चालता-बोलता (संजय कळमकर)

संजय कळमकर sanjaykalmakar009@gmail.com
Sunday, 7 July 2019

डॉक्‍टर म्हणाले: 'चालणं हा सर्वोत्तम व्यायाम आहे. माझा दवाखाना फार चालतो; त्यामुळे मला चालायला वेळ मिळत नाही. तुम्ही मात्र रोज चालत जा.''
- मी म्हणालो: ' "चालता-बोलता गेला' असं बऱ्याच ठिकाणी ऐकल्यामुळे मला चालण्याची तशी भीतीच वाटते; पण आता पन्नाशी ओलांडल्यानं तुमच्या आज्ञेत राहिलेलं बरं. म्हणजे यमाशी लपाछपी खेळायला बरं पडतं.''
यावर डॉक्‍टर हसत म्हणाले : 'आम्ही कुणाचं मरण टाळू शकत नाहीत. फक्त ते सुखानं कसं येईल याची काळजी घेतो.''

डॉक्‍टर म्हणाले: 'चालणं हा सर्वोत्तम व्यायाम आहे. माझा दवाखाना फार चालतो; त्यामुळे मला चालायला वेळ मिळत नाही. तुम्ही मात्र रोज चालत जा.''
- मी म्हणालो: ' "चालता-बोलता गेला' असं बऱ्याच ठिकाणी ऐकल्यामुळे मला चालण्याची तशी भीतीच वाटते; पण आता पन्नाशी ओलांडल्यानं तुमच्या आज्ञेत राहिलेलं बरं. म्हणजे यमाशी लपाछपी खेळायला बरं पडतं.''
यावर डॉक्‍टर हसत म्हणाले : 'आम्ही कुणाचं मरण टाळू शकत नाहीत. फक्त ते सुखानं कसं येईल याची काळजी घेतो.''

एकंदर त्यांच्या बोलण्याचा गांभीर्यानं विचार करून मी चालायला जाण्याचं ठरवलं. त्यासाठी एखादा चांगला स्पोर्ट ड्रेस व शूज घ्यावेत असा प्रस्ताव मी बायकोसमोर मांडला. ती म्हणाली :'डॉक्‍टरांनी तुम्हाला चालायला सांगितलं आहे, फिरायला नाही. घरात जुना पायजमा आहे. अंगात बसत नाही म्हणून एक टी शर्ट मोनूनं टाकून दिला आहे. तो तुमच्या अंगात बसेल. शिवाय, आजोबा गावी जाताना त्यांचे जुने कापडी बूट इथं विसरून गेलेत. ते वापरा. तुम्हाला रस्त्यावर चालायचंय. रॅम्पपवर नाही.''ं
- एकंदरीत, मी जास्तीच जास्त गबाळा कसा दिसेन याची काळजी घेऊन बायकोनं मला रस्त्यावर सोडून दिलं! शिवाय, "डॉक्‍टरांनी सरळ पाहून चालायला सांगितलंय' अशी तिच्या सोईची सूचनाही ती करायला विसरली नाही. अर्थात सरळ पाहून चालायला सांगणं हा नवऱ्याला सरळ करण्याचा उपाय नाही हे तिला कुणी सांगावं! मान सरळ ठेवून डोळ्यांची बुबुळं खोबणीच्या दोन्ही टोकांना फिरवण्याचं कसब अनेक पुरुषांनी प्राप्त केलेलं असतं. त्यात सरळ सरळ माझाही नंबर लागत होता हे तिला बिचारीला काय माहीत? मी मनातल्या मनात तिला हसत सायंकाळी चालायला बाहेर पडलो.
***

