श्रमगाथा (अनघा ठोंबरे)

अनघा ठोंबरे
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

आजी म्हणाल्या : ‘‘भावजी तुमचा आधार आहे. माझ्या मुलीला द्यायचे तर आशीर्वाद द्या. मी लग्नाचं जेवण फक्त वराकडच्या- त्याही पन्नास लोकांना देणार आहे. मी आपल्याकडच्या कुणालाच लग्नाला जेवायला बोलावणार नाही, माझी ती परिस्थितीच नाही. कुणाकडून पैसे घेऊन मला कार्य करायचं नाही. लग्नात जेवायला आम्ही आणि मुलाकडचेच आहोत.’’ दिराच्या हातात निमंत्रितांची यादी होती, किराणा मालाची होती. तो सामान आणणार होता, आचारीही; पण आजींनी स्पष्ट सांगितलं : ‘‘मी तुम्हाला बोलावू शकत नाही. आहेर नको, आशीर्वाद द्या.’’ आजींनी मुलीला नमस्कार करायला सांगितलं. दीर तणतणतच नाराजीनं निघून गेले.

आजी म्हणाल्या : ‘‘भावजी तुमचा आधार आहे. माझ्या मुलीला द्यायचे तर आशीर्वाद द्या. मी लग्नाचं जेवण फक्त वराकडच्या- त्याही पन्नास लोकांना देणार आहे. मी आपल्याकडच्या कुणालाच लग्नाला जेवायला बोलावणार नाही, माझी ती परिस्थितीच नाही. कुणाकडून पैसे घेऊन मला कार्य करायचं नाही. लग्नात जेवायला आम्ही आणि मुलाकडचेच आहोत.’’ दिराच्या हातात निमंत्रितांची यादी होती, किराणा मालाची होती. तो सामान आणणार होता, आचारीही; पण आजींनी स्पष्ट सांगितलं : ‘‘मी तुम्हाला बोलावू शकत नाही. आहेर नको, आशीर्वाद द्या.’’ आजींनी मुलीला नमस्कार करायला सांगितलं. दीर तणतणतच नाराजीनं निघून गेले.

संस्कार म्हणजे पाठांतर, उपदेश, नीतिनियम असा अर्थ झाला आहे. जगण्याचा मार्ग, जाणीव म्हणजे संस्कार हा अर्थ शिकवला जात नाही. कष्टांची जाणीव, कष्टांविषयी आदर आता नाही. इतर निर्जीव यंत्रं असतात, त्याप्रमाणंच कष्टकरी माणूस यंत्र आहे अशी अनेकांची भावना असते. कष्टांच्या, प्रयत्नांच्या सामर्थ्याची एक गोष्ट एका आजींनी सांगितली. पंधरा वर्षांपूर्वी मी त्यांचे त्या क्षणी पाय धरले. आता त्या नसतील, तेव्हाच नव्वदीच्या आसपास होत्या. शिक्षण असं नव्हतंच त्यांना. मात्र, ‘श्रमविद्यापीठा’नं दिलेलं शिक्षण मोलाचं होतं.

