प्रेम आणि ताप (डॉ. नीलिमा घैसास)

dr. nilima ghaisas
dr. nilima ghaisas

अन्विता घरी आली, तेव्हा केळकरांनी तिला समजावलं : ‘‘आता तरी कार्तिकला पूर्ण विसर. आशयला जप. त्याच्याशी उत्तम संसार कर. यातच तुमच्या दोघांचंही आता हित आहे.’’ यावर अन्विता उद्वेगानं म्हणाली : ‘‘नाही मी कार्तिकला विसरू शकणार.’’ यावर केळकरांनी पेशन्स ठेवून तिला थोडं मायेनं समजवायचा प्रयत्न केला. मात्र, अन्विताचं उत्तर होतं : ‘‘आशय समोर आला, की मला कार्तिकच प्रकर्षानं आठवतो. मी तरी त्याला काय करणार?’’ केळकर हतबल झाले. ‘एवढ्या हुशार मुलीला हे कसं समजू नये? केवळ ज्ञान असून उपयोगाचं नाही, तर ते केव्हा आणि कसं वापरायचं याचंही ज्ञान असावं लागतं. ॲकॅडेमिक हुशारी आणि व्यवहारज्ञान हे शेवटी पूर्णतः वेगळं आहे. अन्विता या बाबतीत विचारानं पूर्ण परिपक्व झाल्याशिवाय आपण तिचं लग्नच करायला नको होतं,’ असे अनेक विचार केळकरांच्या मनात येऊन गेले.

विनिता केळकर यांना काही गायनिक- रिलेटेड त्रास होत होता. म्हणून मिस्टर केळकर त्यांना त्यांच्या ओळखीच्या डॉक्‍टरांकडे तपासणीसाठी घेऊन गेले. डॉक्‍टरांना थोडी शंका आली म्हणून त्यांनी ब्लड-शुगर लेव्हल करून घेतली... आणि खणखणीत मधुमेहाचं निदान झालं. विनिता यांच्या माहेरी कोणतीच फॅमिली हिस्टरी नव्हती. मग डॉक्‍टरांना प्रश्‍न पडला, असं का झालं? त्यांनी काही स्ट्रेस आहे का विचारलं? कारण प्रचंड टेन्शनमुळंही हे होऊ शकतं. दोघा पती-पत्नींनी एकमेकांकडं पाहिलं आणि अखेर आपलं मन मोकळं केलं.

केळकर पुण्यात स्थायिक होण्यापूर्वी इचलकरंजीला होते. दोघंही तिथल्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना दोन मुली. मोठी अन्विता... अत्यंत हुशार, तर धाकटी निशिता... सुंदर, लाघवी; पण शाळेत थोडी मागं. मोठी कायम पहिली येणार, तर धाकटी पहिल्या दहात असणार. पुढं मोठीला चेन्नई आयआयटीत ऍडमिशन मिळाली. केळकर पती-पत्नी अतिशय खूष झाले. तिथंही ती सातत्यानं अव्वल असे. सुरवातीला वारंवार आई-वडिलांना फोन करे. पुढच्या वर्षी मात्र हे प्रमाण खूपच घटलं. केळकरांनी विचार केला : ‘‘शिक्षणाचा ताण असल्यानं हे स्वाभाविक आहे. शेवटी ते आयआयटी आहे.’’

धाकटी निशिता थोडीशी खुशालचेंडू; पण मायाळू. आयआयटी उसके बसकी बात नहीं थी! तिनं पुण्यात इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळवली आणि त्यामुळे केळकरही सेवानिवृत्त होऊन पुण्यात शिफ्ट झाले. केळकरांचं जग म्हणजे अन्विता आणि निशिता असं होतं. त्यातही अन्विता मॅम आयआयटीत शिकत असल्याने त्यांना तिचा कोण अभिमान! साहजिकच मायेचं थोडं झुकतं माप तिकडे होतं. निशिताच्या मनात मात्र अन्विताबद्दल कोणतीही असूया तर नव्हतीच; उलट प्रांजळपणे ती अन्विताच्या हुशारीला दाद देत असे.

