रुढी आणि परंपरांचा संगम... (डॉ. राधिका टिपरे)

Tradition
Tradition

प्रत्येकाला दीपावलीचं स्वागत परंपरांच्या वाटेनंच करायचं आहे, यात शंकाच नाही... भले जल्लोष करता येत नसला, तरी रुढींचं पालन करणं अपरिहार्य आहे, हे सर्वांना ठावूक आहेच... त्यामुळं मनात घर करून बसलेल्या भयाचं तम दूर सारण्यासाठी का होईना, आपल्याला दिव्यांच्या उजेडाचं स्वागत करून आनंदानं याही वर्षी दीपावलीचं, दिव्यांच्या सणाचं त्याच उत्साहानं स्वागत करायला हवं असं मनापासून वाटतं आहे... कारण दीपावलीचा सण म्हणजे सणांचा राजा... वर्षातून एकदा येणारा...! हा सण प्रत्येकाचा आहे... गोरगरीब... राव-रंक... भाऊ-बहीण... पति-पत्नी... माय-लेकरं... गाय-गोऱ्हा... लक्ष्मी-विष्णू ... अगदी सर्वांसाठी दीपावली आनंद घेऊन येते. येताना सोनियाच्या पावलांनी येते... झगमगत्या प्रकाशात न्हाऊन... मनातील निराशेचा अंधार आपल्या उज्ज्वलतेनं प्रकाशमान करीत येणारी ही दीपावली असंख्य दीपमाला लेऊन येते आणि सर्वांना आनंद देऊन जाते..

जवळ जवळ आठ-नऊ महिन्यांपासून एका अदृश्‍य, असुरी शक्‍तीनं आपल्या सर्वांचं जीवन वेठीस धरलेलं आहे... जगण्यातील आनंदच जणू हरवला आहे... एका अनामिक भयानं सर्वांची मनं शंकित झालेली आहेत. भय इथलं संपतच नाहीय, अशी गत झाल्यामुळं जणू जगण्याला एखाद्या अवकळेचं रूप आलंय की काय, असंच वाटतं आहे...  उन्हाळा आला आणि गेला... त्याच्या मागोमाग पावसाळा अगदी लगबगीनं आला... कधी नव्हे ते अगदी धोधो बरसून गेला... नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले... तळी-तलाव पाण्यानं भरून वाहू लागले... पिकं जोमानं डोलू लागली... पण कुणाच्या मुखावर आनंदाची लकीर काही उमटली नाही...! जणू मरणकळा पसरलीय की काय, अशीच अवस्था झालीय सर्वत्र.... पावसाळ्याच्या तोंडावर गौरी-गणपती आले आणि गेलेसुद्धा... विजयादशमीच्या येण्याची नांदी देणारा हा सण बोटाच्या चिमटीतून रेत निसटावी तसा आला आणि गेला... नवरात्रीचा उत्सवही सुनासुनाच गेला... ढोल नाहीत... ताशे नाहीत... देवीच्या आगमनाची वर्दी नाही... नेहमी रुणझुण रुणझुण करीत येणारा विजयादशमीचा आनंदोत्सव सोनं लुटून साजरा होतो; पण या वेळी ना कुणी सोनं लुटलं, ना कुणी सोनं वाटलं...!

