पालकत्वासाठी संधी (डॉ. मानसी देशमुख)

manasi deshmukh
manasi deshmukh

लॉकडाऊनमुळे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. यात सगळ्यांत जास्त कुचंबणा होत आहे ती पालकांची. मुलांशी कसं बोलायचं, कसं वागायचं, त्यांना एंगेज कसं ठेवायचं, मानसिक संतुलन कसं ठेवायचं असे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. या सगळ्या प्रश्‍नांबाबत मार्गदर्शन.

एक आटपाट नगर होतं. या नगरीतली मोठी माणसं, मुलं ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपापल्या कामांमध्ये व्यग्र असायची. एक दिवस या नगरीत एका भयानक विषाणूनं प्रवेश केला आणि बघताबघता माणसांच्या कामाची गती मंदावली. जीवनशैली बदलली. ऑफिसेस आणि शाळा कॉलेजेसना आपोआप सुट्टी मिळाली. परीक्षा न देता मुलं पुढच्या वर्गात गेली. आई-बाबा आणि मुलंही आपापल्या घरट्यात बंद झाली. एरवी गोष्टीसदृश भासावं असं हे वर्णन आज मात्र या कोरोनाच्या संक्रमणामुळे आपण सगळेच अनुभवतोय. अचानक मिळालेल्या या सक्तीच्या सुट्टीनं आणि बंधनांनी सगळ्यांनाच घरातल्या आणि ऑफिसमधल्या कामांशी जुळवून घेणं जरा अवघड जातंय.

दिवसभर ऑफिसमध्ये बिझी असलेले आई-बाबा आणि आठ तास शाळेत अडकलेली मुलं चोवीस तास एकमेकांच्या सहवासात आल्यानं पालकत्व निभावताना पालकांचा कस लागतोय, तर दिवसभर फक्त आणि फक्त आई-बाबा किंवा फार तर आजी-आजोबा यांच्याशी संवाद साधून साधून वेगवेगळ्या वयोगटांतली मुलं कंटाळली आहेत. सोशल मीडियावरून मित्र मंडळी, नातेवाईक यांच्याबरोबर व्हर्च्युअल गप्पा मारूनसुद्धा मनाचं समाधान होत नाहीये. काहीतरी हरवल्याची भावना प्रत्येकाच्याच मनात आहे. आणि बरीच मुलं मुली, मोठी माणसं तर स्क्रीनच्या या वापराचे गुलाम बनू लागली आहेत.
तरी कित्येक शाळा, क्‍लासेस यांनी "ऑनलाईन शिकवण्या' सुरू केल्या आहेत; पण परत स्क्रीनसमोर बसूनच शिक्षण घेणं, यात कित्येक मुलांना कृत्रिमता जाणवतेय. प्रत्यक्षात शाळा, क्‍लासेसमधले गडबड गोंधळ, गप्पा या आम्ही मिस करतो अशी बऱ्याच टीनएजर्सची खंत आहे. जी समुपदेशन करत असताना प्रकर्षानं जाणवते.
कलरिंग, ड्रॉईंग, कोडी, पत्ते, कॅरम, सापशिडी, उनो, व्यापार असे कितीतरी खेळ परत परत खेळून झाल्यावरसुद्धा मुलांची तक्रार असतेच, की आता कंटाळा आला. त्यात बिल्डिंगमधल्या बागेत खेळणं, सायकल चालवणं अशा गोष्टींवर मर्यादा आल्यानं ही बच्चेकंपनी हैराण झाली आहे. सुरवातीच्या या लॉकडाऊनच्या दिवसांमध्ये मुलांनी केलेल्या गोष्टींचे कितीतरी फोटो फेसबुकवर, सोशल मीडियावर येत होते; पण आता तर मुलं यालाही कंटाळू लागली आहेत. अशावेळी रोज काहीतरी नवा खुराक यांच्यापुढे ठेवणं हे खरं तर पालकांपुढचं आव्हान आहे. कित्येक पालक ते यशस्वीपणे करत आहेत. सगळ्यांच्याच संयमाची परीक्षा आहे. वेगवेगळ्या वयोगटांतल्या मुलांचे आणि पालकांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. त्यातल्या काही वयोगटांतल्या मुलांच्या आणि पालकांच्या प्रातिनिधिक समस्या आणि त्यावरचे उपाय समजून घेण्याचा आजच्या लेखात आपण प्रयत्न करूया.

