नवी आरोग्य चळवळ (डॉ. निखिल फडके) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dr nikhil phadke

नवी आरोग्य चळवळ (डॉ. निखिल फडके)

भारतात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळं सरासरी दर आठ मिनिटांना एका महिलेचा मत्यू होतो. ह्युमन पॅपिलोमा वायरस म्हणजे एचपीव्हीसंदर्भातल्या चाचण्या केल्या, तर या प्रकारच्या कर्करोगाचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी होऊ शकतं. या चाचण्यांचा नेमका काय उपयोग होऊ शकतो, त्याच्या संदर्भात काय काम सुरू आहे, त्यासाठी आय-शेअर ही संस्था काय प्रयत्न करते आहे आदी गोष्टींवर एक दृष्टिक्षेप.

ह्युमन पॅपिलोमा वायरस (Human Papilloma Virus - एचपीव्ही) हा विषाणू पुरुष आणि महिला या
दोन्हींमध्ये होणाऱ्या सर्व्हायकल (cervical), ॲनल (anal), व्हजायनल (vaginal), व्हल्वर (vulvar) आणि काही ओरोफॅरिंजिअल (oropharyngeal) या प्रकारच्या कर्करोगांच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण आहे. या एचपीव्ही विषाणूंच्या आढळणाऱ्या एकूण प्रजातींपैकी काही प्रजाती कमी धोकादायक, तर काही अती धोकादायक असतात. यापैकी कोणत्या विषाणूंची बाधा झाली आहे त्यावरून कर्करोगाची तीव्रता ठरवता येते.

एचपीव्ही विषाणूंमुळे होणारा सर्व्हायकल कॅन्सर (Cervical cancer) म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा भारतीय महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे. भारतामध्ये दर वर्षी या प्रकारच्या कर्करोगाच्या सुमारे एक लाख केसेस उजेडात येतात आणि त्यांपैकी अंदाजे ६० टक्के महिलांचा या कर्करोगामुळं मृत्यू होतो. म्हणजेच भारतात सर्व्हायकल कॅन्सर मुळे सरासरी दर आठ मिनिटांना एका महिलेचा मत्यू होतो. मात्र काही देशांमध्ये- उदाहरणार्थ, ऑस्ट्रेलियामध्ये पुढच्या वीस वर्षांत या प्रकारच्या कर्करोगाचं समूळ उच्चाटन होईल असं सांगितलं जात आहे. तसंच अमेरिकेत हा रोग होऊनही किमान पाच वर्षं किंवा त्यापेक्षा जास्त काळ जगणाऱ्या महिलांचं प्रमाण (फाइव्ह-इअर सर्व्हायवल रेट) ९२ टक्के आहे- हेच प्रमाण भारतात ४७ टक्के इतकं आहे. या कर्करोगाचा प्रतिबंध करता येऊ शकतो (प्रिव्हेंटेबल कॅन्सर) आणि त्यामुळे होऊ शकणारे मृत्यूदेखील टाळता येऊ शकतात. या प्रकारचा कर्करोग टाळण्यासाठी दोन गोष्टी उपयुक्त ठरू शकतात : पौगंडावस्थेतल्या मुलींमध्ये एचपीव्हीचं लसीकरण करणं आणि प्रौढ महिलांच्या या कर्करोगासंदर्भातल्या चाचण्या (सर्व्हायकल कॅन्सर स्क्रीनिंग) करणं. या दोन्ही गोष्टींची प्रभावी अंमलबजावणी केली, तर या शतकाच्या अखेरपर्यंत या प्रकारच्या कर्करोगाचं उच्चाटन करता येऊ शकतं. जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्ल्यूएचओ) या संदर्भात काही उद्दिष्टं निश्चित केली आहेत आणि ती सन २०३०पर्यंत साध्य होणं अपेक्षित आहे. ही उद्दिष्टं म्हणजे -
- पंधराव्या वर्षापर्यंतच्या नव्वद टक्के मुलींचं संपूर्ण लसीकरण करणं
- वयाच्या पस्तिसाव्या आणि पंचेचाळिसाव्या वर्षी सत्तर टक्के महिलांच्या अचूक निदान करणाऱ्या चाचण्या करणं
- गर्भाशयाशी संबंधित आजार झालेल्यांपैकी नव्वद टक्के महिलांना उपचार आणि शुश्रूषा उपलब्ध करून देणं

भारतात सध्या लसीकरणाचं प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी आहे आणि चाचण्या होण्याचं प्रमाणही पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे. याचा अर्थ देशातल्या एकूण महिलांपैकी ४५.३ कोटी महिलांनी लसीकरणाचं वय ओलांडलं आहे आणि गर्भाशयाचा कर्करोग होण्याच्या शक्यतेच्या कक्षेत त्या आहेत. (यातही लसीकरणाचं वय ओलांडणाऱ्या मुलींची संख्या दर वर्षी एक कोटीनं वाढतच जाईल.) त्यामुळे अशा महिलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची वाजवी दरामध्ये कर्करोगासंबंधी चाचणी करणं अत्यावश्यक आहे.

