पुण्यातून 'बूस्टर!' (महेश बर्दापूरकर)

महेश बर्दापूरकर barmahesh@gmail.com
रविवार, 14 जुलै 2019

देशाच्या "चांद्रयान 2' या मोहिमेसाठी आवश्‍यक असलेला आणि यानाचा अवकाशात झेपावण्यासाठी मदत करणारा "बूस्टर' हा भाग पुण्याजवळच्या वालचंदनगर इथल्या "वालचंदनगर इंडस्ट्रीज'मध्ये बनवला गेला आहे. संरक्षणविषयक अनेक उत्पादनं विकसित करणाऱ्या आणि स्थानिक मराठी कामगारांच्या जोरावर चालणाऱ्या या कंपनीनं अनेक अंतराळ मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. कंपनीचा प्रवास आणि चांद्रयान मोहिमेतल्या तिच्या सहभागाबद्दल...

देशाच्या "चांद्रयान 2' या मोहिमेसाठी आवश्‍यक असलेला आणि यानाचा अवकाशात झेपावण्यासाठी मदत करणारा "बूस्टर' हा भाग पुण्याजवळच्या वालचंदनगर इथल्या "वालचंदनगर इंडस्ट्रीज'मध्ये बनवला गेला आहे. संरक्षणविषयक अनेक उत्पादनं विकसित करणाऱ्या आणि स्थानिक मराठी कामगारांच्या जोरावर चालणाऱ्या या कंपनीनं अनेक अंतराळ मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. कंपनीचा प्रवास आणि चांद्रयान मोहिमेतल्या तिच्या सहभागाबद्दल...

भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रातला मानाचा तुरा ठरणाऱ्या "चांद्रयान 2'चं प्रक्षेपण उद्या (सोमवार, ता. 15) श्रीहरिकोटा इथून होईल आणि सर्व देशाचा ऊर अभिमानानं भरून येईल. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (इस्रो) अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी करत जगभरात भारताचा दबदबा निर्माण केला आहे. यामध्ये अनेक संशोधक, तंत्रज्ञ आणि कामगारांचं मोठं योगदान आहे. या मोहिमांमध्ये महाराष्ट्रातल्या, अगदी आपल्या पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्‍यात असलेल्या वालचंद इंडस्ट्रीजचा खूप मोठा वाटा आहे. या कंपनीचं या मोहिमेतलं योगदान नक्की काय आहे, हे अभ्यासण्यासाठी वालचंदनगरला निघालो. शेठ वालचंद हिराचंद यांनी स्वातंत्रपूर्व काळातच देशामध्ये औद्योगिक क्रांती आणण्याचं स्वप्न पाहिलं होतं. त्यांनी हिंदुस्तान एअरक्राफ्टस्‌ लिमिटेड आणि हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड या कंपन्यांची सुरवात सन 1940च्या दशकात केली. देशातली साखरेची गरज लक्षात घेऊन साखर कारखानाही सुरू करण्यात आला आणि त्यानंतर या कारखान्याला लागणारे सुटे भाग तयार करण्यासाठी वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेडची सुरवात झाली. या क्षेत्रातल्या अनुभवानंतर कंपनीनं 1970मध्ये संरक्षण आणि अवकाश संशोधनासाठी लागणाऱ्या उत्पादनांच्या क्षेत्रात प्रवेश केला.

कंपनीचा हा इतिहास ज्ञात असला, तरी आज तिथं सध्या नक्की काय परिस्थिती आहे, कंपनी नक्की कशा पद्धतीनं काम करते, हे पाहण्याची उत्सुकता होतीच. एके काळी देशातलं सर्वाधिक सुनियोजित शहर अशी ओळख असलेल्या वालचंदनगरच्या परिसरात प्रवेश केल्यानंतर परिस्थिती बदललेली दिसते. काळाच्या ओघात परिसरातला साखर कारखाना बंद करावा लागला असून, त्यामुळं एकेकाळी भरभराट असलेल्या या शहराचे पुरावे पडक्‍या इमारतींच्या रूपात दिसत राहतात. हजारो एकर शेती, त्यामध्ये घेतलं जाणारं शेतीचं उत्पादन आणि हजारो शेतकरी आणि कामगारांच्या जोरावर उभा असलेला उद्योग आता काही प्रमाणात आटला आहे. मात्र, या साखर कारखान्याच्या मदतीसाठी सुरू झालेला भव्य प्रकल्प अद्यापही दिमाखानं उभा आहे, बहरतो आहे. कंपनीत प्रवेश करताच याचा अंदाज येतो. शिफ्ट संपल्यानं शेकडो कामगार बाहेर पडत होते आणि पुढच्या शिफ्टचे कामगार आत प्रवेश करत होते. उत्सुकता होती ती इथं नक्की कोणत्या गोष्टी बनतात, त्याचा आकार आणि आकारमान काय आहे, त्या करण्यासाठीच्या कामात इथले कामगार किती प्रशिक्षित आहेत याची... अर्थात, कंपनीची अनेक उत्पादनं संरक्षण खात्याशी निगडित असल्यानं सुरक्षेच्या कारणानं त्यातल्या बहुतांश उत्पादनांचा उल्लेख करता येणार नसल्याचं तिथल्या अधिकाऱ्यांनी आधीच स्पष्ट केलं होतं.

