वादळ का घोंघावतंय? (डॉ. श्रीकांत कार्लेकर)

dr shrikant karlekar
dr shrikant karlekar

गेल्या पाच वर्षांत हिंदी महासागराच्या उत्तरेकडील भागात असलेल्या अरबी समुद्रातील व बंगालच्या उपसागरातील उष्ण कटीबंधीय वादळांच्या संख्येत ३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या दहा वर्षांत वादळांच्या संख्येतील ही वाढ त्यापूर्वीच्या दशकातील वादळापेक्षा ११ टक्क्यांनी जास्त आहे. या वर्षीची वादळं अनेक दृष्टींनी वेगळी, अतिसंहारक व अतितीव्र तर होतीच; पण त्यांचं सगळं वर्तन भविष्यातील संकटांची चाहूल लागावी असंच होतं!

गेल्या पाच वर्षांत हिंदी महासागराच्या उत्तरेकडील भागात असलेल्या अरबी समुद्रातील व बंगालच्या उपसागरातील उष्ण कटिबंधीय वादळांच्या संख्येत ३२ टक्क्यांनी वाढ झाल्याचं भारतीय हवामान खात्याकडून उपलब्ध होणाऱ्या सांख्यिकीतून (डेटा) स्पष्ट झालं आहे. गेल्या दहा वर्षांत वादळांच्या संख्येतील वाढ त्यापूर्वीच्या दशकातील वादळापेक्षा ११ टक्क्यांनी जास्त आहे. या वर्षी नोव्हेंबरपर्यंतच हिंदी महासागराच्या या भागात २३ वादळं निर्माण झाली. सन २०१९ मध्ये नऊ वादळांची निर्मिती झाली. सन १९८५ नंतर इतक्या मोठ्या संख्येनं वादळं निर्माण झाली नव्हती. यातल्या सात वादळांची तीव्रता वाढून त्यांची संहारक वादळं बनली तीही याच काळात.

या वर्षी जानेवारीमध्ये अंदमानच्या समुद्रावर पबुक (Pabuk) हे पहिलं वादळ तयार झालं. त्यानंतर अतिसंहारक व अतितीव्र असं
‘फणी’ वादळ एप्रिलच्या अखेरीस व मेच्या सुरवातीला बंगालच्या उपसागरात तयार झालं आणि त्यानं ओडिशाच्या किनाऱ्याला मोठाच तडाखा बसला. सन १९६५ नंतर मॉन्सूनपूर्व काळात ओडिशाचा किनारा ओलांडणारं हे विध्वंसक वादळ. याच्या तडाख्यातून अजूनही ओडिशाच्या किनारपट्टीवरचं जनजीवन सावरलेलं नाही. या वर्षी ता. १० जून ते १७ जून या काळात अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या अतितीव्र, आवर्ती, लघुभार प्रदेशाच्या ‘वायू’ नावाच्या वादळामुळे मॉन्सून आठ दिवस उशिरा सुरू झाला. महाराष्ट्रात तो ता. २४ जूनला म्हणजे त्याच्या निर्धारित वेळेनंतर १४ दिवसांनी दाखल झाला. पुढच्या काही महिन्यांत ‘क्यार’ आणि ‘महा’ अशी आणखी दोन वादळं अरबी समुद्रावर तयार झाली. त्यामुळे पश्चिम किनाऱ्यावर मुसळधार अतिवृष्टी झाली. याच महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरावर ‘बुलबुल’ या वादळाची निर्मिती झाली. या वादळानं गंगेचा दक्षिण त्रिभुज प्रदेश आणि सुंदरबन या भागांना अक्षरशः झोडपून काढलं!

