चार दिवसांची ‘कसोटी’ (दिलीप वेंगसरकर)

dilip vengsarkar
dilip vengsarkar

कसोटी क्रिकेट सामने चार दिवसांचेही करण्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. एकीकडं या संदर्भात सोशल मीडियावर चर्चा सुरू असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (आयसीसी) या संदर्भात विचार करत असल्याचंही सांगितलं जात आहे. वेगवेगळे क्रिकेटपटू या संदर्भात मतं व्यक्त करत आहेत. अशा प्रकारे कसोटी सामन्याचा फॉर्मॅट बदलल्यामुळं काय होईल, कशावर परिणाम होईल, खेळातली रंगत कमी होईल की वाढेल आदी गोष्टींबाबत चर्चा.

कोणत्याही क्षेत्रात जेव्हा बदल होतात, तेव्हा आधी चर्चा आणि मग हमखास टीका होते. केरी पॅकरनं ऑस्ट्रेलियात पांढरा चेंडू आणि रंगीत ड्रेसवर क्रिकेटचा डाव मांडला, तेव्हा ‘सर्कस’ म्हणून त्याची संभावना करण्यात आली. क्रिकेटच्या जन्मदात्या इंग्लंडनं तर ‘पायजमा क्रिकेट’ अशी हेटाळणी केली. याच इंग्लंडनं नंतर लॉर्डसवर प्रकाशझोतात अन् अर्थातच पांढऱ्या चेंडूवर आणि रंगीत कपड्यांवर क्रिकेटचा डाव मांडला, हे उल्लेखनीय.

चार दिवसांची कसोटी एक फलंदाज म्हणून मला पसंत पडणार नाही. कसोटी पदार्पणापूर्वी मुंबईत कसोटी खेळलेल्या इंग्लंड, वेस्ट इंडिजच्या संघातील सर्व खेळाडूंची नावं आजही मला तोंडपाठ आहेत. तेव्हा वन-डे क्रिकेट फार नव्हतं. त्यामुळं कसोटीचं आकर्षण, अपील विलक्षण होतं. वन-डे क्रिकेट सुरू झालं; पण कसोटी क्रिकेटप्रमाणं ते कुणी लक्षात ठेवत नाहीत. अलीकडं कसोटी क्रिकेटचीसुद्धा काहीशी अशीच अवस्था होतेय अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यातूनच चार दिवसांची कल्पना पुढं आली आहे. सुरूवातीला नमूद केल्याप्रमाणं, फलंदाज म्हणून माझा शंभर टक्के पाठिंबा नसला, तरी एक संघटक म्हणून मात्र माझं मत वेगळं असेल. निवृत्तीनंतर मी संघटनात्मक पातळीवर सक्रिय आहे. त्या भूमिकेतून मी याचं स्वागतच करीन.

कसोटी क्रिकेटला आलेली मरगळ चार दिवसांची कसोटी दूर करेल. त्यामुळं बदल होतील आणि ते पोषक ठरतील, असं वाटतं. चार दिवसांत कर्णधारांना आपल्या दृष्टिकोनात, डावपेचांमध्ये बरंच नावीन्य आणावं लागेल. त्यांना डाव घोषित करण्याचं टायमिंग साधण्याची कसरत करावी लागेल.
चार दिवसांच्या कसोटीमुळं निकालाच्या प्रमाणावर परिणाम होईल, असं बोललं जात आहे; पण आज बहुतांश कसोटी तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी संपत आहेत. चार दिवसांच्या कसोटीबाबत मला एकच मुद्दा थोडा विचार करण्यासारखा वाटतो. तो म्हणजे दिवसात ९६ षटकं टाकावी लागणार आहेत. इंग्लंडसारख्या रात्री आठ-नऊपर्यंत सूर्यप्रकाश असलेल्या देशात ते शक्य होईल; पण उपखंडात कोलकात्यासारख्या ठिकाणी संध्याकाळी साडेचार वाजताच अंधार पडायला सुरुवात होते. तिथं हे शक्य होईल का, याचा विचार करावा लागणार आहे.

निर्धारीत वेळेत षटकं पूर्ण करणं हे खेळासमोरचं आव्हान बनलं आहे. त्यासाठीही कर्णधारांना नियोजन करावं लागेल. एकूण काय तर, पूर्वी जे पाच दिवसांत करावं लागायचं, ते चार दिवसांत करून दाखवावं लागेल. याचाच अर्थ जास्त कस लागेल. केवळ उभय कर्णधारच नव्हे, तर या दोन्ही संघांतले मिळून इतर वीस खेळाडूंचा सुद्धा जास्त कस लागेल. चार दिवसांच्या कसोटीमुळे क्रिकेट आणखी कसदार बनेल, असं माझं ठाम मत आहे.

(लेखक भारताचे माजी क्रिकेट कर्णधार; तसंच राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com