ती हळूच येते एका संध्याकाळी... (डॉ. सलील कुलकर्णी)

dr salil kulkarni
dr salil kulkarni

उदासीला नेमकं कारण असतं? ती का असते? कारणाशिवाय येते आणि क्वचित काहीही न करता जातेसुद्धा. कुठं सुरुवात होईल या प्रवासाची सांगता येत नाही. कोणी जवळच्या माणसानं नाकारणं, आपल्याला चारचौघांत खोटं पाडणं... एक प्रसंग पुरतो आणि कधीकधी काहीही प्रसंग नसतो सुरुवात करायला. अगदी सहज सुरुवात होते. एका संध्याकाळी, एका मध्यरात्री... पण आपण खरंच इतक्या गांभीर्यानं पाहतो का त्यांच्याकडे? का ‘जाऊ दे ना रे, असतात काही जण मूडी, कसलं डिप्रेशन वगैरे उगीचंच फॅड काहीतरी’ असं म्हणून त्यांना टाळून आपल्या सोयीनं, आपल्याशी छान प्रसन्न बोलतील अशा माणसांकडे वळतो?

ती हळूच येते एका संध्याकाळी  
ना दिसे कुणा ती, लपून डसते भाळी  
डोळे उघडे पण थंड, नजर हरलेली  
अन् मनांत फिरती लक्ष वर्तुळे काळी....

‘अलीकडे तो जरा कमीच बोलतो’, ‘हो ना घुम्याच झालाय जरा.. येतो आणि थेट स्वतःच्या खोलीत जातो.. ही हल्लीची मुलं म्हणजे...’
किंवा... ‘ती उगाच चेहरा पाडून बसते हं. एवढ्या तेवढ्यावर काय चिडायचंय?’  
ही अगदी आपल्या आसपास ऐकू येणारी वाक्यं. बोलणारीसुद्धा आपल्या आसपासचीच माणसं असतात आणि ज्यांच्याविषयी बोलतात तेसुद्धा आपलेच. काल-परवापर्यंत अगदी छान असतात; पण नक्की मग काय होतं? कधी होतं? का बरं त्यांना मनापासून हसावं असं वाटत नाही आणि त्यांच्या आसपासचे लोक मात्र एक तर दुर्लक्ष करतात किंवा रागावतात, किंवा ‘हा किंवा ही ना जरा विचित्रच आहे,’ असं म्हणून दिवस आणि प्रश्न पुढे ढकलतात; पण ‘त्या’ माणसाच्या मनांत मात्र काहीतरी वेगळं घडत असतं. काय असतं नेमकं? काय कारण असतं? खरं तर नेहमी काहीतरी कारण असायलाच हवं का?  

वरवर ना दिसते कुणास लक्षण काही,  
ना खूण कुठेही, ना अंगाची लाही
ना दिसते तरिही वसते खोल उदासी
ती संतत झरत राहते थांबत नाही.....

दुःखाला नेमकं कारण असतं. एकटेपणाला सोबत, बेरोजगारीला नोकरी, पाठदुखीला डॉक्टर असे नेमके उपायसुद्धा असतात; पण उदासीला नेमकं कारण असतं? ती का असते? कारणाशिवाय येते आणि क्वचित काहीही न करता जातेसुद्धा. कुठं सुरुवात होईल या प्रवासाची सांगता येत नाही. कोणी जवळच्या माणसानं नाकारणं, आपल्याला चारचौघांत खोटं पाडणं... एक प्रसंग पुरतो आणि कधीकधी काहीही प्रसंग नसतो सुरुवात करायला. अगदी सहज सुरुवात होते. एका संध्याकाळी, एका मध्यरात्री... पण आपण खरंच इतक्या गांभीर्यानं पाहतो का त्यांच्याकडे? का ‘जाऊ दे ना रे, असतात काही जण मूडी, कसलं डिप्रेशन वगैरे उगीचंच फॅड काहीतरी’ असं म्हणून त्यांना टाळून आपल्या सोयीनं, आपल्याशी छान प्रसन्न बोलतील अशा माणसांकडे वळतो?  

पोटाशी घेऊन पाय श्रांत तो बसतो
अन् रात्री आकाशात पाहुनी हसतो  
रडण्याहून भेसूर दिसते त्याचे हसणे  
तो जणू सुखाच्या दारी हात पसरतो  

‘काही नाही हो, सुख बोचतं म्हणतो ना तसं आहे’ असं न म्हणता या माणसाशी संवाद साधायला हवा ना? ‘तो किंवा ती उगीच नाटक करते,’ हे वाक्य खरं असूही शकेल; पण समजा नसेल खरं तर? खरंच तो रात्र रात्र जागा राहत असेल तर? खरंच आता त्याच्या अगदी आवडीचे पदार्थसुद्धा त्याच्या घशाखाली उतरत नसतील तर? विश्वास ठेवून बघायलाच हवा. ‘आजपर्यंत आपल्या ओळखीत कोणीही मानसिक त्रास वगैरे झाला म्हणून डॉक्टरकडे गेलेलं नाही. तुम्हाला सगळं मिळतं म्हणून उगीच नाही नाही ते  विचार,’ असं बोलून झटकून टाकण्यापेक्षा एकदा हात हातात घेऊन विचारायला हवं, की ‘सांग काय होतंय तुला?’ आणि त्याचं नेमकं उत्तर देता आलं नाही, तरी न वैतागता संवाद चालू ठेवायला हवा- कारण ज्याचं उत्तर त्यालाच माहीत नसतं तो आपल्याला काय सांगणार?   
काल-परवापर्यंत खळखळून हसणारी ही व्यक्ती आता का हसत नाही? त्याला काय मिळेल असं एकटक शून्यात पाहत राहून? ती का अचानक ‘सध्या गाणं बंदच आहे पूर्ण’ असं म्हणाली?... खूप छोट्याछोट्या खुणा असतात; पण उदासीची वाटसुद्धा पुसट; पण निश्चित अशा खुणा दाखवत असते.   

