‘स्क्रीन’पल्याडची शाळा (डॉ. मानसी देशमुख)

dr mansi deshmukh
dr mansi deshmukh

कोरोनामुळे डिजिटल आणि ऑनलाइन शिक्षणाचे वारे वाहू लागले असले, तरी जास्त भिस्त ही शिक्षकांइतकीच पालकांवरही आहे. बदलत्या परिस्थितीला पालकांनी कसं सामोरं जायचं, साधनं असली किंवा नसली तर काय करायचं, पूरक शिक्षण कसं द्यायचं आदी गोष्टींबाबतचा ऊहापोह.

कोरोनाच्या या संचारबंदीच्या काळात शाळा, महाविद्यालयं सुरू करण्याबाबत अजूनही काही निर्णय झाला नसला, तरी शहरांतल्या बहुतेक शाळांनी प्रतिरूप/ आभासी शाळा, ऑनलाईन स्कूलिंग, डिजिटल शिक्षण सुरू केलं आहे. दूरस्थ शिक्षणप्रणालीचा मार्ग आता बहुतेक विद्यार्थी आणि पालक यांनी स्वीकारला आहे. जून महिना उजाडला, की खरं म्हणजे शाळेचे वेध, नवीन वह्या, पुस्तकं, दप्तरं यांच्या खरेदीबरोबरच शाळा सुरू होण्याची आतूरतेनं वाट बघणारे पालक आणि मुलं असं चित्र डोळ्यांसमोर येतं. मित्र-मैत्रिणी, नवीन शिक्षक, मधली सुट्टीतली गंमत हे सगळं सवयीतलं वातावरण, शाळेचा वास हे शाळेभोवती फिरणारे अनुभवविश्व, अचानक आपलं रूप बदललेल्या ‘ऑनलाईन शाळेनं’ थोडे दिवस का होईना पण मुलांपासून दूर नेलं आहे.

आपण शाळा, शिक्षण याचा खोलात जाऊन विचार केला तर असं दिसतं, की शाळेचा मुख्य उद्देश हा मुलांना अभ्यासक्रमाबरोबरच जीवनकौशल्यं, मूल्यशिक्षण देणं हा आहे. एका तंत्रज्ञानानं अद्ययावत असलेल्या शाळेत, घरी बसूनच अभ्यास करायचा, टीचरचं ऐकायचं, लक्ष द्यायचं हे खरं तर या मुलांना सवयीचं करून घेताना थोडा वेळ लागणार हे पालकांनी आणि शिक्षकांनी समजून घेणं हे फार गरजेचं आहे. एरवी काँप्युटर किंवा फोनवर फक्त कार्टून्स किंवा गेम्स खेळणारी मुलं आता चक्क त्यावर शाळेतला अभ्यास करणार! बरं इतर वेळेस ‘स्क्रीनसमोर जास्त बसू नकोस,’ म्हणणारे पालक आता आपणहून त्यांच्या हातात मोबाईल देतायत आणि त्यावर या मुलांना ‘लक्ष दे, नीट ऐक नाहीतर टीचर तुला ओरडतील,’ असं सांगतायत. म्हणजे म्हटलं तर मुलंसुद्धा संभ्रमात पडली आहेत पालकांमधील हा न भूतो न भविष्यती असा बदल बघून.
मुळात अशी ऑनलाईन शाळा ही काही दिवसांसाठीची एक तजवीज आहे. प्रत्यक्ष शाळेत जाऊन पुन्हा एकदा या मुलांना शिकण्याचा आनंद घ्यायचा आहे. अभ्यासकौशल्य, लिखाणाचा सराव सतत जाणीवपूर्वक विकसित करायचा आहे. कारण शाळा बंद असल्या, तरी मेंदूमधला विकास काही थांबत नाही. अभ्यासाचा, लिखाणाचा, गणितं सोडवण्याचा सराव हा वहीवर चालू ठेवणं, त्यात सातत्य ठेवणं ही सवय आपण मुलांना लावली, तर कदाचित शिक्षणाचं माध्यम हे प्रतिरूप असो, दूरदर्शन, रेडिओ यापैकी काहीही असलं, तरी मुलांच्या मेंदूमध्ये या अभ्यासाला पूरक पेशींचं जाळं विणलं जाईल. प्रत्यक्ष शाळा सुरू झाली, की त्यांना परत शाळेतील वातावरणाशी, वेळापत्रकाशी जुळवून घेणं फारसं कठीण जाणार नाही.

