मन करा रे प्रसन्न... (डॉ. हमीद दाभोलकर)

dr hamid dabholkar
dr hamid dabholkar

कोरोनाच्या साथीमुळे एकीकडे शारीरिक आरोग्याबाबत जागरुकता निर्माण होऊ लागली आहे; पण त्याच वेळी मानसिक स्वास्थ्य बिघडण्याचीही स्थिती निर्माण झाली आहे. मनोबल वाढण्यासाठी काय करायला हवं, कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा, सर्व घटकांनी कोणत्या कृती करायला हव्यात, सकारात्मकता कशी वाढवायला हवी आदीसंदर्भात विवेचन.

शारीरिक आरोग्याच्या तुलनेत मानसिक आरोग्य हा आपल्या समाजात कायमच दुर्लक्षित राहिलेला घटक आहे. कोरोनाच्या साथीनं जगभरात प्रचंड उलथापालथ झाली आहे आणि अनेक अडचणींना आपल्या सर्वांना सामोरं जावं लागत आहे. असं असतानासुद्धा त्यातल्या त्यात बरी एक गोष्ट झाली आहे ती म्हणजे मनाचं आरोग्य हा विषय केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात अजेंड्यावर आलेला आहे.

राष्ट्र, प्रदेश, धर्म, जात, गरीब-श्रीमंत अशा नेहमी आपल्याला वेगळंवेगळं करणाऱ्या सर्व गोष्टींच्या पलीकडे जाऊन या साथीनं आपल्याला माणूस म्हणून एका पातळीवर आणलं आहे. कोरोनाच्या साथीनं निर्माण झालेल्या अडचणीतून रस्त्यावर आलेला स्थलांतरित मजूर आणि कोरोनाच्या साथीमुळे भयकंपित होऊन आत्महत्या करणारा जर्मनीतला एका राज्याचा अर्थमंत्री याना कोरोनाच्या साथीनं मानसिक अस्वस्थतेच्या एकाच प्रतलावर आणलं आहे. या पार्श्वभूमीवर ही अस्वस्थता कशामुळे तयार होते आणि ती कशी हाताळायची हे आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे.

कोरोनाच्या साथीनं मानवी जीवनात निर्माण केलेल्या ताण-तणावांचा पट खूपच मोठा आहे. आपल्याला किंवा आपल्या प्रियजनांना हा आजार होईल का, अशा चिंतेपासून ते हातावरचं पोट असलेल्या लोकांच्या साठी आजची खाण्याची आणि निवाऱ्याची सोय काय होईल का अशापर्यंतच्या चिंतेचा असा तो मोठा पट आहे. वीस ते तीसच्यामध्ये वय असलेल्या तरुण पिढीच्यासाठी त्यांच्या आयुष्यातील शिक्षण, व्यवसाय, नोकरी अशा सर्वांवर सर्वव्यापी परिणाम करणारी ही घटना असू शकते. अनेक दिवस एकाच ठिकाणी अडकून पडल्यामधून निर्माण होणारे नात्यातले ताण-तणाव हे त्याचं आणखी एक स्वरूप आहे. जीवनावश्‍यक सेवा पुरवणाऱ्या लोकांच्या आयुष्यातला ताण-तणाव तर अनेक पटीनं वाढलेला आहे. एका बाजूला आपलं कर्तव्य करताना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती, कुटुंबाची सुरक्षितता कशी राखावी या विषयीची काळजी अशा अनेक पातळ्यांच्या वर हे ताण-तणाव आपल्या सर्वांना जाणवत आहेत.

कोरोनाच्या साथीच्या सुरुवातीच्या कालखंडात आम्ही परिवर्तन संस्था, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि इतर काही संस्थांच्या मदतीनं "मनोबल' नावाची मोफत हेल्पलाईन सुरू केली. त्यामध्ये अनेक प्रकारच्या चिंता आणि अस्वस्थता असलेले लोक फोन करत असतात. मात्र, सगळ्यात जास्त जर प्रमाण कशाचं असेल, तर ते "मला तर कोरोना झाला नाही ना' या भीतीनं ग्रस्त असलेल्या व्यक्तींच्या फोनचं. जसा कोरोनाचा संसर्ग हा बहुतांशपणे आधीच इतर शारीरिक व्याधी असलेल्या लोकांना जास्त होतो, तसं या प्रकारातल्या कोरोनाच्या भीतीचा आजार मुळात चिंता करण्याचा स्वभाव असलेल्या लोकांना होण्याची शक्‍यता असते.