आता सर्वजण मनानं दीपावलीच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत...! परंतु यावेळच्या दीपावलीचं स्वागत कसं करायचं, ही भावना प्रत्येकाच्या मनात रुंजी घालते आहे. खरंतर प्रत्येक जण मनातून साशंकच आहे... तसंही भारतीयांना सणांचं नेहमीच अप्रूप वाटत राहतं... प्रत्येक सणाचं वेगळं महत्त्व आहे. कारण जसं आपण आपल्या देवी-देवतांना मानतो, तसंच या प्रत्येक देवतेच्या बरोबर येणाऱ्या मिथकांना आणि रुढी-परंपरांनाही मनापासून मानतो... कारण या रुढी आणि परंपरांची मुळं आपल्या समाजमनात घट्ट रुजलेली आहेत... कदाचित या रुजलेल्या श्रद्धेमुळंच समाज घट्ट बांधला गेलाय, असंही वाटतं कधीकधी...! अपवाद वगळता बहुतेकांच्या मनात या श्रद्धांना महत्त्व आहे. त्यामुळंच मनातील भय संपलं नसलं तरी प्रत्येकाला दीपावलीचं स्वागत परंपरांच्या वाटेनंच करायचं आहे, यात शंकाच नाही... भले जल्लोष करता येत नसला, तरी रुढींचं पालन करणं अपरिहार्य आहे, हे सर्वांना ठावूक आहेच... त्यामुळं मनात घर करून बसलेल्या भयाचं तम दूर सारण्यासाठी का होईना, आपल्याला दिव्यांच्या उजेडाचं स्वागत करून आनंदानं याही वर्षी दीपावलीचं, दिव्यांच्या सणाचं त्याच उत्साहानं स्वागत करायला हवं असं मनापासून वाटतं आहे... कारण दीपावलीचा सण म्हणजे सणांचा राजा... वर्षातून एकदा येणारा...! हा सण प्रत्येकाचा आहे... गोरगरीब... राव-रंक... भाऊ-बहीण... पति-पत्नी... माय-लेकरं... गाय-गोऱ्हा... लक्ष्मी-विष्णू ... अगदी सर्वांसाठी दीपावली आनंद घेऊन येते. येताना सोनियाच्या पावलांनी येते... झगमगत्या प्रकाशात न्हाऊन... मनातील निराशेचा अंधार आपल्या उज्ज्वलतेनं प्रकाशमान करीत येणारी ही दीपावली असंख्य दीपमाला लेऊन येते आणि सर्वांना आनंद देऊन जाते... पाच दिवसांचा हा सण, प्रत्येक दिवसाच्या वैशिष्ट्यामुळं खास असतो. या प्रत्येक दिवसाचं वैशिष्ट्य जाणून घेतानाच या सणाचं महत्त्व प्रत्येक भारतीयाच्या मनात कसं रुजलेलं आहे हेसुद्धा जाणून घेता येईल...

सोनपावले आली दीपावली
फुलल्या लक्षलक्ष ज्योती नभांगनी
दीपमाळा होऊन आकाशी
नक्षत्रं उतरली भूवरी
घेऊनी रूप तारकांचे
उजळले लक्ष दीप,
दीपोत्सव हा ज्योतिर्मय,
जाई विरून तम,
होई निराशेचा अंत, उजळून जाई सारे आसमंत


