‘देवाणघेवाणीतून समृद्धता’ (चिन्मयी सुमित राघवन)

chinmayi
chinmayi

मुलंही आपल्याला शिकवत असतात. निरद आणि दिया दोघांनी मला शिकवलं आहे. माझ्या एका जवळच्या मित्रानं एक काम करण्याविषयी मला विचारलं होतं. ते काम मला तितकंसं पटलं नव्हतं; पण त्याला नाही कसं म्हणायचं, त्याला वाईट वाटेल असं द्वंद्व माझ्या मनात सुरू होतं. त्यावेळी दिया मला पटकन म्हणाली : ‘अम्मा, तू मनाविरुद्ध जर काम केलंस आणि कामातून कळलं, की हे तू मनाविरुद्ध करते आहेस, तर त्याला जास्त वाईट वाटेल ना!’ मला तिचं म्हणणं खूपच मॕच्युअर वाटलं.

माझे वडील रवींद्र सुर्वे आयएएस ऑफिसर असले, तरी ते साहित्यिकदेखील होते. बा. भ. बोरकर यांच्यापासून नारायण सुर्वे यांच्यापर्यंत सारे दिग्गज साहित्यिक आमच्याच घरी उतरायचे. त्यामुळे आमच्याकडे साहित्यिक वातावरण असायचं. माझी आई मानसशास्त्रज्ञ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये तिनं पस्तीस वर्षं विभागप्रमुख म्हणून काम केलं आहे. औरंगाबादमधलं शासकीय अपंग बालकगृह किंवा मूकबधिर शाळा अशा सर्व ठिकाणी आई मानद शास्त्रज्ञ म्हणून जायची. समाज हा सगळ्या घटकांनी बनलेला असतो आणि तो सगळा समाज आपलाच असतो, हे नकळतच आमच्या मनावर बिंबवलं गेलं. आई सगळीकडेच आम्हाला बरोबर घेऊन जायची. मराठवाडा समाजकल्याण समितीची ती चौदा वर्षं सदस्य होती. महिला आर्थिक विकास महामंडळाचं काम करायची. त्यासाठी ती खेडोपाडी फिरायची. या सगळ्या गोष्टींचे संस्कार नकळत आमच्यावर झाले. आई शिकवत होती, तिथला बराचसा प्रभाव आमच्या राहणीमानावर होता. म्हणूनच आधी शिक्षण महत्त्वाचं आहे, शिक्षित लोकांचा संघर्ष हा वेगळा असतो, सुशिक्षित लोकांनी बोललं पाहिजे, मत मांडलं पाहिजे, नुसतं आपल्यापुरतं बघून चालणार नाही अशा सगळ्या गोष्टींचा आमच्यावर प्रभाव होता. आई कार्यकर्ता म्हणून, तर वडील अधिकारी म्हणून काम करत असले, तरी वडिलांमधला कार्यकर्ता जास्त सजग होता. अत्यंत निःस्पृह अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. प्रामाणिकपणा, समाजाप्रती आस्था अशा खूप गोष्टी आम्ही आमच्या आई-वडिलांकडून शिकलो. लहानपणी घरात सगळेच भरपूर वाचायचे. माझ्या आजोबांचा व्यासंग खूप मोठा होता. त्यामुळे घरात इंग्लिश, मराठी, हिंदी, पाली असं वेगळ्या भाषांतलं मुबलक साहित्य होतं. या सर्व गोष्टींमुळे अत्यंत समृद्ध बालपण मला आणि माझ्या बहिणीला मिळालं. आम्हाला सिनेमा स्टारचं नाही, तर लेखक, कवींचं ग्लॕमर वाटायचं. बा. भ. बोरकर यांना बघता आलं, वसंत बापटांच्या, पाडगावकरांच्या कवितांच्या मैफिली त्यांच्याबरोबर बसून ऐकता आल्या, हे संचित खूप मोठं आहे असं मला वाटतं.  

