कसोटी क्रिकेटचं केंद्रीकरण (ज्ञानेश भुरे)

dnyanesh bhure
dnyanesh bhure

‘‘कसोटी सामन्यांना गर्दी होत नसेल तर आम्ही खेळायचं कुणासाठी? यासाठी कसोटी सामने ठराविक पाच केंद्रांवर खेळवण्यात यावेत,’’ असं मत भारताचा कर्णधार विराट कोहली यानं नुकतंच मांडलं आहे.
त्या पार्श्वभूमीवर, कसोटी क्रिकेटचं असं केंद्रीकरण कितपत शक्य आहे, त्यासाठी कोणकोणते बदल करावे लागतील आदी मुद्द्यांचा ऊहापोह...

एकदिवसीय, टी २० आणि आता येऊ घातलेल्या टी १० क्रिकेटच्या गदारोळात कसोटी क्रिकेट जणू काही मरणासन्न झालं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आतापर्यंत हे मान्य करत नव्हती; पण आता आयसीसीला उपरती झाली आणि तिनं कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरवात केली. यानंतरही कसोटी क्रिकेटचं पुनरुज्जीवन होणार का, हा प्रश्न कायम राहतो. अलीकडेच झालेल्या भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या मालिकेनंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीनंच हा प्रश्न समोर आणला. कसोटी सामन्याला होत नसलेली गर्दी ही चिंतेची बाब आहे.
‘कसोटी सामन्यांना गर्दी होत नसेल तर आम्ही खेळायचं कुणासाठी? यासाठी कसोटी सामने ठराविक पाच केंद्रांवर खेळवण्यात यावेत,’ असं मत कोहलीनं मांडलं. कोहलीचं हे वक्तव्य कसोटी क्रिकेटच्या भारतातल्या केंद्रीकरणाच्या चर्चेला वाचा फोडणारं ठरलं.

झटपट क्रिकेटच्या गर्दीत कसोटी क्रिकेट हरवलं हे खरं आहे. कसोटी क्रिकेट वाचवण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी कोहलीनं उपस्थित केलेला पाच केंद्रांचा मुद्दा हा पहिलं पाऊल ठरू शकतं. भारतात सध्या १५ कसोटीकेंद्रं आहेत. कोहलीच्या या सूचनेला अजून संघटनात्मक पातळीवर काहीच प्रतिसाद मिळालेला नाही.
अर्थात, भारतीय क्रिकेट नियामक मंडळच तोवर अस्तित्वात नव्हतं. आता ते अस्तित्वात आलं आहे आणि नवे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर आहे. या सगळ्यातून त्यांना या कसोटी केंद्रीकरणाचा मुद्दा धसास लावायचा आहे. सध्या तरी कोहलीच्या वक्तव्याला केवळ अनिल कुंबळे आणि अझहरुद्दीन या दोन माजी कर्णधारांनीच प्रतिसाद दिला आहे. तोही परस्परविरोधी आहे. कुंबळेनं पाठिंबा दिला आहे, तर अझरनं विरोध दर्शवला आहे.

