उद्रेक आणि ऊर्जा (अपर्णा महाजन)

aparna mahajan
aparna mahajan

मनात वेगवेगळ्या विचारांच्या लाटा उसळत राहतात...भावनांची वादळं घोंघावत राहतात...याच वादळांच्या घोंघावलेपणातून काही सकारात्मक असंही आकाराला येतं. मनाला उभारी देतं. या महासंकटाच्या बिकट काळात कसं वागायचं याची दिशा या वादळांतूनच मिळते! आत्ताचा, सध्याचा क्षण इतका आवेगानं जगू या की आत्तापर्यंत कधी असा जगलोच नव्हतो, असं मन स्वतःला बजावतं. याच आवेगपूर्ण क्षणातून दुसरा तसाच क्षण निर्माण होईल, ऊर्जा देईल...दुसऱ्यातून तिसरा...तिसऱ्यातून चौथा...
नकारात्मक उद्रेकापेक्षा सकारात्मक ऊर्जेचा हा प्रवाह जगण्याला बळ देत राहील.

कोरोनाच्या नंतरच्या काळात येऊ घातलेली कसली अनिश्चितता, कसला बदल मनाला अस्वस्थ करतोय? माझ्याकडचे पैसे, धान्य, भाज्या, पीठ हे सगळं संपलं तर याची धास्ती? माझा भविष्यकाळ कसा असेल ही चिंता? आपलं काही बरं-वाईट होईल ही शंका? हे नाही झालं तर...हे झालं तर...अशा अनेक अनामिक भीतींची यादी?
नाही.
भीती अथवा धास्ती यापैकी कशाचीच नाही वाटत! उलट, सध्या घरातला दिनक्रम खूप चांगला सुरू आहे. इतका चांगला दिनक्रम कधी असूच शकत नाही असं वाटावं इतका चांगला!
इतके दिवस ‘वेळ नाही’ म्हणून पुस्तकं वाचायची राहिली अशी खंत होती, ती आवडीची पुस्तकं आता पहाटे उठून वाचावीत, अभ्यास करावा, लेखन करावं, आवडीचे छंद स्वस्थतेनं जोपासावेत, आवडत्या लोकांशी चर्चा कराव्यात, गप्पा माराव्यात...अशा किती तरी गोष्टी करण्यासाठीची सवड कोरोनामुळे झालेल्या या लॉकडाउननं दिली आहे.
तशी पैशाची, अन्नाची, आश्रयाची काळजी नाही. मात्र, एक भीती दरदरून वाटत आहे. अगदी मनाच्या तळातून... ‘हे कधीतरी संपणार आहे, सकारात्मक विचार केला पाहिजे’, या फोल शब्दांच्या पलीकडची, मणक्यांतून सळसळत जाणारी भीती!
प्रत्येकाकडे असणारं ‘पिगी बँक'चं मडकं किंवा गलेलठ्ठ एफडीचं संचित हळूहळू रिकामं होतंय, कमी कमी होतंय...! अर्थात् सध्याच्या परिस्थितीनुसार अनेकांच्या गरजाही कमी होत आहेत.