एकदा का चिंता मनात यायला लागली, की छातीत धडधड होणं, सतत बेचैन वाटणं, झोप न लागणं, भूक मंदावणं, चिडचिड होणं अशा अनेक गोष्टी व्हायला लागतात. आपल्यातल्या कुणाला जर अशी काही लक्षणं येत असतील, तर आपण पहिली गोष्ट लक्षात घेऊया, की या कालखंडात अशी अस्वस्थता वाटणारे आपण एकटे नाही. आपल्या आजूबाजूचे बहुतांश सर्वजण कमी-अधिक प्रमाणात अशा भावना अनुभवत असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनातली चिंता ही समुद्राच्या लाटेसारखी असते. समुद्राची लाट जशी हळूहळू वर जाते, एका सर्वोच्च बिंदूला पोचते आणि मग खाली येते त्याचप्रमाणं ही चिंतेची लाट हळूहळू वर जाते. एका सर्वोच्च त्रासदायक बिंदूला पोचते आणि मग हळूहळू ओसरते. त्यामुळे ही चिंता ही तात्पुरती मनाला वाटणारी अवस्था आहे हे आपण लक्षात ठेवूया. या चिंतेच्या लाटेत बुडून न जाता त्यावर स्वार व्हायला आपल्याला शिकायला लागतं. समुद्रातल्या लाटेवर स्वार होऊन सर्फिंग करणारे लोक तुम्ही बघितले असतील, अगदी तसंच आपल्याला आपल्या चिंतेच्या लाटेवर स्वार व्हायला शिकायचं आहे. मानसशास्त्राच्या भाषेत याला worry surfing असे म्हणतात. अनेकदा असं होतं, की चिंता आणि अस्वस्थता असह्य होऊ लागली, की माणसं त्याच्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी काही तरी निर्णय घेऊन टाकतात. मन अस्वस्थ असताना घेतलेले हे निर्णय बहुतांश वेळा चुकतात म्हणून आपण कुठलाही निर्णय घेण्यासाठी आपल्या चिंतेवर स्वार होऊन तिचा भर ओसरण्यासाठी वाट पाहायला हवी.

वरी टाईम (worry time) हे चिंता हाताळण्यासाठी उपयोगी पडणारं दुसरं महत्त्वाचं तंत्र. चिंतेच्या भावनेचं स्वरूप असं आहे, की ती करणाऱ्या व्यक्तीला असं वाटत असतं, की आपण जितकी जास्त चिंता करू तितके आपण जास्त विचार करायला उद्युक्त होऊ आणि आपण जितका जास्त विचार करू तितका आपला धोका टाळण्याची शक्‍यता जास्त होते. प्रत्यक्षात मात्र होतं असं, की जितकी चिंता आणि विचार आपण जास्त करतो तितका वेळ आपण अधिक अधिक चिंतेच्या जाळ्यात गुंतत जातो. प्रत्यक्ष प्रश्न राहतो बाजूला आणि चिंतेचं दुष्टचक्र आपलं मन व्यापून राहतं. अशा परिस्थितीमध्ये आपल्या मनाला दिवसातला केवळ ठराविक वेळ उदाहरणार्थ सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास असा वेळ आपल्याला अस्वस्थ करणाऱ्या गोष्टींच्या वरती विचार करण्यासाठी बाजूला काढून ठेवला, तर दिवसातला बाकीचा वेळ तर आपल्याला शांत मनःस्थितीत घालवता येऊ शकतो. आपल्यामधल्या बऱ्याचशा लोकांसाठी सोशल मीडिया अथवा टीव्हीवरच्या बातम्या या आपली चिंता वाढवण्याचं काम करत असतात. तो वेळ मर्यादित करणं, त्यांमधील सकारात्मक बातम्यांवर लक्ष केंद्रित करणं अशा छोट्या छोट्या गोष्टी या परिस्थितीत खूप फायद्याच्या ठरू शकतात.
"मोकळ्या वेळाचं काय करायचं' हा लोकांना सतावणारा दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे. मानवी जीवनाची गंमत अशी आहे, की जेव्हा आपण खूप व्यग्र असतो, तेव्हा आपल्याला कधी एकदा मोकळा वेळ मिळतो असं आपल्याला वाटत असतं; पण प्रत्यक्षात जेव्हा मोकळा वेळ मिळतो, तेव्हा मात्र त्याचं काय करायचं ते लक्षात येत नाही आणि कधी काम सुरू होतं अशी भावना यायला लागते.