अधिकाऱ्यांच्या मुली म्हणून आम्हाला कोणतीही वेगळी वागणूक मिळाली नाही. आम्ही सिटी बसनं शाळेत जायचो. सर्वसामान्य मुलांप्रमाणंच आम्हाला वाढवलं. इतरांचं मन दुखवायचं नाही, ही शिकवण आईनं दिली आणि स्वतः पाळलीदेखील. मला आठवतंय- लहानपणी मला दूध प्यायला आवडायचं नाही. मी चहाशिवाय काही प्यायचे नाही. मी आईसोबत एकदा दौऱ्यावर गेले होते, तेव्हा एकदा एका घरातल्या बाईंनी शेळीचं दूध मला प्यायला आणून दिलं. मी नाक मुरडलं- कारण शेळीच्या दुधाला तर आणखी उग्र वास येतो. त्यावेळी आईनं माझ्याकडे बघितलं आणि म्हणाली : ‘‘एरवी तू दूध पीत नाहीस, मी तुला काही म्हणत नाही; पण या बाईंनी त्यांच्या घरातून काढून आणलं आहे तेव्हा हे तुला प्यायला लागेल.’’ कुणाचं मन नाही मोडायचं, इतरांच्या मनाचा आदर करायचा हे काही तिनं बसवून शिकवलं नाही, तर तिच्या छोट्या छोट्या कृतींतून आम्ही ते शिकत गेलो.

मी माझ्या मुलांना नेहमी म्हणते, की सगळ्याच गोष्टींत तुम्ही उजवे आहात; पण एका गोष्टीत नाही. तुमच्या आईपेक्षा माझी आई जास्त चांगली आहे. आई कॉलेजात शिकवायची आणि त्याचबरोबर ती समाजकार्यही करायची. या दोन्ही गोष्टी करताना तिनं कायम आम्हाला तिच्यासोबत ठेवलं. त्यामुळे तिनं अतिशय क्वालिटेटिव्ह टाईम घालवला. तेच मी करायचा प्रयत्न करते; पण माझा प्रयत्न असतो आणि तिच्यासाठी त्या गोष्टी सहजसाध्य होत्या. हा मला तिच्या आणि माझ्यामधला फरक वाटतो. आई आमच्याबरोबर वाचायची, आमच्यासाठी नाटकं लिहायची आणि ती बसवायचीसुद्धा.  आकाशवाणीवर आम्ही नाटक करावं म्हणून संहिता लिहून द्यायची. हे मी माझ्या मुलांसाठी नाही केलं; पण मुलांबरोबर गोष्टी वाचणं, सोबत भरपूर वेळ घालवणं, कामाच्या ठिकाणी मुलांना घेऊन जाऊन आम्ही काय पद्धतीचं काम करतो हे दाखवणं या गोष्टी मात्र मी केल्या.

माझ्या मते, प्रत्येक पालकांची आव्हानं वेगवेगळी असतात. त्यात फक्त काळाचा फरक नसतो, तर मुलांचा पिंडही महत्त्वाचा असतो. प्रत्येक मुलाचा त्या त्या काळात वेगवेगळा पिंड असू शकतो. म्हणजे आताच्या काळात आपण म्हणतो, की मुलांची एकाग्रताशक्तीच कमी झाली आहे. स्क्रीन अॕडिक्शन ही खूप मोठी समस्या दिसते; पण सुदैवानं माझी मुलं फार शहरी किंवा मुंबईत राहूनही अगदी तशी नाहीयेत. त्यात माझं काही योगदान आहे, असं मला खरंच वाटत नाही. मी विनयशीलता वगैरे दाखवत नाही; पण त्यांचा पिंडच असा होता, की त्यामुळे मला त्यांना वाढवणं सोपं गेलं. एकतर मी मुलांना ठरवून मराठी माध्यमात घातलं. कारण मी मराठी शाळेत शिकले. घरात सतत मराठी कविता म्हणत असते. मला मराठी भाषेचा आनंद उत्तम प्रकारे घेता येतो. त्यामुळे मला जे माहीत झालेलं आहे, ते मुलांनाही समजावं, त्यांना मिळावं, त्यांनाही तो आनंद घेता यावा अशी माझी इच्छा होती. मध्यंतरी शुभांगी गोखलेनंदेखील हा मुद्दा मांडला होता, की ‘मला जे मिळालं नाही, ते मुलांना मिळालं पाहिजे यासाठी बहुतेक पालक धडपडतात; पण आपल्याला जे मिळालं आहे, तेसुद्धा मुलांना मिळालं पाहिजे याच्याबद्दल आपण थोडेसे रिलॕक्स असतो. त्याकडे फारसं लक्ष देत नाही.’ त्यामुळे मला असं वाटतं, की मला हा जो ठेवा मिळालेला आहे, तो मीच माझ्या मुलांपर्यंत पोचवायला पाहिजे- जेणेकरून तो पुढं जाईल, टिकेल. म्हणूनच मी मुलांना मराठी माध्यम शाळेत घातलं. त्यावेळी काही प्रमाणात विरोधही सहन करावा लागला, थोडी मनं पण दुखावली गेली. मात्र, आता असं वाटतं, की जे झालं ते सगळं छान झालंय.