सन १९८० ते २०१० या ३० वर्षांत भारताच्या किनाऱ्यावर दरवर्षी सरासरी तीन वादळं निर्माण झाली; पण सन २०१०-२०१९ या काळातच दरवर्षी चार या प्रमाणात वादळं तयार झाली. वादळांच्या संख्येतील ही वाढ मुख्यतः जमीन आणि पाणी यांच्या तापमानात हवामानबदलामुळे जी वाढ झाली तिचाच परिणाम असावा असं हवामानशास्त्रज्ञांचं मत आहे. इतक्या मोठ्या संख्येनं तीव्र वादळाची निर्मिती झाल्यामुळे सन २०१९ च्या उत्तर हिंदी महासागरातील वादळऋतूला (सायक्लोन सीझन) ‘या प्रदेशाच्या इतिहासातला आजपर्यंतचा सगळ्यात जास्त वादळी कालखंड’ म्हणून दर्जा देण्यात आला आहे. सातपैकी सहा वादळं अतितीव्र स्वरूपाची होती, तर ‘क्यार’ हे ‘महावादळ’ (सुपर सायक्लोन) होतं.

उत्तर हिंदी महासागरातील ही उष्ण कटीबंधीय वादळं (ट्रॉपिकल सायक्लोन्स) सामान्यतः एप्रिल ते सप्टेंबर या काळात तयार होतात. जगाच्या या भागातील वादळनिर्मितीला नेमक्या कालसीमा (टाइम बाउंड्स) नसल्या तरी आजपर्यंत आढळलेल्या वादळनिर्मितीतील प्रवृत्ती (ट्रेंड्स) अशाच आहेत.
उत्तर हिंदी महासागरातील उष्ण कटिबंधीय वादळातील वाऱ्यांचा वेग जेव्हा ताशी ६५ किलोमीटरपेक्षा जास्त होतो तेव्हा त्या वादळांचं नामकरण केलं जातं. या वादळांना कोणती नावं द्यावीत ते सन २००० ते मे २००४ या काळात WMO/ESCAP च्या (वर्ल्ड मिटिओरॉलॉजिकल ऑर्गनायझेशन/इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर एशिया अँड द पॅसिफिक) पॅनलवरील सभासद सुचवत असत. मात्र, सप्टेंबर २००४ नंतर नवी दिल्लीतील प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राकडून ही नावं देण्यात येऊ लागली. ‘पबुक’ हे जपानच्या हवामान अनुसंधानाकडून दिलेलं नाव वगळता बाकी सर्व वादळांची नावं या केंद्रानं दिली आहेत.

या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या काळात बंगालचा उपसागर व हिंदी महासागर या भागात वास्तविक पाहता नऊ वादळं तयार झाली; पण त्यापैकी दोन वादळं (‘बॉब ३’ व ‘लँड १’ ) म्हणजे
कमी तीव्रतेचे, कमी भाराचे भोवरे (डिप्रेशन आणि डीप डिप्रेशन) होते. इतर सात मात्र मोठी वादळं होती. सन १८९१ पासूनच उत्तर हिंदी महासागरात अशा वादळांची नोंद होत असली तरी या वर्षी इतक्या मोठ्या संख्येनं झालेल्या तीव्र वादळांची निर्मिती ही अनपेक्षितच होती. शिवाय, त्यातील वाऱ्यांचा वेग, त्यांचे प्रवासमार्ग (ट्रॅजेक्टरी), निर्मितिस्थान, विस्तार आणि त्यांच्यामुळे किनाऱ्यांवर झालेले परिणाम याबाबतीत ही वादळं सर्वथैव भिन्न होती. एप्रिल ते सप्टेंबर हा या प्रदेशात वादळं निर्माण होण्याचा ‘आदर्श काळ’; पण यावर्षी जुलैमध्ये एकही वादळ तयार झालं नाही. उष्ण कटिबंधीय वादळांशी निगडित अशा वादळी वारे, भरपूर पाऊस आणि महाऊर्मी (सर्ज) या नेहमीच्या घटनांची तीव्रताही या वर्षीच्या वादळांत वाढलेली आढळून आली. त्यांनी ताशी ६० ते २२० किलोमीटर वेगानं भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर आक्रमण केलं. मॉन्सूनच्या मार्गक्रमणांत अशी लघुभार आवर्ती वादळं गेल्या काही वर्षांपासून अडथळे आणत असल्याचं याआधीच लक्षात आलं आहे.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही वादळं भविष्यात भारताच्या दोन्ही किनाऱ्यांवर येऊ शकणाऱ्या संकटांची पूर्वसूचक होती! पुढं दिलेल्या त्यांच्या संक्षिप्त माहितीवरूनही याची कल्पना सहजपणे येऊ शकेल.

