esakal | ठायीच बैसुनी करा एकचित्त। (चैतन्यमहाराज देगलूरकर)
sakal

बोलून बातमी शोधा

chaitanya maharaj deglurkar

भक्तीचा कळसाध्याय मानली जाणारी आषाढी एकादशी येत्या बुधवारी (ता. एक जुलै) साजरी होत आहे. यंदा पायी वारी नसल्यानं कित्येक वर्षांची परंपरा खंडित झाली आहे. अशा काळात या परंपरेकडं कसं बघावं, मानसवारी कशी करावी; कायिक नसली तरी वाचिक आणि मानसिक साधना कशी करावी आदी गोष्टींबाबतचा आनंदमंत्र...

ठायीच बैसुनी करा एकचित्त। (चैतन्यमहाराज देगलूरकर)

sakal_logo
By
चैतन्यमहाराज देगलूरकर

भक्तीचा कळसाध्याय मानली जाणारी आषाढी एकादशी येत्या बुधवारी (ता. एक जुलै) साजरी होत आहे. यंदा पायी वारी नसल्यानं कित्येक वर्षांची परंपरा खंडित झाली आहे. अशा काळात या परंपरेकडं कसं बघावं, मानसवारी कशी करावी; कायिक नसली तरी वाचिक आणि मानसिक साधना कशी करावी आदी गोष्टींबाबतचा आनंदमंत्र...

श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतस्तौ सम्यरीत्य विविनक्ति धीरः।
श्रेयो हि धीरोऽभि प्रेयसो वृणीते प्रेयो मन्दो योगक्षेमाद्वणीते।।

अशी कठोपनिषदामध्ये श्रृती आहे. मानवी जीवन हे संमिश्र स्वरूपाचं आहे. त्याच्या विचारामध्ये श्रेय आणि प्रेयाची ही मिसळण झालेली आहे. विवेकी, धीर पुरुष या दोन्हींचं स्वतंत्रतेनं चिंतन करून ‘खोल विवेका’नं प्रेयसापेक्षा श्रेयाची निवड करतो; पण अविवेकाच्या काजळीनं ग्रस्त असा, मंदबुद्धी पुरुष योगक्षेमाच्या निमित्तानं प्रेयाचा स्वीकार करतो, असा या श्रृतीचा सरल अर्थ आहे. संतवाङ्‍मयाच्या आश्रयानं, आधारानं आपल्या जीवनाची वाटचाल करणारा वारकरी संप्रदाय नेहमीच श्रेयसाला आपलं ध्येय मानत आलेला आहे. श्रीक्षेत्र आळंदी, देहू आदी संतक्षेत्रांतून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे येणारे पालखी सोहळे म्हणजे श्रेयसाचं अतिशय भव्य विलोभनीय असं अभिव्यक्त रूप आहे. वारकरी संप्रदायानं सर्वोपरी मानलेल्या अद्वैतुकी भक्तीचा तो प्रेमप्रवाह आहे. संत, परमात्मा श्रीपंढरीनाथ आणि नाम याबद्दलच्या प्रतिक्षणी वृद्धिंगत करणाऱ्या या वारीची वारकरी वर्षभर वाट बघत असतात. श्रीतुकाराम महाराज ते आर्त शब्दबद्ध करताना म्हणतात :
संपदा सोहळा नावडे मनाला। करीते टकळा पंढरीचा।।
जावे पंढरीसी आवडे मनासी । कधी एकादशी आषाढी हे।।
तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी। त्याची चक्रपाणी वाट पाहे।।

अशी वारकऱ्यांना पंढरीची आस आहे. पावसाळा आला, की चातकास आनंदाचं जसं उधाण यावं, मेघातून धरतीकडे येणाऱ्या थेंबांच्या प्राप्तीची तळमळ निर्माण व्हावी, ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हे शब्द ऐकले, की साहित्यिकांच्या मनात मेघदूत, महाकवी कालिदास वगैरे विचारांचे तरंग निर्माण होतात, तसं या काळात वारकऱ्यांच्या अंतःकरणामध्ये परमात्मा आणि संतांच्या भेटीची तळमळ, संत वाङ्‍ममयातून प्रकटणाऱ्या मानवी जीवनाच्या कृतार्थतेचं सर्वांगसुंदर चिंतन सांगणाऱ्या ओव्या, अभंगांचे विचारतरंग निर्माण होत राहतात आणि मग भगवान श्रीकृष्णाचा मुरलीध्वनी ऐकून हातातील सर्व कामं टाकून गोपिका वृंदावनाकडे निघाल्या, तसे वारकरी संतांसमवेत श्रीक्षेत्र पंढरपूरकडे धावत सुटतात. त्या सर्व प्रवासात वारकऱ्यांचा संबंध केवळ आनंदाशी असतो. सर्व प्रतिकूलता अनुकूलतेमध्ये परिवर्तित झालेली असते. पाऊस, उन्ह, जेवण, कपडे, झोप या सर्वांकडे वारकऱ्यांचं लक्षच नसतं. केवळ तांत्रिकतेनं व्यावहारिक क्रिया होत असतात. सर्व चित्तवृत्ती भगवंताकडे लागलेल्या असतात. शरीर वाटचाल करत असतं; पण मन मात्र भगवंताच्या चरणाजवळ पोचलेलं असतं. गेली अनेक वर्षं निर्विघ्नपणे चालत आलेला हा परिपाठ आहे.