माझ्या पालकत्वाचा अनुभव हा माझ्या आयुष्यातला अत्यंत सुंदर अनुभव आहे. अजूनही मी पालक झाल्याची भावना मला येतच नाहीये- कारण मी अजूनही मुलांबरोबर वाढतेच आहे. खूपशा गोष्टी मी मुलांकडून शिकले. त्यामुळे मी त्यांना काही दिलं आणि त्यांनी ते घेतलं असं म्हणण्यापेक्षा त्यांनी मला आणि मी त्यांना असं देवाणघेवाण करत आम्ही इथवर आलोय असं मी म्हणीन. खरं तर मुलांना काहीच शिकवू नये असं मला वाटतं. काही गोष्टींची काळजी कशी आणि का घ्यायची हे नक्कीच सांगितलं पाहिजे; पण बरेचदा पालक मुलांना गोंधळून टाकतात. आपल्या सोयीनुसार आपलं मूल त्यांना लहान किंवा मोठं हवं असतं. म्हणजे ‘अरे, लहान आहेस का तू?’ असंही ते विचारतात आणि वेळेनुसार ‘अजून तू लहान आहेस’ असंही म्हणतात. हा गोंधळ मुलांच्या बाबतीत पालकांनी करू नये. मी मुलांना कधीच माझी मोठी सावली मानलं नाही. त्यांचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, स्वतंत्र भावभावना आहेत, स्वतंत्र विचार आहेत असं मानलं.
माझ्या मुलाचं नाव निरद आणि मुलीचं नाव दिया. दोघांना शिकवण्याच्या बाबतीत माझं एकच धोरण होतं. ज्या गोष्टी दियानं शिकल्या पाहिजे, असं मला वाटत होतं, त्याच गोष्टी निरदनंही शिकल्या पाहिजेत. म्हणजे तिनं विचारांनी आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असावं, असं वाटतं- तेच निरदच्याही बाबतीत. अर्थात काही बाबतींत आपण एकमेकांवर अवलंबून असतो, तेही स्वीकारलं पाहिजे. त्यात कमीपणा वाटता कामा नये, हेही मी दोघांना सांगितलं. दोन्ही मुलांना वयात येताना ‘वयात येणं म्हणजे काय’ हे समजून सांगितलं. पाळी काय असते, हे मी दियाच्या आधी निरदला समजावून सांगितलं. कारण तो मोठा आहे. तिचे होणारे मानसिक बदल समजून घेणं त्यामुळे निरदला शक्य झालं. अशा पद्धतीनं दोघांना मी सारख्याच गोष्टी सांगितल्या. मुलगी म्हणून दियासाठी वेगळी तत्त्वं आणि मुलगा म्हणून निरदसाठी वेगळी तत्त्वं असं केलं नाही. काळजी घेणं, जबाबदारी घेणं म्हणजे काय हे सांगितलं.

मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत जात होती, त्यामुळे बरीचशी मुले झोपडपट्टीतलीच यायची. आमच्या मुलांना हा फरक समजायचा. त्यामुळे त्यांचा बाबा स्टार असला, त्याच्याकडे मोठी गाडी असली, तरी मुलं आम्हाला सांगायची, की ‘गाडी अलीकडच्या गल्लीत थांबवा. शाळेसमोर थांबवू नका.’ मुलांनी आम्हाला ही मोठी गोष्ट शिकवली. मुलांना त्यांची मतं बनवू द्यावी. एखाद्या गोष्टीबाबत त्यांची फक्त प्रतिक्रिया बघायची आणि ती समाजासाठी किंवा इतरांसाठी त्रासदायक नाहीत, याकडे लक्ष ठेवावं. आम्ही फक्त एवढंच बघितले आणि गरज वाटेल तिथं हस्तक्षेप केला. आपल्याच बोटाला धरून मुलांनी सारखं चालावं, असा अट्टाहास पालकांनी धरू नये, किंवा त्याच्या मुठीत आपलं बोट आधारासाठी कोंबू नये. ती जेव्हा मागतील, तेव्हा आधार निश्चितच द्यावा; पण उगीच नाही!