पबुक : ता. एक जानेवारी २०१९ रोजी दक्षिण चिनी समुद्रावर (साऊथ चायना सी) तयार झालेल्या पबुक या वादळानं हळूहळू थायलंडच्या उपसागरात प्रवेश केला. ता. चार जानेवारीला ते दक्षिण थायलंडच्या किनाऱ्यावर आलं आणि तिथून ते अंदमान समुद्रात पोचलं. पुढचे दोन दिवस हे वादळ पश्चिमेकडे आणि वायव्येकडे सरकलं. ता. सात जानेवारीला ते कमी भार प्रदेशाच्या रचनेत दुर्बळ होऊन एका आवर्तात रूपांतरित झालं. त्यानंतर ईशान्येकडे सरकून ते आठ जानेवारीला नष्ट झालं.

फणी : ता. २५ एप्रिल २०१९ ला हिंदी महासागरात सुमात्रानजीक विषुववृत्ताजवळ तयार झालेलं आणि ता. तीन मे रोजी ओडिशा राज्यातील पुरीच्या किनाऱ्यावर प्रचंड ताकदीनं हल्ला करणारं फणी हे एक अतितीव्र आणि विध्वंसक उष्ण कटिबंधीय वादळ होतं. ता. २५ एप्रिल रोजी उत्तर हिंदी महासागरात समुद्रावरच्या वातावरणात सुमात्राच्या वायव्य टोकाजवळ खूप उंचीवर एक चक्रवात निर्माण झाला होता. तो तीव्र होत वायव्येच्या दिशेनं सरकत, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमच्या आग्नेयेला २३० किलोमीटर अंतरावर स्थिरावला आणि नंतर उत्तरेकडे सरकून तीन मे रोजी सकाळी आठ वाजता ओडिशाच्या किनाऱ्यावर थडकला. मात्र, चार आणि पाच मेपर्यंत हा चक्रवात म्हणजे फणी वादळ पश्चिम बंगाल आणि बांगलादेशात जाऊन दुर्बळ होऊन नष्ट झाला! या वादळानं ओडिशातील गंजम, गजपती, खुर्दा, पुरी, जगतसिंगपूर, केंद्रपाडा, भद्रक, जजपूर आणि बालासोर अशा विस्तृत भागांत प्रचंड विध्वंस केला. या वादळात ३० जणांचा बळी गेला. एकूण १० हजार गावं आणि ५२ शहरी भागांचं मोठं नुकसान झालं. ५५३ हेक्टर जमिनीची हानी झाली.

