...तरीही मुंबई खंबीर आहे! (दीपा कदम)

दीपा कदम deepakadam३@gmail.com
रविवार, 7 जून 2020

सध्या कोरोनाशी लढत असलेली मुंबई खूप सोशीक आहे. आजवर तिनं काय काय आणि किती किती सोसलं आहे याची गणतीच नाही. मानवनिर्मित, निसर्गनिर्मित अशी असंख्य संकटं ती ठरावीक कालावधीनंतर सोसत आली आहे.

सध्या कोरोनाशी लढत असलेली मुंबई खूप सोशीक आहे. आजवर तिनं काय काय आणि किती किती सोसलं आहे याची गणतीच नाही. मानवनिर्मित, निसर्गनिर्मित अशी असंख्य संकटं ती ठरावीक कालावधीनंतर सोसत आली आहे. सोशीक असण्याबरोबरच तिचा आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे, ती खंबीर आहे...खूप खंबीर आहे. ती तशी असल्यामुळेच प्रत्येक संकटाचा धीरानं सामना करत ती पुनःपुन्हा उभी राहते आणि जोमानं जगू लागते...

‘गेल्या शंभर वर्षांत असं कधीच घडलं नाही…’ असं म्हणण्याची वेळ मुंबईकरांवर अधूनमधून येतेच. गेल्या २५ वर्षांत तर मुंबईकरांचा जीव अनेकदा टांगणीला लागण्याची वेळ आली होती. मुंबईवरची संकटं ही अशी शतकोत्तर असतात. मात्र, प्रलयंकारी प्रसंगांचा सामना केल्यानंतर हे शहर कधी मागं हटलेलं नाही, तर नव्या उमेदीनं बहरलेलं आहे. या शहरावर आलेल्या आपत्तींनंतरच खरं तर या शहराच्या गरजांकडे, आवश्यकतांकडे पाहिलं गेलं आहे.

मुंबईसारखं नैसर्गिक बंदर असलेलं आंतरराष्ट्रीय शहर गेल्या अनेक शतकांत आकाराला येत असताना, इतिहासात या शहरावर कोसळलेली संकटं बाजूला सारून, या शहराचा विचार करता येत नाही. मुंबईतल्या पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा, एवढंच नव्हे तर, या शहरातलं सामाजिक वर्तनही निश्चित करण्यात या संकटांचा मोठा वाटा आहे. ठेच लागल्यानंतरच शहाणपण आल्याच्या काही ठळक घटना या शहराच्या इतिहासात आहेत. यातल्या काही घटनांनी मुंबई घडवली, समृद्ध केली, तर काही प्रसंगांमुळे ती निष्ठुरही झाली.
 
‘ये बंबई शहर हादसों का शहर है…’ या गाण्याची प्रचीती मुंबईबाबत अनेकदा खरी ठरते. संकटं जणू या शहराच्या पाचवीलाच पूजलेली असावीत. बरं, संकटं येतात तर ती काही लहानसहान नव्हेत, तर ‘गेल्या शंभर वर्षांत असं कधीच घडलं नव्हतं,’ असे दाखले देता येऊ शकतात अशी ही संकटं असतात. त्यांपैकी काही संकटं नैसर्गिक, तर काही मानवनिर्मित असतात. दोन्ही प्रकारच्या आपत्तींमध्ये मनुष्यहानी मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे या घटनांची नोंद घ्यावी लागतेच. त्याशिवाय शहराला शहाणं करणारी वळणं आहेत आणि काही गढूळही वळणं आहेत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला आलेली प्लेगची भयंकर साथ असो की मुंबईच्या गोदीतला भयंकर स्फोट असो वा सन १९९३ मधली जातीय दंगल आणि त्यानंतर शहराला हादरवणारे बॉम्बस्फोट असोत अथवा ता. २६ जुलै २००५ चा महाप्रलय किंवा २६/११ चा दहशतवादी हल्ला असो...या घटनांनी शहराला केलेली खोल जखम कधी तरी भरून निघेल?
सध्या कोरोना, म्हणजेच, कोविड-१९ च्या दहशतीनं हे शहर हबकलेलं असताना या शहरावर येऊन गेलेल्या अशाच प्रकारच्या संकटांचा घेतलेला हा आढावा...

