साचे मोडणारा अवलिया (अनिता पाध्ये)

anita padhye
anita padhye

हिंदी चित्रपटसृष्टीतले रुढ साचे मोडून काढत अनेक उत्तमोत्तम चित्रपट तयार करणारे दिग्दर्शक बासू चटर्जी यांचं नुकतंच निधन झालं. स्वतःच्या दिग्दर्शनाची अतिशय उत्तम शैली त्यांनी विकसित केली. एके काळी कार्टूनिस्ट म्हणून काम करणारे बासुदा यांचं आयुष्य म्हणजेही एक चित्रपटच आहे. त्यांच्या काही वेगळ्या पैलूंवर एक नजर.

दिग्दर्शक पटकथालेखक, संकलक बासू चटर्जी यांचं नुकतंच निधन झालं आणि हलके-फुलके, वास्तववादी आणि सरळसाध्या चित्रपट बनवणाऱ्या काळाचा-पर्वाचा जणू अंत झाला. दहा जणांना मारणारा, लार्जर दॅन लाईफ इमेज असणारा नायक आणि सौंदर्यवती नायिका या साठ आणि सत्तरच्या दशकात हिंदी चित्रपटांच्या रुळलेल्या स्वरूपाला तडा दिला तो बासुदांनी. सत्तरच्या दशकात त्यांनी अनेक वास्तववादी तरीही हलक्या-फुलके . सरळ साधे आणि सर्वसामान्य माणसाशी नाळ जुळेल असे चित्रपट बनवले आणि चित्रपटसॄष्टीमध्ये स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं.
बासुदांचे वडील सरोजकुमार चटर्जी रेल्वेमध्ये नोकरी करत असत. नोकरीनिमित्तानं ते अजमेरला असताना बासुदांचा जन्म झाला. मात्र, पुढे त्यांची बदली मथुरेत झाली त्यामुळे बासुदा तिथंच लहानाचे मोठे झाले. शालेय जीवनापासूनच बासुदांना चित्रकला आणि चित्रपट या दोन गोष्टींची आवड होती. त्याकाळात मथुरेत एकच थिएटर असल्यानं चित्रपट बघण्यासाठी मित्रासंह ते आग्र्याला जात असत. सिनेमाचं तिकिट असे पाच-दहा पैसे, शिवाय वडिलांमुळे रेल्वेप्रवास फुकट करायला मिळत असे.
घरची आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेणं शक्य नव्हतं, त्यामुळे मॅट्रिक होताच बासुदा नोकरी शोधू लागले. ही घटना आहे सन १९५० ची. एकाचवेळी त्यांना दोन नोकऱ्यां‍साठी कॉल आले होते. एक नोकरी होती आसाममधल्या एका रोडवेजच्या कामावर देखरेख करणाऱ्या सुपरव्हायझरची, तर दुसरी होती मुंबईतल्या एका शाळेत ग्रंथपाल म्हणून. ग्रंथपालाची नोकरी पत्करत बासुदा त्यानिमित्तानं पहिल्यांदाच मुंबईत आले आणि कायमचे मुंबईकर झाले. दरमहा ४०० रुपये पगाराची शाळेतील नोकरी करत असतानाच बासुदांना ‘करंट’ या इंग्रजी वॄत्तपत्रामध्ये कार्टून काढण्याची संधी मिळाली. त्या कार्टूनसाठी मानधन म्हणून बासुदांना १० रुपये मिळाले होते. त्याच काळात त्यांना ‘ब्लिट्झ’ या आणखी एका इंग्रजी वॄत्तपत्रात कार्टून काढण्याची संधी मिळाली.  ‘ए मॅन एण्ड ए वूमन’ हा प्रेमकथेवर आधारित फ्रेंच चित्रपट तसेच सत्यजीत रेंचा ‘पाथेर पांचोली’ बघून बासुदा कमालीचे प्रभावित झाले आणि आपणही चित्रपट दिग्दर्शन करावं असा ध्यास त्यांच्या मनानं घेतला. नोकरी सोडून चित्रपट दिग्दर्शन करण्यासाठी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेणं आर्थिकदॄष्ट्या परवडण्यासारखं नव्हतं. परंतु त्याचवेळी मथुराचेच रहिवासी असलेले गीतकार शैलेंद्र चित्रपटनिर्मिती करत आहेत ही गोष्ट समजताच एका भल्या सकाळी बासुदा थेट शैलेंद्रना भेटायला त्यांच्या घरी गेले आणि आपल्याला सहायक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळावी अशी त्यांच्याकडे विनंती केली. शैलेंद्रदेखील भला माणूस. अनोळखी परंतु आपल्या गावातला एक तरुण काम मागण्याच्या-काहीतरी नवं शिकण्याच्या इच्छेनं आलाय म्हणून त्यांनी लगेच बासुदांना सहायक दिग्दर्शक म्हणुन रुजू करून घेतलं. तो चित्रपट होता राज कपूर-वहिदा रेहमान अभिनित ‘तिसरी कसम.’ हा चित्रपट करताना बासुदांना चित्रपटाची तांत्रिक बाजू शिकता आली. ‘तिसरी कसम’नंतर बासुदांनी ‘सरस्वतीचंद्र’ या चित्रपटासाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.

