esakal | एका गावाची आगळी कहाणी (अर्चना बापट)
sakal

बोलून बातमी शोधा

archana bapat

राजस्थानातल्या कुलधारा गावाची भरभराट झाली; पण माणसांसारखीच एखाद्या वास्तूलाही नजर लागते की काय कुणास ठाऊक!! खुशहाल असलेल्या गावाचं एका रात्रीत नशीब बदलून गेलं... ते विराण ओसाड झालं! अक्षरशः एका रात्रीत अख्खं गाव रिकामं झालं. जवळजवळ सहाशे घरांची वस्ती.. एवढी सगळी माणसं कुठं गेली, कशी गेली काही पत्ता लागला नाही. किती विलक्षण आहे ही कहाणी. खूप काही शिकवणारी.

एका गावाची आगळी कहाणी (अर्चना बापट)

sakal_logo
By
अर्चना बापट

राजस्थानातल्या कुलधारा गावाची भरभराट झाली; पण माणसांसारखीच एखाद्या वास्तूलाही नजर लागते की काय कुणास ठाऊक!! खुशहाल असलेल्या गावाचं एका रात्रीत नशीब बदलून गेलं... ते विराण ओसाड झालं! अक्षरशः एका रात्रीत अख्खं गाव रिकामं झालं. जवळजवळ सहाशे घरांची वस्ती.. एवढी सगळी माणसं कुठं गेली, कशी गेली काही पत्ता लागला नाही. किती विलक्षण आहे ही कहाणी. खूप काही शिकवणारी.

कित्येक वर्षांपूर्वी जैसेलमेरपासून जवळ म्हणजे साधारण वीसेक किलोमीटरवर होतं एक समृद्ध, संपन्न गाव. आपल्या देशात काही काही ठिकाणांशी अनेक कथा, कहाण्या, दंतकथा जोडल्या गेलेल्या आहेत. त्या ऐकून, वाचून त्या त्या ठिकाणी जायचा मोह सच्च्या पर्यटकाला झाल्यावाचून राहात नाही. कथेचा खरे-खोटेपणा तपासण्यापेक्षा त्या जागेचा, ठिकाणाचा अनुभव घेण्याची उत्कंठा जास्त असते. काहीतरी वेगळं आणि नवीन अनुभवायला मिळेल म्हणून पावलं आपोआप अशा गूढ, रहस्यमय जागांकडे वळतात.

अशा ठिकाणांपैकी एक म्हणजे कुलधारा- जे पालीवाल ब्राह्मणांच्या कष्टांनी समृद्ध झालं होतं. सहाशे उंबऱ्यांच्या या संपन्न गावाभोवती अजून 84 गावं उभी राहिली. या गावाच्या जमिनीचा पोत असा, की त्यात पाणी धरून राहण्याची क्षमता नाही.. तरी जेवढं पाणी मिळेल तेवढं साठवून त्या पाण्यावर शेती पिकवून शेती हाच मुख्य व्यवसाय केला. गावाची भरभराट झाली; पण माणसांसारखीच एखाद्या वास्तूलाही नजर लागते की काय कुणास ठाऊक!! खुशहाल असलेल्या गावाचं एका रात्रीत नशीब बदलून गेलं... ते विराण ओसाड झालं! आता अक्षरशः खंडहर असलेल्या या गावाची कहाणी मोठी विलक्षण.. म्हणूनच मला ती अजूनही जशीच्या तशी आठवते आहे.
साधारण सतरा-अठरा वर्षांपूर्वी जेव्हा जैसलमेरची ट्रिप केली, तेव्हाच हे गाव बघायचं निश्‍चित केलेलं. ओसाड गाव काय बघायचं असं मला वेड्यात काढलं, तरी मी हट्टानं इथं यायला लावलेलं. आज जुने अल्बम चाळता चाळता ही सगळी सैर डोळ्यांसमोर तरळून गेली. तर... हे कुलधारा गाव.. त्याची गूढ तरीही अतिशय विलक्षण अशी कहाणी..