प्लेग  (सन १८९६)

‘कोविड-१९’चं संकट संपूर्ण जगावर घोंघावत असलं तरी देशात त्याची सर्वाधिक तीव्रता ही मुंबई शहरातच आहे. या शहरातल्या उंचच्या उंच टॉवरमधून उतरून दाटीवाटीनं वसलेल्या चाळींमध्ये आणि झोपडपट्ट्यांमध्ये कोविड हात-पाय पसरू लागल्यापासून सन १८९६ मध्ये मुंबईत येऊन गेलेल्या प्लेगच्या साथीचे दाखले दिले जाऊ लागले आहेत. इतकंच नव्हे तर, तत्कालीन ब्रिटिश सरकारनं प्लेगच्या अटकावासाठी तयार केलेल्या ‘बॉम्बे एपिडेमिक अॅक्ट, १८९७’ चा आधार आज कोरोनाच्या साथीला अटकाव करण्यासाठी घ्यावा लागतो आहे. प्लेगच्या लशीचा शोध वाल्देमार मॉर्देकाई हाफकिन
यांनी याच मुंबईत लावला. पाच टप्प्यांत आलेल्या प्लेगच्या साथीनं मुंबईची लोकसंख्या निम्मी केली होती. प्लेगच्या साथीत दीड लाख मुंबईकरांचा मृत्यू झाला होता, तर आजच्याप्रमाणेच चार लाखांपेक्षा अधिक जणांनी मुंबई सोडून गावचा रस्ता धरला होता.
मुंबईत आज जे सार्वजनिक आणि धर्मादाय रुग्णालयांचं जाळं दिसतं ते याच प्लेगच्या साथीच्या काळात विणलं गेलं आहे. आपापल्या जातसमूहासाठीची विशेष रुग्णालयं प्लेगच्या काळात उभी राहिली आहेत. एकूण, ३२ रुग्णालयं त्या काळात मुंबईत होती. शहरात रुंद रस्ते, पिण्याचं पाणी, सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी भूमिगत व्यवस्था आणि चाळी बांधल्या जाऊ लागल्या. सन १८९८ मध्ये ‘बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट’ची (बीआयटी) स्थापना करण्यात आली. मरिन लाईन्ससारखे विस्तीर्ण रस्ते बांधले गेले. आजच्या मुंबईच्या गर्दीलादेखील हे रस्ते पुरे पडतात.

ब्रिटिशांसाठी मुंबई हे सुरतपेक्षा अधिक मोक्याचं बेट होतं. मात्र, मुंबई शहरात वारंवार येणाऱ्या कॉलऱ्याच्या आणि देवीसारख्या तापाच्या साथीनं या बेटावर काम करण्यास ब्रिटिश अधिकारी उत्सुक नसत. त्यामुळे मुंबईचं आरोग्य सुधारण्यासाठी ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले होते. सन १८६४ मध्ये अँड्र्यू लीथ या ब्रिटिश अधिकाऱ्यानं तत्कालीन मुंबई बेटावरच्या आरोग्यव्यवस्थेबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालाची अंमलबजावणी करण्यासाठी सन १८६५ मध्ये मुंबईत स्वतंत्र आरोग्यविभाग स्थापन करण्यात आला होता. मुंबई महापालिकेच्या अंतर्गत आजही हा आरोग्यविभाग येतो. प्लेगची साथ रोखण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी जॉन
अँड्र्यू टर्नर यांनीच साथजन्य रोगांबद्दलच्या कायद्याची अंमलबजावणी केली होती.
* * *    

मुंबईच्या गोदीतला स्फोट (सन १९४४)