मुलं जरी घरून शाळेत हजेरी लावणार असली, तरी जर आपण घरगुती वातावरणात शाळेप्रमाणं काही बदल केले, तर या मुलांची ऑनलाईन शाळेविषयीची मानसिकता, त्यांचा लक्ष देण्याचा कालावधी, अंतःप्रेरणा, शिकवत असताना लक्षपूर्वक ऐकण्याची त्यांची तयारी या गोष्टींमध्ये सकारात्मक बदल घडतील. ज्याप्रमाणं मुलं या डिजिटल शिक्षणासाठी नवीन आहेत त्याप्रमाणंच शिक्षकसुद्धा अशा प्रकारे शिकवण्याच्या पद्धतीला सरावले नाहीत. त्यामुळे त्यांनीसुद्धा त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीत सर्जनशील बदल करणं, शिकवण्याचे तास कमी करणं, अभ्यासक्रमातला कठीण भाग हा शाळा सुरू झाली, की वर्गात शिकवणं, सतत उजळणी घेणं, प्रायमरी शाळेतल्या मुलांकरता अभ्यासक्रम जमल्यास कमी करणं, भरमसाठ गृहपाठ न देणं अशा पद्धतीचे बदल करणं हे सध्याच्या परिस्थितीत हिताचं आहे. जेणेकडून मुलांना या माध्यमातून शिकण्यासाठी ऊर्जा मिळेल. एकदा या शिक्षणाचा ताण यायला लागला किंवा ते आवडेनासं झालं, की अभ्यासातली त्यांची व्यग्रता कमी होण्याची शक्यता असते. कारण कितीही नाही म्हटलं, तरी मुलांच्या डोळ्यांमधले भाव, देहबोली समजून घेण्यात या डिजिटल शिक्षणपद्धतीत मर्यादा आहेत. ज्या विद्यार्थ्यांच्या काही विशेष समस्या आहेत- उदाहरणार्थ चंचलता, अध्ययन अक्षमता, वर्तणुकीतली समस्या- त्यांच्यासाठी तर या डिजिटल शिक्षणाशी सामावून घेणं हे थोडं अधिक कठीण आहे, असं दिसतंय. मुळातच मेंदूमधल्या न्यूरॉलॉजिकल समस्येमुळे त्यांना शाळेतल्या औपचारिक शिक्षणाला जुळवून घेणं कठीण जात असतं. उपचारात्मक पद्धतींचा वापर करून या मुलांना शिकवावं लागतं, जे या डिजिटल शिक्षणाच्या मर्यादेमुळे तेवढं परिणामकारक होऊ शकत नाही.
नुकताच निम्हन्स या बंगळूर इथल्या संस्थेनं प्रायमरी शाळा ऑनलाइन सुरू न करण्याचा प्रस्ताव मांडला आणि मंजूर करण्यात आला. यामागेदेखील अनेक मनोसामाजिक, वैकसिक मानसशास्त्रीय घटक आहेत, अगदी जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या नियमावलीनुसार सहा वर्षांखालील मुलांचा स्क्रीन टाईम हा एक तासापेक्षा जास्त नसावा असं सांगितलं आहे. शाळांनीदेखील या सगळ्याचा विचार करून ऑनलाइन शाळेचं वेळापत्रक बनवलं असलं, तरी मुलांचा अभ्यासाव्यतिरिक्त स्क्रीन टाईम हा कमी करणे हे पालकांपुढचं आव्हान आहे. सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती शिक्षकांसाठी तीन मुद्दे मांडतात : मुलांना सर्जनशील आणि विमुक्त करणं, मुलांवर कोणताही आदर्श न थोपणं आणि शिक्षकानं स्वतःच्या भावभावनांचे निरीक्षण करणं; मुलांना नावीन्याचा शोध घेण्यास उत्तेजन देणं, हेच खरं तर शिक्षकांचं काम आहे. मग ते या प्रतिरूप संवादमाध्यमांतर्गत होणार नाही असं नाही. फक्त या प्रक्रियेला आपलंसं करायला थोडा वेळ लागेल इतकंच.