परवाच मला साहिलच्या आईचा फोन आला. साहिल सात वर्षांचा आहे. घरात तो आणि आई-बाबा अशी तिघंच राहतात. विभक्त कुटुंबपद्धती! त्याच्या आई-बाबांना घरातून ऑफिसचं काम करावं लागतं. घरातली कामं करायला मदतनीस नसल्यानं स्वयंपाकापासून ते केर-फरशीपर्यंत सगळी कामं साहिलच्या आईलाच करावी लागतात. ती त्रासलेल्या स्वरात म्हणाली ः ""डॉक्‍टर, साहिल खूप त्रास देतो. ऑफिसचं काम चालू असताना वेगवेगळ्या गोष्टीसाठी खूप हट्ट करतो. त्यामुळे कधी कधी माझी त्याच्यावर खूप चिडचिड होते. त्याला बिझी ठेवायला काहीही ऍक्‍टिव्हिटी दिली, तरी त्याला सतत मी त्याच्याबरोबर खेळायला लागते. त्याच्याकडे लक्ष द्यावे अशीच त्याची मागणी असते. नाहीतर टीव्ही, लॅपटॉप, फोन आहेतच. काय करता येईल म्हणजे तो त्याच्या खेळात किंवा ऍक्‍टिव्हिटीमध्ये रमेल? कसं वागायचं नेमकं साहिलशी?''
खरं तर हा प्रश्न सध्या बहुतांश पालकांना सतावतोय. सुजाण पालक म्हणून आपण या लहान मुलांना अनेक बाजूंनी समजावून घेण्याची गरज आहे; पण या सहा ते दहा वर्षं वयोगटातल्या लहान मुलांना फार अभ्यास नसल्यानं आणि बऱ्याच मुलांना पाळणाघरात किंवा समूहाबरोबर राहण्याची सवय असल्यानं या मुलांचं नेहमीचं रुटीन बदललं आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. रोज त्यांच्या वयाच्या मुलांबरोबर खेळणं, नवीन गाणी, गोष्टी ऐकणं, मोकळ्या हवेत मैदानी खेळ खेळणं हे सगळंच अचानक थांबलं आहे, त्यामुळे यांची भावनिक आणि मानसिक भूक भागत नाहीये. मुलांच्या मनात डोकावायचं असेल, तर त्यांच्याशी मनानं एकरूप होणं, त्यांच्या भावनाविश्वाशी जोडलं जाणं गरजेचं. त्यांचं म्हणणं ऐकणं महत्त्वाचं. मी असं म्हटल्यावर त्याची आई म्हणाली ः ""म्हणजे मी त्याला सतत गोष्टी नाही सांगू शकत, ऑफिसच्या कामावर त्याचा परिणाम होतो.''
मी त्यांना शांतपणे म्हटलं ः ""ऑफिसच्या कामावर याचा परिणाम न होऊ देतादेखील आपल्याला हे करता येऊ शकतं. म्हणजे बघा हं, आपण घरातल्या सगळ्यांचं रुटीन हे ऑफिस आणि शाळेच्या वेळांप्रमाणंच ठेवायचं. वेळेवर झोपणं, उठणं, व्यायाम या सवयी मोडायच्या नाहीत आणि जर असं करत नसू, तर त्या सवयी प्रयत्नपूर्वक अंगी भिनवाव्यात. साहिललासुद्धा आपल्या कृतीतून काही गोष्टी ठामपणे कळू शकतील असं बोलायचा आणि त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करावा.''