त्यानंतर हळूहळू ते इंडियन फिल्म डायरेक्टर असोशिएशनशी या दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ यांच्यासाठी बनलेल्या या संस्थेशी जोडले गेले त्यामुळे परदेशी चित्रपट, चित्रपट मासिकं बघण्याची नामी संधी त्यांना मिळू लागली आणि फिल्म सोसायटी ही एक जागतिक स्तरावरची चळवळ आहे हेदेखील त्यांच्या लक्षात आलं. ‘तिसरी कसम’नंतर ‘सरस्वतीचंद्र’ या चित्रपटासाठी सहायक दिग्दर्शक म्हणून बासुदांनी काम केलं. त्याकाळी फिल्म वेलफेअर कॉर्पोरेशन ही संस्था चित्रपट बनण्यासाठी निर्मात्यांना कर्ज देत असे. बासुदांनीदेखील या संस्थेकडून एक लाख ५५ हजार कर्ज देऊन स्वत: चित्रपटनिर्मिती आणि दिग्दर्शन करण्याचं ठरवलं. हिंदीमधील सुप्रसिद्ध लेखक राजेंद्र यादव यांच्या ‘सारा आकाश’ या कादंबरीवर बासुदांनी त्याच नावाचा आपला पहिला चित्रपट दिग्दर्शित केला. कमी बजेटचा चित्रपट असल्यामुळे स्टार कलाकारांना साइन करण्याचा प्रश्न नव्हताच, शिवाय मोठ्या नामवंत कलाकारांसह काम करण्याचा बासुदांना फारसा शौकसुद्धा नव्हता. स्वत:च्या कामावर विश्वास असल्यानं मोठे कलाकार नसतानादेखील आपण चांगला चित्रपट बनवू शकू, असा विश्वास त्यांना वाटत होता. राकेश पांडे व नंदिता ठाकुर हे कलाकार असलेल्या या चित्रपटाच्या पटकथा-संवाद लेखनाची जबाबदारी बासुदांनी कमलेश्वर यांच्यावर सोपवली होती. सात हजार रुपये मानधन घेऊन आणि लेखनासाठी हिल स्टेशनवरच्या हॉटेलमध्ये वास्तव्यास जाऊनसुद्धा कमलेश्वर वेळेवर पटकथा लिहू शकले नाहीत, त्यामुळे पटकथालेखनामध्ये अननुभवी असूनही बासुदांनी स्वत:च पटकथा लिहिली आणि नकळत या पहिल्याच चित्रपटाद्वारे ते पटकथालेखन शिकले. सर्वोत्कॄष्ट पटकथेसाठी त्या वर्षीचा फिल्मफेअर पुरस्कार ‘सारा आकाश’साठी त्यांना मिळाला होता. इतकंच नाही, तर चित्रपटातल्या एका प्रसंगात भाषण करणाऱ्या‍ माणसाची लहान व्यक्तिरेखा साकार करणारा कलाकार शूटिंगच्यावेळी गैरहजर राहिला, तेव्हा शूटिंग रद्द होऊ नये म्हणुन दहा-पंधरा रिटेक्स देत बासुदांनी स्वत:च ती भूमिका वठवली होती.