मोकळ्या वेळेत काय करता येऊ शकतं याच्याविषयीच्या गोष्टींचा समाजमाध्यमावर मोठा सुकाळ झाला आहे. त्यांची पुनरावृत्ती टाळून त्यासंबधी काही आणखी मुद्दे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा ठरवून त्या पाळणं. कामाला जायचं बंधन नसलं, की अनेक वेळा आपण कधीही झोपणं आणि कधीही उठणं असं स्वैर वागायला लागतो. एखाद- दुसरा दिवस हे ठीक राहू शकतं; पण त्याचा आपल्या एकूणच दैनंदिन नियोजनावर परिणाम व्हायला लागतो. त्यामधून शरीर आणि मन यांचं संतुलन बिघडायला लागतं. म्हणून शक्‍यतो हे पथ्य आपण पाळावं. दुसरं पथ्य आहे आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याविषयी. आपल्याकडे अनेक वेळा घरातली कामं करणं ही केवळ स्त्रीवर ढकलली जाणारी गोष्ट आहे. घरातल्या कामाच्या जबाबदाऱ्यांची वाटणी करायला आणि निभावायला शिकायची ही सुवर्णसंधी म्हणून घरकामात मदत न करणाऱ्या वर्गानं (जो बहुतांश पुरुषच आहे) घ्यायला हवी. त्यामधून कामाचं वाटप होईल, कौटुंबिक स्वास्थ्य वाढेल आणि भविष्याच्या दृष्टीनं एक चांगलं मूल्य आपल्यात रुजू शकेल. मोकळ्या वेळाच्या बाबतीत एक महत्त्वाचा म्हणता येईल असा साक्षात्कार आपल्याला समाज म्हणून होऊ शकतो. तो असा, की ज्या सेलिब्रिटीसारखी लाईफस्टाईल होणं हे आपल्यामधल्या एका मोठ्या वर्गाचं स्वप्न असतं त्यांच्या आणि आपल्या दैनंदिन जीवनात कामाचा भाग सोडला तर फारसा फरक नसतो! अनुष्का शर्मा आणि विराट कोहली पत्ते खेळतात, कतरिना कैफ भांडी घासते आणि कचरा काढते, दीपिका पदुकोण स्वयंपाक करते आणि आपल्यामधले किती तरी लोक ही कामं त्यांच्यापेक्षा अधिक चांगली करत असतील. काही पातळ्यांच्यावर आपण सर्व वेगळे असलो, तरी अनेक बाबतींत आपण एकाच पातळीवर आहोत हे आकलन होणं ही कोणत्याही साक्षात्कारापेक्षा थोडीही कमी उपलब्धी नाही.

अनेक दिवसांच्या लॉकडाऊनचा जवळच्या नातेसंबंधांवरदेखील अनेक अंगी परिणाम होताना दिसतात. लॉकडाऊननंतर चीनमध्ये घटस्फोट वाढल्याच्या बातम्या आपण वाचल्या असतीलच. नवरा-बायको, सासू-सून किवा पालक आणि मुलं यांच्यामधली जी नाती आधीपासूनच मोठ्या प्रमाणात बिघडलेली आहेत, त्यांना हा परिणाम खूप जास्त जाणवू शकतो. अशा परिस्थितीत एकमेकांच्या सक्तीच्या सहवासाचा कालावधी नीट हाताळला गेला नाही, तर तो नात्यांसाठी स्फोटक ठरू शकतो. मात्र, त्याच वेळी हेदेखील तितकंच खरं आहे, की हा उपलब्ध कालावधी आपण आपल्या नात्यांमधले नेहमीचे वादाचे आणि ताणाचे मुद्दे हाताळण्यासाठीदेखील वापरू शकतो. नेहमीच्या धकाधकीच्या जीवनात नात्यातल्या दुखऱ्या जागा हाताळायला उपलब्ध नसलेला अवकाश या निमित्तानं आपल्याला निर्माण होऊ शकतो. भले सगळेच प्रश्न यामधून सुटणार नसले, तरी आहेत ते प्रश्न चिघळणार नाहीत एवढी काळजी तर आपण नक्कीच घेऊ शकतो. पालकत्वाची परीक्षा घेणारादेखील हा कालखंड आहे. ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांना गुंतवून ठेवणं आणि उपलब्ध कालावधीचा त्यांच्या अधिक चांगल्या वाढीसाठी कसा वापर करून घेता येईल हादेखील विचार महत्त्वाचा आहे. मुलांवर चांगले संस्कार करण्याची सगळ्यात प्रभावी पद्धत म्हणजे आपल्या मुलांनी जसं वागावं असं आपल्याला वाटतं, तसं वागण्याचा आपण प्रयत्न करणं. हे वाचायला जेवढं सोपं वाटतं, तेवढे अंगीकारायला अजिबात सोपं नाही. मुलांनी मोबाईलचा वापर कमी करून घरकामात मदत करावी अशी आपली अपेक्षा असली, तर आपल्याला प्रथम ते स्वत: अमलात आणावं लागेल. आपली नाती अधिक समृद्ध करण्याची संधी म्हणून आपण या कालखंडाकडे पाहायचं ठरवलं, तर या अनुषंगानं अनेक गोष्टी आपल्याला सुचू शकतील.