चेन्नईत शिकताना अन्विताच्या प्रोजेक्‍ट-ग्रुपमध्ये कायम कार्तिक असे. तो साऊथ इंडियनच होता. सर्व ग्रुपची एकमेकांशी चांगली फ्रेंडशिप होती; पण अन्विता मात्र कार्तिककडे कायम थोड्या वेगळ्या नजरेनं बघे. त्याचं नॉन-व्हेज खाणं तिला फारच खटके. सगळे कॅंटिनला गेले, की ती कायम त्याला ‘नॉन-व्हेज खाऊ नकोस, फिश खाऊ नकोस’ इत्यादी सूचना देऊ लागली. कार्तिक त्रासू लागला. ‘‘माझं स्टेपल-फूड हे आहे आणि मी काय खायचं हे तू कोण ठरवणार?’’ याचा अर्थ त्याच्या मनात काही ‘तसं’ नसावं; पण अन्विताला तरीही हे पटत नव्हतं. ‘तो नक्कीच आपल्यात गुंतेल’ असं तिला वाटे. कार्तिकच्या प्रचंड हुशारीनं ती त्याच्याकडे ओढली जात होती. एकदा त्यांची स्टडी-टूर गेली होती तेव्हा तिनं त्याच्याकडे आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. कार्तिकनं हे सर्व पूर्ण थट्टेवारी नेलं आणि त्याचा हेतू स्पष्ट केला. अन्विता मात्र तरीही मागं हटायला तयार नव्हती. बघताबघता फायनल परीक्षा झाली. चेन्नई सोडून अन्विता पुण्यात आली. एकीकडे चांगला जॉब मिळाला अन्‌ दुसरीकडे वर-संशोधन सुरू झालं.

अन्वितानं घरात स्पष्टच कार्तिकबद्दल सांगितलं. मग सर्वजण त्याच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी चेन्नईला गेले. कार्तिक चाटच पडला. तरी एक बॅचमेट म्हणून त्याच्या घरच्यांनी यांचं आगत-स्वागत केलं. मूळ मुद्दा निघाला, तेव्हा कार्तिक स्पष्टपणे केळकरांना म्हणाला : ‘‘अंकल, आपकी ये बेटी थोडी नहीं, बहुत व्हिमझिकल है। मै इसको कभीभी अपनी पत्नी के रूपमें स्वीकार नही करूंगा। आपभी इसको अच्छी तरह समझाओ, नहीं तो आगे चलके ये बहुत बडी प्रॉब्लेम बनेगी।’’ कार्तिक इतका विनम्रतेनं बोलत होता, की केळकरांना त्याचा राग आला नाही. उलट त्यांनी स्वतःला सावध केलं. पुण्यात आल्यावर त्यांनी कशीबशी अन्विताची समजूत काढली आणि वरसंशोधन सुरू केलं. लग्न झालं, की अन्विता सुधारेल अशी त्यांना आशा होती.
आशय जोगळेकरचं स्थळ केळकरांना समजलं. मुलगा दिसायला छान, श्रीमंत, इंजिनिअर.. पण! तो फक्त ‘डिप्लोमा’ इंजिनिअर होता. त्यामुळे केळकरांना हे स्थळ नको वाटलं. मात्र, अन्विता याच स्थळासाठी हटून बसली. वडिलांना आपल्या मुलीच्या मनाचा अंदाज येईना. ही आयआयटी इंजिनिअर, तर तो डिप्लोमा इंजिनिअर... पुढं यावरून गोंधळ व्हायला नको. अखेर अन्विताच्या इच्छेसाठी त्यांनी होकार दिला आणि लग्न थाटात पार पडलं.

आशय, अन्विता हनिमूनसाठी मॉरिशला गेले. केळकरांना एका जबाबदारीतून पार पडल्याचं समाधान मिळालं. आठ दिवसांनी ते परत आले, तेव्हा अन्विता अगदी खूष दिसत होती; पण आशय मात्र खूपच डिप्रेस वाटला. केळकरांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. त्यांनी दुसऱ्या दिवशी एकट्या आशयची भेट घेतली. तेव्हा आशय उसळून म्हणाला : ‘‘बाबा, हा कार्तिक कोण?’’ कार्तिकचं नाव ऐकताच केळकरांचा चेहरा साफ पडला. मनात धस्स झालं. ‘‘अहो, आम्ही गेल्यापासून परत येईपर्यंत हिचं आपलं कार्तिकपुराण चालू होतं. कार्तिक किती हुशार... कार्तिक किती स्मार्ट... माझा कसा जवळचा मित्र... आम्ही काय धमाल करायचो... बाबा, कसं तरी मी सर्व ऐकून घेतलं झालं! काहीतरी फटकन्‌ बोलून मला तिला दुखवायचं पण नव्हतं,’’ आशय म्हणाला.

