स्तब्ध कोलाहल (डॉ. ज्योती धर्माधिकारी)

dr jyoti dharmadhikari
dr jyoti dharmadhikari

निसर्गाचीही एक हाक असते. ती ऐकणं आपण पूर्वीच बंद केलं. पृथ्वी म्हणजे मानवासाठी दिलेली देणगी आहे असा अहंभाव रुजला गेला, नैसर्गिक जगणं सोडून मानव अतिरिक्त इच्छा, अपेक्षांसह पृथ्वीच्या साधनसंपत्तीची लयलूट करू लागला. पृथ्वीवर एकाधिकारशाहीनं इतर प्राण्यांचं अस्तित्व सरळ अमान्य करू लागला, प्राण्यांनी माणसाच्या अटी आणि दयेवर जगावं असा हट्ट करू लागला. या परिस्थितीचा कडेलोट झाला तेव्हा निसर्गानंच माणसाला चेक-मेट केलं.

गेल्या दोन महिन्यांपासून पृथ्वी जणू काही शांत, निवांत झाली. तिचं सगळ्यात खोडकर अपत्य घरामध्ये कैद झालं आहे. जगभरात निसर्ग फुलून आलाय, प्राणी, पशू, पक्षी त्यांच्या हक्काच्या जगात निर्भयपणे बागडत आहेत. कुठं रस्त्यांवरून चालणारे मोरांचे थवे, कुठं बेमुर्वतखोर वाघ, सिंह, कुठं निर्भयपणे उड्या मारणारी माकडं, खारी, एवढंच कशाला कधी नव्हे ते चिमण्या बिनबोभाट दारात येऊन बसू लागल्या, कबुतरांचे थवे मोकळे रस्ते काबीज करू लागले, कुठं डौलदार बदकं एका रांगेत दिमाखात चालत आहेत. जंगलांचे कोंडलेले श्वास मोकळे झाले. वातावरणातला कार्बन कमी झाल्यामुळे काही प्रमाणात प्रदूषण कमी झालं. नद्या, समुद्र स्वच्छ झाले आणि दुर्मिळ कासवाच्या जाती प्रजननासाठी किनाऱ्यावर येऊ लागल्या. नितळ झुळझुळत्या पाण्यामधून कित्येक जलचर डोकी वर काढून हे जग एकदाचं डोळे भरून पाहून घेत आहेत, असा भास होतोय. हे असं दृश्‍य ज्यांनी पाहिलं त्यांना प्राण्यांच्या बिनधास्त वागण्याचं कौतुक वाटलं. त्यांचा निर्भयपणा भावला आणि कॅमेऱ्यात बंद करून अशी दृश्‍यं भराभर शेअर होत आहेत. कुठं होते आजवर हे सगळे प्राणी, पशू, पक्षी?

माणूस नावाच्या प्राण्यानं क्रूर उच्छाद मांडला होता. दादागिरी करत पशुपक्षी, झाडे-वेलींच्या हक्काच्या जागेवरून हुसकावून लावण्याला तो "विकास' म्हणतो. निसर्ग आणि साधनसंपत्तीची लयलूट करत सुटला. जंगल, डोंगर, दऱ्या, पर्वते, जे प्राण्यांचे हक्काचे अधिवास तिथं माणसांनी राज्य केलं. वरून साळसूदपणे प्राण्यांना अभय देत असल्याचा दिमाख ही माणसं करतात. प्राण्यांसाठी अभयारण्यं राखीव करून तर पृथ्वीच्या दावेदारांवर तुरुंगात राहायची वेळ आणली. जणू काही माणूस किती संवेदनशील आणि किती सहृदय हे सांगण्याची स्पर्धाच लागल्यासारखे तथाकथित पक्षी, प्राणी-मित्र त्यांचा कैवार घेत तावातावानं बोलताना दिसतात. खरेखुरे प्राणीमित्र आणि प्राण्यांच्या नष्ट होऊ पाहणाऱ्या जातींबद्दल सातत्यानं चिंता व्यक्त करणारे ख्यातनाम प्राणी-मित्र सर डेव्हिड ऍटनबर्रो यांच्या मते हजारो सजीवांच्या जाती मानवानं नष्ट केल्या. एक जंगल ही एक संपूर्ण परिसंस्था असते, विकासाच्या नावाखाली जेव्हा जंगल तोडलं जातं तेव्हा तिथल्या दुर्मिळ वनस्पतींपासून ते किटकांपर्यंत हजारो जाती नष्ट होतात, ही या भूतलाची कधीही भरून न येणारी हानी ठरते. माणसाच्या उद्दामपणामुळे शेकडो सजीव प्रजाती नष्ट झाल्या आहेत, काही नष्ट होण्याचा बेतात आहेत. माणूस हे साफ विसरला, की या जगावर त्याच्याइतकाच किंबहुना थोडा जास्तच इतर प्राणीमात्र-सजीवांचाही हक्क आहे. अहंकारी माणसाला धडा शिकवायला जसा काही कोरोना हा महाआजार आला आणि भीतीनं माणूस जागीच स्तब्ध झाला. मानवाचा कोलाहल थांबला, आणि निर्भयपणे पृथ्वीचे वारसदार डोकी वर काढू लागले.