अतिशय सुंदर अशा गावाची वाताहात का झाली? तीही एका रात्रीत!! असं काय घडलं, की गावकऱ्यांनी रातोरात हे गाव सोडलं? झालं असं, की तिथल्या राजाचा सालमसिंह नावाचा दिवाण होता. एक दिवस त्या सालमसिंहची नजर गावातल्या एका रूपसुंदर तरुणीवर पडली. काही झालं, तरी ही सुंदर स्त्री आपल्याला मिळालीच पाहिजे, असा ध्यास त्यानं घेतला आणि ती मिळवण्यासाठी त्यानं प्रयत्न सुरू केले. अक्षरशः जंगजंग पछाडलं; पण त्याच्या प्रयत्नांना यश येण्याचं चिन्ह दिसेना.

हातात सत्ता असताना आपल्याला हवी असलेली वस्तू, मग ती स्त्री का असेना, मिळत नाही म्हणजे काय या विचारानं तो अस्वस्थ झाला. गोडीगुलाबीनं काम होत नाही म्हटल्यावर त्यानं गावकऱ्यांना धमकी दिली, की येत्या पौर्णिमेपर्यंत या लावण्यवतीला माझ्या हवाली केलं नाहीत, तर मी तिला जबरदस्तीनं उचलून घेऊन जाईन.
एकीकडे सत्तेनं आणि लालसेनं पछाडलेला दिवाण आणि दुसरीकडे त्याच्या या धमकीला भीक न घालणारे गावकरी. पौर्णिमेला काहीच दिवसांचा अवधी असलेला. आता करायचं तरी काय? मोठा पेच पडला. त्या तरुणीचं शीलरक्षण करायचं, की तिला त्या दिवाणाच्या हवाली करून इतक्‍या कष्टानं वसवलेलं आपलं गाव वाचवायचं?
...पण गावकऱ्यांच्या दृष्टीनं हा पेच नव्हताच. कारण ते होतं तेरावं शतक. तरुणीची इभ्रत वाचवायची, तिच्या नखालाही धक्का लागू द्यायचा नाही हे एकमुखानं ठरलं आणि अक्षरशः एका रात्रीत अख्खं गाव रिकामं झालं.

जवळजवळ सहाशे घरांची वस्ती.. एवढी सगळी माणसं कुठं गेली, कशी गेली काही पत्ता लागला नाही. त्यावेळच्या दळणवळणाच्या सोयींचा विचार करता एका रात्रीत अख्ख्या गावानं नाहीसं होणं म्हणजे जादुईच वाटतं.
साधं गावाला दोन दिवस जायचं म्हटलं, तर आपण काय काय घेतो बरोबर!! इथं तर घरदार कायमचं सोडून जायचं होतं. किती अन्‌ काय काय बरोबर नेणार? आणि काय काय इथंच ठेवणार? वृद्ध माणसं असतीलच की गावात!! त्यांना कसं नेणार? सोनंनाणं, पैसा-अडका किती कनवटीला बांधणार?
...पण या सगळ्या प्रश्नांना पार करून गाव रिकामं झालं.. दुसऱ्या दिवशी दिवाण येऊन बघतो तर काय! सुनसान रस्ते आणि रिकामी घरं. एका रात्रीत हे सगळे गेले कुठे? काहीच कसं कळलं नाही? त्यांच्या निर्णयाचा काहीच कसा थांग लागला नाही? त्याला काही सुचेना.. विचार करकरून वेड लागायचंच बाकी राहिलं.. इतक्‍या सगळ्या लोकांनी गुंगारा देऊन एका रात्रीत निघून जाणं त्याच्या विचारशक्तीच्या पलीकडचं होतं.. हात चोळत बसण्याशिवाय गत्यंतर नव्हतं.

