अण्णा भाऊ साठे : एक विद्यापीठ (सुरेश पाटोळे)

सुरेश कृष्णाजी पाटोळे
रविवार, 28 जुलै 2019

 

ज्येष्ठ साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी येत्या ता. एक ऑगस्टपासून सुरू होत आहे, त्यानिमित्त्त त्यांच्या आठवणींना उजाळा...

 

 

ज्येष्ठ साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी येत्या ता. एक ऑगस्टपासून सुरू होत आहे, त्यानिमित्त्त त्यांच्या आठवणींना उजाळा...

 

अण्णा भाऊ साठे हे कुण्या व्यक्तीचं नाव नाही, तर ते साहित्यातलं एक विद्यापीठ आहे. विद्यापीठ जसं सर्व शाखांचं असतं तसंच वाङ्‌मयातल्या सर्वच प्रकारांत आपलं नाव कोरून गेलेला कर्तृत्वसंपन्न असा हा एक कोहिनूर हिरा आहे.
‘अण्णा भाऊ म्हणजे शाहीर; त्याच्यापुढे जाऊन लोकशाहीर, अण्णा भाऊ म्हणजे साहित्यिक, साहित्यरत्न’ अशी अण्णा भाऊंची ओळख रुजली आहे. क्‍लेशदायक बाब म्हणजे ‘अण्णा भाऊ हे दलित, मातंग साहित्यिक’ अशी ओळख समाजात रूढ आहे. त्यांना चौकटीत बांधून त्यांच्या कर्तृत्वाची सीमारेषा आखली गेली आहे. वयाची पुरती पन्नास वर्षंही न जगलेले अण्णा भाऊ, शाळेचं फक्त तोंड पाहिलेले अण्णा भाऊ, केवळ दीड दिवस शाळा शिकलेला माणूस; पण त्यांच्या साहित्यावर पीएच.डी. होणं, त्यांच्या नावे विद्यापीठांतर्गत असणाऱ्या अध्यासनप्रमुख पदासाठी पदव्युत्तर किंवा पीएच.डीधारक ही पात्रता असणं हे कितवं आश्‍चर्य म्हणावं? होय, हे आश्‍चर्यच आहे! त्यांच्या साहित्यवाचनातून अनेक लेखकांना लेखनाची योग्य दिशा मिळाल्याचं आजचे अनेक मान्यवर लेखक मान्य करतात.

शाहीर आत्माराम पाटील हे ‘शाहीर’चा अर्थ सांगताना म्हणतात :
‘शाहीर हा समाजाशी आणि राष्ट्रीय जीवनाशी समरस होऊन लोकभावनांना समजून-उमजून घेत असतो. लोकांच्या शब्दांतून आणि भाषेतून तो लोकजीवनाचा इतिहास सांगत असतो. जोश आणि त्वेषपूर्ण शब्दांच्या गुंफणीतून हा लोककवी क्रांती घडवून आणण्याचं सामर्थ्य बाळगतो.’
हे भाष्य अण्णा भाऊंच्या संदर्भात तंतोतंत जुळतं.
काव्य या वाङ्‌मयप्रकारात अण्णा भाऊंनी लावणी, पोवाडा, गण, कटाव, निसर्गगीतं, स्फूर्तिगीतं, शेतकरीगीतं, गौरवगीतं, प्रहार/घावगीतं, व्यथा-शल्यगीतं, भावगीतं, व्यक्तिगत गीतं, गौळण, कामगारगीतं असे असंख्य प्रकार हाताळले. त्यातून त्यांनी हिंसाचार, अत्याचार यांचा धिक्कार करत पोवाडे रचले. त्यात ‘बंगालची हाक’, ‘पंजाब-दिल्ली दंगा’, ‘नानकिंग नगरापुढे’, ‘स्टालिनग्राडचा पोवाडा’, ‘बर्लिनचा पोवाडा’, ‘तेलंगणाचा संग्राम’, ‘महाराष्ट्राची परंपरा,’ ‘मुंबईचा गिरणी कामगार’, ‘काळ्या बाजाराचा पोवाडा’, ‘अंमळनेरचे हुतात्मे’ अशा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पोवाड्यांतून वास्तव चित्रण मांडलं. कामगारांबद्दल ते लिहितात : ‘इतिहास कामगारांचा। वळून जरा वाचा। नसे तो कच्चा। अन्यायाची चीड ज्याला भारी। सदा तो देऊनी ललकारी उठवी देशात जनता सारी।’
तर मुंबईच्या कामगारांबद्दल ते लिहितात : ‘बा कामगारा तुज ठायी अपार शक्ती। ही नांदे मुंबई तव तळहातावरली। ते हात पोलादी सर्व सुखे निर्मिती परि तुला जगण्याची भ्रांती। बेकारी येत तुजवरती। म्हणे अण्णा भाऊ साठे शाहीर। उठूनी सत्वर उज्ज्वल राख आपली कीर्ती।’
तर ‘काळा बाजार’ या पोवाड्यात ते म्हणतात : ‘काळ्या बाजाराचा रोग आला। मागं लागला गोरगरिबाला। सुखाचा घास मिळंना झाला।’
हे सत्य चित्रण मांडून गोरगरिबाची नस त्यांनी पकडली आहे.
‘महाराष्ट्राची परंपरा’ यातून महाराष्ट्राचं केलेलं वर्णन, अगदी महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल असं सारंच त्यांनी मांडलं आहे.
‘महाराष्ट्र मायभू आमुची। मराठी भाषिकांची। संत-महंतांची।’
अण्णा भाऊंनी अनेक लावण्या लिहिल्या; पण आजही ‘माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली’ या लावणीचं गारूड समाजमनावर कायम आहे. ही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतली लावणी असली तरी ती समाजभानातून अवतरते. लोकनाट्य पुढं नेण्यासाठी ‘कटाव’ हा काव्यप्रकार असतो. तो अण्णा भाऊ विषयानुरूप मार्मिकतेनं मांडतात.