पुढं अन्विता घरी आली, तेव्हा केळकरांनी तिला समजावलं : ‘‘आता तरी कार्तिकला पूर्ण विसर. आशयला जप. त्याच्याशी उत्तम संसार कर. यातच तुमच्या दोघांचंही आता हित आहे.’’ यावर अन्विता उद्वेगानं म्हणाली : ‘‘नाही मी कार्तिकला विसरू शकणार.’’ यावर केळकरांनी पेशन्स ठेवून तिला थोडं मायेनं समजवायचा प्रयत्न केला. मात्र, अन्विताचं उत्तर होतं : ‘‘आशय समोर आला, की मला कार्तिकच प्रकर्षानं आठवतो. मी तरी त्याला काय करणार?’’ केळकर हतबल झाले. ‘एवढ्या हुशार मुलीला हे कसं समजू नये? केवळ ज्ञान असून उपयोगाचं नाही, तर ते केव्हा आणि कसं वापरायचं याचंही ज्ञान असावं लागतं. ॲकॅडेमिक हुशारी आणि व्यवहारज्ञान हे शेवटी पूर्णतः वेगळं आहे. अन्विता या बाबतीत विचारानं पूर्ण परिपक्व झाल्याशिवाय आपण तिचं लग्नच करायला नको होतं,’ असे अनेक विचार केळकरांच्या मनात येऊन गेले. ‘आता गणराया तूच अन्विताला सुबुद्धी दे’ अशी त्यांनी प्रार्थना केली.

पुढे काही दिवसांनी आशय एकटाच केळकरांकडे आला तेव्हाच केळकरांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. आता आपल्या लेकीनं काय दिवे लावलेत? आशय म्हणाला : ‘‘मधल्या काळात आमच्या संसाराची गाडी थोडी रुळावर होती; पण अन्वितानं आता नवीनच भूणभूण सुरू केली आहे. ती एमटेक आणि मी मात्र फक्त डिप्लोमा होल्डर. याचा तिला खूप कॉम्प्लेक्‍स येतो आहे. त्यामुळं तिनं माझ्या मागं आधी बीई आणि नंतर एमई होण्याचा तगादा लागला आहे. वर तो कार्तिक कसा ब्रिलियंट आहे, हेही ऐकवत असते. अहो बाबा, लग्नाआधी माझं शिक्षण आम्ही काही लपवून ठेवलं नव्हतं. बरं, सुखानं जगण्याइतकं अर्थार्जन मी करतोच आहे. परत माझी कम्पॅरिझन त्या कार्तिकबरोबर सुरू झाली आहे. खूपच वैताग आला आहे.’’ केळकरांनी त्याची कशीतरी समजूत काढण्याचा प्रयत्न केला : ‘‘अरे, त्यांच्यात अफेअर असं काहीच नव्हते. हीच एकतर्फी त्याच्यावर प्रेम करत होती. कार्तिक सभ्य आणि डिसेंट मुलगा असल्यानं त्यानं त्याचा कधीच गैरफायदा घेतला नाही.’’ त्यांनी आशयला कार्तिकचा फोन नंबर दिला आणि त्याच्याशीच डायरेक्‍ट बोलण्यास सांगितलं. कार्तिकच्या फोननंतर मात्र आशय थोडा शांत झाला. त्याची खात्री झाली, की कार्तिकची तरी या भानगडीत काही इन्व्हॉलव्हमेंट नव्हती तर!

आशय- अन्विता, दोघांच्याही आई-वडिलांनी, त्यांच्या एकत्र बसवून मोठ्या प्रेमानं समजावलं. त्यांच्यासाठी कौन्सिलरकडे सेशन्स सुरू केली. सहा महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर परिस्थिती बरीच सुधारली. दोघांनीही आधीचं सर्व विसरून आनंदानं पुढचं आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला. परिणामतः अन्विताला एक गोंडस मुलगी झाली... अनुष्का! तीन वर्षांनी अनुष्का शाळेत जाऊ लागली. केळकर दांपत्य आता शांततेनं झोपू लागलं होतं. त्यांच्या डोक्‍यावरचं मोठं ओझं उतरलं; पण हे सुख अल्पायुषीच ठरलं.

आशयला ऑन-साईट दुबईला सहा महिन्यांसाठी जावं लागणार होतं. अन्विताला खूप आनंद झाला; पण त्याचं कारण कळल्यावर आशय पुरता कोलमडून गेला. अन्वितानं आशयला तो गेल्यावरचा आपला प्लॅन सांगितला : ‘‘तसाही तू इथं असणार नाहीस. तर त्या काळात माझा चेन्नईला जायचा प्लॅन असेल. अनुष्का आता तीन वर्षांची झाल्यानं तसंही आपण दुसरा चान्स घेण्याचं ठरवलं होतं. हे बेबी मात्र मला कार्तिकपासून हवं आहे रे. त्या बेबीच्या रूपानं मला कार्तिकचा सहवास लागेल. आणि मुख्य म्हणजे ते बेबी डॅम ब्रिलीयंट निघेल यार... I am just craving for that intelligence’’ आशयनं उठून अन्विताला दोन्ही खांद्यांना धरून गदागदा हलवलं : ‘‘अगं अन्विता सत्यात ये. दिवास्वप्न पाहू नकोस. हे ऐकून माझ्या मनाला काय यातना होतील याचा थोडा तरी विचार कर. आता कुठं आपण सुखासमाधानात राहू लागलो आहोत. अजून तरी भानावर ये. ही सगळी तू थट्टा करते आहेस नं! बोल अन्विता बोल.’’ अतिशय थंडपणे अन्विता म्हणाली : ‘‘No Ashay, I mean it... rally I mean it... माझी एवढी इच्छा पूर्ण होऊ दे. मग मात्र मी कार्तिकचं नाव तुझ्यापुढं कधीच काढणार नाही.’’ आशय आ वासून पाहतच राहिला. काही तरी ठाम निर्णय घेऊन त्याने आ मिटला.