‘सारा आकाश’ बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नसला, तरी चित्रपटसॄष्टीतल्या व्यक्ती आणि परीक्षकांनी या चित्रपटाचं खूप कौतुक केलं होतं. या चित्रपटाचं वितरण करणाऱ्या राजश्री प्रॉडक्शननंसुद्धा आपल्या आगामी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी बासुदांवर सोपवली. ‘मुंबईचा जावई’ या मराठी चित्रपटावरून बेतलेला तो चित्रपट होता ‘पिया का घर.’ ‘सारा आकाश’मध्ये एकही गाणं नव्हते. सर्वसामान्य माणसं आनंद किंवा दु:ख झाल्यावर गाणी गात नाहीत, त्यामुळे चित्रपटात गाणी नसावीत असं बासुदांचं मत होतं, तर राजश्रीच्या ताराचंद बडजात्यांना ‘पिया का घर’मध्ये गाणी असणं गरजेचं वाटत होतं.

‘‘चित्रपटात हे गाणं कोण गाणार आहे?’’.. ‘पिया का घर’मधील ‘ये जीवन है, इस जीवन का’ हे गाणं किशोरकुमारच्या आवाजात रेकॉर्ड होत असताना या गाण्याचे गीतकार आनंद बक्षींनी बासुदांना विचारलं. ‘‘कुणीही नाही’’ बासुदा उत्तरले. त्यांच्या या उत्तराचं बक्षींना नवल वाटलं होतं. ‘‘म्हणजे?’’ त्यांनी पुन्हा विचारलं. ‘‘असं समजा दिग्दर्शकच हे गाणं गातोय,’’ इतकं बोलून बासुदा गप्प बसले. आपल्या या गाण्याची हा दिग्दर्शक वाट तर लावणार नाही ना, अशी शंका त्यावेळी आनंद बक्षींच्या मनात निर्माण झाली होती; परंतु चित्रपटातल्या विविध व्यक्तिरेखांचे मूड्स चित्रीत करत त्याच्या पार्श्वभूमीवर बासुदांनी अत्यंत खुबीनं या गाण्याचा वापर केला. नंतरच्या काळात गीतकार गुलजारनी चित्रपटांत गाण्यांचं महत्त्व असतं हे बासुदांना पटवून दिलं होतं. गंमत म्हणजे चित्रपटात गाणी नसावीत असं मत असणाऱ्या बासुदांच्या बहुसंख्य चित्रपटांतली गाणी आजही लोकप्रिय आहेत. ‘रजनीगंधा’ या चित्रपटाद्वारे बासुदांना प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. निर्मात्याच्या आग्रहाखातर शशी कपूर, शर्मिला टागोरसारखे स्टार्स आणि त्या काळात फारसे यशस्वी नसलेले अमिताभ बच्चन यांना घेऊन हा चित्रपट बनवायचा असं ठरलं होतं; परंतु कमी मोबदला घेण्यास राजी झालेल्या शशी कपूरनी चित्रपट साइन करताना हा चित्रपट आपल्या अन्य चित्रपटांना मिळणाऱ्या‍ किंमतीतच विकला जावा अशी अट घातली. चित्रपट किती किंमतीत विकला जाईल ही केवळ दिग्दर्शकाची जबाबदारी नसल्यामुळे त्या भानगडीत न पडण्याचा निर्णय घेत बासुदांनी अमोल पालेकर आणि विद्या सिन्हा या नव्या जोडीला घेऊन हा चित्रपट बनवला. नायिका आणि नायक दोघेहीजण अगदी सर्वसामान्यांपैकी एक वाटावेत असे. ‘रजनीगंधा’नंतर बासुदांनी ‘चितचोर’, ‘मंजील’, ‘बातों बातों में’, ‘खट्टा मीठा’, ‘छोटी सी बात’, ‘स्वामी’, ‘प्रियतमा’ असे एकाहून एक सरस, दर्जेदार चित्रपट बनवले. भारतीय चित्रपटात पहिल्यांदा फ्लॅश फॉरवर्ड तंत्र वापरलं. त्याचा आपल्या बहुसंख्य चित्रपटांमध्ये वापर केला तो बासुदांनीच. कथेचा उत्तम ढाचा, प्रेक्षकांना आपल्याशा, वास्तववादी वाटणाऱ्या‍ व्यक्तिरेखा; तसंच वास्तववादी चित्रीकरणावर भर, मनोरंजन करेल असं दिग्दर्शन ही बासुदांची खासियत होती. त्यांचे समकालीन दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जीदेखील वास्तववादी, तरल चित्रपट बनवत असल्याकारणानं बासुदा आणि हॄषिदांमध्ये एक प्रकारची स्पर्धा असली, तरी ती स्पर्धा निकोप होती.