अनेक दृष्टींनी फणी हे वादळ वैशिष्ट्यपूर्ण होतं. बंगालच्या उपसागरावरील आवर्ती वादळांचं आयुष्यमान केवळ चार ते पाच दिवसच असतं. मात्र, फणी वादळ तब्बल दहा दिवस तयार होत होतं. या वादळाचा प्रवासमार्गही मोठा विलक्षण होता. विषुववृत्ताजवळ २५ एप्रिलच्या दरम्यान तयार होऊ लागलेलं हे वादळ पश्चिमेकडे आणि नंतर उत्तरेकडे व वायव्येकडे सरकू लागलं होतं. सुरवातीला या आवर्ताचं रूपांतर तीव्र चक्रवातात होईल याची खात्री नव्हती. मात्र, ३० एप्रिलला त्याचं रूप पालटलं आणि ते अतितीव्र वादळ बनलं. हे वादळ दीर्घ काळ समुद्रावर तयार होत राहिल्यामुळे त्यात आर्द्रता (मॉइश्चर) व गतिजन्य ऊर्जा मोठ्या प्रमाणावर वाढत गेली. त्यामुळे त्यात ताशी २४० किलोमीटरपेक्षाही जास्त वेगाचे वारे वाहण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. हे वादळ तामिळनाडूच्या किनाऱ्यावर धडक मारेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं केला होता; पण निर्मितीनंतर वादळानं मार्ग बदलला आणि ते ओडिशाच्या दिशेनं जाऊ लागलं. तामिळनाडूलाच ते किनाऱ्यावर आलं असतं तर कमी अंतर पार करावं लागल्यामुळे ते इतकं विध्वंसक झालं नसतं. बंगालच्या उपसागरात निर्माण होणारी व भारताच्या पूर्व किनाऱ्याकडे सरकणारी वादळं सामान्यतः दुर्बल असतात. कारण, त्यांना मोठं अंतर तोडावं लागत नाही. मात्र, फणी वादळ सुमात्रानजीक निर्माण झाल्यामुळे त्यानं जवळजवळ १८०० किलोमीटरचा प्रवास केला व नंतरच ते पुरीच्या किनाऱ्यावर आलं. त्यामुळं ते जास्त विध्वंसक झालं. पुरीनंतरही चार मे रोजी संध्याकाळी बांगलादेशात जाईपर्यंत या वादळानं जमिनीवरही मोठं अंतर कापलं. हे त्याचं एक निराळं वैशिष्ट्य ठरलं. या वादळामुळे भरतीच्या लाटांच्या (स्टॉर्म सर्ज ) उंचीत १.५ मीटरनं वाढ झाली. तीन मे रोजी सात मीटर उंचीच्या लाटांमुळे १० किलोमीटर अंतरापर्यंत पाणी किनाऱ्यावर आत घुसलं होतं!

वायू : ता. ९ जून २०१९ रोजी अरबी समुद्रात आग्नेय बाजूला, मालदीव बेटांच्या उत्तरेला कमी दाबाचा पट्टा तयार झाला. तो ता. १० जूनला मालदीवच्या वायव्येला सरकला आणि ११ तारखेला त्याचं अतितीव्र आवर्ती वादळात रूपांतर झालं व त्याचं ‘वायू’ असं नामकरण करण्यात आलं. ता. १३ जूनला ते गुजरातच्या दिशेनं झेपावलं. त्याच दिवशी संध्याकाळी ते आणखीच तीव्र झालं. ताशी १५० किलोमीटरपेक्षा जास्त वेगानं वारे वाहू लागले. वायुभार ९७० हेक्टापास्कल इतका कमी झाला. ता. १४ जूनला ते दुर्बळ होऊ लागलं व गुजरात किनाऱ्यापासून दूर पश्चिमेकडे सरकलं आणि नाहीसं झालं.

हिक्का : ता. २२ ते २५ सप्टेंबर या काळात अरबी समुद्रात तयार झालेल्या या वादळातील वाऱ्याचा वेग ताशी १४० किलोमीटर म्हणजे अतितीव्र वादळी आवर्तातील वाऱ्यांच्या वेगाइतका होता. ९७८
हेक्टापास्कल वायुभार असलेल्या या वादळात आजूबाजूच्या कोरड्या हवेनं जोरदार घुसखोरी केल्यामुळे ते ओमानच्या किनाऱ्याकडे जात दुर्बल होत गेलं.