या निमित्तानं समजून घेण्याची अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वत:शी संवाद. पृथ्वीतलावर माणूस हा असा एकमेव प्राणी आहे, की जो स्वत:शी संवाद साधू शकतो. स्वत:ला तपासून पाहू शकतो आणि स्वत:मधल्या चुकीच्या गोष्टींची दुरुस्तीदेखील करू शकतो. मात्र, ही क्षमता वापरण्याचं आपण बहुतांश वेळा टाळत असतो. लॉकडाऊनच्या कालावधीचा सगळ्यात एक चांगला वापर हा स्वत:शी संवाद होण्यासाठी नक्की करून घेता येऊ शकतो. यालाच धरून येणारा एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या अडचणींचं महाभयंकरीकरण करण्याएवजी आपल्यापेक्षा अधिक अडचणी असलेल्या लोकांच्या दुःखाचा विचार करून आपली जीवनदृष्टी विशाल करण्याचा प्रयत्न करू शकतो. रोजंदारी करणारे, स्थलांतरित लोक असे अनेक जनसमूह आपल्यापेक्षा अधिक अडचणीत जगत आहेत, त्यांना आपल्याला शक्‍य त्या पातळीवर मदत करणं हे महत्त्वाचं आहे. आपण समूह म्हणून जगतानाच आपल्या समोरच्या आव्हानाचा चांगला मुकाबला करू शकतो, हे या कालखंडानं अधोरेखित केलं आहे. याचा फायदा समाजाला होतो हे तर आहेच; पण दुसऱ्याला मदत करणं हे आपल्या मनाला उभारी देणारं असतं हे आपण समजून घेणं आवश्‍यक आहे.
या कालखंडात मानसिक आरोग्याची नीट काळजी घेतली नाही, तर सगळ्यात मोठा धोका हा चुकीच्या माहितीला अफवेला किवा अंधश्रद्धेला बळी पडण्याची शक्‍यता. याचं मोठं पीक हे आपल्या आजूबाजूला आलेलं दिसतं आहे. त्याच्या माध्यमातून आपलं शोषण होऊ नये, असं आपल्याला वाटत असेल, तर आपण आपल्या मनाची काळजी घेणं आवश्‍यक आहे. काही ठिकाणी कोरोनाविषयी वाटणाऱ्या वैयक्तिक भीतीचं रूपांतर सामाजिक भीतीत झालं, तर त्यामधून लोकांना बहिष्कृत करण्याचे प्रकारदेखील आपल्या आजूबाजूला घडताना दिसतात. या गोष्टी टाळण्यासाठीदेखील वैयक्तिक आणि सामुदायिक भीतीवर मात करण्याचं कौशल्य आपण शिकणं आवश्‍यक आहे.

शासनाच्या मानसिक आरोग्यसुविधांची स्थिती मात्र अजून खूपच अपुरी आहे. शासनानं मानसिक आरोग्याच्या प्रश्नांकडे गंभीरपणाने बघायला लागावं, अशी अपेक्षा आपण या निमित्तानं करू शकतो. मात्र, शासन याबाबतीत काही करेल यावर आपण अवलंबून राहता कामा नये. आपलं स्वत:चं आणि आपल्या कुटुंबाचं मानसिक आरोग्य राखण्याची ही जबाबदारी आपल्यालाच पुढाकार घेऊन पार पडायची आहे. या अवघड कालखंडात आपलं स्वत:चं आणि कुटुंबाचं मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी आम्ही "मनोबल हेल्पलाईन' मार्फत एक मोफत प्रशिक्षणदेखील आयोजित करत आहोत. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपण 8149278509, 9561911320 या क्रमांकांवर संपर्क करू शकता. आपण सगळे मिळून या अवघड कालखंडात स्वत:चं आणि कुटुंबाचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राखूया आणि कोरोनाच्या साथीवर मात करूया!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com