कळीला फुलू द्या... (डॉ. नीलिमा घैसास)

dr nilima ghaisas
dr nilima ghaisas

या वर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लग्नासाठीच्या मुलींच्या किमान वयाबाबतच्या अटीमध्ये नजीकच्या काळात बदल करता येईल, असं सूतोवाच केलं. मुलींचं लग्नाचं वय १८वरून २१ करण्यानं त्याचे काय पडसाद उमटतील, प्रश्न सुटतील की वाढतील, याबाबतचा इतिहास काय सांगतो, समाजानं नक्की कशा पद्धतीनं विचार करणं आवश्यक आहे आदी गोष्टींबाबत मंथन.

श्रावणी... आमची जुनी पेशंट. आमच्या हॉस्पिटमध्ये १८-१९ वर्षांपूर्वी तिची डिलिव्हरी झाली होती. नंतरही तिच्या अगर तिच्या मुलीच्या-श्रेयाच्या किरकोळ तक्रारींसाठी येत असते. श्रावणी आणि तिची मुलगी दोघीही लाघवी असल्यानं तेव्हा आमच्या थोड्या इतरही गप्पा होतात. आज असाच श्रावणीचा फोन आला : ‘‘मॅडम, तुमच्याकडं थोडं पर्सनल काम आहे. त्यासाठी श्रेयाला बरोबर घेऊन मी आणि श्री (श्रावणीचा पती श्रीनिवास) तुम्हाला भेटायला येत आहोत.’’ सर्व पेशंट संपल्यावर हे त्रिकूट आत आलं. श्रेया- १८-१९ वर्षांची सुंदर, एरवी खळखळून हसणारी; पण आज मात्र अगदी धास्तावलेला चेहरा, मान खाली घालून बसलेली. मी जुजबी चौकशी करू लागले. तरी ती काही नजरेला नजर देईना. माझं अनुभवी मन सांगू लागलं, की ‘ही मुलगी काहीतरी प्रेमप्रकरण करून आता प्रेग्नन्सी घेऊन आलेली असावी.’ पण चौकशी केली, तर तसं काही नव्हतं. मग श्रावणीनंच विषयाला हात घातला : ‘‘श्रेयाचं आता अठरा वय पूर्ण झालं आहे. तशी ती बीएच करते आहे. म्हणजे अगदी फार ग्रेट शिक्षण चालू आहे असं नाही. तिला ओळखीतूनच एक अगदी चांगलं स्थळ चालून आलं आहे. मुलगा एमटेक झालेला आहे. तिशीचा आहे. वय थोडं जास्त आहे; पण चांगला शिकलेला आहे आणि अफाट श्रीमंतदेखील आहे. तर ही आता इतक्‍यात लग्न नको म्हणते आहे. तिला वाटतं आहे, की अजून तिचं वय लहान आहे. शिक्षण बाकी आहे... पण मी म्हणते, आज लग्न केलं काय आणि अजून चार-पाच वर्षांनी केलं काय... काय असा मोठासा फरक पडणार आहे? शिवाय अगदी बीए होऊन काय मोठे दिवे लावणार आहे? पुढं मात्र शोधूनही असं स्थळ सापडणार नाही. ती आमचं ऐकत नाही. तेव्हा तुम्हीच काय ते समजावून सांगा.’’ श्री मनापासून श्रावणीच्या बोलण्याला दाद देत होता. म्हणजे त्यालाही श्रावणीचं बोलणं अगदी पटत होतं तर...!

मी मात्र श्रावणीचे विचार ऐकून पुरती हादरून गेले. मला स्वतःलाच तिचे विचार पटत नव्हते. हा सगळा प्रसंग आठवला, तो मुलींचं लग्नासाठीचं वय १८वरून २१ असं करण्याबाबत सरकारकडून सुरू झालेल्या चर्चेमुळे. खरंच असं झालं, तर मुलीचा शारीरिक, बौद्धिक, भावनिक विकास अधिक होऊ शकेल. बदलत्या जीवनशैलीमुळे लग्नानंतर जी अनेक सामाजिक आव्हानं पेलावी लागतात, संकटांना तोंड द्यावं लागतं ते सर्व ती अधिक प्रगल्भतेनं करू शकेल.

