गूढ उडत्या तबकड्यांचं (आनंद घैसास)

anand ghaisas
anand ghaisas

यूएफओ म्हणजे उडत्या तबकड्या हे अनेक वर्षांपासून कायम असलेलं गूढ आहे. पेंटॅगॉननं नुकतेच असे काही व्हिडिओ प्रसिद्ध केले आणि ही चर्चा पुन्हा एकदा वेगानं सुरू झाली. हा सगळा प्रकार नेमका काय असावा, त्याबाबतच्या चर्चांना काही आधार आहे का, वैज्ञानिक निकष लावता काय दिसतं आदी सर्व गोष्टींबाबत विश्‍लेषण.

यूएफओ म्हणजे "अन-आयडेंडिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्‍ट'. आकाशात विहरणाऱ्या; पण त्या नक्की काय आहेत हे समजून न आलेल्या वस्तू. अशा वस्तू कोणीतरी पाहतं, कधी कुतूहल, कधी भीती, तर कधी स्वत:लाच प्रसिद्धी मिळवायची असते म्हणून त्याची बातमी होते, खरे-खोटे फोटो प्रसारित होतात, मग विविध चर्चा, मुलाखती, झडतात. चित्रे, व्हिडिओ यांचा भडिमार सुरू होतो. साधकबाधक गोष्टी समोर येतातही किंवा बरेचदा गुलदस्त्यातही ठेवल्या जातात. काही दिवस या गोष्टी चर्चेत राहतात, कालांतरानं विरूनही जातात; पण जनमानसातलं यूएफओंबद्दलचं कुतूहल मात्र प्रत्येकाच्या मनाच्या एका कोपऱ्यात घर करून राहतंच. शिवाय आपल्यासारखे कोणीतरी सजीव या विश्वात असणारच... हा विचारही डोक्‍यात कायम भिरभिरत असतोच...

आज या यूएफओंबद्दल लिहिण्याचं कारणही असंच काहीसं आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेतल्या संरक्षणसंबंधी काम करणाऱ्या "पेंटॅगॉन' या प्रमुख संस्थेनंच काही वर्षं गूढ म्हणून गणल्या गेलेल्या काही "यूफओंचे' नौदलातल्या काही वैमानिकांनी घेतलेले कथित व्हिडिओच समाजमाध्यमावर प्रसारित केले. आधी "क्‍लासिफाइड' म्हणजे लोकांच्या नजरांपासून संरक्षित, अर्थात गुप्त ठेवलेले हे व्हिडिओ "डिक्‍लासिफाइड' म्हणजे सर्वांना उपलब्ध करून देण्यात आले आणि या चर्चेला पुन्हा एकदा हवा मिळाली. अर्थात या वस्तू नक्की काय आहेत हे सांगता येत नसल्यानं, त्या कोणी परग्रहवासी "एलियन्स'च्या अवकाशातून फार दूरवरून आलेल्या/पाठवलेल्या असू शकतात, किंबहुना त्या म्हणजे आपल्या ग्रहाचा, पृथ्वीचा शोध घेण्यासाठी, टेहाळणीसाठी पाठवलेल्या त्या "उडत्या तबकड्या'च (अशा दूरच्या अवकाश-प्रवासासाठी लागणारी अवकाशयानं स्वत:भोवती फिरत राहणाऱ्या तबकडीच्या आकाराची करावी लागतील असा एक वैज्ञानिक सिद्धांत आहे) असणार असा कित्येकांचा अंदाज आहे.

विशेष म्हणजे असे व्हिडिओ काही आजचे, नवे नाहीत. सन 2004 च्या उत्तरार्धात आणि सन 2015 च्या पूर्वार्धात अमेरिकेच्या नौदलातल्या काही वैमानिकांनी त्यांच्या सागरी फेरफटका मारताना दिसलेल्या काही वस्तूंचं चित्रण केलं होतं. अर्थात ते शासकीय संरक्षण दलातले असल्यानं ते गुप्त राखलेल्या माहितीचा एक भाग होते; पण काही स्रोतांमधून ते बाहेर पडून काही वर्षांनी ते प्रसार माध्यमांच्या हाती लागले. सन 2017 मध्ये ते पहिल्यांदा उल्लेखिले गेले आणि प्रसृत झाले, तेही एका निवृत्त वैमानिकाच्या मुलाखतीमधून.