दिवाळी आली की दिव्या-पणत्यांनी घरं सजतात... रंगबिरंगी आकाशकंदिलांनी अवघा आसमंत उजळून जातो... सुंगंधी तेलानं मर्दन करून, उटणं लावून, केलेल्या सचैल स्नानानंतर अंग कसं उजळून जातं... झुळझुळीत वस्त्रांनी देह सजले जातातच... गोडधोड खाऊन मनं अगदी तृप्त होऊन जातात. ही तृप्ती मनाबरोबर देहावरही उतरते... आणि मन कसं निरामय, संतृप्त होऊन जातं... अशी ही मंगलमयी, तेजोर्मयी दीपावली येते आश्‍विन महिन्याच्या कृष्ण पक्षात. अतिशय मानाचा, सर्वांत मोठा असलेला हा सण खऱ्या अर्थानं सुरू होतो वसुबारसेला. आश्‍विन वद्य द्वादशीला "वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी'' असं म्हटलं जातं... या दिवशी तिन्हीसांजेला गाय-गोऱ्ह्याची सांग्रसंगीत पूजा होते. शेतकऱ्यांचं खरं धन म्हणजे गोधन... त्यांचा मान सर्वांत मोठा. गाय-गोऱ्ह्यांची फुलमाळा घालून, आरती ओवाळून पूजा होते... घरात नैवेद्यासाठी गोवारीची भाजी आणि बाजरीची भाकरी आवर्जून केली जाते. घरातल्या गोधनाची पूजा म्हणजे प्रत्यक्ष परमेश्‍वराची पूजा... गाय-गोऱ्ह्याला गोडधोड खाऊ घातलं जातं... वसुबारस या दिवसाची एक आख्यायिका आहे, ती अशी....! आश्‍विन वद्य द्वादशीच्या दिवशी एका घरातील सासू कामावर जाताना घरातील सुनेला सांगून जाते... "बयो, सांजच्याला गव्हाळ्या मुगाळ्याची भाजी करून ठेव हा काय" सुनेनं सासूची आज्ञा मानली. गोठ्यात त्याच नावाची दोन लहान वासरं बागडत होती... त्यांना मारून त्यांची भाजी करून ठेवली... संध्याकाळी कामावरून परत आलेल्या सासूला गोठ्यात गव्हाळा, मुगाळा दिसला नाही... तिला काही सुचेना... सुनेला विचारलं तेव्हा तिनं उत्तर दिलं; "भाजी करून ठेवलीय मी त्यांची." सासूनं दु:खातिशयानं कपाळावर हात मारून घेतला... सुनेला आपली चूक कळली... मग मात्र दोघींनी मिळून देवाची मनोभावे प्रार्थना केली... आणि त्यानंतर देवाच्या कृपेनं ती दोन्ही वासरं पुन्हा जिवंत झाली. हा आनंद साजरा करण्यासाठी या दिवशी गोवत्सांची पूजा केली जाते. आपण गायीला गोमाता मानतो... गायीची नेहमीच मनोभावे पूजा करतो... पण आजच्या काळात शहरात राहणाऱ्यांना कुठून गाय-गोऱ्ह्याची पूजा करायला मिळणार? तिन्हीसांजेला गळ्यातील घंटांचा नादमधुर रुणझूण हा ध्वनी कुठून ऐकायला मिळणार? दमून भागून जनावरं सांजेला गोठ्याकडं परतून आल्यावर आसुसलेलं वासरू गायीच्या पान्ह्याला ढुसण्या देत आहे, असं दृश्‍य नजरेला पडणंही अशक्‍यच...! ही आजची खरी वस्तुस्थिती आहे. या पार्श्‍वभूमीवर लहानपणी पाठ्यपुस्तकात शिकलेली कविता इथं द्यावीशी वाटते.

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी
गायी म्हशी कुणाच्या? लक्षुमनाच्या...!
लक्षुमन कुणाचा? आई-बापाचा...

वसुबारसेनंतर येणारा दिवस म्हणजे ''आश्‍विन वद्य त्रयोदशी'' म्हणजेच ''धनत्रयोदशी''... या दिवशी सायंकाळी, दिवेलागणीच्या सुमारास अंगणात पणत्या, दिवे लावले जातात. तिन्हीसांजेला धनाची पूजा केली जाते. पूजेसाठी धने, लाह्या, फुलं याची गरज असते. अंगणात तेलाचे दिवे लावताना त्यापैकी काही दिव्यांचं तोंड दक्षिणेकडं करतात. या दिवसाची अख्यायिका सांगतात ती अशी... हैम नावाचा एक राजा होता. त्याला बऱ्याच वर्षांनी एक पुत्र झाला. सर्वांना खूप आनंद झाला; पण षष्टीदेवीनं त्या राजपुत्राचं भविष्य सांगितलं, की लग्नानंतर चारच दिवसांनी त्याचा मृत्यू होईल... पुढं योग्य वेळी राजपुत्राचं लग्न झालं. नवीन जोडपं यमुनेच्या डोहात बांधलेल्या एका महालात राहायला गेलं. पण नियतीनं ठरवल्याप्रमाणे चारच दिवसांनी राजपुत्राचा मृत्यू झाला. सर्वांनी दु:खी होऊन खूप आक्रोश केला. या वेळी राजपुत्राचे प्राण घेऊन जाणाऱ्या यमदूतांना खूप वाईट वाटलं. ही गोष्ट यमराजाला समजली तेव्हा त्यालाही खूप वाईट वाटलं. तो म्हणाला, जे लोक मला आश्‍विन वद्य त्रयोदशीला दीपदान करतील आणि प्रदोषसमयी दीपोत्सव करतील, त्यांना मी असा अपमृत्यू येऊ देणार नाही. तेव्हापासून या दिवशी दीपोत्सव करण्याची प्रथा सुरू झाली.