मुलंही आपल्याला शिकवत असतात. निरद आणि दिया दोघांनी मला शिकवलं आहे. निरद जास्त संवेदनशील आहे. लहान असताना त्याच्या हातून काही तुटलं, फुटलं तर तो खूप दचकायचा. आपल्या हातून कोणाचं काहीतरी नुकसान झालं, ही भावना त्याच्या चेहऱ्यावर उमटायची. म्हणून आम्ही ठरवलं, की असं काही झालं, तर तिथं जो असेल त्यानं ‘नेव्हर माइंड, असू दे, काही हरकत नाही’ यांसारखे शब्द बोलायचे. जेणेकरून तो दचकणार नाही. माझ्याकडे माझ्या मैत्रिणीनं दिलेला एक खूप छान हँडमेड सूप बाऊल होता. तो मला खूप आवडायचा. एकदा तो बाऊल आमच्याकडे कामाला येणाऱ्या मुलीच्या हातून निसटला आणि फुटला. मी तिला चटकन त्यावेळी ‘अगं!!’ असं म्हणाले. त्यावेळी मी रागावणार होते की नाही मला आता सांगता येणार नाही; पण ते ऐकल्यावर निरद धावत आला आणि म्हणाला : ‘‘अम्मा, पटकन नेव्हर माइंड म्हण ना, ती खूप घाबरली आहे.’ इथं त्यानं मला शिकवलं, की ‘त्याच्यासाठी एखादी गोष्ट लागू असेल, त्याची चूक चालणार असेल, तर घरात काम करणाऱ्या मुलीसाठीसद्धा तोच नियम या घरात लागू पाहिजे.’ दुटप्पी राहून चालत नाही, हे मुलानं शिकवलं.  
दियानंही मला शिकवलं आहे. माझ्या एका जवळच्या मित्रानं एक काम करण्याविषयी मला विचारलं होतं. ते काम मला तितकंसं पटलं नव्हतं; पण त्याला नाही कसं म्हणायचं, त्याला वाईट वाटेल असं द्वंद्व माझ्या मनात सुरू होतं. त्यावेळी दिया मला पटकन म्हणाली : ‘अम्मा, तू मनाविरुद्ध जर काम केलंस आणि कामातून कळलं, की हे तू मनाविरुद्ध करते आहेस, तर त्याला जास्त वाईट वाटेल ना!’ मला तिचं म्हणणं खूपच मॕच्युअर वाटलं.

निरद आता बावीस वर्षाचा आहे. तो पियानिस्ट आहे. म्युझिक कंपोझ करतो. दिया सिनेमॅटोग्राफी शिकत आहे. दोघांनी त्यांची अगदी वेगळी क्षेत्रं निवडली आहेत. पालक म्हणून आम्ही फार मोठं काही मुलांना शिकवलं आहे, असं मी आणि सुमित दोघांनाही वाटत नाही. खरं तर पालकत्वाच्या बाबतीत मी स्वतःला फार भाग्यवान समजते. कारण मी घरी थांबण्याचा निर्णय घेतला आणि घरच्यांनी त्याचा आदर केला. आमच्या जगण्याबाबतच्या फार मोठ्या मागण्या नव्हत्या. मोठं घर, मोठी गाडी पाहिजे, असं काही नसल्यामुळे मुलं वाढत असताना मी बऱ्यापैकी मुलांबरोबर राहिले. ती मुलांपेक्षा माझी जास्त गरज होती. पालक म्हणून मी आज माझ्या क्षेत्रात बघते, छोट्या छोट्या मुलांना आई कामावर घेऊन येते. त्यामुळे सेटवरचं वातावरण बदलतं आणि मुलांचीसुद्धा पूर्ण काळजी घेतली जाते, असंही नाही. म्हणूनच मुलं लहान असताना मी काम नाही करायचं हा निर्णय घेतला होता आणि काम करायची वेळ येईल, तेव्हा शंभर टक्के काम करायचं, असं ठरवलं होतं. या दोन गोष्टी मला साधता आल्या- कारण माझी तशा पद्धतीची सपोर्ट सिस्टीम होती. त्यावेळी सुमित खूप जास्त काम करत होता. जे येईल ते काम तो घेत होता. त्यामुळे माझ्या निर्णयाला सुमितचा पाठिंबा नसता, तर ते शक्य नव्हतं. आता मी त्याला सांगितलंय, की तुला जे आवडतं तेच तू कर. काही वर्षं टीव्ही मालिका नाही केल्यास तरी चालेल.  