मी निघालो तो रस्ता माणसांनी कसा फुलून गेलेला होता. एक माणूस वाघ मागं लागल्यासारखा अत्यंत वेगानं चालताना दिसला. तो कुठल्या तरी संकटात असावा म्हणून मी त्याच्या मागं पाहिलं; परंतु त्याच्या मागं दूरपर्यंत काहीच दिसत नव्हतं. "मागं काही नसलं तरी झरझर चाललं पाहिजे, नाहीतर...' अशी भीती डॉक्‍टरांनी त्याला घातली असावी आणि तीच भीती त्याच्या मागं लागली असावी. एक मरतुकडा मनुष्य दोन भली मोठी कुत्री घेऊन फिरत होता. कुत्र्यांच्या साखळ्या त्याच्या दोन्ही हातांत होत्या. जणू तो चालतच नव्हता, तर बैलांनी जशी बैलगाडी ओढावी तशी ती दोन कुत्री त्याला ओढत होती. त्यानं कुत्र्यांना फिरायला आणलंय की कुत्र्यांनी त्याला ते समजायला मार्ग नव्हता. - माझ्यासमोर सात-आठ ज्येष्ठ नागरिकांचा घोळका दुडक्‍या चालीनं चालला होता. त्यांच्यात राजकारणाच्या गप्पा रंगल्या होत्या. या जगात येताना त्यांनी प्रथम डोळे उघडले तेव्हा सर्वत्र कॉंग्रेस पक्ष होता. आता डोळे मिटताना तरी तो पक्ष काही दिवस सत्तेवर यावा अशी त्यांची इच्छा होती.
'कुणाला मत द्यावं ते आजच्या तरुणांना काही कळत नाही. नवी पिढी पूर्णपणे बिघडली असून लवकरच जग बुडणार आहे,'' असं एक म्हातारबुवा म्हणाले आणि इतकं लांबलचक वाक्‍य बोलल्यानं दम लागून जागीच थांबले. तेव्हा दुसरे म्हातारबुवा हसत म्हणाले : 'आता आपली बुडण्याची वेळ झालीये रामभाऊ. कशाला उगाच जगाला घेऊन बुडतोस?''

यावर सारे खो खो करत हसले. एक मध्यमवयीन जोडपं चालताना दबक्‍या आवाजात भांडत होतं. बायको म्हणत होती :'आपली वाटणी का म्हणून सोडायची? आई राहायला आपल्याकडं आणि शेती खाताएत ते. नाहीतर घेऊन जा म्हणावं आईला. मी नाही पोसायला मोकळी. तुम्ही गप्प बसल्यानं कायमच आपला तोटा होतो.'' तिचा नवरा तिला समजावत होता.
- माझी चाहूल लागली तसे ते दोघं एकदम गप्प झाले. रस्त्याच्या कडेला तरुण पोरांचं एक टोळकं मित्राचा वाढदिवस साजरा करत होतं. ज्याचा वाढदिवस होता त्याच्या तोंडाला त्यांनी संपूर्ण केक फासला होता. त्यामुळे वाढदिवशीच त्या मुलाची अवस्था देवाला बळी द्यायला चालवलेल्या बोकडासारखी झाली होती. काही मुली कानात हेडफोनच्या वायर घालून चटचट चालताना पाहून वाढदिवसवाल्यांना अजून जोर आला. संपूर्ण चेहरा ओढणीनं लपेटून घेतलेली एक तरुणी बाजूनं संथ चालीनं, हळू आवाजात मोबाईलवर बोलत चालली होती. तिला आजूबाजूचं कसलंच भान नव्हतं, तर दुसरी मुलगी चालताना स्वत:शीच खुदकन हसत होती. मध्यमवयीन महिलांचं एक टोळकं या क्षणी त्यांच्यात नसलेल्या महिलांचे दोष एकमेकींना चढाओढीनं सांगत भरभर चालत होत्या. काही माणसं चालताना नखावर नखं घासत होती, काही बॉलिंग टाकल्याप्रमाणे हात फिरवत होती, काही नाकातून जोरजोरानं श्वास सोडून पुन्हा छातीचा भाता भरून घेत होती. एकजण नुकताच सलाईन लावल्यासारखा संथ चालीनं चालला होता, तर दुसरा चालताना मध्येच पोटावर हात फिरवून चालण्याचा काही उपयोग होतोय का ते तपासत होता. काही तरुण, तरुणी, माणसं मात्र चेहऱ्यावर कसलाच भाव उमटणार नाही याची काळजी घेत गांभीर्यानं चालत होती. मी रमतगमत चालत असताना गाडीवर चाललेले दोन तरुण एकदम थांबून मला म्हणाले : 'काय बॉडी बनवायचीय वाटतं या वयात? असं चालून आयुष्य वाढवायचं आणि वाढलेलं आयुष्य चालण्यात घालवायचं याला काही अर्थ आहे का?''
- माझ्या डोक्‍यात असा कालवा करून ते निघून गेले. आता अंधार पडू लागल्यानं गर्दी तुरळक झाली. अंधारात एक बाई एकट्याच फिरताना दिसल्या. अशा अंधारात बाईमाणसानं एकटं फिरणं बरं नाही असं मला त्या बाईंना सांगावंसं वाटलं; पण मी गप्प बसलो. घरी येऊन बायकोला साऱ्या गमतीजमती सांगितल्या. ती म्हणाली :'अंधारात एक बाई दिसल्या होत्या ते नाही सांगितलंत?''
मी आश्‍चर्यानं ओरडतच विचारलं : 'तुला कसं माहीत?''
बायको म्हणाली : 'ती मीच होते!''
सध्या माझं फिरणं बंद आहे!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang article write sanjay kalamkar