आजींचे वडील शेतकरी होते. त्या काळात या पाच-सहा बहिणी, तीन-चार भाऊ, क्रिकेटची टीमच. आजींचे वडील लहानपणीच त्या चार-पाच वर्षांच्या असताना गेले. आई मोठ्या दिराच्या घरी राबत होती आपल्या मुलांना घेऊन. तेव्हा पर्याय असा नसायचाच, कसंतरी चालत होतं. निदान आई होती, तिचे कष्ट करणारे हात होते; पण तीही दोन-चार वर्षांत गेली. काका-काकूंचा मोठा प्रपंच, यांची भावंडांची टीम. काही वर्षं गेली, भावांनी मिळेल तिथं, मिळेल ते काम पत्करलं. उरल्या त्या मुली, खाणारी तोंडं, मुलींना शाळेत नावापुरतं घातलं; पण खूपदा शाळा बुडायची. जेमतेम लिहिता, वाचता यायला लागल्यावर शाळा संपली. शाळेला जायला डबा, दप्तर, वह्या, पुस्तकं, कपडे, चपला असं कितीतरी लागतं, पुन्हा वेळ जातो. आजी केवळ तेरा वर्षांच्या असताना, त्यांच्या काकांनी त्यांचं लग्न लावून दिलं. मुलाचं शिक्षण, नोकरी सोडा- वयही पाहिलं नाही. त्यांना नवरा एकतीस वर्षांचा होता. कायमचं कामही नव्हतं. काहीतरी काम कधीतरी मिळायचं. लग्नामुळं कसलीच सुरक्षितता, सुख, आधार मिळाला नाही; पण एक गोष्ट मिळाली : पाच- सहा मुलं आणि वैधव्य. आजींच्या शब्दात - ‘‘कुत्र्या- मांजरांना होतात तशीच मला मुलं झाली. त्यांना न आनंद ना दुःख. मुलगा होवो, की मुलगी काहीच फरक नाही.’’ नवरा गेला तेव्हा मुलं लहान होती. सगळे खेड्यात राहत होते. आजींचा दीर म्हणाला : ‘‘माझ्याकडं येऊन राहा, मला काही भावाचा प्रपंच जड नाही.’’ आजींनी सौम्य शब्दांत सांगितलं : ‘‘तशीच गरज पडली तर तुमचे घर आहेच. तेव्हा अवश्‍य येईन- तोपर्यंत मात्र नाही.’’ आजींनी एक निर्णय घेतला- ‘शहरात जायचं. तिथं काही थोडं काम मिळेल. शहरात शिक्षणाचं महत्त्व असते, शिक्षण होईल, मुलांनाही काम मिळेल, खेड्यांत मात्र काही भविष्य नाही.’ होतं नव्हतं, ते किडुकमिडुक मोडून आणि साठवलेले पन्नास रुपये घेऊन त्यांनी पुणे गाठलं.
देव एखाद्याची सत्त्वपरीक्षाच पाहत असतो. आजींना पहिल्या मुलीनंतरची मुलं. एका वाड्यात एक अंधारी खोली मिळाली. वाड्यात बरीच बिऱ्हाडं होती, मोठ्या वाड्यात म्हशी होत्या आणि घरमालकाचा दुधाचा धंदा होता. दुधाचा धंदा शेतीपेक्षाही खूप कष्टाचा. पहाटे चारला उठा, गोठा साफ करा, जनावरांना वैरणपाणी करायचं, स्वच्छ करायचं, धारा काढायच्या. घरमालकांच्या दुधाच्या व्यवसायात आजी काम करू लागल्या. पगार, कामाच्या वेळा काहीच ठरलं नव्हतं, काम काय करायचे तेही ठरलं नव्हतं. पडेल ते काम करू लागल्या. राहायच्या जागेचं भाडं त्या काळी सात रुपये होतं; पण ते भाडं कधीच भरायची वेळ आली नाही. आजी पहाटे चार ते दुपारी एकपर्यंत गोठ्यात, नाहीतर इतर कामांत असायच्या. दूध पार नाजूक पदार्थ, नासता कामा नये. त्या काळात बर्फाची गाडी यायची, भुश्‍श्‍यातला बर्फ धुवायचा, तुकडे करायचे, त्यात मोठी पातेली, बरण्या ठेवायच्या. सर्व पातेली प्रचंड मोठी, बरण्या घासणं हे फार मोठं काम होतं. मग रतीबाला बरण्या तयार करायच्या, पुरुष सायकलवर जायचे. मग दुधाचं काम संपलं, की शेणाचं काम. मालकीणबाई दुधाच्या कामाला लागायच्या. आसपासचे लोक पावशेर, अदपाव दूध घ्यायला यायचे. तोवर गोठा पुन्हा स्वच्छ करून मोठ्या घमेल्यात शेण घेऊन गोवऱ्या थापायच्या, खर घालून गोळे करायचे हे काम आजी करत असत. उन्हात दोन-तीन तास ते काम चालायचं, शेणाचा वास अंगाला यायचा, त्यातच घामाचा वास; पण आजींची तक्रार नसायची.
आजींच्या मुली घर सांभाळायच्या. कपडे, भांडी, स्वयंपाक, स्वच्छता या सगळ्या गोष्टी बघायच्या आणि शाळेतही जायच्या. मुलंसुद्धा घरात काम करायची. बाहेर कुणाकडं पाणी वरच्या मजल्यावर भरायची, कधी वाढप्याचं काम करायची, पेपर टाकायची. तेव्हा पेपर टाकायला रस्त्यानं ओरडत बातम्या सांगत जावं लागायचं- तेही धावत. आजींना सासरच्या घरून एक संपत्ती मिळाली, ती म्हणजे शिवणाचं खूप जुनं मशीन. ते कुणीच वापरत नव्हतं. आजींनी ते आणलं. त्याचे पैसेही दिराला हप्त्यानं देऊन टाकले.