केळकरांकडे तो गेला ते परत न जाण्यासाठीच! अन्विताच्या आई-बाबांनी त्याची समजूत काढायला प्रयत्न केला : ‘‘अरे, ती मूर्ख मुलगी लाख म्हणेल; पण कार्तिक असं कधीच काही करणार नाही.’’ मात्र, आशयला आता अन्विता आणि कार्तिक ही नावंही परत त्याच्या शब्दकोषात नको होती. त्यानं त्याचा ठाम निर्णय केळकरांना कळवला. केळकर मुलीला आणि नातीला घेऊन घरी आले ते कायमचेच. तिथंही अन्विताचं बिनधास्त वागणं-बोलणं, थोडंसं विचित्रच म्हणा... चालूच होतं. विनीताताईंनी आईच्या मायेनं लेकीला जवळ घेऊन समजावण्याचा प्रयत्न केला : ‘‘अगं, हा आडमुठेपणा सोड. आशयची माफी माग. काही अनुभव, काही भावना... कधी सुखाचे क्षण, कधी तीव्र वेदना... कधी हवासा वाटणारा एकांत, कधी जाणवला एकटेपणा... हे सगळं बोलायला, उतू चाललेलं मनातलं कुणाला तरी सांगायला, जीवन-साथी मात्र नक्की हवा...! थोडं पडतं घेतलंस, नमतं घेतलंस, तर आशयला तू अजूनही मिळवू शकतेस.’’ त्यांनी मोठ्या आशेनं अन्विताकडे पाहिलं... तर पालथ्या घड्यावर पाणी! अन्विता काहीही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हती. उलट अतिशय उर्मटभाव तिच्या चेहऱ्यावर होते.

या सर्व प्रकाराचा विनीताताईंना एवढा स्ट्रेस झाला, की अखेर त्यांना स्ट्रेस-इंड्युस्ड डायबेटिस झाला. मुलीच्या त्रासानं शुगर काही केल्या कंट्रोलमध्ये येईना. अखेर केळकरांनी पत्नीच्या काळजीनं, अन्विताची रवानगी गावात असलेल्या त्यांच्या दुसऱ्या फ्लॅटमध्ये केली. शेवटी आई-वडील असल्यानं मुलीला वाऱ्यावर तर सोडता येईना.

धाकट्या निशितानं बीई झाल्यावर आपल्याशी अनुरूप असलेल्या नीलेशशी लग्न केलं. दोघेही ॲकेडेमिक हुशारीच्या बाबतीत मध्यमगती गोलंदाज; पण समजूतदार, संवेदनशील, समाधानी, सुशील, सुसंस्कृत, शांत... दोन्हीकडच्या कुटुंबीयांबद्दल आदर असणारे. दोन्हीकडच्या सिनिअर सिटिझन्सची आता मनापासून तेच काळजी घेतात. पूर्वी केळकर पती-पत्नींना धाकट्या निशितापेक्षा मोठ्या अन्विताचा कोण अभिमान होता, केवढं कौतुक होतं; पण पुढं नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. आता मात्र निशिता सर्वांची जीव की प्राण झाली होती. डॅनिअल गोलमन यांचं ‘इमोशनल इंटेलिजन्स’ हे जगभरातलं विक्रमी विक्रीचे उच्चांक स्थापन करणारं पुस्तक आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी IQ - बुद्ध्यंक महत्त्वाचा आहेच; पण त्यापेक्षाही जास्त महत्त्व EQ - भावनांकाला आहे. डॅनिअल गोलमन यांनी या पुस्तकात हे सप्रमाण सिद्ध केले आहे. ‘अन्विता - निशिता’ हे याचं सबळ आणि बोलकं उदाहरण नाही का? निसर्गाने समस्त मादी जमातीला उपजतच असलेल्या अपरिमित प्रेमाचं वरदान दिलं आहे. अन्विताचं वागणं हे एक प्रकारच्या Obsessional Love चा display म्हणावा लागेल का? का हा स्त्रीसुलभ नैसर्गिक अतीव प्रेमाचा आविष्कार असेल? का अन्वितात खोलवर रुतून बसलेल्या विकृतीचा हा तापदायक, क्‍लेशकारक, दुःखदायक परिणाम असेल?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com