डेव्हिड फ्रेव्हर हा तो निवृत्त कमांडर आणि त्याचा वरिष्ठ लेफ्टनंट कमांडर जिम स्लेट हे दोघं नोव्हेंबर 2004 मध्ये नेहमीप्रमाणं नौदलाचं विमान उडवण्याचा शैक्षणिक सराव करत होते. त्यांनी सांगितलं, की ""अचानक नियंत्रण कक्षाशी संबंधित असलेल्या; पण बरोबरीनं सरावात सामील असलेल्या दुसऱ्या एका विमानातून विचारणा झाली, की तुमच्याकडे काही प्रत्यक्ष युद्धसामग्री आहे का?... लगेच मनात विचार आला, या सॅनडिगोच्या किनाऱ्यावर युद्ध वगैरे काही नसताना, आत्ता हवाई युद्धसामग्रीची काय गरज?... आम्ही खरं उत्तर दिलं; पण त्या विमानांमधल्या एका वैमानिकाला काही तरी भीतिदायक शंका आली होती हे मात्र त्यावेळी जाणवून गेलं.

""मात्र पुढील दोन आठवडे या प्रकारचे अनुभव आम्हालाच यायला लागले. किनाऱ्यापासून सुमारे 160 मैलांवर दूर असताना अशा काही ओळखता न येणाऱ्या वस्तू सुमारे 80,000 फुटांवरून खाली येताना आमच्या रडारवर दिसायच्या. त्या भराभर खाली उतरायच्या... त्या साधारण 20,000 फुटांवर आल्यावर काही काळ तरंगत राहिल्यासारख्या थांबायच्या. मग काही वेळानं अचानक वेगानं समुद्राकडे झेपावायच्या किंवा परत वर जायच्या, तेही एवढ्या वेगानं, की आमच्या रडारच्या दृष्टिक्षेपाच्या बाहेर निघून जायच्या... एकदा तर आम्ही त्यांचा पाठलाग पण केला. मग लक्षात आलं, की खाली समुद्रात काही विचित्र प्रकारे लाटा दिसताहेत. म्हणजे समुद्रात काही तरी पृष्ठभागाखाली एखादी गोलाकार वस्तू असेल, तर त्यावर आदळून लाटा जशा वागतील तसं काहीसं होत होतं. मग लक्षात आलं, की तिथंच समुद्राच्या पृष्ठभागावर सुमारे 50 फुटावर काहीतरी चमकणारं, साधारण 40 फूट व्यासाचं काहीतरी होतं. ते विमानच असावं अशा विचारानं आम्ही सरळ त्याच्याकडे जायला निघालो, तर तेही थेट आमच्याकडे जणू आम्हाला भेटायलाच येत आहे, असं वाटू लागलं; पण नंतर अचानक ते अतिशय वेगानं वरच्या दिशेनं फरार झाले...''

या त्यांच्या मुलाखतीनंतर पेंटॅगॉनचं याकडे लक्ष वेधलं गेलं. पेंटॅगॉनही यूएफओंच्या घटनांचं विश्‍लेषण करणारा एक संशोधन प्रकल्प चालवत होते. त्यातून हे व्हिडिओ चर्चेत आले. सरकार या बाबतीत नेहमीच खूप लपवाछपवी करते, अशाही टीका करण्यात आल्या होत्या. त्याचाच परिपाक म्हणून "आम्ही काहीही लपवाछपवी करत नाही; पण जे दिसलं, ते ओळखू काही आलेलं नाही; पण अधिक तपासानंतरही त्यातून काही धोका होईल अशी काही कुठली यंत्रणा त्यात आहे असे दिसून आलेले नाही,' असा खुलासा करत पेंटॅगॉननं हे व्हिडिओ प्रसारित केले आहेत, आणि "चुकीच्या कल्पनांचं निराकरण करण्यासाठी' आम्ही हे उघड करत आहोत अशी त्याला पुष्टी जोडली आहे.