दुपारी चार घास पोटात गेले, की परत दुधाचं काम सुरू. गुरं चरायला गेली, की स्वच्छता. उरलेलं दूध तापवायचं, साय काढायची, विरजण लावून दही- ताक करायचं, लोणी काढायचं, कढवायचं. ताक तयार झालं, की ते वाटायचं ती एक व्यवस्था. मग उरलेलं दूध आटवून खवा करायचा. तांबूस रंगाचा खवा तयार व्हायचा. सगळं कष्टाचं काम. सणासुदीला दही टांगून चक्का तयार करायचा, तूप गाळून डब्यात भरायचं. तेव्हा डालडा तूप नव्हतं, याच तुपाचा वापर होत असे. हे सगळं प्रचंड प्रमाणात. शेकडो लिटर दूध, त्या खाली सरपण गोळा करून जाळ करायचा, खूप लक्ष द्यावं लागायचं, परत ती प्रचंड मोठी भांडी घासायची. हे करताकरता रात्र व्हायची. मग संध्याकाळी काहीतरी खायचं आणि मशीनवर बसायचं. आजी एकलव्य पद्घतीनं बघून शिवायला शिकल्या. झबली, टोपडी, फ्रॉक्‍स, चड्ड्या, पिशव्या, अभ्रे आणि ब्लाऊज शिवायच्या. वाड्यातलं सगळं शिवण त्यांच्याकडं असायचं आणि आसपासचे लोकही शिवण द्यायचे. ते सगळं करताना रात्रीचे बारा वाजायचे. मग चार तासांची झोप. म्हशींचं हंबरणं, घंटांचा आवाज, त्यांची हालचाल, झोप येणं कठीण; पण तरीही चारला उठून कामाला हजर. कष्ट आणि कष्ट... विचार करायला, दोन शब्द बोलायलाही वेळ नाही!
घरमालक फारच सहृदय, माणुसकी असलेले. आजींच्या घरात किराणा माल येऊन पडायचा, दूध यायचं, मुलांचे कपडे, वह्या-पुस्तकं, शाळेची फी, चपला सर्व येऊन पडायचं. तेही सर्वांना पुरेसं. कधी मागावं लागलं नाही, वेळेवर मिळायचं. घरमालक, त्यांच्या घरातले लोकही दुधाच्या धंद्यात सतत राबायचे. सणावाराला गोडधोड, नवे चांगले कपडे तेही मिळायचे. हिशेब कसलाच नव्हता. ना त्यांनी केला ना आजींनी. वाड्यात खूप बिऱ्हाडं होती. आजींचं सतत काम, मुलांचे कष्ट वाडा पाहायचा. सर्वांना खूप सहानुभूती, आस्था, आदर होता. मुलं शांत, कष्टाळू आणि समाधानी, समजूतदार. रोख पैसे फक्त शिवणाचे- महिन्याला पाच-दहा रुपये. घरमालक भाजी, ताक, दहीपण पोचवायचा.