वैद्यकीयदृष्ट्या आपण थोडं खोलात जाऊन मुलीत वयपरत्वे होणाऱ्या आणि विवाहाशी संबंधित असलेल्या शारीरिक बदलांचा आढावा घेऊ. विवाह म्हटलं, की शारीरिकदृष्ट्या स्त्री-पुरुष संबंध याचा विचार करावा लागेल. १८ वयापेक्षा २१ वयानंतर याची माहिती मुलीला जास्त चांगली असू शकते. त्यामुळं ती एकदम घाबरून जाणार नाही. शिवाय वय थोडं वाढल्यानं ती विचारानं अधिक परिपक्व होईल. मग हे संबंध म्हणजे फक्त शारीरिक न राहता त्यात तिची भावनिक गुंतवणूकही जास्त होईल आणि त्यामुळं मनोशारीरिक दृष्टीनं दोघांसाठीही अधिक आनंददायी ठरेल आणि त्यावर उत्तम वैवाहिक जीवनाचा पाया रचला जाईल.

एकदा ग्रामीण भागातले सासू-सासरे त्यांच्या सोळा वर्षाच्या सुनेला घेऊन आले. तक्रार काय तर, ‘‘आमचा मुलगा बिजवर, छत्तीस वय, पहिली बायको गेली म्हणूनशान ही दुसरी केली. हिच्या माहेरी हिला धड दोन घास पन भेटत नव्हते. एवढी गरीबी. हितं पाहिजे त्ये समदं खायला हाय. अगदी ओ येईपर्यंत. पण बघा कसं अंगात आल्यावानी करतीया. आमच्या पोराला अंगाला हात बी लावू देत नाही. जरा नीट तपासा...’’ हा केवळ तिचं अगदी कोवळ्या वयात लग्न केल्याचा दुष्परिणाम होता.

लग्नानंतर पुढचा मुद्दा येतो तो प्रेग्नन्सीचा. मेडिकल सायन्स सांगतं, की ‘reproductive efficacy’ ही २० ते २५ या वयात सर्वांत कमाल पातळीवर असते. (संदर्भ : डी. सी. दत्ता) याआधी प्रेग्नन्सी राहिली, तर तिच्यातला धोक्याचा संभव जास्त (high risk) असतो. Toxaemea चं प्रमाण (ब्लड प्रेशर वाढणं, सूज येणं, युरिनमधून प्रोटि‌न्स जाणं, क्वचित प्रसंगी झटके येणं) लहान वयात जास्त असतं. शिवाय सिझेरिअन सेक्‍शनची शक्‍यताही वाढते. Uterine inertia म्हणजे डिलिव्हरीच्या कळांसाठी लहान वयात गर्भाशय चांगला रिस्पॉन्स देईलच असं नसतं. अशा अनेक कॉम्पिकेशन्सचा धोका वय लहान असेल, तर होऊ शकतो.

एकवीस वयानंतर मुलीच्या लग्नाचा घाट घातला गेला, तर तोपर्यंत मुलीचं बेसिक शिक्षण तरी नक्कीच पूर्ण झालेलं असतं. एकदा ग्रॅज्युएशन झालं, की तिची शैक्षणिक पात्रता चांगली तयार होते. बौद्धिक विकास त्यामुळं होतो. वेगवेगळ्या विषयांचं वाचन होतं. ‘वाचाल तर वाचाल आणि वाचवालसुद्धा’ हे समजण्याइतकी ती प्रगल्भ होते. यानंतर पुढं असणारे वेगवेगळे शैक्षणिक ॲव्हेन्यूज मग तिला खुणावू लागतात. यानंतर आपल्या आवडीप्रमाणं ती पुढच्या शिक्षणाची (पोस्ट ग्रॅज्युएशन, सुपर स्पेशालिटी इत्यादी) वाटचाल करू लागते. एकदा उच्चशिक्षण झालं, प्रोफेशनल स्किल्स‌ अवगत झाली, की ती छानपैकी जॉब मिळवते, अगर स्वतःचा व्यवसाय चालू करते. याचा होणारा महत्त्वाचा फायदा म्हणजे तिची स्वतंत्र विचारसरणी तयार होणं. ‘आपण दुसऱ्यावर अवलंबून नाही’ ही भावनाच मुळी सुखावणारी असते. अर्थात ‘स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे’ ही जाणीव तिनंही ठेवावी लागेल. उलट जितकं स्वातंत्र्य जास्त, तितकी जबाबदारीही जास्त... नाही का? मुलीचं लहान वयात लग्न झालं नाही, तरच उत्तम शिक्षण आणि उत्तम अर्थार्जन शक्‍य होईल.