माणसाचा सर्वव्यापी संचार यंत्रांच्या सहाय्यानं सुरू आहे. त्यानं सगळीकडे प्रचंड कोलाहल माजवला आहे. घनदाट लोकांचा बोलण्याचा कोलाहल, यंत्रांचा खडखडाट, कारखान्यांचा धूर, वाहनांची वर्दळ, त्यांचं धूर-धुळीचे उत्सर्जन, विमानांची कार्बन ओकणारी घरघर, कारखान्यांनी तर त्यांची कमाल मर्यादा गाठली. जिथं यंत्र नाहीत तिथं की-बोर्ड बडवण्याचा कोलाहल. मोबाईल, रोबोट आणि कॉंप्युटर अधिक प्रगत करण्याचा इतका ध्यास मानवानं घेतलाय की पुढील काळात माणसाच्या मेंदूचं कदाचित काही काम राहणार नाही. मानवाला नैसर्गिकतेचं एवढं वावडंच आहे. निसर्गापासून फारकत म्हणजेच आधुनिकता अशी सरळ व्याख्या त्यानं स्वीकारली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेन्स वाढवण्यात माणूस इतका तल्लीन होतो, की तो स्वतःच एक रोबो बनून संवेदनाशून्य काम करू लागला. त्या भरवशावर त्यानं शरीराच्या जैविक घड्याळावर विश्वास ठेवणं केव्हाच सोडून दिलं. प्रचंड आवाज, औद्योगिकरण, यामुळे हवेतला कर्ब-वायू वाढू लागला, अजून काही वर्षांनी पृथ्वीवर शुद्ध हवेचा स्त्रोतच बंद होईल. आणखी किती पुढं जाणार? की ही प्रगती म्हणजे वेगानं उतरणीला लागलेली ब्रेक फेल झालेली कार आहे?

कारवरून आठवलं, रोडवरचा कोलाहल तर जीवघेणा मृत्यूचा खेळच असतो. सर्कशीत मृत्यूगोलात दोनतीन गाड्या एकमेकांना चुकवत वेगानं फिरत असतात, हे आपण तिकिट घेऊन बघतो. अगदी तसाच खेळ रोडवरही सर्रास सुरू असतो. या वेगाच्या नादानं मग हात-पाय लंगडे होतात, तर कधी हाती पायी धड बचावणारा सुकुमार देह मेंदूच्या इजेने शांत, निर्जीव होतो. तरीही मृत्यूचा हा अक्राळविक्रळ खेळ रस्त्यांवर सुरूच असतो. माणूस प्राणी बहुदा मृत्यूलाही घाबरत नाही.

विविध मागण्यांचा, मोर्चांचा, उठावांचा, नारे, घोषणा या सगळ्यांचाही आवाज सर्वदूर जगभर ऐकू येत असतो... असा आवाज कुठून ना कुठून उमटत असतो. या हाकेमध्ये अनेकदा आर्तता असते, अगतिकता असते, संतापानं भिरभिरत जाणारा एखाद्याच्या मस्तकाचा वेध घेणारा दगड असतो. आपले प्रश्न, समस्या घेऊन अनेक मागण्यांसाठी रस्त्यावर उतरणारे लोकांचे प्रश्न सरकार दरबारी पोचवण्याची धडपड असते. बहरहाल अशा कोलाहलाची निष्पत्ती बहुतांश अगतिक तडजोड असते.
गेल्या दोन महिन्यांत सगळे कोलाहल, स्पर्धा, कारखान्यांच्या घरघरी, मोर्चे, मागण्या थांबल्या. महासाथीनं आपले हातपाय जगभर पसरवले. मानववंश संपण्याची जरब मृत्यूपेक्षा भयंकर आहे. कारण मानव तर मृत्यूला घाबरतच नाही. जीवनात जीवघेणी स्पर्धा करताना माणसाला मृत्यू विसरायलाच आवडतं. मृत्यूचं भय असतं, तर अनेक कोलाहलांपासून दूर राहण्याचा प्रयत्न त्यानं पूर्वीच निश्‍चित केला असता. मुळात आपल्या मर्यादित जागेत राहायला शिकला असता. नैसर्गिक जगणं माणसाला अनेक भौतिक दु:खातून मुक्ती देतं हे माणसाला माहीत आहे.

