नात्यांतली गंमत कळावी! (अविनाश नारकर)

avinash narkar
avinash narkar

संस्कार बिंबवून अथवा ठासून होत नाहीत, तर ते तुमच्या आचरणातून मुलं आपोआप शिकतात, ते नकळत रक्तात मुरतात. दंडेलशाहीनं केलेले संस्कार कालांतरानं विरून जाऊ शकतात; पण टिपकागदासारखं शोषून घेतलेले संस्कार कायम राहतात. त्यामुळं मोठ्यांचं आचरण जितकं चांगलं, तितकं ते मुलांपर्यंत झिरपतं, पोहोचतं आणि ते टिकून राहातं. आईकडून शिकलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कोणीही दारात आलेलं उपाशी परत जायला नको. आलेल्याची जी अपेक्षा असेल, ती तुमच्या कुवतीप्रमाणे पूर्ण करता आली पाहिजे. दारात कोणी आलं आहे आणि तुमच्याकडं अर्धीच भाकरी आहे, तर ती तुम्ही त्याला द्या, आपल्यासाठी काय हे नंतर बघता येईल... हे आईचे संस्कार अजूनही मी पाळतो.
 

आमचं एकत्र कुटुंब होतं. त्यामुळं घरातील सगळ्यांचा विचार करणं, सगळ्यांना सांभाळून घेणं या गोष्टी नकळत शिकलो. एकत्र कुटुंब पद्धती ही सगळ्यात छान आणि सुरक्षितता देणारी व्यवस्था आहे, असं मला आजही वाटतं. आम्ही सहा भावंडं, त्यात मी शेंडेफळ होतो. त्या वेळी आम्ही साडेतीनशे चौरस फूट जागेत चौदा माणसं राहात होतो. आम्ही वैश्य वाणी, त्यामुळं ‘आगे दुकान पिछे मकान’ या संस्कृतीमधले होतो. दुकानावर काम करण्यासाठी येणारी गावाकडची मंडळी असायची, आम्ही त्यांना काका, मामा असंच म्हणायचो. त्यांचं खाणं-पिणं सगळं आमच्याच घरी व्हायचं, ते आमच्या कुटुंबाचाच भाग होते. त्यामुळं भेदभाव कधी बघितलाच नाही. आम्ही लोअर परळला राहायचो. तिथून एल्फिन्स्टन स्टेशन जवळ होतं. त्यामुळं गावाकडून आलेली ओळखीची माणसं आधी दुकानावर यायची. वडील त्यांना जेवायला घालूनच पुढं पाठवत असत. हे येणारे पाहुणे आमच्यासाठी काहीतरी खाऊ घेऊन यायचे, त्यामुळं आम्ही खूश असायचो. आमचे काका गावी होते; पण काकांच्या मुलांची शिक्षणं आमच्या याच घरात झाली आहेत. इतकंच नाही, तर गावाकडून आमच्या आईच्या हाताखाली काम करण्यासाठी साधारण दहा-अकरा वर्षांच्या मुली यायच्या, त्यांची लग्नंसुद्धा वडिलांनी लावून दिली आहेत. मी खूप लहान होतो, तेव्हा आमच्याकडं मंदाताई, मालूताई होत्या; तसंच कामासाठी आलेले धोंडू मामा, दत्ता मामा यांचीही लग्नं वडिलांनी लावून दिली.