खरं तर या आधीच, नऊ फेब्रुवारी 2020 ला एक यूएफओंबद्दलची एक बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये एकूणच यूएफओंच्या दर्शनाचं प्रमाण अमेरिकेमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढलं आहे, असं नमूद करण्यात आलं आहे. "द ग्रे एरिया न्यूज' या न्यूज एजन्सीनं अशी बातमी दिली आहे, की एकट्या जानेवारी 2020 च्या महिन्यात एकूण 518 जणांनी त्यांना यूएफओ दिसल्याच्या घटना "नॅशनल यूएफओ रिपोर्टिंग सेंटर' या संस्थेकडे नोंदवल्या आहेत. तर "म्युच्युअल यूएफओ नेटवर्क' या संस्थेकडेही 468 घटनांची नोंद जानेवारीतच केली गेली आहे. या दोन्ही संस्थांच्या वेबसाइटवर (www.nuforc.org आणि www.mufon.com) जाऊन आपण त्याबाबत तपशील पाहू शकतो.

या प्रसारित केलेल्या व्हिडिओंच्या बाबतीत अमेरिकेच्या अध्यक्षांचं म्हणणं "ते काही विशेष महत्त्वाचं वाटत नाही' असंच आहे. काही जणांनी मात्र "म्हणजे अजूनही काहीही समजून न येणाऱ्या "परग्रहवासियांची' शक्‍यता आहेच' असा दावा केला आहे. त्यात "टु द स्टार्स' या संस्थेनं तर या व्हिडिओंचं तोंडभरून स्वागत केलं आहे, जी संस्था "परग्रहवासी आहेतच आणि आपण त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी तयार राहिलेच पाहिजे' या विचारातूनच स्थापन केली गेली आहे...

यूएफओ ही कल्पनाच दुसऱ्या महायुद्धानंतर सुमारे सन 1953 मधली. हवाई सामर्थ्य वाढवण्याच्या आणि रशियाबरोबर चाललेल्या शीतयुद्ध-काळात शत्रूच्या हवाई कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी चालवलेल्या गस्तींमधून, काही ओळखता न आलेली विमानं, मिसाईल यांच्या संदर्भात यूएफओ हा शब्द खरं तर पहिल्यांदा वापरात आला. आजपर्यंत जर आपण या यूएफओंचा, त्यांच्या नोंदवलेल्या घटनांचा मागोवा घेतला, तर अमेरिकेच्या लष्करी हवाई प्रयोगांसाठी तयार करण्यात आलेल्या खास प्रतिबंधित जागेशी आणि त्यांनी घेतलेल्या हवाई चाचण्यांशी यांचा सरळ संबंध जोडता येतो, असं काहींचं म्हणणं आहे. या हवाई चाचण्या, मग त्या विविध आकाराच्या सुपर सॉनिक विमानांच्या प्रायोगिक चाचण्या असतील, रडारवर नोंद होऊ शकणार नाही अशा लहान आकारात, प्रचंड वेगानं जाणारी आणि सभोवतालाशी मिळते-जुळते रंग असणारी लष्करी विमानं अथवा टेस्ट मिसाइलचे काही प्रकार असतील. तेच सामान्य माणसांना दिसले असावेत आणि त्यांना "यूएफओ' मानले गेले असावे...