पाच केंद्रांचा मुद्दा...
कसोटी क्रिकेट सामन्यांना गर्दी होत नाही. जिथं गर्दी होत नाही तिथं कसोटी सामने खेळवून काय फायदा? आमचा खेळ बघायला कुणीच येणार नसेल तर आम्ही खेळायचं कुणासाठी? त्यामुळे जिथं गर्दी होते अशाच केंद्रांवर कसोटी सामने व्हावेत हे कोहलीचं मत होतं. कोहलीचा हा मुद्दा बरोबर आहे. खेळ बघायलाच कुणी येत नसेल तर अशा केंद्रांवर सामने घेण्याचा काय फायदा? त्याचबरोबर कसोटी सामन्यांची केंद्रं निश्चित करण्यात आली तर परदेशातल्या संघांनाही भारतात खेळताना त्या त्या केंद्रांच्या ठिकाणच्या हवामानाचा आणि खेळपट्टीचा चांगला अंदाज येईल आणि ते संघही भारतीय संघाला आव्हान देण्यापर्यंत मजल मारू शकतील. मुख्य म्हणजे अलीकडच्या काळात झटपट क्रिकेटचा प्रभाव इतका वाढला आहे, की कसोटी क्रिकेट सामने निकाली होऊ लागले आहेत. तरी, प्रेक्षक कसोटी सामन्यांकडे पाठ फिरवत आहेत हे सत्य आहे. कोहलीनं पाच केंद्रांचा मुद्दा समोर आणल्यावर या चर्चेनं जोर धरला. आता प्रश्न असा उभा राहतो, की गर्दी होत नाही म्हणून की कसोटी क्रिकेटला वाचवायचं म्हणून सामन्यांची केंद्रनिश्चिती करायची?
आताच भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान झालेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत विशाखापट्टणम, पुणे आणि रांची अशा तीन केंद्रांवर क्रिकेट सामने झाले. या तिन्ही शहरांमधला हा केवळ दुसरा कसोटी सामना होता. अशा अननुभवी केंद्रांवर होणारा खेळ खरच त्या दर्जाला साजेसा होता का याचाही विचार व्हायला हवा. प्रत्येक केंद्रावरचा सामना पाच दिवसही चालू शकला नाही. भारतीय संघ जिंकला तरी या सामन्यांची खेळपट्टी दर्जेदार होती का? कोहलीची सूचना काही अंशी याचं उत्तर अप्रत्यक्षरीत्या देते. त्याचबरोबर सामना जिथं होतो तिथल्या स्थानिक क्रिकेटचा काय प्रभाव पडतो हेही महत्त्वाचं आहे. त्यामुळे जिथं गर्दी होते आणि जिथं हवामान अनुकूल असतं अशा केंद्रांवर सामने घेणं केव्हाही चांगलं. मुंबई, बंगळूर, चेन्नई, कोलकता, दिल्ली, कानपूर ही सुरवातीची केंद्रं होती. नंतर त्यांत अहमदाबाद, विदर्भ अशा केंद्रांचा समावेश झाला. थोडक्यात काय तर, भारतातलं कसोटी क्रिकेट हे महानगरांत आणि शहरी भागात केंद्रित होणार. अर्थात यातली काही केंद्रं मध्यंतरी आयसीसीच्या काळ्या यादीत आली होती हे विसरून चालणार नाही. कोहलीनं ‘पाच केंद्रं हवीत’ असं सांगताना केंद्रांची नावं घेतलेली नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा ही केंद्रं निवडताना बीसीसीआयमधलं राजकारण उफाळून येऊ शकतं. या पाच केंद्रांवर कसोटी खेळवल्यास कसोटी क्रिकेट खरंच वाचणार असेल तर हा निर्णय व्हायला काहीच हरकत नाही. आजपर्यंत आपल्याकडे कसोटी सामन्याचं यजमानपद हे रोटेशन पद्धतीनं दिलं जातं. म्हणजेच आता कसोटीकेंद्रं निश्चित करायची असतील तर आधी रोटेशन या विचारपद्धतीला छेद देण्याची गरज आहे.

कशी असावीत पाच केंद्रं?
पाच केंद्रं निश्चत करण्याचा अंतिम निर्णय झाला तर या पाच केंद्रांची निवड कशी करायची हेही निश्चित व्हायला हवं. यासाठी काही निकष असायला हवेत. त्यांत ते केंद्र किती चांगल्या सुविधा पुरवतं, तिथल्या सुविधा किती योग्य आहेत, त्या केंद्रावर झालेल्या सामन्यातून सर्वच आघाड्यांवर आपल्याला काय मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, आपण खेळ पाहण्याबरोबर प्रेक्षकांना काय देतो हेदेखील महत्त्वाचं आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात कसोटी सामन्यांची केंद्रं निश्चित असल्याचं उदाहरण या वेळी दिलं जातं; पण तिथं प्रेक्षकांना मिळतात त्या सुविधा आपण देऊ शकतो का, हे तपासून पाहणं महत्त्वाचं आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात प्रेक्षक मैदानावर जितक्या मोकळेपणानं सामना बघू शकतात तितका मोकळेपणा आपल्याकडे प्रेक्षकांना मिळणार आहे का? नाही! कारण, आपल्याकडे सुरक्षेचा इतका बाऊ केला जातो की क्रिकेट सामना पाहायला येणाऱ्या प्रेक्षकाकडे, विरोधी नेत्याच्या भाषणाला आलेल्या दुसऱ्या गटातल्या कार्यकर्त्याप्रमाणे बघितलं जातं!
सामना बघायला आलेल्या प्रेक्षकांकडून त्याच्याकडील सर्व पदार्थ दरवाज्यातच काढून घेतले जातात, अगदी औषधंही बरोबर घेऊ दिली जात नाहीत. त्यांना परवडेल अशा किमतीत खाद्यपदार्थही उपलब्ध होत नाहीत. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, केंद्राच्या अंतराचा. मैदान जर शहरापासून दूर एका टोकाला असेल तर प्रेक्षक सामन्याचं तिकीट, रोजचा प्रवासाचा खर्च करून पाच दिवस येणार असतील आणि त्यांना तिथं काहीच सुविधा मिळणार नसतील तर त्याचा काय उपयोग? सर्वात महत्त्वाचं म्हणजे, बहुतेक मैदानं ही शहराबाहेर असल्याचा फटका बसत आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेटला गर्दी का होत नाही याचा विचार करताना खेळाबरोबर येणारी इतर आव्हानंदेखील लक्षात घेतली जावीत.