‘तमाशा’ या कलाप्रकारात स्त्री नाचवणं, गणात गणपतीचं गुणगान असणं या दोन्ही प्रकारांना छेद देऊन गणात महापुरुष, राष्ट्र, कामगार व सामान्य माणूस यांना ते नमन करतात. उदाहरणार्थ : ‘प्रारंभी मी आजला। कर त्याचा येथे पूजला। जो व्यापूनी संसाराला। हलवी या भूगोला।।धृ।।’ अशा या क्रांतिकारी शाहिरानं लोकनाट्यात स्त्री आणली; पण ती कामगाराची शेतकऱ्याची बायको म्हणून. अण्णा भाऊंची लोकनाट्ये ही समाजाची कथा-व्यथा मांडणारी होती.

‘पुढारी मिळाला’, ‘खापऱ्या चोर’, ‘शेटजीचे इलेक्‍शन’ ‘अकलेची गोष्ट,’ ‘बिलंदर बुडवे’, ‘बेकायदेशीर’, ‘मूक मिरवणूक’, ‘माझी मुंबई’, ‘देशभक्त घोटाळे’, ‘लोकमंत्र्याचा दौरा’, ‘पेंग्याचं लगीन’ अशा लोकनाट्यांतून त्यांनी लोकजागृती व समाजप्रबोधन केलं. अण्णा भाऊंनी अश्‍लील संवादांना छेद दिल्यामुळं ते खऱ्या अर्थानं लोकनाट्य झालं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ‘लाल बावटा’ या कलापथकानं इथल्या शासनकर्त्यांना कलापथकाच्या लोकनाट्यातून जेरीस आणलं होतं. त्याची प्रचीती म्हणजे ‘लोकमंत्र्याचा दौरा’. या लोकनाट्यावर तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी बंदी घातली होती. तरीही शाहीर अमर शेख, द. ना. गव्हाणकर, अण्णा भाऊ व त्यांचं हे पथक त्याला डगमगलं नाही. या त्रयीला अटकही झाली. अण्णा भाऊ शिकलेले नव्हते; पण त्यांच्यात जिद्द होती, ध्यास होता, अनुभव होता, अभ्यास होता. अक्षरओळख करून घेता घेता त्यांनी माणसं वाचली. समाजातल्या चाली-रूढी, अनिष्ट प्रथा, स्त्रीचं होणारं शोषण, गरिबी, बेकारी, राजकारण, द्वेष, हेवेदावे यांची उघड्या डोळ्यांनी मस्तकात नोंद केली, ती मनात साठवली नि हातानं ते सारं कथा-कादंबऱ्यांत उतरवलं. वाचकांनी त्यांच्या लेखनाला पसंती दिली नि अण्णा भाऊ झपाटल्यासारखं लिहीत गेले. त्यांनी शेकडो कथा लिहिल्या. त्यांचे कथासंग्रह आले. ‘खुळंवाडी’, ‘बरबाद्या कंजारी’, ‘कृष्णाकाठच्या कथा’, ‘चिरागनगरची भूतं’ आदी १९ कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. त्यात ‘बरबाद्या कंजारी', ‘भोमक्‍या’, ‘स्मशानातील सोनं’, ‘सापळा’, ‘उपकाराची फेड’, ‘विठू महार’, ‘वळण’, ‘तमाशा’, ‘मरीआईचा गाडा’ या कथांमधून त्यांनी समाजात असणारी दरी व आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर सत्य लिहिलं.
अण्णा भाऊ स्वतःच म्हणत : ‘आपण जे जीवन जगतो, ज्या जीवनात आपला आणि आपल्या कैक पिढ्यांचा जन्म झाला, ज्या जीवनाचा आपण रोज अनुभव घेत आलो आहोत तेच जीवन जगणारी बहुसंख्य जनता, त्या जनतेचे विशाल जीवन, तिची जगण्याची धडपड किंवा संघर्ष, त्याच जनतेत वावरणारे उदात्त विचार हे सारे आपल्या लिखाणातून त्या आपल्या जनतेपुढे आपण मांडावे. अशाच मोहाने प्रेरित होऊन मी आजपर्यंत लिहीत आलो आहे.’