काही सहज सुचलेल्या उपाययोजना :
ऑफिसच्या कामाच्या वेळी पालकांनी आपली बसण्याची जागा, खोली निश्‍चित करावी. ती सतत बदलू नये.
स्वयंपाकाचं काम सकाळच्या वेळी म्हणजे शक्‍यतो ऑफिसच्या आधी आटोपता तसं आटोपावा. जे जास्तीचं काम आता करायला लागत आहे ते घरातल्या सगळ्यांना सहभागी करून घेऊन संध्याकाळी करायचं वेळापत्रक करावं. यात मुलांची मदत घेताच येते. उदाहरणार्थ- पाककला, घरातली आवराआवरी, भांडी पुसणं, लावणं यांसारख्या अनेक कामांमध्ये आपण त्यांना सहभागी करून घेऊ शकू. ही कामं करताना त्यांच्याबरोबर सुसंवाद साधा. संवाद महत्त्वाचा, प्रत्येक वेळी मुलांना सूचना देणं, उपदेश करणं टाळावं.
या नियमितपणामुळे मुलांनाही आई-बाबा सध्या घरातून ठराविक वेळेत ऑफिसचं काम करतात याची सवय होईल.
ऑफिसच्या कामाच्या वेळी मुलांनाही वेगळ्या जागी हे तुझं ऑफिस किंवा काम करायची, खेळायची जागा असं सांगावं. ती जागा छान रंगीबेरंगी, त्यांनी काढलेल्या काही चित्रांनी किंवा तक्‍त्यानी सजवावी. आपण कामात असताना, त्यांच्याकडे अधूनमधून लक्ष द्यावं. त्यांच्याशी डोळ्याला डोळे भिडवून बोलणं आणि बोलताना त्यांना वास्तवाचं भान देणं गरजेचं आहे.
आईचं आपल्याकडे लक्ष आहे, ती ऐकतेय ही भावनासुद्धा या मुलांना सुखावून जाते. मुळात त्यांच्या मनातल्या एकटेपणाची, असुरक्षिततेची भावना कमी होण्यास मदत होते. त्यांना लगेच झिडकारू नये. आपल्या प्रतिक्रिया ते निरखत असतात. हसत, खेळत जर आपण त्यांच्याबरोबर सुसंवाद साधला, त्यांच्या हाकेला प्रतिसाद दिला, त्यांना प्रेरणा दिली, त्यांनी चांगलं काम केल्यावर छोटंसं बक्षीस दिलं, तर ही मुलं सतत त्रास देण्याचं प्रमाण काही अंशी तरी कमी होईल.
बोलताना कोणतीही गोष्ट फुगवून किंवा त्याचं महत्त्व कमी करून सांगू नये. सत्य परस्थिती जर मुलांपुढे ठेवली आणि त्यांनाही तू कसं वागशील या प्रसंगात? असा विचार करायला लावला तर त्यांची विचारशक्ती वाढेल. त्यांच्यावर छोट्या छोट्या कामांची जबाबदारी दिल्यानं त्यांचा आत्मविश्वास वाढेल. "मीसुद्धा घरातली जबाबदार व्यक्ती आहे,' अशी भावना त्यांच्या मनात रुजेल. मात्र, असं करताना, आई आणि बाबा यांच्यात एकमत असणं खूप गरजेचं आहे.
ऑफिसमधल्या कामाचा ताण मुलांना समजत नाही; पण त्यांना जर त्यांच्या भाषेत समजावलं, तर त्यांना कामाचं महत्त्व आणि ते नाही केलं, तर आई-बाबांनासुद्धा कोणीतरी ओरडू शकतं हे समजू शकेल. "तू अभ्यास केला नाहीस, तर तुला कशा बाई ओरडतात शाळेत, तसंच मलाही काम नाही केलं, तर ओरडा बसेल,' असं स्पष्ट शब्दांत सांगणं हिताचं.
मुलांच्या भावना ओळखून, त्यांना योग्य ते नाव देऊन, त्या भावनेचा स्वीकार करण्यासाठी पालकांनी मुलांना मदत करायला हवी. हे भावनिक बुद्धिमत्ता विकसनाचं तंत्र मुलांबरोबर खेळताना वापरा. ज्यामुळे भावनांच्या छटांचे रंग मुलांना समजतील. दुसऱ्यांचं मन समजून घेणं, विचार ऐकणं असे कितीतरी फायदे मुलांना आपोआप मिळतील.

