स्तिमित करणारा स्मिथ (मुकुंद पोतदार)

australian cricket steve smith
australian cricket steve smith

क्रीडापटू पुनरागमन करतात, त्यापूर्वी दुखापतींनी ग्रासणं, फॉर्मला ग्रहण लागणं यांपैकी काहीतरी घडलेलं असतं. अखिलाडूवृत्तीमुळे आलेली बंदीची शिक्षा भोगून मैदानावर परतणाऱ्यांची अवस्था वेगळी असते. अशी कसोटी म्हणजे अग्नीपरीक्षेहून भयंकर. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टीव स्मिथ या आघाडीवर करत असलेली कामगिरी स्तिमित करणारी आहे.

दिनांक : २९ मार्च २०१८
स्थळ : सिडनी विमानतळ
व्यक्ती : ऑस्ट्रेलियाचा पदच्युत कर्णधार स्टीव स्मिथ
संदर्भ : दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील केपटाऊन कसोटीत नवोदित सहकारी कॅमेरॉन बॅंक्रॉफ्ट याला सॅंडपेपर चेंडूवर घासण्यास भाग पाडण्यात आलं. चेंडू कुरतडण्याच्या कटातील सहभाग सिद्ध झाल्यामुळे मायदेशी हकालपट्टी. विमानतळावरील पत्रकार परिषदेत ओक्‍साबोशी रडत संघाची, सहकाऱ्यांची, देशाची, देशबांधवांची, खेळाची, नाचक्की केल्याबद्दल माफी
परिणाम : स्मिथ-डेव्हिड वॉर्नर ही कर्णधार-उपकर्णधारपदाची जोडी एका वर्षासाठी निलंबित
----
दिनांक : १ ऑगस्ट
स्थळ : बर्मिंगहॅममधील एजबस्टन मैदान
व्यक्ती : बंदीनंतर कसोटी पुनरागमन करणारा, नुसता फलंदाज उरलेला स्मिथ
संदर्भ : पहिली ऍशेस कसोटी, ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत हरवून नुकतेच जगज्जेत्या बनलेल्या इंग्लंडच्या गोलंदाजांना सामोरं जात पहिल्या डावात १४४ धावांची खेळी.

सर्वकालीन सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन ज्या ऑस्ट्रेलियातून उदयाला आले तिथं क्रिकेट हा राष्ट्रीय खेळ आहे. अमेरिका, चीन, जर्मनी, रशिया अशा देशांच्या क्रीडाक्षेत्रातील यशाबद्दल खूप चर्चा होती; पण क्रीडासंस्कृतीचा (स्पोर्टस् कल्चर) उल्लेख होतो तेव्हा ऑस्ट्रेलियाचं नाव आघाडीवर असतं. अशा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी प्रत्यक्ष मैदानावर रडीचे डाव भरपूर खेळले असले तरी मैदानाबाहेर असा कट कुणी आखला नव्हता. त्यातही ज्याला भविष्यातलं आशास्थान मानून तरुण वयात नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली त्या स्मिथनं असं करणं धक्कादायक ठरलं.
वर्षभरातील बंदीच्या काळात स्थानिक टी२० लीग खेळणे, दीर्घ काळची मैत्रीण दानी हिच्याशी विवाहबद्ध होणं, ढोपरावर शस्त्रक्रिया होणं, आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सतर्फे सहभाग अशा घडामोडींसह स्मिथ वेगवेगळ्या पातळ्यांवर वाटचाल करत होता. विश्वकरंडक राखण्याच्या मोहिमेत ऑस्ट्रेलियाला अपयश आलं. चार अर्धशतकं ही कामगिरी स्मिथचा लौकिक उंचावणारी नव्हती.

असं पुनरागमन सर्वांत खडतर
कोणत्याही खेळातील क्रीडापटू दुखापती, बॅडपॅच म्हणजे फॉर्म खालावणं अशा दोन मुख्य प्रकारच्या पार्श्वभूमीवर पुनरागमन करतात. गोल्फपटू टायगर वूड्‌स विवाहबाह्य प्रकरणाच्या जोडीला दुखापतींसह बॅडपॅचनंतर कोर्सवर परततो. बंदीनंतरचे पुनरागमन सर्वांत अवघड असतं. याचं कारण त्या खेळाडूच्या कौशल्य, क्षमतेविषयी नव्हे तर विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं असतं. त्याच्या प्रतिमेची कदापी भरून न येणारी हानी झालेली असते.