‘मानवी चुकांच्या साखळीतून ओढवलेली आपत्ती,’ असं जिचं वर्णन केलं जातं त्या मुंबईच्या गोदीत लागलेल्या आगीत १३०० पेक्षा अधिक लोकांचा बळी गेला होता. किती जण अपंग आणि जखमी झाले होते याची गणतीच नाही. ‘फोर्ट स्टिकिन’ या मालवाहतूक जहाजाला लागलेल्या आगीनं झालेल्या स्फोटामुळे घडून आलेल्या भूकंपाची नोंद १७०० किलोमीटर दूर असलेल्या सिमला इथल्या भूकंपमापकावर झाली होती! स्फोटाच्या केंद्रस्थानापासून ९०० यार्डांपर्यंतचा परिसर पूर्णत: भस्मसात झाला होता. संपूर्ण व्हिक्टोरिया गोदी, शेजारची प्रिन्सेस गोदी, पश्चिमेला असलेली माल साठवण्याची गोदामं, उत्तरेला असलेलं बर्मा ऑईल इन्स्टॉलेशन, दक्षिणेला असलेला तांदळाचा बाजार या सर्व भागांत भीषण आगी लागल्या होत्या. पश्चिमेला असलेल्या गोदामांतून आग शेजारच्या नागरी वस्तीत पसरली होती.
गोदीवर वाहतुकीसाठी असलेला ३४ हजार ६३९ टन माल, तसंच ५५ हजार टन खाद्यान्न नष्ट झालं होतं. त्यामुळे महागाई आणि साठेबाजी मोठ्या प्रमाणात वाढली होती. सहा हजार संस्था-आस्थापनांमधल्या ५० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. तीन हजार लोक बेघर झाले होते, तर आग विझविताना अग्निशमन दलाचे ६६ जवान हुतात्मा झाले होते.
अस काय होतं या जहाजात? १३९५ टन घातक विस्फोटकं, प्रत्येकी १३ किलो वजनाच्या सोन्याच्या १२४ विटा, ८७०० कापसाच्या गासड्या (गठ्ठे), वंगणाच्या तेलाची पिंपं, लाकूड, टाकाऊ लोखंड, सल्फर, माशांचं खत, तांदळाचा, बेदाण्यांचा साठा जहाजावर लादलेला होता. हजारो डबे वंगणाचं तेल आणि कापसाच्या गासड्या घेऊन जाणं धोकादायक असल्याची कल्पना जहाजाच्या कप्तानानं देऊनही ‘युद्धकाळात हे सामान पोचवणं बंधनकारक आहे,’ असं त्याला सांगितलं गेलं होतं. जहाज बंदरात नांगरलं जाऊन २४ तासांपेक्षा अधिक काळ उलटून गेल्यानंतरही जहाजातली स्फोटकं आणि वंगणाचे डबे उतरवण्यात आले नव्हते. जहाजात माल भरण्यापासून उतरवण्यापर्यंत सुरू झालेल्या अक्षम्य चुकांची किंमत मुंबई बंदराला मोजावी लागली.
* * *

सन १९९३ ची दंगल आणि बॉम्बस्फोटांची श्रृंखला

अयोध्येतली बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेनंतर देशभर जातीय दंगली उसळल्या. मुंबईसारखं कॉस्मोपॉलिटन शहरही या दंगलीत होरपळलं होतं. दंगलीनंतर काही महिन्यांनी हे शहर भयंकर अशा बॉम्बस्फोटांच्या श्रृंखलेनं हादरलं. या घटनांमुळे शहराची सामाजिक आणि सांस्कृतिक सहिष्णुता दुभंगली गेली. ती नंतरच्या काळात कधीच सांधली गेली नाही. गेल्या २५ वर्षांच्या काळात ती दरी वाढतच गेल्याचं दिसतं.
मशीद बंदर भागात दोन माथाडी कामगारांच्या खुनानंतर मुंबईत अनेक ठिकाणी पडसाद उमटले. त्यात हिंदू व मुस्लिम समाजातल्या निरपराध्यांचे बळी गेले. दंगलीचा सूड घेण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम यानं टायगर मेमन, मोहंद डोसा आदींच्या साथीनं बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचला. फेब्रुवारी १९९३ मध्ये रायगड जिल्ह्यात दिघी व शेखाडी बंदरात एके ५६ बंदुका व आरडीएक्सचे साठे उतरवण्यात आले. त्यानंतर ता. १२ मार्च १९९३ रोजी मुंबईतला शेअर बाजार, एअर इंडिया इमारत, सेंच्युरी बाजार, प्लाझा सिनेमा, नायगाव, विमानतळ प्रवेशद्वार आदी ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. त्यात २५७ जण ठार झाले.
दंगलीनंतरच्या काळात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये पडलेलं अंतर कालांतरानं इतर समूहांमध्येदेखील पडलं. दक्षिण मुंबईत भेंडीबाजारमध्ये राहणाऱ्या मुस्लिमांनी मुंब्रा, मानखुर्द, गाठलं. ‘घेट्टो'त राहणं अधिक सुरक्षित वाटू लागलं. आता मराठीभाषक, गुजराती, ख्रिश्चन, शाकाहारी, मांसाहारी असेदेखील समूह तयार होऊ लागले आहेत.

