सूरपारंब्या... (डॉ. सलील कुलकर्णी)

dr salil kulkarni
dr salil kulkarni

गाणी, कविता, लेख, भाषणं यांच्या पारंब्यांवर चालू असलेला खेळ. प्रत्येक प्रवासातला. कधीकधी मित्र बरोबर असतील, तर त्यांच्याशी बोलत, रसास्वाद घेत, आठवणी सांगत आणि कधी माझाच माझ्याशी. या सगळ्या गाण्यांच्या, कवितांच्या निमित्तानं ती माणसं आठवतात, प्रसंग उभे राहतात. काही भेटलेले.. काहींची भेट हुकली... मला माहितीये हा असा युट्यूबवर सूरपारंब्यांचा खेळ तुम्ही सगळेसुद्धा खेळत असणार.
आणि आम्हा कवी, संगीतकार मंडळींची धडपड यासाठी, की कोणीतरी कुठल्या तरी देशात प्रवास करताना त्याच्या या सूरपारंब्यांच्या खेळात एक पारंबी आपली असावी. आपली एक ओळ.. एखादं गाणं त्याला भेटावं, त्यानं सोबत करावी, कुशीत घ्यावं आणि कधी मिठीतसुद्धा!!

‘तिन्हीसांजा आहे मिळाल्या, देई वचन तुला’ सुरू झालं. दोन हजार वेळा तरी ऐकलं असेल; पण ‘नाद जसा वेणूत हो..  रस जसा सुंदर’ ऐकताना छातीत काहीतरी होतंच. कसा लागलाय ना दीदींचा शुद्ध मध्यम तिथं! दीदी म्हणजे खरंच जादू आणि ही तर हृदयनाथजींची अगदी सुरुवातीची स्वररचना.. क्या बात है! आणि भा. रा. तांबे म्हणजे वाह वाह. ‘हृदयी मी, साठवी तुज तसा’.. किती सुंदर. बा. भ. बोरकर आणि मंगेश पाडगावकर ज्यांना गुरुस्थानी मानत असे कवी तांबे. अबाबा! कसली असतील ही मंडळी. ‘जन पळभर म्हणतील’ तर किती घुसतं थेट आणि ‘मावळत्या दिनकरा’? त्यातलं ते.. ‘ उपकारांची कुणा आठवण? शिते तोवरी भुते अशी म्हण’... किती खरंय ना? संध्याकाळ आणि कविता यांचं वेगळंच नातं आहे. संध्याकाळ हीच एक कविता? का कविता म्हणजे एखादी व्याकुळ संध्याकाळ? ग्रेसच्या संध्याकाळच्या कवितेमधली?  
प्रवासात असताना, युट्यूब नावाच्या गुहेत शिरलं, की मग अंतर, ट्रॅफिक, स्पीडब्रेकर या सगळ्यापलीकडे घेऊन जाणारी इतकी मंडळी आहेत इथं, की त्यांच्याशी, त्यांच्या कलाकृतींशी आणि स्वतःशी बोलत जन्माचं अंतरसुद्धा पार होईल. दोन कान, दोन डोळे आणि एक मन पुरणार नाही असा खजिना.  