आम्ही त्या गावाला भेट देण्यापूर्वी आम्हाला तिथल्या स्थानिक लोकांनी सांगितलं, की तिथं अजून आत्मे वगैरे भटकतात, पैंजणांचे आवाज ऐकू येतात. झरकन जवळून कुणी गेल्यासारखं वाटतं.. कुणाची तरी दबकी चाहूल लागते. आपल्याबरोबर कुणीतरी आहे असं जाणवतं.. खांद्यावर कुणीतरी हलका हात ठेवल्याचा भास होतो.. बांगड्यांचे, पैंजणांचे आवाज येतात, बायकांची कुजबुज कानी पडते..

एक ना दोन हजार गोष्टी.. मी सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि तिथं जाण्याचा विचार अजूनच पक्का केला.. आणि मनात म्हटलं, की हे तर बेशच झालं. मला भेटली एखादी रुह, तर घेईन विचारून सगळा इतिहास. करीन त्यांच्या धैर्याचं, एकीचं कौतुक... पण तसं काहीसुद्धा झालं नाही. ना मला कुणाची चाहूल लागली, ना कुणी हात ठेवला खांद्यावर.. पण तो भकासपणा मात्र कायमचा रुतून बसला मनात.
भर दुपारच्या उन्हात आम्ही ते गाव पाहिलं. एकतर ही गोष्ट मनात होती अन्‌ समोर दिसत होती पडकी, रया गेलेली घरं, घरांचे तुटलेले उंबरठे, भिंतींच्या झालेल्या मोठमोठ्या खिडक्‍या..अन्‌ रेती मातीचं साम्राज्य.. खूप विषण्ण वाटलं.
तेव्हा ते गाव पर्यटनस्थळ म्हणून घोषित झालं नसल्यानं आम्ही गेलो तेव्हा चिटपाखरू नव्हतं. प्रचंड उत्सुकतेपोटी मी एका पडक्‍या घराचा तुटका जिना चढून वर जाऊन बघून पण आले. मात्र, भकासपणाव्यतिरिक्त तिथं मला काही दिसलं नाही..
या गावाला भेट देण्याआधी सगळी माहिती गोळा केल्यामुळे ही कहाणी माहीत होती. म्हणून ते गाव बघताना मन जड झालं होतं. तिथल्या कधी न पाहिलेल्या गावकऱ्यांबद्दल करुणा दाटून आली होती. एका तरुणीच्या शीलासाठी अख्ख्या गावानं बेघर होणं हे आजच्या युगात मला अकल्पनीय, अविश्वसनीय; परंतु तितकंच धीरोदात्त आणि प्रचंड कौतुकास्पद वाटतं.

आजच्या युगातल्या एका घरातल्या चार माणसांमध्ये एकी नसते. चौंघांची तोंडं चार दिशांना आणि "मी तुझं का ऐकू?' हा अहंभाव... पण इथं त्या सहाशे वस्तीच्या लोकांचा एक मुखिया.. तो निर्णय सांगतो आणि एकदिलानं, एकमतानं त्याला सगळे अनुमोदन देतात हे अघटितच नाही का !! मुलीनंच काहीतरी आगाऊपणा केला असेल असं कुणाच्याही मनात येत नाही, हेही मला फार महत्त्वाचं वाटतं.

जाताना ते सोनंनाणं, दागदागिने जमिनीत पुरून गेले असं म्हणतात.. याचा सुगावा लागल्यानंतर ज्यांनी ज्यांनी हे सोनंनाणं लुटून न्यायचा प्रयत्न केला, त्यांचं काहीच भलं झालं नाही.. गाव सोडताना भावना अनावर होऊन शापवाणी उच्चारली गेली.. इथं कुणीही काहीही वसवू शकणार नाही या शापवाणीचा प्रत्यय तिथं कायमस्वरूपी राहण्याचा बेत करणाऱ्या लोकांना आला.. जे लोक तसेच दडपून, कशालाही न जुमानता तिथे राहिले त्यांचं पुढे काय झालं हे कोणालाच समजलं नाही.
...एक प्रश्न मात्र मनाला छळत राहतो, की एका रात्रीत ही सगळी माणसं आपला पाठलाग होईल या शक्‍यतेचा विचार करून कोणत्या सुरक्षित ठिकाणी गेली असतील? कशी आणि किती दूरपर्यंत गेली असतील?