कुटुंबातील सारे एकाच छत्राखाली होते. आपल्याकडं काम करणारेसुद्धा कुटुंबाचाच भाग आहेत, ही खूप मोठी भावना या संस्कारातून रुजली. जागा हा मुद्दाच त्या वेळी नव्हता. मनाचा मोठेपणा हीच दौलत होती. या गोष्टीसाठी आमच्या आईचं नाव अख्ख्या गावात काढलं जायचं. आमच्या घरी आलेलं कोणीही कधी उपाशी परत गेलेलं नाही. माझ्या एकांकिका संपल्यावर आम्ही मित्र रात्री अडीच वाजता आलो, तरी आई सर्वांना खाऊ घालायची. हा सगळा प्रकार आताच्या एकलकोंड्या आयुष्यात संपून गेला आहे. नवरा-बायकोसुद्धा आता एक-एकटेच राहायला लागले आहेत, याचा खेद वाटतो. आमचं वडिलांशी जास्त बोलणं नसायचं; पण त्यांचा आदरपूर्वक धाक होता. तेव्हा रागावण्याची कारणं समजत नव्हती, पण मोठं झाल्यावर त्यामागची कारणं समजतात. आमच्या भल्यासाठीच ते रागावणं होतं. आम्ही राहायचो तिथं आजूबाजूला गुंडांची वस्ती होती. त्यांच्यात टोळीयुद्ध व्हायचं. ते आम्ही बघितलं आहे. दुकानासमोर सोडा वॉटरच्या बाटल्यांचा खच पडायचा. त्यामुळं बाहेरच्या मुलांमध्ये फारसं राहायचं नाही, हे वडिलांचं सांगणं होतं. ते नेहमी म्हणायचे, "तुम्ही लोकांच्या मदतीला नक्की जा; पण त्यांच्यातले दुर्गुण घेऊ नका, तुमच्यातले गुण त्यांना अवश्य शिकवा. तुला पाठ असलेली रामरक्षा शिकवून त्यांची वाणी शुद्ध कर; पण त्यांची शिवराळ भाषा सोबत आणायची नाही. तशी भाषा मी ऐकली तर माझा हात आहे आणि तुझी पाठ आहे," हे त्यांचं सांगणं होतं. याबाबतीत वडील फार कडक होते. त्या अर्थानं त्यांचा धाक होता.

वडिलांकडून शिकलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जबाबदारीची जाणीव! दोन काका आणि वडील यांच्यात एवढं प्रेम होतं, की त्यांना इतर जण राम, लक्ष्मण, भरत असं म्हणायचे. त्यांनी या गोष्टी कधी सांगितल्या नाहीत; पण त्यांचं वागणं खूप काही सांगत होतं. संस्कार बिंबवून अथवा ठासून होत नाहीत, तर ते तुमच्या आचरणातून मुलं आपोआप शिकतात, ते नकळत रक्तात मुरतात. दंडेलशाहीनं केलेले संस्कार कालांतरानं विरून जाऊ शकतात; पण टिपकागदासारखं शोषून घेतलेले संस्कार कायम राहातात. त्यामुळं मोठ्यांचं आचरण जितकं चांगलं, तितकं ते मुलांपर्यंत झिरपतं, पोहोचतं आणि ते टिकून राहातं. आईकडून शिकलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कोणीही दारात आलेलं उपाशी परत जायला नको. आलेल्याची जी अपेक्षा असेल, ती तुमच्या कुवतीप्रमाणे पूर्ण करता आली पाहिजे. दारात कोणी आलं आहे आणि तुमच्याकडं अर्धीच भाकरी आहे, तर ती तुम्ही त्याला द्या; आपल्यासाठी काय, हे नंतर बघता येईल. हे आईचे संस्कार अजूनही मी पाळतो.

शूटिंगला जाताना दर वेळी माझ्याकडं खाऊचा पेटारा असतोच. सेटवर कोणाला भूक लागली, तर हा पेटारा कायम भरलेला असतो. समोरच्या व्यक्तीच्या चेहेऱ्यावरचं समाधान तुम्हाला खूप आनंद देऊन जातं, हे मी लहानपणापासून बघितलं आहे आणि माझ्याकडं ते आई-वडिलांकडून आलं आहे. सध्याच्या काळात अशा गोष्टी बघायला मिळणं खूप अवघड आहे. कारण सध्या अतिशय आत्मकेंद्री आणि स्वकेंद्री आयुष्य झालं आहे.