आहाहा! मुंबई-पुणे प्रवासात सह्याद्रीच्या डोंगररांगा संध्याकाळी किती विलक्षण दिसतायत. ‘पर्वतांची दिसे दूर रांग, काजळाची जणु दाट रेघ’... सुधीर मोघे आठवले. आवंढा आला. त्यांच्या आवाजात मुलाखत ऐकू आली... मुलाखतकार म्हणाला : ‘‘सुधीरजी, ‘सांज ये गोकुळी’ या गाण्यात आधी दोनच अंतरे होते, तुम्ही तिसरा नंतर लिहिलात..’’ त्याविषयी मोघे म्हणाले : ‘‘तिसरा नाही, अजून एक म्हणा. मी दुसरा लिहिला. कारण ‘माउली सांज, अंधार पान्हा’ अशी सर्वसमावेशक ओळ आल्यावर नंतर पुढे लिहिणं शक्य नव्हतं. जो घर बांधतो त्यालाच माहीत असतं, की कुठे खोली वाढवायला जागा आहे. त्यामुळे मी नंतर एक अंतरा लिहिला; पण तो दुसरा’’... वाह! सुधीरजी तुमचा आवाज ऐकू येतो मला नेहमी... आणि तुमच्या आवाजात ‘माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले...’ संगीतकार- त्यात कवी संगीतकार जेव्हा स्वतः शब्द गातो तेव्हा काय बहार येते. तो ज्या काळजीनं शब्द पेरतो, अर्थाचे पदर सोडवून दाखवतो. वेगळीच मजा! आमचा संदीप, ‘मी तुसडा कि भगवा बैरागी’ गातो, तेव्हा असाच शहारा येतो.. ‘माझ्यातून तू वाहसी.. तुझ्यातही मी पाहसी.. तुझ्या माझ्यातले सारे गूढ माझ्या तुझ्यापाशी’ पुरिया, पुरिया धनाश्री, मारवा, श्री... कसे आहेत नाही हे रंग! बापरे.. नको नको. यात खोल शिरलं, तर ते फार एकटे करतात! एकाकी.. ‘हम कितने एकाकी’ आई शप्पथ.. काय गायले आहेत ना सुरेशजी. काय आवाजाचा पोत, काय सूर. दैवी.. आणि वसंत देवांचे शब्द. या व्यक्तीलासुद्धा भेटायचं राहून गेलं. काय कमाल लिहायचे. लक्ष्मीकांत -प्यारेलाल चित्रपट संगीतातसुद्धा किती अभिजात काम करायचे.. आणि संख्यात्मक दृष्टीनं पण केवढं काम आणि तरीही दर्जा उत्तम. आणि आपले सुरेशजी! सुरेशजी आपल्याशी छान गप्पा मारतात, आपल्यातले असल्यासारखेच वागतात; पण केवढा मोठा माणूस.. बापरे नव्यानं पुन्हा एकदा फॅन झालो त्यांचा. ‘जुगनू का पट ओढे, आयेगी रात अभी, निशिगंधा के सुर मे कह देगी बात सभी’.. तीनदा ऐकलं सलग.  वाह वाह आणि आता संध्याकाळ आणि सुरेशजी म्हणजे ‘सुरमयी श्याम, इस तरह आये’ ऐकायलाच हवं. लंडनमध्ये एका संध्याकाळी महेश आणि अमृता पटवर्धनकडे आम्ही सगळे होतो. सुरेशजी, पद्माताई वाडकर, अवधूत गुप्ते, स्वानंद किरकिरे, सचिन आणि जल्पा खेडेकर, संदीप पाध्ये, आदित्य आठल्ये आणि मी. आणि सुरेशजी गायले होते. ती  संध्याकाळ आणि ते सगळं आठवलं.   