आपल्या कारकिर्दीमध्ये बासुदांनी अशोककुमार, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमामालिनी, शबाना आझमी, संजीवकुमार, अमोल पालेकर, विद्या सिन्हा, मिथुन चक्रवर्ती, गिरीश कार्नाड, जितेंद्र, राकेश रोशन, टीना मुनीम अशा अनेक कलाकारांसह काम केलं. यशस्वी चित्रपटांबरोबरच त्यांनी ‘रजनी’, ‘दर्पण’, ‘कक्काजी कहीन’, ‘ब्योमकेश बक्षी’ आदी लोकप्रिय आणि यशस्वी दूरदर्शन मालिकादेखील बनवल्या.  

बासुदांशी पूर्वी असलेल्या माझ्या औपचारिक ओळखीचं रूपांतर गाढ परिचयात झालं ते २००९ मध्ये. बासुदांच्या जीवनावर पुस्तक लिहिण्याच्या निमित्तानं मी त्यांना भेटू लागले, तेव्हा लक्षात आलं की सरळ, साधे, हलकेफुलके चित्रपट बनवणारे बासुदा प्रत्यक्ष आयुष्यातदेखील अत्यंत साधे, मितभाषी आणि मिश्किल आहेत. जीवनातील, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेला एखादा मजेदार प्रसंग सांगताना ते खळखळून हसत असत. काळानुसार चित्रपटसॄष्टीतून बाजूला झाल्याची खंत एकदाही मला त्यांच्या बोलण्यातून जाणवली नाही. पुस्तकासाठी त्यांच्याशी बोलणं संपवून निघाले, की मला निरोप द्यायला ते दरवाजापर्यंत येत असत. पुस्तकाच्या कामासाठी आम्ही त्यांच्या ज्या स्टडीरूममध्ये बसत असू, ती फ्लॅटच्या एकदम शेवटच्या टोकाला होती. हॉलला वळसा घालून त्या रूममध्ये जावं लागत असे. एक दिवस मी निघाले तसे नेहमीप्रमाणं बासुदा माझ्यासह चालू लागले. हॉल लागताच अचानक ते थांबले आणि भल्या मोठ्या हॉलकडे हात दाखवत मला म्हणाले : ‘‘माझा  यशस्वी काळ होता, त्यावेळी वाढदिवसाच्या दिवशी अनेक कलाकार, निर्मात्यांकडून इतके पुष्पगुच्छ येत असत, की ते या हॉलमध्ये ठेवायला जागा उरत नसे; पण आता मात्र कुणीही पुष्पगुच्छ पाठवत नाही.’’ त्यांचं ते बोलणं ऎकून माझ्या पोटात कालवाकालव झाली. मी पटकन  बासुदांकडे पाहिलं; परंतु त्यांच्या आवाजात ना कुठला दर्द जाणवला, ना चेहऱ्यावर खेद. आपल्या जीवनातलं ते सत्य अत्यंत सहजतेनं त्यांनी स्वीकारलं आहे याची मला जाणीव झाली.