प्रत्येक विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता, सवयी, क्षमता या भिन्न आहेत, आणि प्रत्येकजण त्याच्या गतीनंच शिकतो हे सत्य आहे. या परिस्थितीत पालकांची जवाबदारीही अधिक वाढली आहे असं जाणवतं. पालकांचा सक्रिय सहभाग हा मुलांना प्रेरणादायी असावा, यासाठी घराघरात विचार केला गेला पाहिजे. ऑफिस सांभाळून अधूनमधून मुलांकडे लक्ष ठेवणं, त्यांना शिकवलेलं समजतंय का?, त्यांचं लक्ष तर विचलित होत नाहीये ना?, स्क्रीनसमोर बसल्याबसल्या ते मोबाईलवर गेम्स खेळणं, मित्रांशी चॅट बॉक्समध्ये गप्पा मारणं यासारख्या अपायकारक कृती तर करत नाहीत ना? याकडे पालकांनी लक्ष दिलं, तर हळूहळू विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यातला प्रतिरूप संवाद वाढेल. सगळेचजण या नवीन बदलाला सकारात्मकतेनं सामोरे जातील.

त्याचबरोबर घरात नवीन नियमावली करून एक वेळापत्रक तयार केलं आणि त्याप्रमाणं कृती करण्याची सवय ठेवली, तर बरेचसे ऑनलाईन शाळांबाबतचे प्रश्न हे मिटतील. काही उपाययोजना जर घरातल्या सगळ्यांनी आचरणात आणल्या, तर मुलंही त्याप्रमाणं वागतात. उदाहरणार्थ, जेवणाची, झोपेची आणि व्यायामाची एक वेळ निश्चित करणं, जरी घरी बसून शाळेत हजेरी लावायची असली, तरी शक्यतो शाळेआधी आंघोळ आवरणं; वेळापत्रकानुसार पुस्तक, वह्या, पेन, पेन्सिल असं लागणारं सामान आधीच टेबलवर किंवा जिथं अभ्यासाला बसणार आहोत तिथं एकत्र करणं. म्हणजे ऐन वेळेस धावपळ होणार नाही आणि लक्ष विचलित होणार नाही, शाळेकरता घरी बसण्याची एक जागा निश्चित असावी आणि शक्यतो भरपूर उजेड आणि खेळती हवा त्या खोलीत असावी. घरूनच तर शाळेत हजर राहायचं आहे म्हणून वाटेल तसं, मनात आलं, की काहीतरी खात खात, मध्येच टीव्ही बघत जर मुलं या शाळेकडे बघत असतील, तर त्यांचा दृष्टिकोन बदलणं आणि त्यांना योग्य कृतीची वाट दाखवणं, त्यांच्या कलानं, आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यांच्याशी संवाद साधणं या चांगल्या सवयी लावण्याकरताच्या काही क्लृप्त्या आहेत.

शहरी भागात तरी इंटरनेट, घराघरात संगणक, टॅब्ज, फोन्स हे सगळे सहज उपलब्ध आहे, या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची हातोटी पालकांकडे आहे; पण ग्रामीण भागातली परिस्थिती मात्र म्हणावी इतकी अनुकूल नसण्याची शक्यता आहे. साधा दोन जीबीचा डेटा घेण्यासाठीसुद्धा कदाचित पैसे नसल्यानं किंवा तिकडे रेंज नसल्यानं नेटवर्कमध्ये अडचणी येऊ शकतात. मग या मुलांच्या शैक्षणिक वर्षाचं पुढे काय? ते कधी सुरू होणार? मुलं मागं तर पडणार नाहीत? त्यांचं वर्ष वाया गेलं तर काय? असं एक ना अनेक प्रश्न पालकवर्गासमोर आहेत, ज्याची रोखठोक उत्तरं अजून तरी कोणाकडे नाहीत. त्यामुळं यांच्या मनातली अनिश्चिततेची, भीतीची भावना वाढतेय. वाचन, लेखन, मनन, चिंतन या मूलभूत आधारावर शालेय शिक्षणातली प्रगती अवलंबून असते, ‘माध्यम’ हे फक्त ज्ञान आत्मसात करण्याचं साधन आहे.