प्रतिस्पर्ध्याच्या जोडीला प्रेक्षक
स्मिथच्या स्वागतासाठी इंग्लंडच्या प्रेक्षकांनी कशी जय्यत तयारी केली याची झलक विश्वकरंडक स्पर्धेदरम्यान दिसलीच होती. या वेळी ऑस्ट्रेलियाचा डाव सुरू होताच प्रेक्षकांनी सॅंडपेपर फडकावले. काही जण तर स्मिथ पत्रकार परिषदेत रडतानाचे मुखवटे घालून आले होते. अशा वेळी स्मिथची भावनिक अवस्था काय असेल, त्याच्यावर किती दडपण असेल याची कल्पना केली तरी अंगावर काटा येईल.

दुसऱ्या डावातही शतक
ऑस्ट्रेलियन खेळाडू संघभावनेनं खेळतात. त्यामुळे त्यांच्यासाठी वैयक्तिक पराक्रम फार महत्त्वाचे नसतात. स्मिथ किती धावा करतो याशिवाय त्याचा संघ काय करतो याकडे तज्ज्ञांचे लक्ष होतं. स्मिथनं दुसऱ्या डावातही शतक काढत संघाच्या विजयाचा पाया रचला. कसोटीत दोन्ही डावांत शतकाची कामगिरी दुर्मिळात दुर्मिळ मानली जाते. दोन्ही डावांत स्मिथ बाद झाला असला तरी त्याआधी त्यानं इंग्लंडला बरंच मोल देण्यास भाग पाडलं होतं. स्विंग गोलंदाज जेम्स अँडरसन दुखापतीमुळे मारा करू शकला नाही; पण स्मिथला रोखणं त्यालासुद्धा जड गेलं असतं.

देशबांधव प्रतिस्पर्धी प्रशिक्षक
स्मिथच्या पराक्रमाचा आढावा घेताना प्रतिस्पर्धी इंग्लंडच्या प्रशिक्षकांचा उल्लेख करावा लागेल. ट्रेव्हर बेलिस हे ऑस्ट्रेलियन आहेतच. शिवाय, स्मिथ ऑस्ट्रेलियात प्रथमश्रेणी क्रिकेट खेळतो त्या न्यू साउथ वेल्स संघाची सूत्रंसुद्धा त्यांच्याकडं होती. तेव्हा त्यांनी मेंटॉर म्हणून स्मिथचा खेळ जवळून पाहिला होता. पुनरागमन करणारा स्मिथ कितीही दडपणाखाली असला तरी तोच इंग्लंडच्या मार्गातील प्रमुख अडथळा ठरणार हे उघड होतं. अशा वेळी बेलीस हे प्रशिक्षकाच्या भूमिकेतून काय डावपेच आखतात हे महत्त्वाचं होतं. त्याची प्रचीती आली. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला होता. जस्टिन लॅंगर यांच्या निरीक्षणानुसार पूर्वी असं कधीच घडलं नव्हतं.

लेगस्पिनर ते फलंदाज
स्मिथबद्दल सर्वाधिक थक्क करणारा मुद्दा म्हणजे त्यानं कारकिर्दीची सुरवात लेगस्पिनर म्हणून केली. त्यानंतर त्यानं फलंदाज व्हायचं ठरवलं. हा निर्णय त्यानं घेतला आणि तो यशस्वीसुद्धा ठरवला. तो साधासुधा नव्हे तर आजघडीचा सर्वोत्तम फलंदाज बनला. यातून जे ठरवायचं ते तडीस नेण्यासाठी लागणारं मनोधैर्य त्याच्या ठायी असल्याचं स्पष्ट होतं.

नेटमध्ये मॅरेथॉन सराव
स्मिथकडं जादू होती आणि त्यानं ती केली असं मात्र नाही. तर तो नेटमध्ये मॅरेथॉन सराव करत असतो. त्याला नेटमध्ये जे गोलंदाजी करतात त्यांना तो कदापि बाद होणार नाही असं वाटतं. स्मिथला लाखभर चेंडू टाकले तरी त्याची विकेट मिळणार नाही अशी गोलंदाजांची अवस्था होत असल्याचं ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जस्टिन लॅंगर नमूद करतात.

नेटमध्येच झोनमध्ये
खेळाच्या संदर्भात ‘झोनमध्ये जाणं’ अशी एक संकल्पना असते आणि तसं वारंवार कानावर पडतं. हा झोन म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून आत्यंतिक एकाग्रता साधत अमाप जिद्दीच्या जोरावर अतुलनीय कामगिरी साकारणं. सामान्य ते असामान्य किंवा ॲथलिट ते चॅंपियन अशी भरारी घेण्यासाठी या झोनमध्ये जावं लागतं. स्मिथचं वैशिष्ट्य असं की हा बाबा नेट प्रॅक्‍टिस करतानाच झोनमध्ये जातो!