आपण भेटू भेटू म्हणतो; पण नाही जमत यार.. अशी एखादीच येते संध्याकाळ, याहून काहीतरी छान घडेल कदाचित; पण... ते तसं नाहीच..   
‘दिन का जो भी पहर गुजरता है, कोई एहसानसा उतरता है...’
गुलज़ार  साहेब, हृदयनाथजी आणि सुरेशजी, काय कॉम्बिनेशन आहे ना. गुलज़ारजी म्हणजे वेगळंच प्रकरण नाही? ‘दिन खाली खाली बर्तन है, और रात है जैसे अंधा कुंवा.’ कुठून येतात या कल्पना? आणि जयदेव साहेब, एक विद्यापीठ बरं का संगीतातलं. त्यांचं ‘अभी ना जाओ छोडकर, के दिल अभी भरा नही..’ क्या बात है यार. काय मजा असते गाण्यात. शब्द-सुरांमध्ये काय ताकद असते, आत्ता एकटेपणा वगैरे बोलत होतो आणि ‘अभी ना जाओ छोडकर’ सुरू झालं आणि संध्याकाळ प्रसन्न झाली. हिंदी चित्रपटांत जेवढी रोमँटिक युगुलगीतं झाली, मला विचाराल तर, ‘अभी ना जाओ’ ते ‘पहला नशा, पहला खुमार’ या दोन्हींच्या मध्ये मध्ये अनेक गाणी येतील; पण या दोन्हींना वगळून माझी यादी तरी पूर्ण होऊ शकत नाही. आता ‘पहला नशा’ ऐकणं आलं. उदित नारायणचा फ्रेश आवाज आणि पियानो जी जागा. हिंदीत ‘अभी ना जाओ छोडकर’ माझ्यासाठी तीच जागा मराठीत ‘रूपास भाळलो मी’ आणि ‘जे वेड मजला लागले’ या गाण्यांची. काय ताजेपणा आहे गाण्यात! बाबूजींचा आवाज. वसंत पवार काय बाप संगीतकार होते नाही? एका ‘अवघाचि संसार’मध्ये एकाहून एक कमाल चाली केल्या आहेत त्यांनी... आणि शांताबाई शेळके तेव्हा ‘वसंत अवसरे’ हे नाव घेऊन गीतं लिहीत होत्या. त्यांचे शब्द... काही माणसं आणि काही गाणी कधीच म्हातारी होत नाहीत. ती मनात अजून अजून पिकत जातात.. आमच्या ‘मैत्र जीवांचे’मध्ये जेव्हा हृदयनाथजी ‘मानसीचा चित्रकार’ गातात, तेव्हासुद्धा हेच जाणवतं.. चक्र पूर्ण झालं...? ‘तिन्हीसांजा’पासून पुन्हा ‘मानसीचा चित्रकार’... म्हणजे पुन्हा हृदयनाथजी!  

गाणी, कविता, लेख, भाषणं यांच्या पारंब्यांवर चालू असलेला हा खेळ. प्रत्येक प्रवासातला. कधीकधी मित्र बरोबर असतील, तर त्यांच्याशी बोलत, रसास्वाद घेत, आठवणी सांगत आणि कधी माझाच माझ्याशी. या सगळ्या गाण्यांच्या, कवितांच्या निमित्तानं ती माणसं आठवतात, प्रसंग उभे राहतात. काही भेटलेले.. काहींची भेट हुकली... मला माहितीये हा असा युट्यूबवर सूरपारंब्यांचा खेळ तुम्ही सगळेसुद्धा खेळत असणार.
आणि आम्हा कवी, संगीतकार मंडळींची धडपड यासाठी, की कोणीतरी कुठल्या तरी देशात प्रवास करताना त्याच्या या सूरपारंब्यांच्या खेळात एक पारंबी आपली असावी. आपली एक ओळ.. एखादं गाणं त्याला भेटावं, त्यानं सोबत करावी, कुशीत घ्यावं आणि कधी मिठीतसुद्धा!!

चला... गाडी पुण्यात शिरली... शुभंकर, अनन्या वाट बघत असतील... शुभूचा आवाज किती वेगळा झालाय आता. गोड आवाजाच्या बालगायकाकडून आता मस्त दमदार पुरुषी आवाज झालाय.. लहानपणी कसा गोड गोड गायचा... आहेत दहा मिनिटं घर यायला, तर त्याची दोन गाणी ऐकतो : ‘एकटी एकटी घाबरलीस ना, वाटलंच होतं आई’.. हम्म.. आई .. आई जेवायला थांबली असेल..!
तेवढ्यात शुभूचं दुसरं गाणं : ‘करून करून काळजी माझी, करून करून लाड.. दमलात तुम्ही आई-बाबा झोप जरा गाढ’... !!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com