सर्व साधनांचे सार (चैतन्य महाराज देगलूरकर)

chaitanya maharaj deglurkar
chaitanya maharaj deglurkar

देव-भक्तांच्या भेटीचा सोहळा म्हणजेच वारी. ही वारी महराष्ट्राची खरी ओळख आहे. महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचं आणि संस्कृतीचं वारी हे अविभाज्य अंग आहे. भक्तीच्या रसमयतेचं ते आनंदघन स्वरूप आहे. वृत्तीच्या एकालंबनात्मक दर्शनाचं ते विस्मयकारी आणि स्तीमित करणारं रूप आहे.

प्रतिवर्षीप्रमाणं संतांचं बोट धरून त्यांच्या संगतीमध्ये पंढरपूरकडं भगवंताच्या भावस्निग्ध भेटीस वारकरी निघाले आहेत. भगवंतासही या भेटीची तीव्र तळमळ आणि प्रतीक्षा असते. हा देव-भक्तांच्या भेटीचा सोहळा म्हणजेच वारी. ही वारी महराष्ट्राची खरी ओळख आहे.

महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचं आणि संस्कृतीचं वारी हे अविभाज्य अंग आहे. भक्तीच्या रसमयतेचं ते आनंदघन स्वरूप आहे. वृत्तीच्या एकालंबनात्मक दर्शनाचं ते विस्मयकारी आणि स्तीमित करणारं रूप आहे. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेद्रियांना "बैसु जेऊ एके ठायी' ही अनुभूती देणारी व्यवस्था आहे.

वारी ही वारकरी संप्रदायाची उपासना आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीची उपासना इतरत्र कुठंही आढळणार नाही. उपासना म्हणून वारीचं मूल्य वेगळं असलं, तरी वारकरी मात्र वर्षभर या उपासनेची प्रतीक्षा करत असतो. वास्तविक उपासना म्हणजे साधना. आणि साधनेपेक्षा साध्याचं मूल्य अधिक असतं. साध्यप्राप्तीपर्यंतच साधनेचं महत्व असते. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे ः
तृप्ति जालिया जैसी। साधनेसरती आपैसी।
देखे आत्मतुष्टी तैसी। कर्मे नाही ।।
जववरी अर्जुना। तो बोध भेटे ना मना।
तवचिया या साधना। भजावे लागे।।

यावरून सर्वसाधारणपणे साध्य-साधन भावबंध लक्षात घेता येईल. परंतु, या सर्वमान्य नियमाला वारी ही साधना मात्र अपवाद म्हणावे लागले. कारण इथं साध्य प्राप्त्युत्तरही साधनेचं सातत्य टिकलं आहे आणि तेही बाधित अनुवृत्तीनं नव्हे, तर त्यातून साध्य होणाऱ्या नित्यनूतन अनुभवामुळे! हेच वारीचं प्रमुख वैशिष्ट्य ठरावं. इथं साध्यप्राप्तीचा आनंद साधनेच्या आनंदावरून कैमुत्तिक न्यायानं अनुमानित करता येतो. तथापि वर्तमानात प्राप्त साधनेचा आनंद, संत संगतीचं सुख, त्याची अपूर्वता हीसुद्धा इतकी भावविभोर आणि आनंदप्राप्तीची ठरतात, की हा आनंदही सोडण्याची इच्छा जाणकार साधकाला कदापि होणार नाही. म्हणून वारी साधना असूनही तिचं मूल्य मात्र साध्याचं आहे. वास्तविक साधकाच्या अंतःकरणामध्ये साध्याची उत्कंठा अधिक असते. आणि वारी या साधनेचं वैलक्षण्य असं आहे, की वारकऱ्यांच्या मनामध्ये प्रतिवर्षी वारीचीच उत्कंठा अधिक असते. पहिल्या पावसानंतरच्या मृद्‌गंधानं ती उत्कंठा अधिक तीव्र होत जाते. ती प्रस्थानापर्यंत वृद्धिंगत होत जाते आणि मग अशा एका अलौकिक आनंदाभूतीला प्रारंभ होतो, की ज्यामध्ये साध्याचाच विसर पडतो आणि हा साधनकालच अधिक चालावा असं वाटू लागते. वारीचा हा प्रवास सुरू होताना पंढरपूरची ओढ अधिक असते; पण जसा प्रवास होत जातो, तशी या नित्यक्रमाची आत्मीयताच वाढत जाते.

