपण समजून घेतली पाहिजे, असं त्यांचं मत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang anand ghaisas write machine and human article