एक मूलभूत प्रश्न शिल्लक आहे, तो असा की मानव पशू आहे, अगदी इतर पशूंसारखाच हे त्यानं अमान्य केलं. एवढी अवाजवी संख्या फक्त मनुष्य प्राण्याचीच वाढली ती कशामुळे? पुरातत्त्वशास्त्रज्ञ स्पष्टीकरण देताना सांगतात, की शेतीच्या शोधामुळे मानवाची भटकंती थांबली. एरवी पोटार्थ फिरणारा मानवप्राणी स्थिर झाला. मुबलक पिकं घेऊ लागला, जनावरांना बंदिस्त करून मांस, दूध-दुभत्याची सोय झाली. आणि तिथूनच मानवाची लोकसंख्या वाढायला सुरवात झाली.
भय मृत्यूचं नाही, मानववंश संपण्याचं आहे. आठ हजार वर्षापूर्वीची मोहेंन्जोदारो, हडप्पा संस्कृती मातीच्या ढिगाखाली गाडली गेली. भक्कम तटबंदीचं संपन्न बॅबीलॉन नगर धुळीच्या लोटांखाली गडप झालं. तिथं मानववंश नष्ट झाला. त्या समृद्ध पुरातन संस्कृतीच्या शहाणपणाचे गोडवे आपण आजही गातो. काही हजार वर्षांपूर्वी या मानवी वस्त्या अशाच एखाद्या प्रलयाच्या किंवा महारोगाच्या शिकार झाल्या असाव्यात. त्यांनीही जगण्याची आपल्या इतकीच धडपड केली असेल. त्यांच्या संपन्न राज्यातले कोलाहल, नाण्यांचा खळखळाट, शस्त्रांचे खडखडाट , असेच थंड झाले असावेत.

निसर्गाचीही एक हाक असते. ती ऐकणं आपण पूर्वीच बंद केलं. पृथ्वी म्हणजे मानवासाठी दिलेली देणगी आहे असा अहंभाव रुजला गेला, नैसर्गिक जगणं सोडून मानव अतिरिक्त इच्छा, अपेक्षांसह पृथ्वीच्या साधनसंपत्तीची लयलूट करू लागला. पृथ्वीवर एकाधिकारशाहीनं इतर प्राण्यांचं अस्तित्व सरळ अमान्य करू लागला, प्राण्यांनी माणसाच्या अटी आणि दयेवर जगावं असा हट्ट करू लागला.
या परिस्थितीचा कडेलोट झाला, तेव्हा निसर्गानंच माणसाला चेक-मेट केलं. मानवापेक्षा ताकदवान आणि विध्वंसक शक्ती अस्तित्वात आहे याची जाणीव झाली. आपल्याला सध्यातरी कोरोनासोबत जगायचं आहे. रॅपीड फायरसारखी सुरू असलेली मृत्यूची शृंखला तोडायची असेल, तर घरात बसण्याला पर्याय नाही. माणूस कबुतरांप्रमाणे खुराड्यात राहायला शिकला. मानव चतुर आहे, हुशार आहे, परिस्थितीवर लवकरच ताबा मिळवेल यात शंका नाही.

मात्र, तोपर्यंत वाघ, सिंह, हरणं, उन्मुक्त जगणारे माकडं, साप, सरडे, कबुतरं, चिमण्या, कावळे, कासव, मासे, यांना बघत बसावं लागणार. त्यांचा अधिकार मान्य करायची संधी निसर्गानं मानवाला दिली आहे. मानवाच्या संख्येवरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं. ही जमीन केवळ मानवाच्या उपभोगाची नाही, त्यांच्यासोबत सहजीवन जगणाऱ्या विविध सजीवांचीदेखील आहे, याची ती जणू जाणीव आहे. त्यांच्या हक्काची जागा परत करण्याची विवेकबुद्धी माणसात येईल तेव्हाच कदाचित महासाथीवर नियंत्रण मिळेल. तोवर एखादा डौलदार मोर किंवा नाजूकशी चिमणी खिडकीच्या तावदानावर टकटक आवाज करत आपल्या अस्तित्वाची जाणीव देईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com