वडिलांची आणखी एक लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे, ते नेहमी म्हणायचे, "स्लो बट स्टेडी विन द रेस." आपण आपल्यापरीनं गती ठेवायची; पण ध्येयावरचं लक्ष चुकवायचं नाही. म्हणून माझ्या आयुष्यातही मी कधीही हपापल्यासारखा यशाच्या मागं धावलो नाही. स्पर्धेत तिसरा नंबर आला म्हणून मन कधी खट्टू केलं नाही. हळूहळू यशाच्या पायऱ्या चढत गेलो. काय करायला पाहिजे, हे वडील एकदाच सांगायचे; पण काय नाही करायचं, हे ते नेहमी सांगत असत. मी अनेक बक्षिसं मिळवून आणत असे; पण वडिलांनी कधी तोंडावर माझं कौतुक केलं नाही. आईकडून त्यांना माझ्या सगळ्या गोष्टींची माहिती मिळालेली असायची; पण कौतुक केल्यावर हा बिघडेल या विचारानं ते थेट कौतुक करत नसत. वडील गेले त्या दिवशी मला बघून आईनं, "आता मी माझ्या अविचं कौतुक कोणाला सांगू?" असं म्हणून हंबरडा फोडला तेव्हा मला समजलं, की वडिलांना माझ्या प्रत्येक गोष्टीची माहिती होती. तेव्हाच मी ठरवलं, की आपण अभिनय क्षेत्रातच करिअर करायचं आणि नाव कमवायचं, जेणेकरून लौकिक अर्थानं वडील गेले असले, तरी आईला नेहमी वडिलांशी संवाद साधून माझ्याबद्दल सांगता आलं पाहिजे, तिचा त्यांच्याशी संवाद सुरू राहिला पाहिजे. वडील होते तेव्हा एकही दिवस असा गेला नाही, की त्यांनी माझ्या डोक्यावर तेल घातलं नाही. ते शब्दांनी बोलायचे नाहीत; पण रोज तेल लावताना आमच्यात जो स्पर्शाचा संवाद व्हायचा, त्यामुळं मला शब्दांची कधी गरज वाटायची नाही. वडील गेल्याचं दुःख मला खूप वर्षं सलत होतं, कारण शब्द तुम्ही विसरता; पण स्पर्श नाही विसरू शकत. मीसुद्धा माझ्या मुलाला, अमेयला तेल लावून देतो. त्याला रोज नाही आवडत; पण पाय चेपून देणं, पाठीवरून हात फिरवणं या गोष्टी करतो. स्पर्शाचा हा संवाद खूप महत्त्वाचा असतो. हे प्रेमाचे उमाळे पालकांकडूनच मिळतात, त्यातूनच मुलांचं आणि पालकांचं नातं दृढ होत जातं. आहे त्यात समाधान राखणं, हव्यास न धरणं, या गोष्टीसुद्धा मी माझ्या पालकांकडूनच शिकलो. याचा अर्थ असा नाही, की आपण पुढं जायचंच नाही; पण ते करण्यासाठी दमछाक न करता, सततच्या प्रयत्नानं शांतपणे यश मिळवलं पाहिजे. प्रत्येक टप्प्यापर्यंत गेल्यानंतर त्याचा आनंद घ्यावा. आजूबाजूच्या मंडळींना तो आनंद वाटावा आणि मग पुढं दुसऱ्या टप्प्यावर जावं, ही त्यांची शिकवण होती.