क्यार: ‘क्यार’ नावाच्या अरबी समुद्रावर तयार झालेल्या मॉन्सूनोत्तर वादळानं कोकण किनाऱ्यावर ता. २५ आणि २६ ऑक्टोबर २०१९ या दोन दिवशी नुसता हैदोस घातला. त्याची तीव्रता आणि वेग पाहता असं लक्षांत आलं की त्यानं किनारपट्टी ओलांडून खूप आतपर्यंत मुसंडी मारली असती तर मोठं नुकसान झालं असतं. या वादळानं दिशा बदलल्यामुळे आणि ते पश्चिमेकडे व वायव्येकडे सरकल्यामुळे मोठा धोका टळला. मॉन्सूनोत्तर काळातलं हे या वर्षीचं पहिलंच वादळ होतं. ‘क्यार’ वादळामुळे २४ तासांत २०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनाऱ्यावर पडला होता. हे वादळ शुक्रवारी ता. २५ ऑक्टोबरला रत्नागिरीच्या पश्चिमेला १९० किलोमीटरवर आणि मुंबईच्या नैर्ऋत्येला ३३० किलोमीटरवर स्थिरावलं आणि नंतर पश्चिमेकडे ओमान, येमेन व सोमालियाच्या दिशेनं सरकून एक नोव्हेंबरला नष्ट झालं.

महा : ता. ३० ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर या काळातल्या या वादळानं ताशी १८५ किलोमीटर वेगानं केरळच्या किनाऱ्यावर मोठाच हैदोस घातला.

बुलबुल : बंगालच्या उपसागरात दक्षिण भागात अंदमानच्या समुद्रात तयार झालेलं ताशी १४५ किलोमीटर वेगानं पुढं जाणारं हे वादळ पश्चिम बंगाल आणि बांगलादेश यांच्या किनाऱ्यांसाठी संहारक अशी मोठी आपत्ती ठरलं. यामुळे या किनाऱ्यांवर मुसळधार पाऊस झाला आणि समुद्रात प्रचंड मोठ्या लाटांची निर्मिती झाली!

भारताच्या पूर्व किनाऱ्याला सामान्यपणे मॉन्सूनोत्तर काळांत ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये चक्रवात (सायक्लॉन) अनुभवाला येतात. सन १९६५ ते २०१७ या काळात अतिविध्वंसक अशी ३९ वादळं होऊन गेली. या काळांतल्या एकूण ५२ पैकी ६० टक्के म्हणजे २३ वादळं ही ऑक्टोबर-नोव्हेंबरमधली होती. तीव्र वादळात वाऱ्याचा वेग ताशी ४८ ते ६३ नॉट्स इतका असतो (एक नॉट वेग म्हणजे ताशी १.८ किलोमीटर). अतितीव्र वेग म्हणजे ९० ते ११६ नॉट्स आणि विध्वंसक वेग म्हणजे १२० नॉट्स किंवा त्यापेक्षा जास्त.

सामान्यतः बंगालच्या उपसागरात मे महिन्यात चक्रवात अभावानंच निर्माण होतात. अनेक प्रकारे वेगळेपणा असलेल्या या वर्षीच्या या वादळांनी जागतिक तापमानवृद्धी आणि हवामानबदल या गोष्टींवर आता शिक्कामोर्तबच केलं आहे असं म्हणायला हरकत नाही. मे महिन्यांत भारताच्या पूर्व किनाऱ्यावर थडकणारं गेल्या ५२ वर्षातलं ‘फणी’ हे दहावं वादळ होतं. त्याआधी मे २००४ मध्ये आणि त्याहीआधी सन १९६८, १९७६, १९८२, १९९७, १९९९ आणि २००१ च्या मेमध्ये अशी वादळं आली होती.

भारतातील या वादळांचं अतिभव्य व भयावह रूप आणि त्यांची जलद वाढ उपग्रहप्रतिमांतून लक्षात येतच होती. प्रबळ अभिसरणप्रवाह, भरपूर क्युम्युलोनिम्बस ढग आणि विशाल रुंदीचा आवर्तडोळा (आय ऑफ सायक्लोन) अशा जोराच्या या वादळांचं रूपांतर झपाट्यानं विध्वंसक आवर्तात झालं आणि दोन्ही किनाऱ्यांना अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलन अशा संकटांना सामोरं जावं लागलं. वादळाच्या प्रभावामुळे वीजसेवा आणि दळणवळणसेवा ठप्प झाली आणि अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली.