धनतेरस किंवा धनत्रयोदशी नंतर येणाऱ्या चतुर्दशीला नरक चतुर्दशी असं म्हणतात. या दिवशी दिवाळीचं पहिलं अभ्यंग स्नान असतं. या दिवशी भल्या पहाटे उठून स्नान करायचं असतं. आई आपल्या मुलाबाळांना सुवासिक तेल लावून, चोळून न्हाऊमाखू घालते... अंगणात सडासंमार्जन करून रांगोळी घातली जाते... दिव्यांच्या माळा लावल्या जातात. दारासमोर पणत्या लावून अंधाररूपी नरकासुराला दूर पळवलं जातं. कणकेच्या दिव्यात तेलवात लावून मुलाबाळांना, पतीला स्नानानंतर ओवाळलं जातं. कणकेचे दोन मुटके करून मुलाबाळांवरून ओवाळून विरुद्ध दिशेला टाकले जातात. नरकासुराच्या धडाचे दोन तुकडे म्हणून हे मुटके प्रतीकात्मकरीत्या विरुद्ध दिशेला फेकले जातात. काही भागात नरकासुर वध म्हणून डाव्या पायानं कारंटं फोडूनच स्नानगृहातून बाहेर पडतात. नरकासुराचा नाश व्हावा याच भावनेनं हे सारं केलं जातं. या दिवशी जो उशिरा उठेल, तो नरकात जाईल, असं मानलं जातं. नरकचतुर्दशीच्या या दिवसाचं महत्त्व सांगणारी आख्यायिका आहे, ती अशी - पूर्वी नरकासुर नावाचा एक बलाढ्य राक्षस होता. त्यानं देशोदेशीच्या अनेक कुमारिकांना पळवून आपल्या तुरुंगात कैद केलं होतं. भगवान श्रीकृष्णानं या दिवशी नरकासुरावर स्वारी केली आणि नरकासुराचा वध केला. मृत्यूसमयी नरकासुरानं आपल्या पापाचं प्रायश्‍चित म्हणून श्रीकृष्णाला विनंती केली, की त्याच्या मृत्यूनंतरही, भगवान श्रीकृष्णाच्या नावाबरोबर लोकांनी त्याचंही नाव आठवावं. श्रीकृष्णानं नरकासुराची ही विनंती मान्य केली आणि सरतेशेवटी आपल्या सुदर्शन चक्राच्या मदतीनं त्याचा वध केला. त्याच्या तुरुंगातील सोळा हजार कुमारिकांची सुटका केली. त्यांना सन्मानानं जीवन जगता यावं म्हणून त्या सर्व स्त्रियांशी विवाह केला. नरकासुराच्या वधामुळं या दिवसाला नरकचतुर्दशी असं म्हटलं जातं.

एकंदरीतच आपल्या पूर्वजांनी आपल्या सणांच्या पूर्वपीठिका आपल्या सामाजिक प्रश्‍नांना नजरेसमोर ठेवूनच आयोजित केल्या होत्या, हे यावरून लक्षात येतं. नरकासुर राक्षस म्हणजे आपल्या समाजातील दुष्ट प्रवृत्तींचं प्रतिनिधित्व करणारा घटक आहे. याच भावनेतून पाहिल्यानंतर "समाजातील वाइटाचा, असभ्यतेचा, दुष्ट प्रवृत्तींचा नाश व्हावा, समाजात जे जे वावगं आहे, वाईट आहे, ज्यापासून सुखी जीवनाला गालबोट लागेल, असं सर्व काही नष्ट व्हावं व मनुष्याला सुखनैव जीवन जगता यावं, हीच या पाठीमागची खरी भूमिका आहे. जसं गंगेच्या पाण्यात सचैल स्नान केल्यानंतर सर्व पापं धुतली जातात, असं आपण मानतो, तसंच नरकचतुर्दशीच्या दिवशी सुगंधी तेलानं अंगाला मर्दन करून गरम पाण्यानं सचैल स्नान करावं... शरीरानं निर्मळ व्हावंच; पण त्याचबरोबर मनाची शुद्धताही जपण्याचा प्रयत्न करावा... हेच या दिवसाचं गमक आहे, असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही...!!   