त्या काळात वडिलांचा आम्हा भावंडांशी थेट संवाद फारसा नव्हता; पण आता मात्र माझ्यात व अमेयमध्ये असं नाही. मला त्याची प्रत्येक गोष्ट स्वतःहून जाणून घ्यायची असते आणि मलाही त्याला बरंच काही सांगायचं असतं. तो क्षणभर जरी शांत वाटला, तरी मी अस्वस्थ होतो. त्यानं नेहमी माझ्याशी मनमोकळा संवाद साधावा, असं मला वाटतं. कौतुकाच्या बाबतीत मी थोडं वडिलांसारखं वागतो. त्यानं केलेल्या कामाला छान म्हणतो, पण सोबत "आणखी थोडं उत्तम करायला संधी आहे, ती संधी कुठली याचा शोध घे," असा सल्लाही देतो. "तुला उत्तम गुण मिळाले ही छानच गोष्ट आहे; पण तेवढ्या गुणांइतकं ज्ञान तू खऱ्या अर्थानं मिळवलं आहेस का, याचा तपास घे," असं माझं सांगणं असतं. अमेयनं नेहमीच उत्तम गुण मिळवले आहेत; पण सुरुवातीपासूनच आमचा भर केवळ गुणांवर नसून आकलनावर राहिला आहे. 'पाठ्यपुस्तकांतील उत्तरं पाठ करण्याऐवजी ती समजून घे,' असंच आम्ही त्याला सांगत आलो आहोत. तू एक एक इयत्ता पुढं जातो, तसं तुझ्या बौद्धिक कुवतीमध्ये फरक पडत गेला पाहिजे, मॅच्युरिटी वाढली पाहिजे आणि सांगायला आनंद वाटतो, की लहानपणापासून अमेयच्या व्यक्तिमत्त्वात प्रगल्भता वाढतानाच दिसत आली आहे. आता त्यानं रुईया कॉलेजातून मास मीडियामध्ये पदवी घेतली आहे. इथल्या इंडस्ट्रीचा काही काळ अनुभव घेऊन पुढं तो स्पेशलायजेशनसाठी परदेशात जाणार आहे.

पालक म्हणून मला नेहमी असं वाटतं, की मुलांना फार काही वेगळं शिकवावं लागत नाही. मुलं निरीक्षणातून शिकत असतात. घरातलं वातावरण, बोलणं, आई-बाबांचा एकमेकांशी असलेला संवाद, घरात आलेल्या व्यक्तींशी त्यांचं बोलणं... या सगळ्या गोष्टींतूनच मुलांची जडणघडण होत असते. आम्ही अमेयचा जवळ बसून अभ्यास फारसा घेतला नाही. ऐश्वर्या त्याला फक्त विचारायची, काही अडचण आहे का तुला? गणित, सायन्समध्ये काही समजलं नसेल तर ती ते समजावून सांगायची. यापलीकडं मागं लागून अभ्यास कधी घेतला नाही. परीक्षेच्या काळातही त्याची दहशत कधीच दाखवली नाही. त्याचं खेळणं वगैरे सगळं सुरू असायचं, तरी त्यानं दहावीत ९६ टक्के गुण मिळवले होते. त्याच्या आवडी-निवडीबाबतही आम्ही कधी हस्तक्षेप केला नाही. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर नाटक, नृत्य, स्केटिंग, क्रिकेट अशा वेगवेगळ्या आवडी त्यानं जोपासल्या. क्रिकेटमध्ये तर त्यानं भरपूर प्रगती केली. एमसीए क्लबच्या चौदा खेळाडूंत त्याची निवड झाली होती, पण नंतर त्याच्यातील इंटरेस्ट कमी झाला; पण आम्ही कसलीच बळजबरी केली नाही. पदवीच्या परीक्षेनंतर आम्ही अमेयला विचारलं, तुला नक्की काय करायचं आहे? कारण, तो एडिटिंग उत्तम करतो, तसंच त्याला दिग्दर्शनही आवडतं. त्या वेळी त्यानं मला एक पत्र लिहिलं, 'बाबा