ग्रामीण भागात निसर्गाकडून कितीतरी गोष्टी या सहज शिकता येतात. वेगवेगळ्या उपक्रमातून, शेती, घरातली कामं, हवामानातले बदल या विषयांवर चर्चा करताकरता भूगोल, गणित, भाषा यांसारख्या विषयांचा अभ्यास हा होऊ शकतो. उदाहरणार्थ, अभ्यासक्रमातली एखादी कविता पाठ नाही झाली तरी चालेल; पण कवितेचं रसग्रहण कसं करावं, ती कशी समजून घ्यावी, त्यातली नवीन शब्दार्थ, यमक हे कसं समजून घ्यावं याबाबत जर आपण मुलांबरोबर चर्चा केली, तर कोणतीही कविता समजून घेण्याची मुलांची आकलनक्षमता वाढेल. गणितातला गुणाकार हा अभ्यासक्रमातून कमी करण्यापेक्षा जर त्यांना गुणाकार म्हणजे काय आणि तो कुठं वापरतात ही संकल्पना स्पष्ट करून, आता तुम्ही रोजच्या आयुष्यात हा गुणाकार कसा वापराल याविषयी जर विचार करायला सांगितला, तर अशा मुलांचं गुणाकार चुकण्याचं प्रमाण कमी असेल. थोडक्यात शाळेतल्या बंद भिंतींतच शिक्षण सुरू होतं असं नाही. अनेक मार्गानी सर्जनशीलतेनं, कार्यानुभवातून आपल्याला अनेक गोष्टी शिकता येतात. ती आयुष्यभर करावी अशी साधना आहे; पण या मुलांचा मानसिक दृष्टिकोन, रुची आणि शिस्त यांचा मेळ पालक आणि शिक्षकांनी मिळून घडवला, तर खऱ्या अर्थानं एक सुजाण पिढी आपण कोणत्याही भाषेतून, माध्यमातून शिक्षण देऊन घडवू शकू याची खात्री आहे. सगळे नवीन बदल हळूहळू अंगवळणी पडतात, त्यासाठी पेशन्स हवा. मुलं मुळातच चिकित्सक असतात, त्यांना सतत असं का? याचं उत्तर शोधायचं असतं.

प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंतचा काळ हा तसं म्हटलं, तर शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी जरी वेगळ्या आव्हानांचा असला, तरी जर प्रत्येकानं स्वतःतली कौशल्यं विकसित करणं, पाठ्यपुस्तकातून बाहेर पडून अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टांचा पुनर्विचार करणं, पुस्तकेतर शिक्षणाची साधनं तयार करणं, जगभरात शिक्षणक्षेत्रात काय नवीन प्रयोग केले जात आहेत यासंबंधी माहिती मिळवणं आणि मनाचं सशक्तीकरण करणं यासाठी खर्च केला, तर मला वाटतं मनातले शिक्षणविषयक गोंधळाचं चित्र पुसट होईल आणि शिक्षणाबरोबरची मुलांची आणि शिक्षकांची नाळ तुटणार नाही. असेल त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची आपल्या मनाची ताकद सारासार विचारातून वाढवण्याची आणि त्याप्रमाणं कृती करण्याची महत्त्वाची दिशा ही शिक्षणामुळंच साध्य होते. सद्यःपरिस्थितीत आपण सगळ्यांनीच धीरानं, काळजी घेत, संचारबंदीतले सर्व नियम पाळत आतापर्यंत मार्ग काढले आहेत आणि पुढंही काढू यात शंका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com