मला आठवतंय, लहान असताना आम्ही दिवाळीच्या पहिल्या दिवशी नटूनथटून जवळपासच्या शेजाऱ्यांना फराळाची ताटं द्यायला जायचो. चिवडा, चकली, लाडू, अनारसे, शंकरपाळे असं सर्वप्रकारचे फराळाचे जिन्नस आईनं भरपूर केलेले असायचे. फराळ ताटात भरून त्यावर आईनंच विणलेला जाळीदार रुमाल टाकून शेजाऱ्यांच्या घरी फराळ देताना कोण आनंद मिळायचा... तीच ताटं भरून परत यायची... देवाण आणि घेवाण असायची ती... हल्ली ही प्रथाच बंद झालीय...! कोण कुणाकडं जाणार? शहरात असंही कुणी कुणाकडं जायला तयार नसतं. कुणी एकमेकाच्या सुखदु:खांची चौकशी करायला तयार नसतं... प्रत्येकाच्या दृष्टीनं त्याची त्याची स्पेस आणि प्रायव्हसी महत्त्वाची असते. आणि दुसऱ्यांकडं देण्याइतकं फराळाचं तर कोण बनवतं...? घरी फराळ बनवण्याचे दिवसही कधीच संपून गेले आहेत. असो...

नरकचतुर्दशी नंतर येणारा दिवाळीचा महत्त्वाचा दिवस म्हणजे आश्‍विन वद्य अमावास्या... या दिवशी सायंकाळी दिवेलागणीच्या वेळी लक्ष्मीची पूजा केली जाते. व्यापारीवर्गात लक्ष्मीपूजेच्या या दिवसाला फार महत्त्व आहे. त्या दिवशी व्यापारी व श्रीमंत लोक आपल्या हिशेबाचा ताळेबंद ठेवून, लक्ष्मीची पूजा अत्यंत धुमधडाक्‍यानं करतात. फटाक्‍यांची आतषबाजी होते... भाताच्या लाह्या, बत्तासे, साखरफुटाणे, झेंडूची फुलं या सर्वांच्या साहाय्यानं लक्ष्मीची साग्रसंगीत पूजा केली जाते. आजच्या दिवशी झेंडूच्या फुलांचं खूप महत्त्व असतं... दाराला आंब्याच्या पानांचं आणि पिवळ्याधमक गेंदेदार झेंडूच्या फुलांचं मस्त तोरण बांधलं जाते... लक्ष्मीची चांदीची प्रतिमा पूजेसाठी ठेवलेली असतेच; पण घर स्वच्छ ठेवणारी केरसुणीसुद्धा लक्ष्मीचं प्रतीक म्हणून पूजली जाते. श्रीफळ ठेवलेल्या कलशाचं पूजनही लक्ष्मीचं प्रतीक म्हणून केलं जातं. लक्ष्मीपूजनाचा हा सोहळा प्रत्येक कुटुंबासाठी महत्त्वाचा असतो. कारण आपल्या अनेक मांगल्यदेवतांपैकी लक्ष्मी ही सर्वांत महत्त्वाची देवता. कारण लक्ष्मीची साथ असेल तर जीवनातील अनेक सुखांच्या सोबतीनं पैशाचं सुखसुद्धा अनुभवता येतं. अर्थात, पैसा हाच परमेश्‍वर मानणारे महाभाग लक्ष्मीला देवता मानतात, की नाही हीच खरंतर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण, आयुष्यात पैसा हेच सर्वस्व नाही असं मानणारेही बहुसंख्य असतात. पैशांच्या पाठीमागं न धावता, मानसिक सुख, शांती आणि आंतरिक समाधान मिळवून सुखासमाधानानं आयुष्य घालवणारे खऱ्या अर्थानं लक्ष्मीपती असतात... लक्ष्मीपूजनाच्या या दिवसाचं महत्त्व सांगणारी पौराणिक आख्यायिका आहे ती अशी... बळीराजानं आपल्या पराक्रमानं सर्व देवदेवतांना कैद करून ठेवलं होतं. एवढंच नाही, तर विष्णुपत्नी लक्ष्मीदेवीसही कैदेत ठेवलं होतं. त्या वेळी भगवान श्रीविष्णूंनी वामनावतार घेऊन बळीराजाकडून तीन पावलं जमीन दान म्हणून मागून घेतली... एका पावलात विष्णूनं स्वर्ग व्यापून टाकला. दुसऱ्या पावलात अवघी पृथ्वी कह्यात घेतली. आता तिसरं पाऊल कुठं ठेवू असा प्रश्‍न त्यानं बळीराजाला केला असता, बळीराजानं त्याच्या समोर स्वत:चं मस्तक धरलं, कारण बळीराजानं ओळखलं होतं, की याचक म्हणून त्याच्याकडं आलेला हा वामन दुसरा तिसरा कुणी नसून साक्षात विष्णू आहे. असुरराज बळीच्या समोर दुसरा पर्याय उरलेला नव्हता. भगवान विष्णूनं आपलं पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवून बळीला पाताळात दडपलं. बळीराजाचा पराभव होताच सर्व देवदेवतांची त्याच्या कैदेतून मुक्‍तता झाली. त्याचबरोबर देवी लक्ष्मीचीही मुक्‍तता झाली. तो दिवस होता आश्‍विन वद्य अमावास्येचा. देवी लक्ष्मीची कैदेतून मुक्‍तता होताच सर्वत्र आनंदोत्सव सुरू झाला आणि सर्वत्र चैतन्य पसरलं. त्या वेळी विष्णूने वर दिला, की यानंतर कधीही देवी लक्ष्मी कुणा एकाच्या घरी वास करणार नाही. तिचा वास घरोघरी राहील आणि घरोघरी याच दिवशी तिची पूजा होईल. यामुळेच आश्‍विन वद्य अमावास्येला लक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली.