माझी लांबची बहीण वृषाली अगदी रडवेली होऊन आली होती. तिचा पती विक्रम सध्या रोजच ड्रिंक्‍स घेऊ लागला आहे. शिवाय ऑफिसमधल्या त्याच्या सेक्रेटरीबरोबर त्याचं अफेअर सुरू आहे. वयाच्या अठराव्या वर्षीच लग्न झाल्यानं वृषालीचं शिक्षण अर्धवट राहिलं. त्यामुळं ती आता जॉबही करू शकत नाही; तसंच मुलगा विहान याची जबाबदारी घेऊन विक्रमपासून वेगळीसुद्धा राहू शकत नाही. तो कॉन्फिडन्स‌ आता तिच्यात कुठून येणार? त्यामुळं असहायपणे ती विक्रमबरोबर ‘अंडर वन रूफ’ राहते आहे. अशी बरीच उदाहरणं आपण पाहत असतो. मुलीचं लग्नाचं वय किमान २१ झालं, तर योग्य शिक्षणाअभावी तिची होणारी फरफट नक्कीच थांबू शकेल.

भावनिक विकासही जास्त
मुलींच्या भावनिक विकासही वयाबरोबर जास्त होणार. १८ पेक्षा २१ वयाला सामंजस्य नक्कीच चांगलं असेल. लग्न हे काही फक्त मुलगा आणि मुलगी यांचं मिलन नसून, त्यानं दोन कुटुंबंही जोडली जातात. अर्थात यासाठी दोन्ही घरांतल्या सर्वांनीच एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. सर्वांत जास्त समजूतदारपणा दाखवावा लागतो तो मुलीला. कारण ती आपलं घर सोडून आलेली असते. दुसऱ्या घरातल्या चालीरिती तिला आत्मसात कराव्या लागतात. त्याही आनंदानं. समज चांगली असेल तरच हे सर्व शक्‍य होईल. नाही तर लहान वय असल्यास ‘मीच का ॲडजस्ट करायचं?’ असं वाटणं स्वाभाविक आहे. मग कुरबुरींना सुरुवात होते.

देवांगीचं थोडं लवकरच लग्न झालं. तिला उशिरा उठायची सवय, तर सासरी सर्व लवकर उठणार. तिला लवकर अकरालाच जेवायला लागायचं, तर सासरी सकाळी नाष्टा करून दुपारी एकची जेवायची वेळ ठरलेली असायची. त्यामुळं देवांगी आणि तिचा पती देवेश यांची रोजची भांडणं सुरू झाली. खरं म्हणजे किरकोळ मुद्दे होते; पण देवांगीच्या हट्टीपणामुळं हे सर्व घडत होतं. तिनं थोडा समजूतदारपणा दाखवून स्वतःत बदल केले असते, तर तिचंही जीवन सुखकर झालं असतं. समज चांगली असेल, तरच माणूस तडजोड करू शकतो. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात; पण हे कळण्याचं देवांगीचं वय नव्हतं.
‘Man is s social animal.’ लग्नानंतर सोशल लाईफ चांगलं असेल, तर तुमच्या वैवाहिक जीवनात ‘चार चॉंद’ लागतात. तुमचे वेगवेगळे ग्रुप्स असणं- काही नातेवाईकांचे, तर काही मित्रमंडळींचे; मग छान प्रोग्रॅम्स ठरवणं, ते एंजॉय करणं...! तुम्ही छान शिकलेले आहात, तुम्हाला चांगला जॉब आहे, एका चांगल्या पोझिशनला तुम्ही कार्यरत आहात... तरच हे सगळं शक्‍य असतं. समाजात तुम्ही लोकांना हवेहवेसे वाटणं महत्त्वाचं आहे; पण लहान वयातच लग्न होऊन बसलं, तर योग्य शिक्षणाअभावी समाजातला हा मान मिळणं अवघड होऊन बसतं. फक्त पती उच्चपदस्थ असून भागणार नाही. उलट अशा परिस्थितीत काही वेळा नैराश्‍यही येऊ शकतं.