काहींचं म्हणणं आहे, की समुद्रावर दिसून येणाऱ्या एका मृगजळाचा हा प्रकार आहे, ज्यात अंडाकृती आकाराच्या सभोवतालच्या रंगांपेक्षा थोड्या उजळ किंवा कधीकधी चमकणाऱ्याही वस्तू यात दिसून येतात. काही वेळा क्षितिजाखाली असणाऱ्या वस्तूही यात क्षितिजावर तरंगण्याचा आभास निर्माण करतात. काही ठिकाणी पांढऱ्या ढगांचाच आकार हवेतील चक्राकार वाऱ्यांमुळे (हवेतल्या हवेत होणाऱ्या वावटळीप्रमाणे) असा तबकडीसारखा झालेला असतो. त्याला "लेंटिक्‍युलर क्‍लाऊड' असं म्हटलं जातं. त्यांच्याकडेच "यूएफओ' किंवा "उडत्या तबकड्या' म्हणून पाहिलं जातं.
काही काही वेळा रात्रीच्या हवाई प्रवासात दिशा कळून न आल्यानं गुरू, शुक्र मंगळ असे बरेच ठळक असणारे काही ग्रह तर काही अगस्ती, व्याधासारखे तारेही यूएफओ म्हणून गणले गेले आहेत, खरं तर अशा चमकदार वस्तूंमुळे पाहणारे चक्क संभ्रमित झाले आहेत. एकूणच पाहता, जरी मानलं की ओळखता न येणाऱ्या काही वस्तू लोकांना दिसून आल्या आहेत, तरी त्या बऱ्याच वेळेस एकालाच, कधी दोघांना; शिवाय ते बाकी समाजापासून दूर असताना दिसल्या आहेत. एकाच वेळी एका अख्ख्या गावाला अशी वस्तू दिसलेली आहे, अशी नोंद कधीच दिसून येत नाही. त्यामुळे बऱ्याच घटना अतिरंजित आणि सांगोवांगीच्या गणल्या जातात, हेही खरंच. घडलेल्या घटनांचा सूचना मिळाल्याबरोबर लगोलग शोध घेतल्यावर तर, काही ठिकाणी रात्री आकाशात सोडलेले हे आकाशदिवे होते, हवामानाच्या संशोधनासाठी पाठवलेल्या प्रचंड बलूनवरून परावर्तित होणारा हा प्रकाश होता, एका ठिकाणी तर कोसळलेला बलूनच उपकरणांसकट मिळाला, असंच आजवर लक्षात आलं आहे. काही वेळा उल्काही पडताना त्यांचं रूपांतर छोट्या अग्निलोळात होते, त्यालाही अजाणतेपणी यूएफओ ठरवण्यात आलेलं आहे.

80-90 च्या दशकात तर उडत्या तबकड्या म्हणून प्रसिद्धीस आलेले काही फोटो हे काही माणसांनी चक्क उडत्या तबकड्यांचे कागदी मॉडेल करून, ते झाडाला टांगून किंवा आकाशात भिरकावून त्याचे फोटो काढून, ते समाजमाध्यमांवर प्रसारित केले होते, असं नंतर शोध घेतल्यावर कळलं.