वारी ही वारकरी सांप्रदायाची उपासना आहे. कोणत्याही संप्रदायाचं, धर्माचं महत्त्व आणि स्थैर्य ज्या महत्वाच्या बाबींवर अवलंबून असतं, त्यामध्ये उपासनेचा विचार फार महत्त्वाचा असतो. उपासना शब्दामध्ये "आस्‌' हा धातू आहे. त्याला "उप' हा उपसर्ग लागला आहे. बसणं, प्रवेशणं असा या धातूचा अर्थ आहे. आपल्या आराध्याच्या जवळ जाणं, जवळ बसणं' असा एकूण "उपासना' शब्दाचा भावार्थ दिसतो. या अर्थाच्या अनुषंगानं जगद्‌गुरू शंकराचार्यांनी गीताभाष्यामध्ये उपासनेची व्याख्या फार सुंदर केली आहे. ते म्हणतात ः

"उपासनं नाम यथाशास्त्रं, उपास्यस्य अर्थस्य विषयीकरणेन सामीप्यं उपगमम्य तैलधारावत्‌ समान प्रत्ययप्रवाहेण दीर्घकालं यत्‌ आसनं तत्‌ उपासनं आचक्षते'
अर्थ असा ः चिंतनानं आपल्या उपास्याला आपल्या बुद्धीचा विषय करून त्याच्या सपीप जाणं आणि तैलधारावत्‌ (खंडित न होणाऱ्या धारेप्रमाणं) समानवृत्तीच्या प्रवाहानं दीर्घकाळापर्यंत त्यामधे स्थिर राहणं म्हणजे उपासना होय. उपासनेची ही व्याख्या वारीला तंतोतंत लागू पडते. वारकऱ्याच्या बुद्धीला पंढरीनाथ आणि संतांशिवाय अन्य विषय नसतो. केवळ शरीरानं ही वारी होत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणं ः
स्वरूपाचिया प्रसरा-। लागी प्राणेंद्रिय शरीरा।
आटणी करणे जे वीरा । तेचि तप ।।

असंच हे तप, उपासना आहे. शरीर, प्राण आणि इंद्रियांना वारकरी या वाटचालीमध्ये झिजवतात; पण यामध्ये कोणत्याही कष्टाची वा वैतागाची भावना नसते. संत तुकाराम महाराजांच्याच भाषेत सांगायचं झालं, तर "प्रेमे चालला प्रवाहो । नाम ओघ लवलाहो ।।' अशीच ही वारी आहे. भक्तिमार्ग विचारामध्ये उपासनेची पाच अंगं आहेत ः अभिगमन, उपादान, इज्या, स्वाध्याय आणि योग. अभिगमनादी या प्रकारांचं विस्तारभयास्तव वर्णन करणं शक्‍य नाही; पण इतकं मात्र निश्‍चित म्हणता येईल, की या सर्व प्रकारची उपासना वारीमध्ये सहजच साधून जाते.

वारी ही सर्व साधनांचा समन्वय आहे. कारण वारीचा सर्वांत महत्त्वाचा आधार आहे प्रेम. अंतःकरणातल्या अनन्यसाधारण प्रेमाशिवाय हा सोहळा होऊच शकत नाही. प्रेमच साधकाला स्वयंप्रेरित करतं आणि प्रेमाचं बंधन साधक काटेकोरपणे पाळतोच. वारीमध्ये सर्वत्र हे प्रेम दिसून येतं. अन्यथा कोणतीही सुविधा नसताना प्रतिकूलतेमध्ये इतक्‍या आत्मीयतेनं ही वाटचाल करेल? कारण प्रेमामध्ये प्रतिकूलतेचं भानच नसतं. प्रेमाचं हे लक्षणच आहे. भक्तिशास्त्रामध्ये प्रेमाची व्याख्या करताना म्हटलं आहे ः
सर्वथा ध्वंसरहितं सत्यपिध्वंसकारिणे ।
यद्भावबंन्धनं यूनोतत्प्रेमा परिकीर्तितः ।।

असा अर्थ ः उद्‌ध्वस्त होण्याचं सर्व कारण, परंपरा निर्माण होऊनही जे उद्‌ध्वस्त होत नाही, त्यास प्रेम असं म्हणतात. वारीमध्ये असंच प्रेम अनुभवता येतं. वास्तविक वाटचालीमध्ये अनेक अडचणी असतात. ऊन, पाऊस, असेल ते भोजन, जमेल तिथं विश्रांती, प्रकृतीमध्ये होणारे चढ-उतार या कशाचीही तमा न बाळगता वारकरी आपल्या ध्येयाकडं वाटचाल करत असतो. अनेक वेळा नैसर्गिक आपत्ती येते. पीक पिकत नाही अथवा अतिवृष्टीमुळं हाताशी आलेलं पीकही घरात येत नाही; पण वारकरी कधीही या कारणानं भगवंतावर रागवत नाही. वारी चुकवत नाही. उलट
"पंढरीचा वारकरी । वारी चुको नेदी हरी ।।'
हेच दान मागतात. यालाच प्रेम म्हणतात. प्रेमाची समष्टीरूपानं अशी अभिव्यक्ती अन्यत्र कुठंही दिसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात ः
प्रेम नये सांगता बोलता दाविता ।
अनुभव चित्ता चित्त जाणे ।।