चालतो जसा, की मागुन नियती ढकले
कोणत्या दिशेला जाणे हेही न कळे  
हातांची बोटे हवेत फिरवत बसतो
जणु हिशेब त्याचे किती युगांचे थकले...

‘उत्तम मार्क मिळाले आहेत, छान पगार आहे, सोन्यासारखी बायका-पोरं आहेत... मग काय धड भरली आहे?’ हो बरोबर आहे- पण... तो मुद्दाम नाही करत काहीच... त्याचा इलाज नसतो. त्यालाही समजत नसतं, की का होतंय. का नको वाटतंय सगळंच? का बरा वाटतोय अंधारच? अगदी छोटा दिवासुद्धा का नकोसा वाटतो आहे खोलीत? एखादी तरी व्यक्ती असतेच- ज्या व्यक्तीशी तो मोकळेपणानं बोलेल... पण त्या वेळेला ती व्यक्ती भेटायला हवी ना!!?? आपण ‘नंतर भेटू, सावकाश एकदा बोलू’ म्हणत राहतो... हा नंतर खरंच येतो का? इतकी महत्त्वाची कोणती मीटिंग असते- ज्यात आपण ‘नंतर बोलतो’ एवढा मेसेज पाठवतो आणि नंतर ‘राहूनच गेलं’ म्हणतो. भेटून बोलायला नको? विचारायला नको?  

पाऊस लाडका होता एके काळी  
सगळेच बदलले जेव्हा बाधा झाली  
ढग दाटून येता गुदमरतो, तडफडतो  
तो लपतो मग आईच्या पदराखाली  ...

संवाद... सगळ्याचं उत्तर या संवादातच मिळतं... आजपर्यंत आपल्या ओळखीत कोणी गेलं नाही म्हणून न थांबता मनाच्या डॉक्टरशी गप्पा, संवाद साधायला जायला हवं. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कोणीतरी काहीतरी सांगू पाहतंय का याच्याकडे आपलं प्रत्येकाचं लक्ष हवं. सोशल मीडियावरसुद्धा जाणवतं, की हा माणूस बदलतो आहे. याचे फोटो बदलतायत, फोटोतले डोळे वेगळे दिसतायत, हसू वेगळं दिसतंय... त्याला सतत काहीतरी वेगळं बोलावंसं वाटतंय.. मला वाटतं, हे जाणवल्या जाणवल्या गप्पा मारायला जायला हवं त्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या घरी आणि विचारायला हवं, की काय होतंय? ‘काहीच नाही,’ असं म्हणू दे त्याला; पण बसायला हवं त्याच्या शेजारी... बसून राहायला हवं. सगळ्यापलीकडे जाऊन ‘मी तुझ्यासोबत आहे,’ हे सांगण्याइतकं चांगलं दुसरं काहीच देऊ शकत नाही आपण मैत्रीत... काय होतंय? कशामुळे? याची उत्सुकता असतेच आपल्याला; पण कधीकधी उत्सुकता टोचण्याइतकी वाढली, की जो सोसत असतो त्याला ती त्रासदायक होते.  

तिज कोण आणते? कुठुन उदासी येते?
जी शोधुन शोधुन ‘हसणे’ सोबत नेते
लाखदा विचारा एकच उत्तर त्याचे  
‘हे असेच आहे.. राहील...असेच होते’...

ही मंडळी फक्त आजारी असतात, अजिबात ॲब्नॉर्मल किंवा टोकाला जाणारी नसतात खरं तर. टोकाला जातो तो एखादा क्षण... एकच.. आणि तो जर टाळता आला तर कदाचित आपला माणूस वाचतो.. पुन्हा आपल्यात येतो, पुन्हा हसायला लागतो, कदाचित आपल्यालाच आधार देतो... या उदासीला औषध आहे, याचे तज्ज्ञ आहेत; पण ही ओळखता यायला हवी, वेळेवर.  
आपल्या माणसांशी गप्पा मारत राहायला हवं, मुलांना विचारत राहायला हवं, की छान आहे ना सगळं, काही त्रास नाही ना रे डोक्याला? ऑफिसमधून आल्यावर वडील रोज एकटेच शांत बसत बसतील, तर नुसतं त्यांच्या आसपास राहायला हवं, कोणाच्याही वागण्यात काही बारीक खुणा दिसल्या, तरी त्याची नोंद घ्यायला हवी.   
नाहीतर...  

या खोल उदासीला ना औषध मिळते
ना मंत्र तंत्र वा यज्ञाने ती पळते
ती घर करते मग पेशी पेशीत त्याच्या  
अन् एका रात्री हळूच त्याला गिळते

(कविता - सलील कुलकर्णी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com