आजपर्यंत अवकाशातून कोणासही आपल्या पृथ्वीवर यायचं असल्यास प्रवास करण्यास लागणारं अंतर आणि त्याला लागणारा वेळ पाहता, ही गोष्ट सहजशक्‍य वाटत नाही. आपणच गुरू शनीचे वेध घेण्यासाठी पाठवलेली "पायोनिअर 10-11 आणि व्हॉएजर 1-2' ही अवकाशयाने ताशी सुमारे 43,200 किलोमीटर (आपल्याला साधलेला हा कमाल वेग आहे) या वेगानं आपल्यापासून सध्या सुमारे 80 खगोलीय एककावर पोचली आहेत. (पृथ्वी ते सूर्य हे अंतर म्हणजे एक खगोलीय एकक) या वेगानं एका वर्षभरात ती यानं सुमारे दोन खगोलीय एककांपेक्षा थोडे अधिक अंतर पार करतात. त्यांच्या सूर्यमालेतून बाहेर पडण्याच्या दिशाही वेगवेगळ्या आहेत. "पायोनिअर 10' हे सन 1972 मध्ये निघालेलं यान सध्या आकाशातील रोहिणी (अल्डेबारान) ताऱ्याच्या दिशेनं जात आहे. हा तारा आपल्यापासून 68 प्रकाशवर्षं दूर आहे. म्हणजे कमाल वेगानं सुमारे 21 लाख 50 हजार 150.6 वर्षांनी आपलं यान तिथं पोचेल. एक लक्षात घ्या, रोहिणी तारा हा आकारानं सूर्यापेक्षा 44 पट मोठा आहे, म्हणून तो आपण इथून पाहू शकतो. रोहिणीजवळून आपला 44 पट लहान असणारा सूर्य दिसेल काय? त्याच्या शेजारी तिसऱ्या क्रमांकावर असणारी आणि आकारानं सूर्याच्याही 109 पट लहान असणारी, स्वत:ला कोणतेही तेज नसणारी, परप्रकाशी पृथ्वी दिसेल काय, की जिचा माग काढत, कोणीतरी एलियन्स आपली चपटी तबकडीसमान यानं घेऊन इकडे आले असतील?... जरा कठीणच वाटतंय.... अहो, नुकतीच आपल्या अगदी जवळच्या, चंद्राच्या फक्त मागच्या पृष्ठभागावर चांद्रयान उतरवताना आपली काय अवस्था झाली तेही लक्षात असू दे...

एकंदरीतच यूएफओ हा काही फार अनाकलनीय असा प्रकार नाही, तसंच त्या उडत्या तबकड्याच असण्याचंही कारण नाही, जर एलियन्सचं यान असेलच, तर ते कोणत्याही आकाराचं असू शकेल, असंच अनेक शास्त्रज्ञांचं मत आहे. खरं तर झोप न घेता अनेक तास चालणाऱ्या लष्करी कामाच्या ताणातून आणि हवाई प्रवासात होणाऱ्या ऑक्‍सिजनच्या कमतरतेतूनही विविध भास होण्याचं प्रमाण वाढतं.
खगोलशास्त्रज्ञ या प्रसारित झालेल्या व्हिडिओंबाबत म्हणतात, की या नौदलांच्या व्हिडिओंमध्ये जे काही दिसतं, त्याविषयी अनेक संभाव्य स्पष्टीकरणं देण्यासारखी आहेत. यात जे नोंदवण्यात आलं आहे, तो एक वातावरणीय प्रभाव असू शकतो, सागरी लाटांवरून येणारे प्रतिबिंब असू शकतं आणि सरावातल्या इतर लढाऊ विमानांच्या प्रतिमांचंच, सागरी पृष्ठावरून किंवा तिथल्या मृगजळावरून प्रतिबिंबित होऊन झालेलं, हे दर्शन असू शकते. शिवाय, रडारशी जोडलेल्या संगणकीय प्रदर्शन प्रणालीतील काही त्रुटीही स्क्रीनवरच्या या ठिपक्‍यांसाठी जबाबदार असू शकतात...

सामान्य भौतिकी नियमात न बसणारा वेग, जो या वस्तूंचा दिसतो, तो फक्त प्रकाशीय किंवा इतर प्रारणांमुळे तयार होणाऱ्या ठिपक्‍यांसारखा दिसून येतो...
आणखी एक वेगळाच मुद्दाही काही न्यूज चॅनेलनी उठवला आहे, की 2012 मध्ये संपुष्टात आलेला यूएफओविषयक संशोधन प्रकल्प, जो आर्थिक सहाय्याअभावी बंद करण्यात आला आहे, तो परत चालू करण्यासाठी जनमानस तयार करण्याचा तर हा शासकीय प्रकार नाही....कारण 40 अब्ज डॉलर्सची यात वित्तीय तरतूद अंतर्भूत आहे... विचार करा...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com