एचपीव्ही विषाणूंमुळे होणारा सर्व्हायकल कॅन्सर हा हळूहळू बळावत जाणारा आजार आहे. परंतु फक्त एचपीव्ही विषाणूंची बाधा झाली आहे म्हणून कर्करोग झालाच आहे असं नाही; पण अशा वेळी तातडीनं योग्य उपचार केले नाहीत, तर मात्र दहा ते वीस वर्षांच्या काळात त्याचं पर्यवसान कर्करोगामध्ये होऊ शकतं. त्यामुळं जमेची बाजू, ही की या कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी; तसंच चाचण्या आणि उपचार यांच्यासाठी पुरेसा कालावधी हाताशी असतो. या कर्करोगाचा संभाव्य धोका ओळखण्यासाठी, पॅप स्मिअर (Pap smear), लिक्विड-बेस्ड सायटॉलॉजी (L.B.C.), व्हिज्युअल इन्स्पेक्शन विथ असेटिक ॲसिड (V.I.A.) म्हणजे प्रत्यक्ष पाहणी, एचपीव्ही टेस्टिंग बाय डीएनए (जनुकीय चाचणी) यांसारख्या चाचण्या उपलब्ध आहेत. त्यापैकी ‘एचपीव्ही टेस्टिंग बाय डीएनए’ या चाचणीद्वारे केलेलं निदान जास्त अचूक मानलं जातं, आणि जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) या चाचणीची शिफारस केली आहे. या प्रकारच्या चाचणीमुळे कोणत्या महिलांमध्ये भविष्यात सर्व्हायकल कॅन्सरशी निडित व्याधी उद्‍भवू शकतात हे वेळीच कळू शकतं, आणि त्याचप्रमाणं अतिधोकादायक विषाणूंची बाधा झाली आहे का, हेदेखील सहजपणे ओळखता येतं. मात्र, या (एचपीव्ही टेस्टिंग बाय डीएनए) जनुकीय चाचणीसाठी येणारा खर्च हा इतर चाचण्यांच्या तुलनेत अधिक असतो.

विकसनशील देशांमध्ये एखादी चाचणी किंवा आरोग्य सेवा व्यापक स्वरूपात (देश/राज्य पातळीवर) राबवायची असेल तेव्हा, त्या चाचणीची अचूकता आणि त्यासाठी येणारा खर्च यांचा किफायतशीर मेळ घालण्यासाठी इन्क्रिमेंटल कॉस्ट ऑफ एफ्फेक्टिव्हन्स रेशोच्या (आयसीईआर) निकषांचा आधार घेतला जातो. तसंच आयसीईआरच्या निकषांच्या आधारे एखादी योजना राबवल्यानंतर होणाऱ्या अतिरिक्त खर्चाच्या बदल्यात एखाद्या व्यक्तीचं आयुर्मान वाढण्यास किती मदत होते हेही पाहिलं जातं, याला त्या योजनेचं ‘आयसीईआर मूल्य’ म्हणतात. त्यामुळं एखाद्या आरोग्य सेवेचं/ चाचणीचं आयसीईआर मूल्य हे देशाच्या प्रती व्यक्ती एकूण देशांतर्गत उत्पन्नापेक्षा (जीडीपी) कमी असेल, तर ती चाचणी व्यापक स्वरूपात राबवण्यास योग्य समजली जाते. थोडक्यात चाचण्यांमुळं वाचवलेल्या प्राणांमुळं (इयर ऑफ लाईफ सेव्हड - आयएलएस) एकूण देशांतर्गत उत्पादनामध्ये (जीडीपी) घातलेली भर याच्यापेक्षा चाचणीसाठीचा खर्च हा कमी आहे, असा त्याचा अर्थ होतो. आयसीईआर मूल्यांकनाच्या आधारे जेव्हा एचपीव्ही संदर्भात उपलब्ध असलेल्या चाचण्यांची तुलना केली असता, असं लक्षात आलं की (एचपीव्ही टेस्टिंग बाय डीएनए) जनुकीय चाचणी इतर चाचण्यांपेक्षा (व्हीआयए आणि एलबीसी टेस्टपेक्षा) सर्वच बाबतीत सरस आहे. उदाहरणार्थ, समजा एखाद्या व्यक्तीचं किमान आयुर्मान ६० वर्षं आहे तर, त्या व्यक्तीनं वयाच्या चाळिसाव्या वर्षी एचपीव्हीची जनुकीय चाचणी एकदा केली तरी पुरेशी असते. याविरुद्ध जर इतर चाचण्या केल्या तर तिसाव्या, चाळिसाव्या आणि पन्नासाव्या वर्षी अशा तीन वेळा चाचण्या कराव्या लागतील. विशेष म्हणजे आयसीईआरच्या दृष्टिकोनातून जर आपण सर्व्हायकल कॅन्सरच्या चाचण्यांच्या अर्थकारणाचा विचार केला, तर मिळणारे निष्कर्ष (फायदे) उल्लेखनीय आहेत. चाचणीसाठी एक रुपया खर्च करण्यानं जीडीपीमध्ये दहा रुपये भर पडू शकते, असं त्यातून दिसतं.