कदाचित पैशाच्या दृष्टीनं संपन्न असणारा माणूस खाण्याच्या गोष्टी, फळं, औषधं, व्हिटॅमिन्सचा भरणा यामुळे इतर गरिबांपेक्षा जास्त तग धरू शकेलही...आपल्या आर्थिक, मानसिक आणि शारीरिक क्षमतेनुसार जो तो पकडूनही ठेवील हा काळ आपल्या हातात. एखाद्या श्रीमंताला चीज खाण्याची इच्छा होईल...आत्ता ते मिळेल का याची चिंता त्याला सतावेल आणि इथून पुढं ते मिळालंच नाही तर, ही काळजीही त्याला कुरतडेल! कुणा गरिबाला अर्ध्या भाकरीसाठी अगदी असंच वाटेल. म्हणजे, वर्ग कुठलाही असो, ही भीती आहे एखाद्या लंबकासारखी. मिळण्याची अनिश्चितता आणि न मिळण्याची चिंता यांदरम्यान आंदोलित होणारी.
पूर्वी आपण सहज म्हणायचो, ‘सगळं काही अनिश्चित आहे पुढचं.’ मात्र, हे आपल्याबाबतीत होणार नाही
अशी तेव्हा खात्री असायची. प्रत्येक नकारात्मक गोष्टीतून स्वतःला वगळतोच माणूस!
पण आज आपण अशा काही परिस्थितीत गुरफटले गेलो आहोत की आपल्याबाहेरचं जग जणू थांबलंय, किती काळासाठी ते माहीत नाही; पण थांबलंय. आपल्या सगळ्यांचंच. वैश्विक पातळीवर हे घडलं आहे !
आज सगळे घरात बसून आहेत. समाजातल्या काही वर्गाचा एकप्रकारे उत्तम दिनक्रम सुरू आहे. सध्या
या वर्गाच्या हाताशी तसे पैसेही आहेत... खाणं-पिणं व्यवस्थित चाललंय...तरी, तरी त्या कोरोना व्हायरसव्यतिरिक्त कुणीतरी अदृश्यपणे मनाला दाबतंय-दडपतंय अशी भावना झाल्याशिवाय राहत नाही. अनपेक्षितपणे आलेल्या या महासंकटाला तोंड देताना सर्वसामान्यांचं मन घेरून गेलं आहे एका उद्रेकाच्या संभाव्यतेनं...अज्ञान, देव-धर्म यांवरची अंधश्रद्धा, अवैज्ञानिक विचार, स्त्री-पुरुष भेद, गरीब-श्रीमंत भेद असे अनेक कंगोरे लक्षात घेऊन आपण सगळेच कोरोनाच्या संकटाशी दोन हात करत आहोत खरे; पण या संकटापेक्षाही आगामी काळातल्या वेगवेगळ्या उद्रेकांच्या आशंकेनंही सर्वसामान्यांचं मन काळवंडून जातंय.

परिस्थिती ही अशी इतकी संकटकाळाची असताना विविध प्रकारच्या समाजमाध्यमांवरची थिल्लर, अविचारी, संवेदनशून्य अभिव्यक्तीही मन विषण्ण करून जाते. कुठल्याशा लोकप्रिय समाजमाध्यमावर कुणी एक पुरुष कणकेच्या गोळ्यांचे फोटोच काय टाकतोय...दुसरा कुणी धुण्याच्या यंत्रात भांडीच काय टाकतोय...कुणी ‘बायको कष्टाळू, नवरा कसं टाळू,’ असे ‘विनोद’ च काय करतोय...कुणी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची बातमी ऐकता ऐकता अत्यंत असंवेदनशीलपणे, त्या डोळ्यांतून पाणी येईपर्यंत हसणाऱ्या भावचित्रांचा, अर्थाच इमोजींचा, भडिमारच काय करतोय....या बाबींना कुणी घेतलाच आक्षेप तर
‘असे विनोद गंमत म्हणून सोडून द्या, फार विचार करू नका,’ असे सारवासारवीचे सल्लेही मग दिले जातात. या सगळ्यामुळे मन विषण्ण न होईल तर काय?
‘वर्क फ्रॉम होम’ अर्थात् ‘घरून काम करा’मुळे घरातला पुरुष किंवा मुलगा सकाळी ९ ते संध्याकाळी ५ घरातून काम करणार आणि दमून गेल्यामुळे संध्याकाळी ५ ते रात्री ९ आराम करणार! मग, घरातली ‘सर्वशक्तिमान’ स्त्री ही उत्तम स्वयंपाकी, घरस्वच्छतेत निपुण, सेवाभावी पत्नी असल्यानं तिला ती कामं तर करावी लागतातच; शिवाय, घरातल्या पुरुषांचं ‘वर्क फ्रॉम होम’ असल्यानं ‘हुशार, चुणचुणीत ऑफिस बॉय’ हीही भूमिका प्रसंगी निभावावी लागत आहे. वरून परत, ‘आता आपण सगळे कसे एकत्र’ या भावनेनं घरातलं वातावरण आनंदी ठेवण्याची नैतिक जबाबदारीही पुन्हा तिच्यावरच! त्यामुळे मनातून हे सारं नको वाटत असतानाही तिला या साऱ्यात ‘आनंदाचा अदृश्य मास्क’ घालून वावरावं लागत आहे...