खरं तर मला अॕक्टर व्हायचं आहे; पण तुम्ही दोघं इतके नावाजलेले कलाकार आहात, उद्या माझी तुमच्याशी तुलना झाली तर!!' असा त्याचा आशय होता. ते वाचल्यावर मी त्याला माझ्याजवळ बसवलं आणि म्हणालो, "हा गोंधळ मनात ठेवू नकोस, तुला जे मनापासून करावंसं वाटतं, ते कर. लोकांनी तुलना केली तरी आपण त्यांचं मनावर घ्यायचं नाही, आपलं काम करत राहायचं." मला आणि ऐश्वर्यालाही बरेचदा अनेकजण विचारतात, तुम्ही एकाच क्षेत्रात आहात, तुमच्यात कधी 'अभिमान' येत नाही का? मला असं वाटतं, की आमचं एकमेकांवर आणि एकमेकांच्या कामावर जिवापाड प्रेम आहे. त्यामुळं माझ्यापेक्षा ऐश्वर्याचं काम जर अधिक चांगलं झालं, असं कोणी म्हटलं, तर मला आनंदच व्हायला पाहिजे. अशीच भावना ऐश्वर्याचीसुद्धा आहे. एकमेकांचं काम व करिअर सतत उंचावतच राहिलं पाहिजे, असंच आम्हा दोघांना एकमेकांबद्दल वाटतं. हाच विचार अमेयच्या मनात रुजवला. तू जबाबदाऱ्या घ्यायला लागशील, तेव्हा कोणत्याही जबाबदारीनं तू डगमगता कामा नये. त्याच्या वागण्यातून, लोकांशी असलेल्या संपर्कातून तो किती जबबदारीनं वागतो, हे आम्हाला समजतं. कोणाचा मदतीसाठी फोन आला, तर तो लगेच धावतो. एखाद्या नाटकात त्याची भूमिका असो वा नसो, बोलावलं तर तो लगेच जाणार आणि तिथं सर्वतोपरी मदत करणार. अलीकडची एक घटना सांगतो, अमेय सकाळी सहा वाजता तयारी करून निघाला. मी विचारलं, "इतक्या सकाळी कुठं निघालास?" तो म्हणाला, "मित्राचा लॅपटॉप बिघडला आहे, त्याला ऑफिसला जायचं आहे, एक प्रोजेक्ट करायचं आहे, त्याला माझा लॅपटॉप देतो." त्याला लॅपटॉप देण्यासाठी अमेय डोंबिवलीला निघाला होता. आपल्याकडची वस्तू समोरच्या व्यक्तीच्या उपयोगात येत असेल तर ती त्याला द्यावी, हे त्याला सांगावं लागलं नाही. त्याच्या या वागण्यामुळं मित्रांमध्ये, शिक्षकांमध्ये त्याचं स्थान खूप आपुलकीचं आहे.

अमेय लहान होता तेव्हापासून ऐश्वर्यानं काम सुरू ठेवलं होतं. काही वेळा त्याचं आजारपण आलं म्हणजे तिची घालमेल व्हायची; पण आमचं एकत्र कुटुंब असल्यामुळं त्याच्याजवळ माझी आई, त्याच्या आत्या असायच्या. त्यामुळं त्याला कधी बाहेर ठेवावं लागलं नाही. चोवीस तास मुलाबरोबर एकत्र राहण्याऐवजी त्याला क्वालिटी टाइम द्यायचा, याबाबत ऐश्वर्याचे विचार खूप स्पष्ट होते. तिनं घर आणि व्यवसाय यात अतिशय उत्तम मेळ साधला. अमेयच्या शाळेतील कार्यक्रमानुसार आम्ही कामाचे दिवस अॕडजेस्ट करायचो. त्याला गरज असेल त्या वेळी आम्ही नेहमीच त्याच्याबरोबर होतो. शिवाय अमेयनंही कधी, आई तू जाऊ नकोस, असा हट्ट केला नाही. तसंच आमच्या बिल्डिंगमध्ये बरीच मुलं होती, सगळे शाळा सुटल्यावर खाली खेळायला जमायचे. त्यामुळं मोबाईल वगैरेचं फॕड काही आमच्याकडं नव्हतं.

