अनेक रूपांतली ‘ती’ (डॉ. सलील कुलकर्णी)

dr salil kulkarni
dr salil kulkarni

‘संवादिनी’ हे नाव माझ्यासाठी या अर्थानं फारच समर्पक आहे. माझा आणि तिचा सतत संवाद चालू असतो. छोटं मूल जसं आईचा किंवा बाबांचा हात धरून किंवा त्यांना खेटून उभं राहून आधार शोधत राहतं, अगदी तसाच मी तिच्या नुसत्या स्पर्शानंसुद्धा जास्त आत्मविश्वासानं गाऊ किंवा बोलू लागतो. अशी चिकटली आहे ती माझ्या हाताला, की आता... वेगळे उरलोच नाहीये. अनेक वेळेला मी झोपेतून उठून हवेत बोटे फिरवतो आणि मला डोक्यात असलेली सुरावट ऐकू येते...

आजी.. आई.. बहिणी.. मुलगी.. मैत्रिणी.. सहकलाकार.. या सगळ्या ‘ती’ भेटल्या.. त्यांनी सांभाळून घेतलं म्हणून जे काही थोडं फार केलं ते करता आलं. या हाक दिल्यावर धावत येणाऱ्या ‘ती’बरोबरच अशा काही ‘ती’ भेटत राहतात. दुरून.. जवळून.. कधीतरी नुसत्या जाणवतात. कधी सोबत करतात, कधी थोड्या दुरून पाहतात माझ्याकडे...पण साथ सोडत नाहीत!!
अशा तीन ‘ती’...
***

तिची माझी पहिली भेट कधी झाली ते आठवत नाही खरं तर. फारच लहान होतो मी आणि वडिलांनी तिची भेट घडवली. तेव्हा ताई होती माझी ती. तीसुद्धा छोटी होती; पण तरीही माझ्यापेक्षा मोठीच. पहिल्या भेटीतच आमची गट्टी जमली. तेव्हा मला ती पूर्ण समजली असं नाही. खरं ती माझ्या मनात ‘हिरवी कच्ची’ असल्यापासून ते आता ‘पोक्त सच्ची’ होईपर्यंत मला भेटत राहिली... पण आजही ती मला अंतर्बाह्य समजली असं नाही वाटत.. पण एक मात्र शंभर टक्के खरं, की मी तिला पहिल्याच भेटीत पूर्ण उमगलो.. अगदी कायमचा!
तिच्या श्वासांचं ती गाणं करत आली माझ्यासाठी. अगदी तिसऱ्या वर्षी मला एक गोष्ट समजली, की आपण जर हिच्या पायाशी बसलो, तर ‘ती’ आपला हात कधीच सोडणार नाही. ती.. माझी गुरू, माझी कायमची मैत्रीण, माझी संवादिनी.. माझी हार्मोनियम!
अगदी तिसऱ्या वर्षी पुणे आकाशवाणीवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं ‘जयोस्तुते’ सादर करताना पहिल्यांदा मी तिचा हात धरून तो प्रवास केला. तेव्हापासून ‘ती’ असली, की आधार वाटतो. अगदी परवाच मी माझ्या मुलाला- शुभंकरला सांगत होतो, की ‘स्टेजवर आपण आत्मविश्वासानं बसायला हवं; पण एक लक्षात ठेव, की समोर कितीही गर्दी असेल, बरोबर कितीही साथीदार असले, तरी आपण आणि आपला सूर एवढेच असतो स्टेजवर.’ मला खरं तर कायमच स्टेजवर सगळ्यांत आनंदी वाटतं आणि सगळ्यांत एकटंसुद्धा. त्या एकटेपणाच्या प्रवासात कायम बरोबर असलेली माझी संवादिनी माझ्याशी बोलत असते.