मुलं वाढताना बघणं ही माझी मागणी होती. त्यामुळे मुलांबरोबर राहणं ही माझ्यासाठी लक्झरी होती. मी घरात होते, तेव्हा कोणीही ‘काय घरात बसली आहेस?,’ असं मला म्हणत नव्हतं. मी काम करायला लागले, तेव्हा आई आणि सासूबाई मुलांकडे बघू लागल्या. त्या दोघींचं इतकं छान नियोजन असायचं, की विचारता सोय नाही. आई वेगवेगळे खेळ, कोडी असं बरंच काही मुलांसाठी शोधून काढायची, तर सुगरण सासूबाई मुलांसाठी निरनिराळे पदार्थ करायच्या. त्या दोघींची उत्तम मैत्री आहे. त्यामुळे त्यांच्यातल्या नात्याचाही संस्कार मुलांवर झाला.

कुटुंब म्हणून आम्ही चौघं एकमेकांशी खूपच जोडलेले आहोत. आम्हाला एकमेकांशिवाय करमतच नाही. मी बाहेर गेल्यावर पोचल्याचं सांगायला विसरले, तर मुलं मला मेसेज टाकून विचारतात. दोन्ही मुलांबरोबर चित्रपट बघणं खूप आनंददायक असतं. कारण दोघंही अत्यंत रसिक आहेत. ती वेगळ्या दृष्टिकोनातून चित्रपट बघतात. ते खूप सुखद असतं. वर्षातून दोनदा आम्ही एकत्र सहलीला जातो. दिया पुण्याला आहे तर मध्येच तिच्याकडे राहायला जातो किंवा ती तिच्या मित्र-मैत्रिणींना मुंबईत घेऊन येते. केवळ आम्ही चौघंच नाही, तर इतर चुलत, मावस भाऊ-बहिणीदेखील एकमेकांशी खूप कनेक्टेड आहेत. आजी- आजोबांशी मुलांचे रोज फोन असतात.

मुलं लहान होती, तेव्हा दोघांचे मैदानी खेळ सुरू असायचे. निरद व्हॉलीबॉल खेळायचा, तर दिया मल्लखांब खेळायची. त्यामुळे मोबाईलशी फार संबंध यायचा नाही. निरदला काही गेम आवडायचे; पण ते तो सुटीच्या दिवशी खेळायचा. त्यामुळे मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी मला प्रकर्षानं काही करावं लागलं नाही. आता मात्र मी सांगते- जेवणाच्या टेबलवर कोणीही मोबाईल आणायचा नाही. म्हणजे मी आणि सुमितनंही नाही. नेटफ्लिक्सवरच्या चांगल्याच मालिका ते बघतात. त्यांना योग्य-अयोग्यची उत्तम समज आहे. त्यामुळे काय आणि किती वापराययचं हे त्यांना ठाऊक आहे. मुलांना फार नियम घातले, तर ते मोडावेसे वाटतात. असेच नियम करावेत- जे घरातल्या सर्वांनी पाळले पाहिजेत. म्हणजे त्यात फार वेगळं मुलांना वाटत नाही.

माझी मराठी भाषाप्रेमी पालक महासंघटनेची सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मी सध्या मराठी शाळांचं काम करते. तिथं एका शाळेत मी पाहिलं, की त्यांनी एका वर्षी पालक ही संकल्पना ठेऊन कॕलेंडर तयार केलं होतं. त्यात त्यांनी म्हटलं होतं, की गावातली नदी, डोंगर, झाडं हेसुद्धा तुमचे पालकच असतात. हे अगदी खरं आहे. पालक म्हणजे काय असा विचार करताना मला नेहमीच आठवणारा खलिल जिब्रान पुन्हा इथंही आठवतो. तो म्हणतो, की ‘युअर चिल्ड्रन आर नॉट युअर चिल्ड्रन, दे आर नॉट सन्स अॕण्ड डॉटर्स अॕफ यू, दे आर नेचर्स मॕनिफॕस्टेशन.’ ती निसर्गाची मुलं आहेत, त्यामुळे ती काही काळ तुमच्या सहवासात आहेत. जो काळ ती आपल्याबरोबर आहेत, तो काळ आपण सगळे जण आनंदानं घालवू या.
(शब्दांकन : मोना भावसार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com