दुसरं टोकही नको
तेव्हा अशा विविध अंगांचा विचार करता मुलीचं लग्नाचं किमान वय १८ वरून २१ वर नेण्याचा विचार योग्यच वाटतो. अर्थात याचं उलटं टोकही गाठणं चुकीचं आहे. हल्ली ३२-३३ वय झालं, तरी उच्चशिक्षित मुलींना अजून पुढं जाऊन काही नवीन करायचं असतं. लग्नाबाबत पालकांनी हटकलं, तर म्हणतात : ‘‘I am not yet mentally prepared.’’ मुलींनी करिअरची शिखरं जरूर पादाक्रांत करावीत; पण म्हणून नैसर्गिकरित्याच स्त्रीत्वाबरोबर येणारी कर्तव्यं नाकारून कशी चालतील? लग्न, प्रेग्नन्सी, डिलिव्हरी हे सर्व योग्य वयातच होणं आवश्‍यक आहे. मेडिकल सायन्सनुसार, ‘You should complete your family before the age of ३०.’ आता शहरांतून तर हे अवघडच होत चाललं आहे. जेव्हा मुलीचं लग्न तिशीनंतर होतं, तेव्हा त्या वयात मुलीचे विचार, निर्णय, आवडी-निवडी या पक्‍क्‍या आणि ठाम होऊन बसलेल्या असतात. शरीर आणि मानसिकता दोन्ही गोष्टी रिजिड होऊन बसलेल्या असतात. त्यामुळं वैवाहिक जीवनात जे ‘थोडं तुझं, थोडं माझं’ लागतं, ‘तू तिथं मी’ लागतं, ‘जोडीदाराच्या मनाचा विचार करून ॲडजस्ट करणं’ लागतं... ते सर्व जरा अशक्‍यप्राय होऊन बसतं. तीस-पस्तिशीच्या दरम्यान शारीरिक बदल असे होतात, की निसर्गतःच शरीराची प्रेग्नन्सी राहण्याची कपॅसिटी कमी होत जाते. स्त्रीबीजं निर्माण होण्यात हार्मोनच्या असंतुलितपणामुळं अडचण येऊ शकते. नैसर्गिकरित्या किंवा काही उपाययोजना करून प्रेग्नन्सी राहिली, तरी त्यात ब्लडप्रेशर वाढणं, डायबेटिस होणं अशी अनेक कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात.

त्यामुळं निकर्ष असा निघतो, की लग्न अति लवकरही लग्न नको आणि अति उशिराही नको. मुलगी लहान असते, तेव्हा कळीसारखीच असते. तिला खेळू द्या... बागडू द्या. बालपण आणि पौगंडावस्था मुक्तपणे एन्जॉय करु द्या. स्वतः चांगल्यापैकी शिकून, समाजात चांगलं स्थान मिळवू द्या. या कळीचं पूर्णतया फुलून फूल होऊ द्या आणि मगच तिचं योग्य वयात म्हणजे २१ नंतर आणि ३० च्या आत लग्न करा. जेव्हा ती शारीरिक, बौद्धिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या सक्षम झाल्यावर विवाह करेल आणि नंतर माता बनेल, तेव्हा ती नुसती Biological Mother बनणार नाही, तर तिच्या मुलांवर उत्तम संस्कार करून पुढची पिढी सुविद्य, सुशील आणि सुसंस्कृत बनवेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com