यापुढची कथा बलिप्रतिपदेशी संबंधित आहे. आश्‍विन शुद्ध प्रतिपदा हा वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा दिवस आहे असं मानतात. श्रीविष्णूनं बटूवामनाचा अवतार घेऊन राजा बळीस पाताळात दडपलं. त्यावेळेस बळीराजाच्या औदार्यावर खूष होऊन विष्णूनं त्याला वर दिला. आश्‍विन शुद्ध प्रतिपदेला लोक तुझ्या नावानं आनंदोत्सव साजरा करतील व त्या दिवसाला बलिप्रतिपदा म्हणतील. त्या दिवशी बलीचं त्याच्या स्त्रीसह पूजन होतं. जिकडे तिकडे दिवे पणत्या लावून आनंदोत्सव साजरा केला जातो. व्यापारी लोक या दिवसापासून आपल्या व्यापार उद्योगाच्या हिशेबाचा वर्षारंभ सुरू करतात. नवीन किर्द खतावणी याच दिवशी लिहायला घेतली जाते. या दिवसाला ''दिवाळी पाडवा'' असं म्हणतात. घरोघरी गोडधोड पंचपक्‍वान्नं बनवली जातात... तिन्हीसांजेला पत्नी पंचारती घेऊन आपल्या पतिराजाची आरती ओवाळते. संसारात प्रेम, सुख, समाधान मिळावं हीच तिची परमेश्‍वरचरणी अपेक्षा असते. अशावेळी पत्नीला ओवाळणी म्हणून काहीतरी भेट देण्याची जबाबदारी पतिराजावर असते. पतीपत्नीचं नातं हे अतुट बंधनानं बांधलेलं असतं...त्यात विश्‍वास, प्रीती, आत्मीयता यांच्याबरोबरच एकमेकांबद्दलचा प्रेमयुक्‍त आदरही असतो. या सर्व भावनांची जपणूक करणाऱ्या जोडप्याला कधीच सुखाची कमतरता जाणवणार नाही... कारण तेच खऱ्या प्रेमाचं प्रतीक असतं.

साजशृंगार ल्याली,
लक्ष्मी दाराशी ओठंगली,
दोन डोळ्यांच्या ज्योती
सुखसागरात तेवती
पाडव्याचा दिन आज
सोनपावलांनी येई सुख...
ओवाळीता पतीराया,
उसळते मनी प्रेमाचे कारंजं...!
रूप प्रेमाचे सोज्वळ,
रुंजी घालते मंजुळ
ओवाळीता राजसाला
मिळे सौभाग्याची ओंजळ...