आजींची मोठी मुलगी मॅट्रिक पास झाली. तिचं लग्न करायलाच हवं. पाठच्या तीन जणीही आपापल्या घरी गेलेल्या बऱ्या. पुढं शिकवणंही शक्‍य नाही आणि संभाळणंही. आजींनी मुलीसाठी स्थळ बघितलं. गरीबच; पण निर्व्यसनी मुलगा, शिकलेला, बऱ्यापैकी नोकरी. त्यांची हुंड्याची अट नव्हती, मुलगी आणि नारळ एवढ्याच अपेक्षा; पण वराकडच्या पन्नास लोकांना जेवण मात्र द्यायचं होतं. तेही त्या परिस्थितीत आजींना अवघड होतं; पण तेवढं करायला हवं होतं. कपडे, दागदागिने, कार्यालय नाही- निदान घरातल्या घरात करून जेवण तर द्यायलाच पाहिजे. आजींच्या दिराला ही वार्ता कळली. तो जरा मनातून नाराजच होता, त्याचा लग्नाबाबत कुठलाच सल्ला घेतला नव्हता. आजींनी सासरच्यांशी संबंध ठेवले होते, सणावाराला येत जात; पण ते तेवढेच. एरवी ज्याचा तो स्वतंत्र. देणं-घेणं काही नाही, येणं-जाणं क्वचितच. दीर जरा घुश्‍श्‍यातच आला. येताना लग्नाला कुणाला बोलवायचं याची शंभरेक माणसांची यादी होती. दीर म्हणाला : ‘‘माझी पुतणी आहे. भावाची मुलगी, माझ्या मुलीसारखीच. मी लग्नाचा खर्च करतो, तुम्ही लग्नाची बैठक घ्या. बस्ता, मानपान करू आणि दोन्हीकडच्या सर्वांना जेवण देऊ. तुम्ही एकही पैसा देऊ नका, लग्न साजेसं झालं पाहिजे. लग्न एकदाच होत असतं.’’

आजी म्हणाल्या : ‘‘भावजी तुमचा आधार आहे. माझ्या मुलीला द्यायचे तर आशीर्वाद द्या. मी लग्नाचं जेवण फक्त वराकडच्या- त्याही पन्नास लोकांना देणार आहे. मी आपल्याकडच्या कुणालाच लग्नाला जेवायला बोलावणार नाही, माझी ती परिस्थितीच नाही. कुणाकडून पैसे घेऊन मला कार्य करायचं नाही. लग्नात जेवायला आम्ही आणि मुलाकडचेच आहोत.’’ दिराच्या हातात निमंत्रितांची यादी होती, किराणा मालाची होती. तो सामान आणणार होता, आचारीही; पण आजींनी स्पष्ट सांगितलं : ‘‘मी तुम्हाला बोलावू शकत नाही. आहेर नको, आशीर्वाद द्या.’’ आजींनी मुलीला नमस्कार करायला सांगितलं. दीर तणतणतच नाराजीनं निघून गेले.

लग्नाच्या दिवशी, आजीच आचाऱ्याचं काम करत होत्या. मदतीला त्यांची मुलं, नवरी मुलगीसुद्धा आदल्या दिवशीपर्यंत तयारी करत होती. वाड्यातल्या अंगणात लग्न लागणार होतं. अक्षता टाकायला वाड्यातले सगळे लोक आले. सर्वांनी अक्षता टाकल्या. लग्न लागलं, आजींनी हातावर साखर ठेवली. लग्नविधी सुरू असतानाही आजी स्वयंपाकात व्यग्र होत्या. स्वयंपाकाला मदतीला वाड्यातल्या दहा-बारा बायका, पुरुषही होते. वऱ्हाडी जेवले. वाड्यातले लोक नव्या कपड्यात होते- ते आपापल्या घरी जाऊन जेवले. सर्वांनी लग्नाच्या निमित्तानं गोडधोड आपल्या घरीच केलं होतं. कन्या सासरी गेली, संध्याकाळ झाली. आजी दुधाच्या कामाला लागल्या.

नंतर परिस्थिती चांगली झाली, मुलं शिकली, सगळ्यांनी चांगले फ्लॅट्स‌ घेतले, मुली चांगल्या घरी पडल्या. आजी तयार नव्हत्या; पण मुलं त्यांना घेऊन गेली फ्लॅटवर! ती अंधारी खोली तशीच त्यांच्या नावावर राहिली. किती दशकं लोटली, जागांचे भाव वाढले; पण मालकांनी कधीच भाडं वाढवलं नाही. आजही भाडं सात रुपयेच आहे. मालक जागा सोडायला सांगत नाहीत, ‘तुम्हालाच असू द्या,’ म्हणतात. खरं तर त्यावर लाखो रुपये मिळू शकतात; पण त्या श्रमकुटीच्या आठवणीनं सगळे हळवे होतात. आयुष्यात इतकी माणसं भेटली; पण श्रम, स्वाभिमान, दृढनिश्‍चय आणि आत्मविश्‍वास असलेल्या आजी स्मृतिपटलावर चिरंतन आहेत, त्या ऊर्जास्थान आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang angha thombre write kathastu article