* * *

ता. २६ जुलै २००५ रोजी मुंबईला आलेला पूर

मुंबई शहराला गेल्या शतकात ज्या मोठ्या नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला त्यात ता. २६ जुलै २००५ रोजी निर्माण झालेली पूरपरिस्थिती सर्वात मोठी होती. या महावृष्टीनं ‘महापूर’ हा शब्दही थिटा पडावा अशी परिस्थिती निर्माण केली होती. समुद्राला भरती असताना प्रचंड पाऊस पडल्यानंतर निचरा न झाल्यानं पाणी शहरात घुसलं होतं. परिणामी, मुंबईत प्रचंड पूरपरिस्थिती निर्माण झाली. उत्तर मुंबईत २४ तासांत ९३४ मिलिमीटर, म्हणजेच ३७ इंच, पाऊस पडला. त्यापैकी सर्वाधिक पाऊस पहिल्या दहा तासांतच पडला होता. शंभर वर्षांत असा पाऊस एका दिवसात पडला नव्हता. या पुरात तब्बल ९०० पेक्षा अधिक मुंबईकरांना जीव गमावावा लागला. शिवाय घरं, वाहनं, असंख्य जनावरं वाहून गेली. या प्रलयंकारी पुरानंतर मुंबई शहराचा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज निर्माण झाली. या शहरातून एक नदी वाहते याचा प्रशासनाला आणि सर्वसामान्यांना विसरच पडला होता! मिठी नदी दुधडी भरून वाहू लागली आणि वाट मिळेल तिथं घुसू लागल्यावर तिची दखल घेतली गेली.
मुंबईतल्या ता.२६ जुलै २००५ च्या पूरपरिस्थितीनंतर राज्य सरकारनं नेमलेल्या ‘डॉ. माधव चितळे समिती'च्या शिफारशींमध्ये ‘ब्रिमस्टोवॅड प्रकल्पा’वर भर देण्यात आला होता. पावसाचं पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या ब्रिटिशकालीन असून त्या फारच अरुंद असल्यानं चितळे समितीनं केलेल्या शिफारशींमध्ये प्रामुख्यानं नाले व नदीपात्रांचं रुंदीकरण, नाल्यांवरची अतिक्रमणं हटवणं अशी कामं हाती घेतली गेली. यांपैकी अनेक कामं अजूनही अर्धवट आहेत, अजूनही खारफुटींची तोड, नाल्यांवरची बांधकामं सुरूच आहेत.
* * *

ता. २६ नोव्हेंबर २००८ : मुंबईवरचा दहशतवादी हल्ला

विसाव्या शतकाचा उत्तरार्ध हा मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांमुळे कायम अस्वस्थेत गेला. त्यानंतरच्या काळात रेल्वेस्थानक, विमानतळांवरची सुरक्षा वाढवण्यात आली; पण बॉम्बस्फोटांच्या भयाचं सावट मात्र मुंबईकरांवर कायमच होतं. ता. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला हा या शहरात आतापर्यंत झालेल्या  कोणत्याही स्फोटांपेक्षा भीषण होता. पाकिस्तानातून समुद्रमार्गे येऊन मुंबईत घुसलेल्या दहा दहशतवाद्यांनी हा भीषण हल्ला केला होता. ता.२६ नोव्हेंबर ते ता. २८ नोव्हेंबर यांदरम्यान चाललेल्या या हल्ल्यात १९७ जण मृत्युमुखी पडले, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. मुंबईवर असाही हल्ला होऊ शकतो हा धक्का पचवणं मुंबईला अवघड होतं. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना मुंबई पोलिस दलातील ज्येष्ठ पोलिस अधिकारी आणि अनेक पोलिस हुतात्मा झाले. मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहराची सुरक्षा किती वाऱ्यावर होती हे हल्ल्यातून स्पष्ट झालं असलं तरी सुरक्षेविषयी काहीही शहाणपण कुणी शिकलं नसल्याचं दिसून आलं. मुंबईसह सर्व प्रंमुख शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं असावं, सागरी सुरक्षा वाढवावी, किनाऱ्यावर गस्त वाढवली जावी याचीदेखील पुरेशी खबरदारी घेतली जात नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang deepa kadam write corona virus and mumbai article