या वर्षी मात्र संसर्गजन्य विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपू्र्ण विश्वच त्रस्त झालेलं आहे. सर्वांनाच एकत्रित येण्यास प्रतिबंध निर्माण झाला आहे. त्यामुळे वारकऱ्याला वारीला येणं अशक्य झालं आहे. भगवद्विरहाचं हे दुःख भक्तिशास्त्रीय, कर्मशास्त्रीय अशा अनेक विकल्पांना जन्म देणारं असल्यानं त्या दुःखाची तीव्रताही वाढती आहे; पण परिस्थितीचं गांभीर्य पाहता हे दुःख सहन करण्यापलीकडे अन्य काय करणार, अशी अगतिकता भाविकांच्या अंतःकरणामध्ये दिसून येत आहे. समाजस्वास्थ्याचा आणि समष्टी कल्याणाचा विचार करता व्यक्ती-व्यक्तींमधलं अंतर पाळणं अपरिहार्य आहे. अर्थात परंपरेनं चालत असलेली ही साधनपरंपरा खंडित झाली अथवा पुढे होईल, अशी भीती व्यर्थ आहे. कारण एखाद्या वर्षाच्या अपरिहार्य अडचणींमुळे थांबावी, अथवा संपावी, अशी ही साधनपरंपरा साधारण नाही. आत्तापर्यंत निसर्ग अथवा मानवनिर्मित अनेक प्रतिबंध आले; पण वारकऱ्यांच्या अढळ निष्ठेपुढे आणि अजोड धैर्यापुढे ते टिकले नाहीत.
श्रीभानुदास महाराज म्हणतात :
जरी हे आकाश वरपडो पाहे। ब्रह्मगोळ भंगा जाये।।
वडवानळ त्रिभुवन खाये। परि मी तुझीच वाट पाहे गा विठोबा।।

ही अनन्यता, निष्ठावंत भाव सर्व प्रतिबंधासोबत लढण्याचं आध्यात्मिक आणि मानसिक बळ देते.

या सर्व प्रतिकूल वाटणाऱ्या परिस्थितीवर संत वाङ्‍मय हाच एक उपाय आहे. संत वाङ्‍मय हे मानवाच्या जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या सर्व स्तरांवरच्या सर्व समस्यांवरचं उत्तर आहे. कारण बहुतांश समस्यांची निर्मिती आपणच करत असतो. परिस्थितीकडे विपरीत रूपानं पाहणं हीच समस्येची निर्मिती असते आणि संत वाङ्‍मय विचार करण्यास शिकवतं, विचारांचं स्वरूप सांगतं, विचाराची रीती स्पष्ट करतं. परिस्थितीचा यथार्थ विचार हेच समस्येचं उत्तर असतं. श्रीतुकाराम महाराज म्हणतात :
विचारावाचून। न पविजे समाधान।।
तर श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात :
देखे सारासार विचारिता। भ्रांति ते पाही असारता।
तरी सार ते स्वभावता। नित्य जाणे।।

निर्माण होणाऱ्या किंवा निर्माण केल्या गेलेल्या प्रश्नांचं स्वरूप कसं असतं आणि त्यावरचं उत्तर कसं असतं, त्यासाठी विचाराची दिशा कशी असावी, याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्रीमद्भभगद्गीता होय.

संत वाङ्‍मयानं, अध्यात्मशास्त्रानं मानवी जीवनाची कृतार्थता करून देणाऱ्या साधनांचा विचार सांगताना कायिक, वाचिक आणि मानसिक असा तीन प्रकाराने सांगितला आहे. वारी करताना या तीनही प्रकारांची साधना होत असते. चालणं ही कायिक साधना, चालताना भजन करणं ही वाचिक साधना आणि मन आणि बुद्धीनं भगवंताचं अनुसंधान ठेवणं ही मानसिक साधना आहे; पण या वर्षीच्या संकटामध्ये मात्र वाचिक आणि मानसिक साधना करणं शक्य आहे. तीन साधनांपैकी या दोन साधना या प्रतिकूल काळातही आपण करू शकतो, ही त्यातही अधिक जमेची बाजू म्हटली पाहिजे. प्रतिकूलतेतही अनुकूलता कशी शोधायची असते, किंवा प्रतिकूलतेला अनुकूल कसं बनवायचं असतं हे आतापर्यंतच्या वारीनं वारकऱ्यांना शिकवलं आहे. वाटचालीमध्ये तो गैरसोयीलाच सोय म्हणत असतो.
सुखी संतोषा न यावे। दुःखी विषादा न भजावे।
आणि लाभालाभ न धरावे। मनामाजी।।