जागतिकीकरणाच्या उदो उदोच्या उद्रेकातूनच ही लागण सगळ्या विश्वाला ग्रासते आहे.
‘कोरोनानंतरचं जग कसं असलेलं आपल्याला आवडेल?’ असा काल्पनिक निबंध मनातल्या मनात लिहिताना विचारांची एक तार अनिश्चिततेच्या भीतीनं खेचली जात आहे. ता. नऊ मार्चपासून ते आजच्या दिवसापर्यंत म्हणजे तब्बल दोन महिने झालेली ही मुस्कटदाबी उसळून बाहेर येऊ पाहतेय...भाजी आणायला बाहेर गेल्यावर मुंबईत पैसे मागणाऱ्यांचा गराडा पडतोय...काही अतिधाडसी मंडळी स्वतःच्या जिवावर उदार होत (आणि इतरांच्या जिवाला धोका निर्माण करत) बाहेर यायला तडफडत आहेत...रस्त्यारस्त्यावर गर्दी करत आहेत. दारूसाठी लांबच लांब रांगा लागत आहेत, त्यावरही विनोद होत आहेत...अर्थात, कोरोनाशी लढण्यासाठीच्या काही सूत्रांपैकी एक असलेलं जे महत्त्वाचं सूत्र आहे त्या ‘सोशल डिस्टन्सिंग’चा
या सगळ्या बाबींमुळे बोजवारा उडत आहे.
घरात एकत्र असण्याची, एकमेकांत संवाद असण्याची सवय नसलेल्या कितीतरी जणांना आणि जणींनाही हा ‘घरवास’ आता नकोसा झाला आहे...या ‘नकोशा’पणातून छोटे-मोठे उद्रेक होऊ पाहत आहेत...शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्तरावर ते दिसू लागले आहेत. घरातला शाब्दिक, शारीरिक, मानसिक हिंसाचार अनेकांना सोसावा लागत आहे. एकमेकांशी मोकळेपणानं बोलायची सवयच नसल्यामुळे हातातल्या मोबाईलद्वारे सोशल मीडियावर मन रमवलं जात आहे. तिथं भडक, उथळ अभिव्यक्ती होत आहे. हा एक प्रकारे परिस्थितीच्या दडपलेपणातून उमटलेल्या उद्रेकाचाच अंश म्हणता येईल.

अशा मन:स्थितीत मनात वेगवेगळ्या विचारांच्या लाटा उसळत राहतात.. भावनांची वादळं घोंघावत राहतात...याच वादळांच्या घोंघावलेपणातून काही सकारात्मक असंही आकाराला येतं. मनाला उभारी देतं.
या महासंकटाच्या बिकट काळात कसं वागायचं याची दिशा या वादळांतूनच मिळते!
आत्ताचा, सध्याचा क्षण इतका आवेगानं जगू या की आत्तापर्यंत कधी असा जगलोच नव्हतो, असं मन स्वतःला बजावतं. याच आवेगपूर्ण क्षणातून दुसरा तसाच क्षण निर्माण होईल, ऊर्जा देईल...
दुसऱ्यातून तिसरा...तिसऱ्यातून चौथा...
नकारात्मक उद्रेकापेक्षा सकारात्मक ऊर्जेचा हा प्रवाह जगण्याला बळ देत राहील. प्रतिकूल काळात तगायचं कसं हे सांगत राहील.
सध्याचा संकटकाळ कधी संपेल? कुणीच निश्चितपणे सांगू शकणार नाही. धीर धरावाच लागेल! ...तोपर्यंत ही ऊर्जा, ही आश्वासकताच मोलाची ठरणार आहे. क्षणिक उद्रेक उपयोगाचा नाही, अक्षय्य ऊर्जाच हवी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com