कोणती असू शकतात पाच केंद्रं?
भारतात सध्या १५ कसोटीकेंद्रं आहेत. यात देशातलं कसोटी क्रिकेट पाच केंद्रांवर खेळवलं जावं अशी सूचना आल्यावर यातली पाच केंद्रं कोणती असतील हीदेखील चर्चा सुरू झाली. देशातलं क्रिकेट प्रामुख्यानं मुंबई, बंगळूर, चेन्नई, कोलकता, दिल्ली, कानपूर, अहमदाबाद, विदर्भ अशा शहरांमध्ये केंद्रित आहे; पण या शहरांतल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आयोजनावर नजर टाकली तर गेल्या दहा वर्षांत बंगळूर, मुंबई, चेन्नई, कोलकता या शहरांमध्ये मिळून केवळ १८ कसोटी सामने झाले आहेत. मुंबई हे क्रिकेटची परंपरा असणारं शहर; पण तिथं गेल्या दहा वर्षांत केवळ पाच कसोटी सामने झाले आहेत. म्हणजे जिथं गर्दी होते आणि जिथं परंपरा आहे तिथंच अधिक सामने झालेले नाहीत. आता कसोटी क्रिकेट वाचवण्यासाठी प्रकाशझोतात कसोटी सामने खेळवण्याचा विचार पुढं येत आहे. गांगुलीच्या अध्यक्षतेखालील नव्या समितीनं हे पाऊल उचललं आहे. त्यांनी बांगलादेशविरुद्धचा दुसरा कसोटी सामना प्रकाशझोतात कोलकता इथं खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कसोटी सामना आयोजित करताना भविष्यात तिथं प्रकाशझोताची व्यवस्था आहे की नाही हेदेखील बघितलं जाईल.
आतापर्यंत बीसीसीआयमध्ये ज्यांची ज्यांची सत्ता आली त्यांनी त्यांनी आपल्या शहरात मैदान उभारलं. विदर्भ, धरमशाला, पुणे अशी काही नावं यासंदर्भात प्राधान्यानं सांगता येतील. त्यांनी उभारलेली स्टेडियम ही आंतरराष्ट्रीय दर्जाची आहेत यात शंकाच नाही; पण एक कसोटी, एक एकदिवसीय सामना झाल्यावर पुढं काय हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. कारण, एकदा सामन्याचं आयोजन झालं की पुन्हा आंतरराष्ट्रीय सामन्याच्या आयोजनासाठी त्या शहराला चार वर्षं वाट पाहावी लागते. एक सामना झाल्यावर तिथं पुन्हा चार वर्षं सामनाच होत नाही. रणजी स्पर्धेतले पाच सामने असले तरी त्यातला एखाद्‌दुसरा सामना त्या मैदानावर होतो. एकूण काय, तर नंतर मैदान पडूनच राहतं.
या पार्श्वभूमीवर, कसोटी सामन्यांचं केंद्रीकरण झाल्यास कसोटी क्रिकेट वाचण्यास हातभार लागू शकेल आणि दुसरं म्हणजे, मैदानाचा वापर, तसेच दर्जा कायम राहील. अशा वेळी अन्य केंद्रंही वाऱ्यावर सोडली जाणार नाहीत याची काळजी घ्यायली हवी यात शंका नाही. मात्र, हे फारसं अवघड नाही. आयपीएलसारख्या लीगमधील फ्रॅंचायजींना आपले काही सामने अन्यत्र खेळवण्याची गळ घातली जाऊ शकते, तसेच रणजी, दुलिप, देवधर, इराणी करंडक अशा अन्य स्पर्धांसाठी या मैदानांचा वापर होऊ शकतो.

प्रमुख मैदानांवर आतापर्यंत झालेले सामने
ईडन गार्डन, कोलकता : ४१
एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई : ३२
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली : ३४
वानखेडे स्टेडियम, मुंबई : २५
चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर : २३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com