आपण समजा पुणे जिल्ह्यातल्या ३५ आणि ४५ या वयोगटातल्या (डब्ल्यूएचओच्या शिफारशींनुसार) महिलांच्या चाचण्या करायच्या म्हटल्या, तर आपल्याला प्रत्येक वर्षी ९१ हजार महिलांच्या चाचण्या करायला लागतील. कॅंपोस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रकाशित केलेल्या शोधनिबंधानुसार, आपण सर्व्हायकल कॅन्सरची शक्यता ४१ टक्क्यांनी कमी करू शकतो. देशभराचा विचार केला, तर दर वर्षी १.८ कोटी महिलांच्या चाचण्या करायला लागतील आणि त्यातून हजारो जीव वाचू शकतील. हे कुटुंबासाठी, समाजासाठी आणि एकूण अर्थव्यवस्थेसाठीसुद्धा खूप महत्त्वाचं योगदान असू शकेल.

या सगळ्या गोष्टींचा विचार करून, आरोग्यविषयक संशोधन आणि शिक्षणासाठी नावीन्यपूर्ण गोष्टी विकसित करण्याच्या ध्येयातून स्थापन झालेल्या आय-शेअर या आमच्या स्वयंसेवी संस्थेनं, डब्ल्यूएचओच्या उद्दिष्टांच्या अनुसार भारतात सर्व्हायकल कॅन्सरचं प्रमाण कमी करण्‍याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्हाला अनेक सहकाऱ्यांची साथ लाभली आहे. आमच्या सहकाऱ्यांमध्ये, मेडिकल मोबाईल व्हॅनच्या (फिरता दवाखाना) माध्यमातून शहरी आणि दुर्गम ग्रामीण भागातील महिलांना आरोग्य सेवा पुरवणारी पुण्यातील प्रयास संस्था; भारतातल्या अग्रगण्य वैद्यकीय महाविद्यालयांपैकी एक असलेलं बीजे वैद्यकीय महाविद्यालय; जनुकीय दोष, संसर्गजन्य रोग आणि कर्करोग यांच्या निदानासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्याचं उद्दिष्ट असलेली जीनपॅथ डायग्नॉस्टिक्स ही मॉलिक्युलर डायग्नोस्टिक्स कंपनी; तज्ज्ञ डॉक्टरांचं पॅनेल; तसंच घारडा केमिकल्स (सीएसआर पार्टनर) यांचा समावेश आहे. एचपीव्ही विषाणूंचं निदान करणारी अत्याधुनिक जेनेटिक टेस्ट (जनुकीय चाचणी) फक्त आर्थिकदृष्ट्या प्रगत समाजापर्यंत मर्यादित न राहता, ती समाजातल्या प्रत्येक स्तरापर्यंत पोचावी हा आमचा उद्देश आहे. ही सेवा ग्रामीण आणि शहरी भागातल्या रुग्णांपर्यंत रास्त दरात पोचवली आणि त्याद्वारे समोर आलेल्या पॉझिटिव्ह केसेसचा नियोजनबद्ध पद्धतीनं पाठपुरावा केला, तर रुग्णांचं आयुष्यमान वाढेल आणि पर्यायानं त्यांच्या कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थितीवर चांगला परिणाम होईल.