त्यांचं हे प्रकटीकरण म्हणजेच त्यांच्या कथा-कादंबऱ्यांचा असणारा आविष्कार आहे. त्यांच्या कथा भारतीय भाषेत अनुवादित तर झाल्याच; पण परदेशीही पोचल्या.
त्यांच्या वरील भाष्यावरच त्यांच्या कादंबऱ्याही बेतलेल्या आहेत. अण्णा भाऊंनी छत्रपती शिवाजीमहाराजांचा आदर्श मानून आपल्या कथा-कादंबऱ्यांमध्ये स्त्रीला सन्मान दिला. स्त्रीचं होणारं शोषण, तिचं जगणं, जगण्यामागची धडपड, तिचं अंत:करण, तिची घालमेल, संघर्ष हे सारं कुठल्याही शाळेत-कॉलेजात शिकूनही आत्मसात करता येणार नाही. हे सगळं इतकं अफाट त्यांना कुठं मिळालं? तर ते जीवनाच्या शाळेत! त्यांच्या लेखनातूनच याची प्रचीती येते.

‘डोळे’, ‘खेळखंडोबा’, ‘तीन भाकरी’, ‘दुर्गा’, ‘तरस’, ‘माहेरची वाट’, ‘जिव्हाळा’, ‘चंदा’, ‘गुऱ्हाळ’, ‘अटकळ’ या स्त्रियांच्या विविध व्यथांवर असणाऱ्या कथा काळजात घर करून समाजातल्या या हीनतेची चीड वाचकांच्या मनात निर्माण करतात. पितृसत्ताक असलेल्या आपल्या देशात स्त्रीला कसं जगावं लागत आहे ते समरस होऊन अण्णा भाऊंनी चित्रित केलंय. हे करत असताना तिचा स्त्रीस्वाभिमान, शील हळुवारपणे जपलं गेलं आहे. कादंबरी या प्रकारात ‘चित्रा’, ‘संघर्ष’, ‘चंदन’, ‘फुलपाखरू’, ‘मूर्ती’, ‘वैजयंता’,
‘आवडी’, ‘रत्ना’, ‘तारा’, ‘आघात’ यांत घातक स्त्रियांची विविध रूपं त्यांनी मांडली आहेत. ‘फकिरा’, ‘वारणेचा वाघ’, ‘वारणेच्या खोऱ्यात’, ‘मास्तर’, ‘धुंद’, ‘रानगंगा’, ‘अहंकार’, ‘गुलाम’, ‘मयूरा’,
‘आग’, ‘माकडीचा माळ’, ‘वैर,’ ‘डोळे मोडीत राधा चाले’, ‘केवड्याचं कणीस’, ‘रानबोका’, ‘कुरूप’ यांतून ग्रामीण जीवन मांडत असतानाही स्त्रीला नायकत्व देत ग्रामीण भागातले विविध विषय त्यांनी हाताळले आहेत. ‘अग्निदिव्य’ ही त्यांची ऐतिहासिक कादंबरी. शिवाजीमहाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या कादंबरीतही त्यातल्या नायिकेला त्यांनी महत्त्व प्राप्त करून दिलं आहे.
अण्णा भाऊंच्या कादंबऱ्या या रंजक, विध्वंसक असल्याचं काही समीक्षक जरी म्हणत असले तरी त्यांनी प्रबोधनाचा वसाही घेतल्याचं दिसतं.
अण्णा भाऊंच्या लेखनाला महापुरुषांच्या विचारांचं अधिष्ठान आहे. असं असलं तरी त्यांच्यातले अनेक पैलू हे दुर्लक्षित राहिलेले आहेत. लेखकाइतकाच त्यांच्यातला माणूस हा श्रेष्ठ आहे. आजारपणात कुटुंबासोबत मित्रपरिवारानं त्यांना दिलेली साथ ते आवर्जून नमूद करतात.