‘करंट’ वॄत्तपत्रामध्ये ते कार्टून काढत असत ही गोष्ट त्यांनी जेव्हा मला सांगितली, तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं : ‘‘बासुदा, तुम्ही काढलेलं पहिलं कार्टून किंवा अन्य काही कार्टून्स असतील तर त्यातली एक-दोन कार्टून्स मला पुस्तकामध्ये छापण्यासाठी द्याल का?’’
‘‘अग, आता मी ती कुठं ठेवली आहेत, ते मला आठवतही नाही, बघू या,’’ असं बासुदा म्हणाले होते. मात्र, जीवाचं रान करून मी त्यांनी काढलेलं पहिलं कार्टून मिळवलं आणि त्यांना दाखवलं तेव्हा ते चकित झाले होते. त्यानंतर काही महिन्यांनी ते कामानिमित्तानं कोलकत्याला गेले होते. एका रविवारी सकाळी त्यांचा मला फोन आला : ‘‘अनिता, मैं कलकत्ता (तेव्हा कोलकता असं नामकरण झालं नव्हतं) आया हू, कल अलमारी साफ करते वक्त मुझे मेरे कार्टून्स मिले, ये बताने के लिए तुम्हे फोन किया.’’
बासुदा कोलकत्याहून मुंबईला परतले, तेव्हा त्यांचा पुन्हा फोन आला आणि त्यांनी मला भेटायला ये असं सांगितलं. मी त्यांच्याकडे गेले, तेव्हा त्यांनी त्यांची कार्टून्स माझ्या हातात ठेवली.

‘‘ही तुझ्यासाठी, तू माझं पहिलं कार्टून शोधून काढलंस याचं मला खूप कौतुक वाटलं. ही सर्व कार्टून्स तूच जपून ठेवशील याची मला खात्री आहे, म्हणून ही तुला देतो,’’ त्यांचं ते बोलणं ऎकून माझ्या डोळ्यात पाणी तरळलं नसतं तरच नवल होतं.
बदललेल्या चित्रपटासॄष्टीविषयी बोलताना ते कधीही सद्य कलाकारांवर किंवा दिग्दर्शकांवर टीका करत नसत किंवा आपण किती चांगलं काम केलं आहे याची शेखीही मिरवत नसत. त्यांच्या ‘खट्टा मीठा’ या अतिशय सहजसुंदर चित्रपटावर रोहित शेट्टीनं ‘गोलमाल ३’ बनवून त्याची माती केली असं माझं मत आहे. ‘‘दादा, किती वाईट चित्रपट बनवलाय हो त्यानं, तुमच्या चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेमची त्यानं कॉपी केली असती तर बरं झालं असतं,’’ असं एकदा बोलण्याच्या ओघात मी बासुदांना म्हटलं.  ‘‘मी तर बघितलाच नाही तो चित्रपट, कशाला डोक्याला ताप करा, जाऊ दे, त्यानं त्याच्या परीनं बनवला असेल,’’ मंद हसत बासुदा म्हणाले होते.

अशी स्वच्छ मनाची, सरळ साधी माणसं आता दुर्मीळ होत चालली आहेत. आज एखाद्या दिग्दर्शकाचा चित्रपट थोडा जरी चालला तर तो असा काही हवेत उडू लागतो की बस्स; परंतु अनेक यशस्वी चित्रपट बनवणाऱ्या बासुदांचे पाय कायम जमिनीवर होते. शेवटपर्यंत आपण चित्रपट बनवावेत अशी त्यांची इच्छा होती. चित्रपट बनवायचा असं नुसतं मनात आलं ना तरी एखाद्या तरुणासारखा हुरुप येतो बघ, असं ते म्हणत. वयाच्या ८५ व्या वर्षांपर्यंत ते नवनव्या कल्पनांवर चित्रपट, सिरियल बनवण्याचा विचार करत होते त्यासाठी मेहनत घेत होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून वयपरत्वे त्यांची तब्येत आणि स्मॄती क्षीण होत गेली होती. त्यांच्या प्रतिभावान, कल्पक मनाला त्यांचं शरीर साथ देईनासं झालं होतं. आज भले शरीरानं बासुदा हयात नाहीत; परंतु आपल्या चित्रपटांद्वारे ते कायम सिनेरसिकांच्या मनात जिवंत राहतील, यात शंकाच नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com