आमच्या नियोजनानुसार, पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही पुणे जिल्ह्यातल्या दहा हजार महिलांच्या चाचण्या करणार आहोत. या उपक्रमाला सुरवात केल्यापासून आम्हाला मिळालेला प्रतिसाद खूप आश्वासक आहे. पहिल्याच महिन्यामध्ये प्रयास हेल्थ ग्रुपच्या टीमनं ५५२ महिलांच्या अत्याधुनिक आणि अचूक अशा (एचपीव्ही डीएनए टेस्ट) जनुकीय चाचण्या विनामूल्य करून घेतल्या आहेत. त्यातून पॉझिटिव्ह निष्कर्ष आलेल्या महिलांचा, प्रयास हेल्थ ग्रुपची टीम डब्ल्यूएचओच्या नियमावलीनुसार पाठपुरावा (फॉलोअप) करत आहे आणि त्यांना मार्गदर्शन करत आहे. या उपक्रमामध्ये समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांतून आलेल्या महिलांच्या चाचण्या करण्यात येणार आहेत, यामुळे अशा महिलांच्या आर्थिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक परिस्थितीवर होणारे परिणाम दूरगामी आणि आश्वासक आहेत.

आमच्या या विधायक प्रयत्नांना बळ देण्यासाठी आणखी बऱ्याच जणांच्या साथीची गरज आहे. आमचा हा प्रयत्न समाजातल्या तळागाळातल्या, ग्रामीण तसंच शहरातल्या प्रत्येक महिलेपर्यंत पोचवण्यासाठी सरकारच्या आणि स्वयंसेवी संस्थांच्या साह्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणं या चाचण्या करण्यासाठी लागणाऱ्या संबंधित किट्सचे आणि उपकरणांचे उत्पादक यांचा सहभाग मिळणंही खूप मोलाचं आहे. ज्यायोगे आम्ही रुग्णांना सोसावे लागणारे खर्च कमी करण्यासाठी काही नावीन्यपूर्ण गोष्टी विकसित करू शकू. तसंच या चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह निष्कर्ष येणाऱ्या महिलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मदतीचीही मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. या अभिनव अशा उपक्रमाद्वारे सर्व्हायकल कॅन्सरनं बाधित कमीत कमी एक लाख महिलांना उपचार उपलब्ध करून देणं हे आमचं उद्दिष्ट आहे. या आर्थिक वर्षांमध्ये एवढं मोठं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अंदाजे १५ कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे. या उपक्रमाला पाठबळ देऊ शकणारे सीएसआर उपक्रम, वैयक्तिक देणगीदार; गरजू रुग्णांना सेवा देण्यासाठी मदत करू शकणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि रुग्णालयं या सर्वांच्या मदतीचं स्वागत आहे. तुम्ही आम्हाला isharefoundation@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क करू शकता.

संदर्भ : 1. Global Strategy Towards the Elimination of Cervical Cancer as a Public Health Problem - https://www.who.int/docs/default-source/documents/cervical-cancer-elimination-draft-strategy.pdf?sfvrsn=380979d6_4
2. When and how often to screen for cervical cancer in three low- and middle-income countries: A cost-effectiveness analysis; Campos et al., Papillomavirus Res. 2015 Dec; 1: 38-58.

सर्व्हायकल कॅन्सरसंदर्भातली आकडेवारी
- भारतात दर वर्षी उजेडात येणाऱ्या केसेसची संख्या - ९६,९२२ (जागतिक आकडेवारीच्या १८ टक्के)
- भारतात या कर्करोगामुळं होणारे मृत्यू - ६०,०७८ (जगभरात होणाऱ्या मृत्यूंपैकी २० टक्के)
- लसीकरण झालेल्या महिला आणि मुली - पात्र संख्येच्या एक टक्क्यापेक्षाही कमी
- चाचण्या झालेल्या महिला - पाच टक्क्यांपेक्षाही कमी (ऑस्ट्रेलियामध्ये हेच प्रमाण नव्वद टक्के इतकं आहे.)
- हा कर्करोग होण्याच्या शक्यतेच्या कक्षेत असलेल्या महिलांची संख्या - ४५,३०,२०,०००
- हा रोग होऊनही किमान पाच वर्षं जगण्याचं प्रमाण - ४७ टक्के (अमेरिकेत हेच प्रमाण ९२ टक्के इतकं आहे)

Web Title: Saptarang Dr Nikhil Phadke Write Hpv Vaccine Article

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top