‘माझा रशियाचा प्रवास’ या प्रवासवर्णनात रशिया व भारत यांच्यातली आर्थिक, सामाजिक स्थितीची तौलनिक मांडणी ते करतात. त्यांनी रशियातली माणसं अभ्यासली व ती त्यातून मांडली आहेत. रशियन माणूस इतिहासप्रिय असल्याची आलेली प्रचीती, तिथं कलावंतांना असणारा मान याचं चित्रण करत त्यांची शोधक वृत्तीही त्यांनी मांडली आहे. रशियन माणसांचा आत्मा शोधणारा हा लेखक आपली दुसऱ्याकडून काही नवं शिकण्याची वृत्तीसुद्धा दडवत नाही.
‘घरातली घाण ऐन रस्त्यावर आणून ओतणारा माणूस त्या देशात नाही. आपल्या रस्त्यावर जळकी काडीही ते लोक टाकत नाहीत. रस्ते हे आपलं वैभव आहे,’ हा संदेश ते त्यातून भारतीय माणसांसमोर मांडतात, तर देशाची मालमत्ता आपली आहे, असं समजणारा रशियन माणूस. कॉम्रेड लेनिन आणि स्टॅलिन ही नावं ते फार जपून वापरतात.

याच पुस्तकात अण्णा भाऊ लिहितात : ‘‘एका सुंदर मुलीनं लाल गुलाबाची फुलं माझ्या हाती देऊन सांगितलं ‘ही आमच्या देशातील फुले तुम्ही भारतीयांपर्यंत घेऊन जा आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्या वीरांनी आत्मबलिदान केले त्यांच्या समाधीवर ती अर्पण करा.’ ’’
‘तिची शब्दसुमनं’ अण्णा भाऊंनी आपल्या वाङ्‌मयातून वाहिलेली आहेत. त्यांच्या लेखनाच्या रूपबंधात, आकृतिबंधात असणारा शब्दसाठा व त्याचा वापर हा चकित करणारा आहे. म्हणी, प्रतिमा, उपमा, निसर्गवर्णन, विनोद, भाषासौंदर्य, शिव्यांचा वापर, सूचकता, नाट्यमयता, वैचारिक पेरणी, राष्ट्रवाद, प्रेरणा देणारी शैली, निवेदनात्मक शैली या साऱ्यांनी त्यांचं कथाबीज आणखी बहरतं.
अण्णा भाऊ उत्तम नट, गायक, वादक होते. नाटककार म्हणून त्यांचं ‘इनामदार’ हे नाटक प्रथम हिंदीत सादर झालं, नंतर मराठीत. पत्रकार, समीक्षक म्हणूनही अण्णा भाऊंनी मुशाफिरी केली. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवा मुक्तिसंग्राम, ‘इप्टा’ची चळवळ या साऱ्यांतून अण्णा भाऊंनी काम केलं. उल्लेखनीय बाब म्हणजे, अण्णा भाऊंनी सन १९४९ मध्ये ‘इप्टा’चं अध्यक्षपद भूषवलं होतं.
‘फकिरा’ या चित्रपटाचं पटकथालेखनही अण्णा भाऊंनी केलेलं आहे. मग अशा अण्णा भाऊंना ‘विद्यापीठ’ म्हणू नये तर काय म्हणावं?

अण्णा भाऊंनी साऱ्याच महापुरुषांना आदर्श मानलं. एकाच व्यक्तीची अशी विविधांगी कामगिरी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-विदेशांतही शोधून सापडणार नाही. मराठी लेखकांची पुस्तकं अनुवादित झालीत; पण त्यात पहिला क्रमांक अण्णा भाऊंचाच आहे. अशा या थोर वाङ्‌मयकर्त्या आदर्श कलावंताला त्याच्या जन्मशताब्दीच्या प्रारंभी ही शब्दांजली!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang annabhau sathe article write suresh patole