‘संवादिनी’ हे नाव माझ्यासाठी या अर्थानं फारच समर्पक आहे. माझा आणि तिचा सतत संवाद चालू असतो. छोटं मूल जसं आईचा किंवा बाबांचा हात धरून किंवा त्यांना खेटून उभं राहून आधार शोधत राहतं, अगदी तसाच मी तिच्या नुसत्या स्पर्शानंसुद्धा जास्त आत्मविश्वासानं गाऊ किंवा बोलू लागतो. अशी चिकटली आहे ती माझ्या हाताला, की आता... वेगळे उरलोच नाहीये. अनेक वेळेला मी झोपेतून उठून हवेत बोटे फिरवतो आणि मला डोक्यात असलेली सुरावट ऐकू येते... संगीतकार मंडळींना हार्मोनियम म्हणजे क्रिकेटिअरसाठी बॅट असावी तितकी जवळची. चाल सुचत असताना अस्वस्थ असणारा मी, कधी कधी काहीही सुचत नसताना परिस्थितीला शरण जाऊन शांत बसलेला मी, कधी धमाल मस्ती करताना आनंदानं आपल्या प्रेयसीला तिचे हात धरून नाचायला लावावं तसा वादन करणारा मी... तिनं सगळे ‘मी’ पाहिले आहेत.
कधीकधी काहीतरी खूप बिनसलेलं असतानाही लोकांना मात्र हसरा चेहरा दाखवत, सादरीकरण करताना तिनं हातात हात घेऊन सावरलं आहे. कधी उगीच सुरांशी दंगा करायला जातोय, असं वाटल्यावर दटावलंदेखील आहे आणि खूप वाट बघितल्यावर एखादी खऱ्या अर्थानं ‘रचना’ म्हणावी अशी चाल सुचल्यावर तिनं शाबासकीसुद्धा दिली आहे. ती माझं हसणंसुद्धा आहे आणि ‘असणं’सुद्धा!
***

बालवयात अनेकांना ‘ती’ लाभते! आजोबा-आजी छान छान गोष्टी सांगतात, अक्षर घडवतात. आई- वडील, शिक्षक चांगले विचार रुजवतात. चांगला सूर लागला आपला, किंवा खरं तर कोणाचाही, की आपल्याला छातीत काहीतरी गंमत जाणवते. कोणीही कोणतंही नातं जीवापाड जपतंय हे बघून आपला गळा दाटून येतो. शाळेत आपला मित्र आंतरशालेय स्पर्धेत खेळताना आपण घसा बसेपर्यंत ओरडत राहतो- त्याला चिअरअप करण्यासाठी... सगळं कसं आतून आणि खरं असतं... या सगळ्याला ‘संवेदशीलता’ म्हणतात हे कळायच्या आधीच ‘ती’ असतेच आपल्याबरोबर!.. आणि मग ती आपलं बोट धरून चांगल्या पुस्तकांकडे नेते; चांगल्या कविता, गाणी, साहित्य, चित्र, शिल्प सारं काही तिच्या नजरेतून दाखवता दाखवता आपल्याला समृद्ध करत राहते.. आणि मग एक दिवस आपण उगीचच मोठे होतो, फायद्या-तोट्याची, सख्खा-चुलतची, माझं-तुझंची भाषा बोलायला लागतो आणि शांताबाई शेळके कवितेत म्हणतात तसा हा ‘लोलक’ हरवतो आपल्या हातून आणि दिसू लागतात माणसं पुन्हा माणसासारखी. अनेक मित्र पाहिले मी हळूहळू बदलताना. त्यांच्यामधला तो छोटा, निरागस, संवेदनशील मुलगा अस्तित्वात असतोसुद्धा; पण त्या बारक्या पोराच्या खांद्यावर यांच्यातला हिशेबी मोठा माणूस बसतो आणि मग ते पोरगं आणि त्याच्याबरोबर ‘ती’ त्याची संवेदशीलता सुद्धा गुदमरते आणि लांबून बघणाऱ्याला मात्र फक्त हा व्यापारी दिसत राहतो.
फार उशिरा कधीकधी लक्षात येतं, की आपण खरे कसे होतो. का चालत होतो, कुठे निघालो होतो..! ‘ती’ अनेकांना लाभते, जपून वागते, लपून बसते.. पण सोडून जात नाही. तुम्ही जरा दोन शब्द गोड बोला.. ती येते. एखाद्या ज्येष्ठ मैत्रिणीसारखी समजून घेते. चुका सोडून देते.. पण तुम्ही हात पुढे तर करायला हवा.
***