पालकत्व मुलांवर लादता येत नाही. पालक व पाल्याचं नातं हे मैत्रीपूर्ण समीकरण असायला हवं. आपल्या चांगल्या मित्राकडून त्याच्या चांगल्या गोष्टी नकळतपणे आपण घेतो, त्याप्रमाणे पालकत्वाच्या बाबतीतही देवाणघेवाण झाली पाहिजे. मुलांकडूनही आपण खूप काही शिकत असतो, त्यासाठी आपण मनाची कवाडं खुली ठेवली पाहिजेत. दोन्ही बाजूनं हे आदानप्रदान झालं पाहिजे. मुलांच्या वयाच्या कुठल्याही टप्प्यावर हे मैत्रीचं नातं जपलं पाहिजे. कारण तेच नातं उपयोगी पडतं आणि एकमेकांना आधार देतं. परस्परांत मोकळा आणि पारदर्शक संवाद हवा, तरच मुलं पालकांशी मोकळं बोलतात, त्यांचे विचार व्यक्त करतात. हल्लीच्या काळात मुलं जास्त अंतर्मुख झाली आहेत, त्यामुळं त्यांना मनानं कायम हलकं ठेवणं, कुठल्याही गोष्टीचं दडपण मनावर न राहू देणं, हे पालकत्वाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यासाठी त्यांची प्रत्येक छोटी गोष्टदेखील ऐकून घेणं गरजेचं आहे. मुलं आजकाल फार संवेदनशील झाली आहेत, पालकांमध्ये आणि आपल्यात थोडं जरी अंतर त्यांना जाणवलं, तर ते मनातलं सांगायचं थांबतात. मुलांना पालकांची प्रत्येक गोष्ट कळत असते, त्यामुळं दोघांमध्ये मोकळा संवाद खूप महत्त्वाचा असतो. आजची वेगवान आयुष्य जगण्याची पद्धत, कामाचा ताण, जागतिकीकरण या सगळ्यामुळं माणसाकडं व्यक्त होण्यासाठी वेळच राहिलेला नाही; पण तो वेळ पालकांनी मुलांसाठी जाणीवपूर्वक काढला पाहिजे. आजही आम्ही दोघं शूटिंगमध्ये असलो, तरी अमेयला दिवसातून तीन-चार फोन होतातच. त्यामुळं तोही घरातून केव्हाही बाहेर पडताना दोघांपैकी एकाला, मी अमुक ठिकाणी चाललो आहे, काम झाल्यावर फोन करतो, असं फोन करून सांगतो. आम्ही घरात नसलो तरी आत्याला घडलेल्या गोष्टी सांगतो. लहानपणापासून आजी, आत्या यांनी त्याला सांभाळलं आहे. आमच्या घरात माझ्या दोन मावशादेखील राहात होत्या. एक मावशी वारली. तिचं सगळं आमच्या घरीच झालं. आजीचं आजारपण, तिची देखभाल हे सगळं अमेयनं पाहिलं आहे. त्यामुळं घर हे फक्त ऊन, वारा, पाऊस यापासून वाचवणाऱ्या चार भिंती आणि छप्पर एवढंच नाहीये, तर नात्यांमधील जी गंमत आहे, त्या गमतीचा आनंद घेण्यासाठी आहे, ही गोष्ट अमेयला समजली आहे. म्हणूनच तो प्रत्येक नात्याचा आदर करतो, जपतो. पालकांनी पाल्याला कुठल्याही गोष्टी न शिकवता आपल्या कृतीतून जे काही सांगितलेलं असतं, ते मुलांच्या मनावर कायम कोरलं जातं आणि त्यातूनच मुलं घडतात.
( शब्दांकन - मोना भावसार )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com