समकालीन क्रिकेटमध्ये भारताचा विराट कोहली, न्यूझीलंडचा केन विल्यम्सन, इंग्लंडचा ज्यो रूट यांच्या जोडीला स्मिथ हे दिग्गज फलंदाज मानले जातात. यातील स्मिथला कर्णधारपद गमवावं लागलं; पण फलंदाज म्हणून तो करत असलेली विक्रमी वाटचाल आणि मोक्‍याच्या क्षणी संघाच्या यशातील त्याचं योगदान स्तिमित करणारं आहे.

वडिलांचा आधार
स्मिथ सिडनी विमानतळावर पत्रकार परिषदेत बोलत असताना त्याचे वडील पीटर शेजारी उभे होते. जेव्हा जेव्हा स्मिथला अश्रू अनावर झाले तेव्हा तेव्हा त्यांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला. हे दृश्‍य हेलावून टाकणारं होतं. खेळाडूंचं बालपण नॉर्मल नसतं. वयानुसार इतर
मुलं-मुली ज्या भाव-भावनांना सामोरे जातात, ज्या अनुभवांतून शिकतात त्यास हे खेळाडू मुकतात. खेळाचे अनेक फायदे असले तरी व्यावसायिक युगात जीवघेणी स्पर्धा कंठाशी आलेली असताना हे खेळाडू प्रेरणेपेक्षा दडपणच जास्त घेण्याची शक्‍यता असते. तशी उदाहरणं १९९० च्या दशकापासून जास्त दिसू लागली आहेत. अशा वेळी ‘पीटर यांचा सुपुत्र’ ते ‘पीटर यांचं कार्टं’ आणि पुन्हा ‘पीटर यांचा पराक्रमी पुत्र’ अशी स्मिथनं केलेली वाटचाल पथदर्शक ठरेल. स्मिथच्या पुनरागमनातला कुटुंबाचा वाटा यातून दिसतो.

तुम्ही मैदानावर उतरून तुमच्या बॅटला बोलू द्यायचं असतं. दक्षिण आफ्रिकेत जे काही घडलं ते भूतकाळात जमा करण्याची वेळ आली होती. प्रेक्षकांनी स्मिथसाठी मोठी कठीण परिस्थिती निर्माण केली होती. अशा वेळी केलेली कामगिरी स्मिथची मानसिक ताकद अधोरेखित करते. वर्षभर कसोटी क्रिकेटला मुकल्यानंतर यश मिळवण्याची आतुरतासुद्धा दिसते.
- ग्लेन मॅक्‌ग्रा, ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज

विराट कोहलीच्या सर्वोत्तम इनिंग्ज मी पाहिल्या आहेत; पण एजबस्टनवरील स्मिथची खेळी केवळ वेगळ्याच उंचीची होती. वेगवेगळ्या कालखंडांत वेगवेगळ्या संघांमध्ये तुम्ही दिग्गज खेळाडू बघता; पण दडपणाखाली स्मिथची कामगिरी कमालीचं धाडस, अविश्वसनीय एकाग्रता, थक्क करणारा स्टॅमिना, मनोधैर्य दर्शवते.
- जस्टिन लॅंगर, ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक

कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची काय भन्नाट पद्धत आहे ही! वेल प्लेड स्मिथ.
- सचिन तेंडुलकर, भारताचे दिग्गज फलंदाज

स्मिथचा पराक्रम
- एकाच कसोटीत शतक-अर्धशतक किंवा जास्त अशी कामगिरी नवव्यांदा. दक्षिण आफ्रिकेच्या जॅक्‌ कॅलिसशी बरोबरी. या क्रमवारीत ऍलिस्टर कूक (इंग्लंड -८ वेळा) याच्यासह प्रत्येकी सात वेळा केलेले. देशबांधव ऍलन बोर्डर, रिकी पॉंटिंग, सचिन, विराट तसेच श्रीलंकेचा कुमार संगकारा यांच्यापेक्षा सरस.
- १८७६-७७ पासून इतिहास असलेल्या ॲशेस मालिकेत दोन्ही डावांत शतक केलेला पाचवा ऑस्ट्रेलियन
-इंग्लंडमध्ये ॲशेस कसोटीत अशी कामगिरी केलेला तिसराच ऑस्ट्रेलियन
-२५ कसोटी शतकांसाठी ब्रॅडमन (६८) यांच्यानंतर सर्वांत कमी डाव (११९), विराटचे १२७ डाव
-दहा ॲशेस शतकांसाठी ब्रॅडमन (३७) यांच्यानंतर सर्वांत कमी डाव (४३)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com