"चांद्रयान 1'मध्ये कंपनीचा सहभाग होताच, आता दुसऱ्या मोहिमेत कंपनीचं काय योगदान आहे, हे पाहणं मनोरंजक होतं. कंपनीनं इस्रोच्या पीएसएलव्ही या अवकाश यानांसाठी बूस्टर बनवायला 1990च्या दशकातच सुरवात केली होती. यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी पुढाकार घेतला होता आणि कंपनीतले कर्मचारी आणि संशोधकांना प्रशिक्षणही दिलं होतं. त्यांच्या मार्गदर्शनातून कंपनीनं अनेक क्षेपणास्त्रांच्या निर्मितीमध्ये मोठा हातभार लावला आहे. जमीन, हवा, पाणी आणि अंतराळात मारा करणारी ही क्षेपणास्त्रं देशाच्या संरक्षणाचा पाया आहेत. (अर्थात, इथं त्यांची नावं आणि माऱ्याची क्षमता यांचा उल्लेख सुरक्षेच्या कारणांमुळं करता येणार नाही.) याच्या जोडीला देशाच्या अंतराळ मोहिमा सुरू झाल्यानंतर डॉ. कलाम यांनी वालचंदनगर इंडस्ट्रीजचीच मदत घेण्याचं निश्‍चित केलं. त्यात सन 1980मध्ये "एसएलव्ही 3', सन 1987मध्ये "एएसएलव्ही', 1993मध्ये "पीएसएलव्ही', 2003मध्ये "जीएसएलव्ही' आणि 2014मधल्या "जीएसएलव्ही एमके 3' या अंतराळयानांच्या निर्मितीमध्ये कंपनीचा सहभाग आहे. यामध्ये यानाच्या दोन्ही बाजूला 80 फूट लांबी व 12 फूट व्यास असलेल्या दोन बूस्टरचा समावेश होतो. हा भाग तीन तुकड्यांमध्ये बनवून जोडला जातो. म्हणजेच, दोन्ही बाजूचे मिळून एकूण सहा भाग तयार केले जातात. त्याचबरोबर यानाला दिशा देण्यासाठीच्या नोझल कंट्रोल टॅंकेजची निर्मितीही कंपनीमध्ये केली जाते. या भागाचा आकार आणि त्यातली गुंतागुंत पाहिल्यावर हे काम किती कौशल्याचं आहे, याचा अंदाज येतो.

या दोन बूस्टरमध्ये इंधन भरून अवकाश यान झेपावताना लागणाऱ्या धक्‍क्‍यासाठी (थर्स्ट) त्यात स्फोट घडवून आणला जातो. या महाकाय बूस्टर्सनी अपेक्षित परिणाम साधल्यानंतर काही सेकंदात त्यांची राख होते. हे बूस्टर बनवण्यासाठी विशिष्ट प्रकारचं स्टील वापरलं जातं. त्याच्या प्लेट कंपनीमध्ये आल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात होते. यातलं बहुतांश काम हातानंच केलं जातं. स्टीलच्या प्लेट्‌सना विशिष्ट आकार देणं, त्यांचं भल्यामोठ्या स्फोटाच्या वेळी टिकून राहणारं वेल्डिंग करणं, बूस्टरच्या आवरणामध्ये कोणताही दोष राहू नये यासाठी सातत्यानं चाचण्या घेणं, शेवटी या बूस्टरमध्ये ऑइल भरून त्यावर मोठा दाब देऊन शेवटची चाचणी घेणं हे सर्व महत्त्वाचे टप्पे कंपनीमध्ये पूर्ण केले जातात. त्यानंतर हे बूस्टर प्रक्षेपण स्थळाच्या दिशेनं रवाना होतात. ही सर्व कामं इथले प्रशिक्षित कर्मचारी मोठ्या आत्मविश्‍वासानं करताना दिसतात. या परिसरातलेच रहिवासी असलेल्या आणि आयटीआयसारखं शिक्षण पूर्ण केलेल्या या कर्मचाऱ्यांना वेल्डिंग, मशिनिंग, फोर्जिंगसारख्या कामांचं परिपूर्ण प्रशिक्षण कंपनीतच देऊन तयार केलं जातं. विशेष म्हणजे, काही खूप गोपनीय प्रकारची उत्पादनं बनवताना नक्की कोणतं काम करत आहात, याची माहितीही कर्मचाऱ्यांना दिली जात नाही. मात्र, अंतराळ यानांचे महत्त्वाचे भाग बनवल्यानंतर आणि त्यांचा देशाच्या अंतराळ कार्यक्रमामध्ये उपयोग केल्यानंतर कंपनीमध्ये आनंदोत्सव साजरा केला जातो. अनेकदा कर्मचारीच पेढे वाटून हे यश साजरे करतात...