अशा वादळांना टिकून राहण्यासाठी भरपूर ऊबदार बाष्प आवश्यक असतं. तीच त्यांची मुख्य ऊर्जा असते. अशी वादळं हा मुख्यतः
उष्णकटिबंधीय आवर्ताचा प्रकार आहे. कर्क आणि मकरवृत्ताच्या दरम्यान अशी आवर्ते म्हणजे लघुभार प्रदेशांची बंदिस्त प्रणाली असते. ६५० किलोमीटर इतक्या विस्तृत व्यासाची ही आवर्ते म्हणजे उत्तर व दक्षिण गोलार्धात वाहणाऱ्या वाऱ्यांचे प्रचंड भोवरेच असतात. ही वादळं पृथ्वीवरची सर्वात प्रबळ व विध्वंसक वादळं म्हणून ओळखली जातात. काही विशिष्ट गुणधर्मामुळेच ही वादळं एवढी विध्वंसक बनतात. त्यातल्या वाऱ्याचा वेग ताशी १८० ते ४०० किलोमीटर असतो. या वादळांबरोबरच भरतीच्या महाकाय लाटा तयार होतात आणि भरपूर पाऊसही पडतो. यातील अतिशय कमी वायुभारामुळे समुद्राची पातळी उंचावते. आकार, विस्तार, वाऱ्याचा वेग, पर्जन्यमान आणि टिकून राहण्याचा कालखंड या सर्वच बाबतीत या वादळात भरपूर विविधता आढळून येते. यांचा सरासरी वेग ताशी १८० किलोमीटर तरी असतोच. समुद्रावर त्यांचा वेग व तीव्रता नेहमीच जास्त असते. मात्र, किनारा ओलांडून जमिनीच्या दिशेनं येताना ही वादळं दुर्बळ व क्षीण होतात. किनारी प्रदेशात ती नेहमीच संहारक ठरतात. यांचा केंद्रबिंदू हा अतिशय कमी वायुभाराचा प्रदेश असतो.
वातावरणात उष्ण व आर्द्र हवेचा पुरेसा व सततचा पुरवठा हे त्यांच्या निर्मितीमागचं मुख्य कारण आहे. जिथं ६० ते ७० मीटर खोलीपर्यंत २७ अंश सेल्शिअस एवढं तापमान असतं अशा उष्णकटिबंधीय, ऊबदार समुद्रपृष्ठावर त्यांचा जन्म होतो. समुद्रपृष्ठाच्या वर नऊ हजार ते १५ हजार मीटर उंचीवर प्रत्यावर्ती अभिसरण असलं तर अशी
चक्रीवादळं तयार होण्याची प्रक्रिया सुलभ होते.

या वादळांच्या रचनेत काही महत्त्वाचे वर्तुळाकृती पट्टे आढळतात. मध्यभागी मंद वाऱ्यांचा, उच्च तापमानाचा, लघुत्तम वायुभाराचा प्रदेश असतो. याला ‘आवर्ताचा डोळा’ असं म्हटलं जातं. याच्याभोवती पर्जन्यमेघांचा १० ते २० किलोमीटर रुंदीचा पट्टा असतो. जोराचे वारे, तीव्र ऊर्ध्वगामी हवा आणि भरपूर पाऊस असं यांचं स्वरूप असतं. यांच्याबाहेर क्रमशः कमी होत जाणारं ढगांचं प्रमाण, क्षीण ऊर्ध्वगामी हालचाल, अत्यल्प पर्जन्य अशी परिस्थिती असते.