दिवाळीचा पाडवा हा जसा ''पत्नीचा दिवस'' तसा भाऊबीज हा बहिणीचा सण... बलिप्रतिपदेनंतर येणारी यम-द्वितीया ही बहीण- भावाच्या प्रेमाचं प्रतीक असते. या दिवशी तिन्हीसांजेला बहीण आपल्या भावाची आतुरतेनं प्रतीक्षा करते... जगाच्या पाठीवर कुठंही असलेल्या भावाला आजच्या दिवशी बहिणीच्या मायेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. लहान असो वा मोठी, या दिवशी बहीण-भावाच्या प्रेमाला कशाची आडकाठी नसते. ती हक्‍कानं आपल्या भाऊरायाला ओवाळते. सासरी असलेल्या बहिणीच्या डोळ्यांत प्रतीक्षेच्या ज्योती तेवत असतात. सजून धजून ती वारंवार दाराशी येऊन आपल्या दादाची वाट पाहत राहते. भाऊराया येतो... बहिणीची कळी खुलते. भाऊरायासाठी गोडधोड जेवणाची मेजवानी होते... बहिणीच्या एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात आसू असतात. पाट मांडून त्यापुढं नक्षीदार वेलबुट्टीची रांगोळी काढली जाते. लाडक्‍या भाऊरायाला पाटावर बसवून पंचारतीनं त्याला ओवाळणारी बहीण त्याक्षणी तरी सर्वांत आनंदी असते.

दिन आज सोनियाचा
उजळुनी जाई दाही दिशा,
लक्षलक्ष फुलल्या ज्योती,
मनी मांगल्य आशा...
चंद्रकोर उगवली नभात,
उभा भाऊराया दारात
सोनियाचा मांडला पाट,
चंदनाचे सजविले ताट
भाळी लावूनी टिळा...
आनंदे भाऊराया ओवाळा,
औक्षवंत बहिणीची माया...
भाऊबीज घाली भाऊराया


बहीण-भावाची माया औक्षवंत असते. कळीकाळी चुकून भाऊ आला नाही तर दु:खी होऊन बहीण आपलं दु:ख चंद्राला सांगते. भावाच्या माघारी चंद्राला भाऊ मानून त्यालाच ओवाळते... अशीच एक बहीण आतुरतेनं म्हणते,
जारे चंद्रा, निरोप घेऊन,
सांग माझ्या भाऊराया,
बहीण तुझी रे वाट पाहते,
भाऊबिजेला ओवाळाया...


मात्र एखादी वयानं मोठी बहीण स्वत:च्या मनाचं सात्वन स्वत:च करते, आणि म्हणते,
पाणावले का गं डोळे आज,

दूरदेशी भाऊराया,
नको करू खंत मनी,
दारी हसतो बघ चंद्रराया...

एकंदरीतच आपल्य जीवनात चंद्राला केवढं मानाचं आणि प्रेमाचं स्थान आहे. जशी चंद्रकिरणांची आभा शीतल असते तशीच भावाच्या प्रेमाची मायाही शीतल असते... जीवाला चटका लावणारी असते... भाऊबीज होते आणि वाजतगाजत येणारी दीपावली संपते. पाच दिवसांचा हा सण आनंदाचं कारंजं फुलवून जातो... जीवाशिवाच्या गाठीभेटी होतात... पैपाहुणे भेटतात... पंचपक्‍वांच्या पंगती होतात... आठवणींच्या झडी फुलतात... आसवांच्या गाठी पडतात... सोन्याच्या पावलांनी दिवाळी येते... वर्षभरासाठी आनंदाची बेगमी करून जाते... इवल्याशा पणतीच्या उजेडात जीवनातील तम विरून गेलेलं असतं... उरते फक्‍त सोन तेजाळलेली निरामय प्रसन्नता...
अशावेळी मनात येतं,
दिव्या दिव्या दिपत्काल...
कानी कुंडल मोती हार...
दिव्याला पाहून नमस्कार...
दिवा लागला देवापाशी
उजेड पडला तुळशीपाशी...
माझा नमस्कार सर्व देवांपाशी...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com