असा अनुभवाचाच विषय आहे.
श्री क्षेत्र आळंदी अथवा संतक्षेत्रांवरून सुरू झालेला हा प्रवास श्री क्षेत्र पंढरपूर इथं विसावतो. हा पारमार्थिक जीवनाचा अंतिम मुक्काम. या मुक्कामावर येण्यासाठी सारे कष्ट, श्रम!! इथं येऊन पंढरीनाथाची भेट, दर्शन झालं, की "भाग गेला शीण गेला। अवघा झाला आनंदु।।' हा अनुभव येतो. इथं येण्यानं आनंद होत असला, तरी उपासना पूर्ण होत नाही. इथं आल्यानंतर फक्त उपासनेचं स्वरूप बदलतं.
चंद्रभागे स्नान । विधि तो हरिकथा ।।
अशी कृतिशील आणि ज्ञानशील उपासना इथं संपन्न होते. म्हणूनच वारकऱ्यांची "वारी' म्हणजे "सर्व साधनांचं सार' म्हणून विचारात घ्यावं लागतं. ज्ञान, कर्म आणि भक्तीचा हा समन्वय आहे. उपासना म्हणून वारीचं हे स्वरूप आहे.
वारकऱ्यांनी ही उपासना प्राणापलीकडं जपली आहे. श्रद्धेनं, विश्वासानं पुढच्या पिढीकडं हस्तांतरित केली आहे. मागील पिढीकडून पुढच्या पिढीकडं देताना आपणास ही उपासना जपण्याची संधी मिळाली, यामधे स्वतःच्या जीवनाची धन्यता मानली आहे.
जीवदशेकडून ब्रह्मस्वरूपतेकडं संतांच्या संगतीमध्ये आणि मार्गदर्शनानं केलेला प्रवास म्हणजे वारी होय. जीवस्वरूपानं ब्रह्म असूनही
प्राणिया कामी भरू। देहाचि वरी आदरू ।
म्हणोनि पडिला विसरू । आत्मबोधाचा ।।

अशी जी अधःपतित अवस्था जीवनास प्राप्त झालेली असते, त्यातून संतसंगती आणि नामस्मरणाशिवाय जीवास कोण बाहेर काढणार? जिवाप्रति आणि सकलजगदुद्धाराची इतकी तळमळ अन्य कोणाच्या मनामध्ये असणार? यासाठी संतांचं बोट धरून प्रवास करणं हेच अधिक श्रेयस्कर आहे. कारण त्यांनीच "वाट दावी, करी धरूनिया।।' असं, किंवा "भुलो नेदि वाट। करी धरुनि दावी नीट ।।' असं स्पष्ट म्हटलं आहे. ही वारीची वाट "नीट' आहे आणि दाखवणारे संतही "नीट' वाटच दाखवतात.
ही नीट वाट म्हणजे वारी होय. ही उपासना सकाम आणि निष्काम अशा दोन पद्धतीनं होते. तथापि वारकरी मात्र वारीची उपासना निष्कामभावनेतून करत असतो. परमात्मा मात्र याचं फळ म्हणून "ज्ञानोत्तर प्रेमलक्षणाभक्ती' पदरात टाकतो. ही अत्यंत दुर्लभ अशा स्वरूपाची भक्ती आपणास सहजतेनं प्राप्त होते.
अशी ही वारी उपासना उपास्य, उपासक आणि उपासनेस एकत्रही आणते आणि उपासनेच्या आनंदासाठी कल्पिक भेदाभेदातही ठेवते. म्हणूनच संतांनाही ही वारी अधिक प्रिय वाटते- नव्हे तर "जीवीची आवड' वाटते. म्हणूनच भगवंतासही या वारीची अपेक्षा अधिक आहे. म्हणून भगवंतही म्हणतात ः
तरी झडझडोनि वाहिला निघ ।
इये भक्तीचिये वाटे लाग ।
जिया पावसी अव्यंग ।
निजधाम माझे ।।

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com