या भगवद्ववचनाचं ते प्रात्यक्षिक असतं. प्रतिकूल परिस्थितीची कालपरिच्छिन्नता विचारानं लक्षात घेतली म्हणजे ही परिस्थिती केवळ मर्यादित काळापुरती आहे हे विचारानं लक्षात आलं, की प्रतिकूलतेकडे आपोआपच दुर्लक्ष होतं आणि अनुकूलतेकडे लक्ष वेधलं जातं, हे साधं सरळ मानसशास्त्र आहे. याच न्यायानं या वर्षी आणि या वर्षीच केवळ कायिक वारी करता येणार नसली आणि त्याचं दुःख होत असलं, तरीही त्या दुःखातिरेकामध्ये अन्य दोन साधनांचा आनंद गमावता कामा नये. ‘दुःखी विषादा न भजावे।’ हेच खरं आहे. त्यातही शास्त्रदृष्टीनं आणखीही एक विचार करता येण्यासारखा आहे. कायिक साधनेला वाचिक साधनेची जोड असेल आणि त्यांना मानसिक साधनेची जोड दिली, तरच साधनेच्या आनंदाची वृद्धी आणि साध्यप्राप्तीची त्वरा निर्माण होईल. अन्यथा
तुका म्हणे ऐसे झालिया वाचून।
करणे तो शीण वाटतसे।।

असा प्रकार होईल. म्हणजे शरीरानं वारीत चालतो आहे; पण मुखानं भगवन्नाम घेत नसेल, तर ते शरीर थकवणं होय आणि मुखानं नाम घेतो आहे; पण मनानं भगवच्चिंतन न करता अन्य कशाचं म्हणजे प्रपंचाचं चिंतन करत असेल, तर समाधानाचं फल लगेच पदरात पडणार नाही; पण या उलट मात्र वेगळं आहे. केवळ मनानं अनुसंधानपूर्वक केलेलं नामस्मरण हे उच्चाराची अथवा क्रियेची अपेक्षा ठेवत नाही. अर्थातच त्यासाठीच्या अधिकाराचाही विचार स्वतंत्र आहे. योगवासिष्ठामध्ये वसिष्ठमुनी श्रीरामचंद्र प्रभूंना म्हणतात :
मनःकृतं कृतं लोके न शरीरकृतं कृतम...।
मनानं केलं तेच खरोखर केलं, जे केवळ शरीरानं केले ते केलं असं म्हणता येत नाही. या सर्व विचारांवरून या वर्षीपुरती ही वारी वाचिक आणि मानसिक रूपानं करून अधिक आनंदाची करता येणं शक्य आहे. कारण शारीरिक क्रियांचा परिणाम वाचेवर, मनावर कदाचित होणार नाही; पण मानससाधनेचा परिणाम शरीरावर, वाणीवर झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठीच श्रीतुकाराम महाराज देवाजवळ प्रार्थना करतात :
माझे चित्त तुझे पायी। राहे ऐसे करी कांही।
धरोनिया बाही। भव हा तारी दातारा।।

‘सकळा इंद्रिया मन हे प्रधान।’ असल्यानं ते चित्त जिथं स्थिर होईल, त्याचाच अनुभव इतर इंद्रियं घेतील.
बैसला गोविंद जडोनिया चित्ती।
आदि तेचि अंती अवसानी।।

असं तुकाराम महाराज म्हणतात. एकंदर यंदा ‘ठायीच बैसोनि करा एकचित्त।’ असंच वारीचं स्वरूप असणार आहे; पण ‘आवडी अंनत आळवावा।’ ही आपली जबाबदारी असणार आहे. ती जर आपण यथार्थतेनं पार पाडली, तर ‘सुखे येतो घरा नारायण।’ असं अलैकिक फल आपणास प्राप्त होईल. या वर्षी तरी त्यातच समाधान मानावं लागेल. ‘होतील संतांचिया भेटी। आनंदे नाचो वाळवंटी।।’ या सुखास अंतरणार असल्याचं दुःख आहे; पण यासाठी कार्तिकी एकादशी आहे, ही प्रतीक्षा त्या आनंदाची वृद्धी करेल, यात शंका नाही. भक्तिशास्त्रात विरहासक्ती ही फार मोठी भक्ती सांगितली आहे. त्या भक्तीचा अनुभव भगवत्कृपेनं आपणास प्राप्त होतो आहे. या विश्वासानं हे दुःख सहन केले पाहिजे. त्यातून मीलनाची उत्कंठा अधिकाधिक तीव्र होऊन आपला प्रत्येक क्षण भगवंताच्या चिंतनानं तन्मय करणारा ठरावा.

शेवटी भगवच्चरणी आणि संतचरणी एवढीच प्रार्थना, की हे संकट लवकरात लवकर निवृत्त व्हावं आणि यापुढे वारीसारख्या आनंदसाधनेमध्ये विघ्न आणणारं कोणतंही संकट उत्पन्न होऊ नये, ‘किंबहुना सर्वसुखी’ ही वारकऱ्यांची विश्वकल्याणाची प्रार्थना भगवंताने पूर्ण करावी.