पालकत्व ही एक कला आहे, त्याचे ठोस नियम नाहीत; पण जर कल्पकतेनं आपण या बालमनाशी जोडले गेलो, थोडा वेगळा विचार केला आणि खेळण्यामध्ये विविधता आणली, तर ही लहान मुलंसुद्धा आपल्याशी घट्ट जोडली जातील, आपल्याला समजून घेतील, अपेक्षित सहकार्य करतील. क्वालिटी टाईम हा आपण अशा अनेक युक्‍त्या लढवून मुलांना देऊ शकू. न मागता देवानं आपल्याला एक सुवर्णसंधी दिली आहे आपल्याच मुलांच्या मनात डोकावायची. त्याचं सोने करूया या लॉकडाऊनमध्ये!
पंधरा वर्षांची सानिका समुपदेशन चालू असताना मला म्हणाली ः ""आजकाल ना माझे बाबा सतत चिडचिड करतात. मी जरा टीव्ही बघत बसले, की लगेच वेळ वाया घालवू नकोस, काहीतरी शिक, कामं कर, सतत मैत्रिणीशी फोनवर बोलू नकोस अशा एक ना दोन अनेक सूचना करत असतात. जर त्यांचं ऐकलं नाही, तर घरात प्रत्येकावर रागावतात. अगदी आजी-आजोबांवर पण चिडतात. आधी ते एवढे चिडायचे नाहीत; पण आजकाल या लॉकडाऊनमध्ये त्यांची चिडचिड वाढली आहे. माझ्यापेक्षा त्यांना समुपदेशनाची गरज जास्त आहे. तुम्ही प्लिज त्यांच्याशी बोलाल का एकदा?'' मी तिला तिच्या बाबांशी मी बोलीन, असं सांगितलं आणि दोन दिवसांनी त्यांच्याशी बोलले.
सानिकाचे बाबा एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्‌द्‌यावर गेली बारा वर्षं काम करत आहेत. ते म्हणाले ः ""सध्या अमेरिकेत क"ोरोनाचं थैमान सुरू असल्यानं आमच्या कंपनीतला आर्थिक फटका बसतोय. पुढं कसं होणार याची सतत चिंता वाटते मला. मला कळतंय की या ताणामुळे सध्या माझी सगळ्यांवर चिडचिड होते. सानिका पण त्यामुळे माझ्यावर नाराज असते. पण या चिंतेनं मला काही सुचत नाही आणि कामावरचा राग घरात निघतो.''

पालकांपुढच्या आव्हानांचा विचार केला, तर अनिश्‍चितता, आर्थिक नियोजनापुढचं संकट, नोकरी टिकवणं, घराची जबाबदारी यासारख्या अनेक समस्या सध्या समस्त पालकवर्गापुढे आहेत हे नक्की; पण आपण या परिस्थितीत आपल्या नियंत्रणात असलेल्या घटकांचा सारासार विचार करण्याची सवय ठेवली, तर आपले विचार टोकाला वाहवत जाण्याचं प्रमाण कमी होईल. पर्यायी नकारात्मक भावना कमी होऊन शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य निरोगी राहील. घरट्यातली शांतता टिकून राहील.
परिस्थितीला किंवा माणसांना दोष न देणं हे पथ्य पाळणंही मानसिक संतुलन टिकवू शकेल. सगळ्यांनाच या "न भूतो न भविष्यती' अशा परिस्थितीचा सामना करायचा आहे. यात आपण एकटे नाही. त्यामुळे सतत चिंता करण्यापेक्षा जर सम्वयस्कांबरोबर, ऑफिसमधल्या सहव्यावसायिकांबरोबर चर्चा केली, तर मार्ग सापडणं सोपं होईल. पुढचे मार्ग दिसले, की मन आशावादी, सकारात्मक बनेल आणि यशाची नवी क्षितिजं गाठण्यासाठी आपण पुन्हा एकदा सज्ज होऊ. अगदी फिनिक्‍स पक्ष्याप्रमाणं! सानिकाच्या बाबांना हे सगळं पटत होतं. आता स्वतःचे विचार तपासण्यासाठी आणि त्यांना विवेकाच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी ते तयार होते. काही दिवसात त्यांची चिडचिड, संताप कमी झाल्याचं सानिकानं सांगितलं. ते घर पुन्हा एकदा आनंदी भावनेच्या, सकारात्मक लाटेत चिंब भिजलं.