अशा महाविध्वंसक वादळांची भरपूर माहिती वादळादरम्यान सतत मिळत असते. पूर्वी आग्नेय आशिया व आशियातील इतर देशांत अशा वादळांच्या पूर्वसूचनेची यंत्रणा परिणामकारक नसल्यामुळे अशा वादळांपासून मोठं नुकसान होत असे. आता ही परिस्थिती बदलली असून भारतातही या आपत्तीचं नेमकं अनुमान केलं जाऊ लागलं आहे. या वादळांची पूर्वसूचना देण्याऱ्या सक्षम भारतीय यंत्रणेचा अनुभव यापूर्वी ता. १० ऑक्टोबर २०१४ ला आंध्र व ओडिशाच्या किनाऱ्यावर प्रचंड ताकदीनं हल्ला करणाऱ्या हुदहूद वादळाच्या वेळी आणि ता. २५ एप्रिल २०१९ ला हिंदी महासागरात सुमात्रानजीक विषुववृत्ताजवळ तयार झालेल्या आणि ३ मे रोजी ओडिशा राज्यातील पुरीच्या किनाऱ्यावर प्रचंड ताकदीनं हल्ला करणाऱ्या फणी वादळाच्या वेळी आपण घेतला आहेच.

भारतात मॉन्सूनोत्तर (पोस्ट-मॉन्सून) वादळं नेहमीच हजेरी लावत असली तरी गेल्या काही वर्षांपासून ती अधिक विध्वंसक आणि बेभरवशाची होऊ लागली आहेत हे या वर्षीच्या ‘फणी’ आणि ‘क्यार’ या वादळांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे असं म्हणायला हरकत नाही! या वर्षीची भारतातील, अरबी समुद्रातील व बंगालच्या उपसागरातील, मॉन्सूनपूर्व आणि मॉन्सूनोत्तर उष्णकटिबंधीय वादळं अनेक दृष्टींनी वेगळी, अतिसंहारक व अतितीव्र तर होतीच; पण त्यांचं सगळं वर्तन भविष्यातील संकटांची चाहूल लागावी असंच होतं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही!

उष्ण कटिबंधीय वादळे

प्रकार
वा-याचा वेग वा-याचा वेग

( किमी / तास ) (नॉट्स )

लघुभार (Low Pressure) <३१ <१७

आवर्त (Depression) ३१ - ४९ १७ - २७

तीव्र आवर्त (Deep Depression) ५० - ६१ २८ - ३३

आवर्ती वादळ (Cyclonic Storm) ६२ - ८८ ३४ - ४७

अतितीव्र आवर्त (Severe Cyclonic Storm) ८९ - ११८ ४८ - ६३

अत्युच्च तीव्रतेचे वादळ (Very Severe Cyclonic Storm) ११९ - २२१ ६४ - ११९

महावादळ (Super Cyclonic Storm) >२२१ >११९


उत्तर हिंदी महासागरातील वादळे

वादळाचे नांव कालखंड प्रकार वा-याचा वेग वायुभार बाधित प्रदेश

( वर्ष २०१९) (किमी / तास ) ( हेक्टापास्कल)

पबूक ४ ते ७ जानेवारी आवर्त ८५ ९९८ थायलँड, म्यानमार,अंदमान

फणी २६ एप्रिल ते ४ मे अतितीव्र आवर्त २१५ ९३२ सुमात्रा, निकोबार, श्रीलंका, पूर्व भारत

वायू १० ते १७ जून तीव्र आवर्त १५० ९७० मालदीव, पश्चिम भारत, ओमान

बॉब ३ ६ ते ११ ऑगस्ट तीव्र लघुभार ५५ ९८८ पूर्व भारत, बांगलादेश

हिक्का २२ ते २५ सप्टेंबर अतितीव्र आवर्त १४० ९७८ पश्चिम भारत, ओमान

लँड १ ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर लघुभार ४५ अनिश्चित पश्चिम भारत

क्यार २४ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर अत्युच्च तीव्रतेचे वादळ २५० ९१५ पश्चिम भारत, येमेन

महा ३० ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर अतितीव्र आवर्त १८५ ९५६ श्रीलंका, दक्षिण व पश्चिम भारत, मालदीव

बुलबुल ६ ते ११ नोव्हेंबर तीव्र आवर्त १४५ ९८० अंदमान , निकोबार, पूर्व भारत , बांगलादेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com