कंपनी विविध क्षेपणास्त्रांबरोबरच अणुभट्टी, पाणबुड्यांचे सुटे भाग, नौदलाच्या गस्ती जहाजांसाठी वापरले जाणारे महाकाय गिअर बॉक्‍स, ऑप्टिकल टेलिस्कोप यांच्या निर्मितीमध्ये आपलं योगदान देत आहे. देशाच्या संरक्षणविषयक संवेदनशील गरजा पूर्ण करणारी ही कंपनी मराठी माणसांकडून अत्यंत दर्जेदार उत्पादनं देत चालवली जाते, ही प्रत्येकासाठीच अभिमानास्पद गोष्ट आहे.

कंपनीचा "डीएनए' महत्त्वाचा!
आमच्या कंपनीला 111 वर्षांचा इतिहास आहे. एका छोट्याशा गावातल्या या कंपनीनं जगाच्या तंत्रज्ञानाच्या नकाशावर स्थान पटकावलं आहे. या गावातले कर्मचारी रस्त्यावर चालणाऱ्या गाड्या बनवत नाहीत, तर त्यांनी थेट अंतराळात झेप घेतली आहे आणि ही आमच्यासाठी मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे. आम्ही देशाच्या अंतराळ कार्यक्रमासाठी बनवलेली सर्व उत्पादनं उच्च दर्जाची आहेत आणि आजपर्यंत आमचं एकही उत्पादन अयशस्वी ठरलेलं नाही. याचं कारण आमच्या कंपनीमध्ये कामगारांच्या अनेक पिढ्या काम करत आहेत आणि ते आपलं ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोचवत आहेत. यातून गुणवत्ता राखली जाते आहे. कंपनीनं कायमच देशाला सध्याच्या स्थितीत काय गरज आहे, याचा विचार करून आपली उत्पादनं विकसित केली आहेत. देशाला साखरेचा तुटवडा जाणवत होता तेव्हा आम्ही या क्षेत्रात काम केलं. आता देशाची डिफेन्स, न्युक्‍लिअर व एरोस्पेस (डीएनए) या तीन क्षेत्रांतील गरज लक्षात घेऊन आम्ही काम करतो आहोत. या क्षेत्रात कंपनीला मिळणाऱ्या फायद्याचं प्रमाण खूपच कमी आहे, मात्र या कामाच्या यशातून आम्हा सर्वांना "किक' मिळते व म्हणून आम्ही हे काम झपाटून करतो. "चांद्रयान 2' अवकाशात झेपावेल, तेव्हाही आम्हाला हीच "किक' बसणार आहे! आम्ही शांतपणे काम करणारी कंपनी आहोत. आम्ही आमच्या कामाचा कुठंही गवगवा करीत नाही. मात्र, देशातली जनता आणि इतर उद्योगांनी आम्हाला पाठिंबा दिल्यास आम्ही आमची आणि देशाची मोठी प्रगती करू शकू.

---------------------------------------------------------------------------
सरकारनं "मेक इन इंडिया'सारखे उपक्रम सुरू केल्यापासून कंपनीला निश्‍चितच फायदा होत असून, येत्या पाच वर्षांत त्याचा फायदाही दिसायला सुरवात होईल. आमच्या कंपनीत सध्या असलेल्या तंत्रकुशलतेचा उपयोग करून आम्ही इतरही काही क्षेत्रांत प्रवेश करणार आहोत. रेल्वेचे हायटेक कोचेस बनवण्याच्या क्षेत्रात वालचंदनगर इंडस्ट्री उतरते आहे. येत्या तीन ते चार वर्षांत इथून अशा कोचेसची निर्मिती सुरू झालेली असेल. देशाच्या प्रगतीमध्ये आम्ही हातभार लावू शकतो, याचा कंपनी आणि कर्मचाऱ्यांना अभिमान आहे.
- जी. के. पिल्लई, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, वालचंदनगर इंडस्ट्रीज

---------------------------------------------------------------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang Chandrayaan 2 article write mahesh bardapurkar