किशोरवयीन मुलांच्या बाबतीत तर वाढलेला स्क्रीन टाईम, पालकांचं न ऐकणं, रात्री उशिरापर्यंत गेम्स खेळणं, कमी खाणं किंवा जास्त खाणं, तासन्‌तास टीव्हीसमोर बसून जेवणं, आजचं काम उद्यावर ढकलणं असे एक ना अनेक वर्तनातले प्रश्न पालक मांडत असतात. या मुलांमध्ये अनेक शारीरिक, मानसिक आण भावनिक स्थित्यंतरं होत असतात. मेंदूतले निओ कॉरटेक्‍स, फ्रंटल कॉर्टेक्‍स हे भाग विकसनाच्या टप्प्यात असतात. त्यामुळे असेही भावनांमधले चढ-उतार, आक्रमकतेनं घेतलेले निर्णय, काय चांगलं काय वाईट हे पारखून विचार करण्याच्या क्षमतेचा अभाव हे प्रश्नार्थक जाळं यांच्याभोवती असतं.

या वयोगटातल्या मुलांची मानसिकता समजावून घेताना यांच्यातले हे नैसर्गिक बदल, मेंदूची रचना आणि विकसित कार्यांची ओळख करून घेणं पालकांसाठी उपयुक्त ठरतं. कारण मगच यांच्याशी कसं वागावं याचं उत्तर मिळतं. काही गोष्टी सोडून देणं आणि योग्य वेळी त्या सोडलेल्या गोष्टींविषयी मुलांशी बोलणं, त्यातील चूक आणि बरोबर हे आपण न सांगता मुलांना ओळखता येतंय का ते बघणं. असं केल्यानं प्रतिक्रिया आणि परिणामांची साखळी त्यांना उलगडू देणं. आपला फायदा कशात आहे आणि तो कसा करून घ्यावा याविषयी त्यांच्याशी चर्चा करणं, हे नेहमी करा.

या मध्यमवर्गीय आव्हानांसारखीच निम्न आर्थिक स्तरातल्या कुटुंबांपुढची आव्हानं तर खूप वेगळी आहेत. या बंदिशाळेनं दोनवेळचं खाणं मिळवणंसुद्धा कठीण केलं आहे. कित्येक मजूर, रोजंगार यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.धड गावाला जाता येत नाहीये, ना इथं जगता येतंय. कित्येक मजूर चिंतेत आहेत. त्यांच्यापेक्षा इतरांची परिस्थिती तरी नक्कीच बरी आहे! त्यामुळे थोडीफार बचत करून, काटकसर करून आपण यातून मार्ग काढू शकू. त्यामुळे माझ्याकडे काय नाहीपेक्षा "माझ्याकडे काय आहे' याचा विचार या बंद घरातल्या मनांना उद्याचा दिवस बघण्याचं बळ देईल हे निश्‍चित!

साहिलची आई असो किंवा सानिकाचा घरातल्या माणसांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न असो- या चार भिंतीत जर घरातलं घरपण टिकवायचं असेल, तर पालकांनी मुलांवर निरपेक्ष प्रेम करणं आणि ते कृतीतून दाखवणं याची गरज आहे. इथं मला खलील जिब्रानचे शब्द स्मरतात :
Your children are not your children
They are the sons and daughter of lifes longing for itself
They have come through you, not form you
Give them love, not your thoughts
अविवेकी विचारांची वादळी नौका घरात वल्हवण्यापेक्षा विवेकी विचार, भावना, वर्तन यांचा सजगतेनं केलेला वापरच आपल्याला या आव्हानातून तरायला दीपस्तंभ बनून दिशा दाखवेल अशी खात्री वाटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com