ती सतत लपाछपी खेळते. दिसते असं वाटेपर्यंत लपते. मुळात लांबून दिसते, तेव्हा असते का? का ‘मृगजळ’ केवळ? एखाद्या आडवयीन प्रेयसीसारखी वागते ती माझ्याशी.. येणार येणार म्हणते आणि गायब.. आणि कधीकधी अर्ध्या रात्री येऊन म्हणते ‘चल, चांदण्यात जाऊ!’...
‘प्रतिभा’.. सगळ्यांत चंचल आणि तरीही सगळ्यांत खोल. सगळ्यांत क्रूर आणि तरीही सतत जपावी अशी. सर्वांत नाजूक, तरीही सगळ्यात प्रभावी अशी ही ‘प्रतिभा’!!
आभाळातून तुम्हाला सतत जोखत राहत गुणांची नोंद करणाऱ्या चित्रगुप्ताची नातेवाईक असावी ही ‘प्रतिभा.’ सतत नोंद ठेवते.. काय करतोय हा आपल्यासाठी? हा जपतोय का मला? का उधळतोय कुठेही, कसाही, अवेळी, अस्थानी? आणि म्हणूनच ‘ती’ येते.. आणिक ‘जाते’.. खानोलकरांना ती काठोकाठ लाभली; पण कदाचित ज्यांना तिच्या नजरेला नजर देता आली त्यातले ते असावेत.. म्हणूनच प्रतिभेच्या नक्षत्रांचे देणे राहून जाणार अशी अस्वस्थ कविता लिहून, त्या प्रतिभेचे लाडके असूनही पट्कन इथला पसारा आवरून स्वतःच एक नक्षत्र होऊन बसले. ‘संध्यागीत’ गुणगुणत ती येते..
‘मी लगेच निघते आहे हं,’ असं म्हणणाऱ्या आडमुठ्या मैत्रिणीसारखी.. आणि एकदा जरी तिच्यावरून नजर हटली, की ती निघाली म्हणून समजा.
अजब नियम तिचे. कधी कधी घरात घुसते आणि गुदमरून टाकते तिच्या मिठीनं. असं वाटायला लागतं की आपलीच. आता असणारच कायम इथं... पण एक क्षण कुठंतरी काहीतरी गोंधळ होतो, एखादा माणूस स्वतःलाच ‘प्रतिभा’ समजायला लागतो आणि ती अर्ध्या रात्री संसार टाकून निघून जाणाऱ्या बायकोसारखी निघून जाते.
मला तिच्या पायाशी बसायला आवडतं.. आशीर्वाद हा आशिर्वादासारखा घ्यायला हवा.. हक्काच्या इस्टेटीसारखा नव्हे. एखाद्या स्वामींच्या पादुका आपल्याकडे येतात आणि दर्शनाला खूप गर्दी जमते तेव्हा ती गर्दी ‘स्वामींच्या’ पादुका पाहायला, त्यांचं दर्शन घ्यायला जमली आहे, याचं भान असायला हवं. ज्या क्षणी माणूस ती गर्दी स्वतःची समजायला लागतो तेव्हा मात्र तिचा कोप होतो. ‘ती ‘फार बारकाईने पाहत असते... आपल्याकडे प्रतिभेचा काही काळ मुक्काम आहे तेव्हा तिचा मान ठेवता यायला हवा, आपण म्हणजेच ‘प्रतिभा’ नव्हे हे कळायला हवं. म्हणूनच तिचा भार सोसणं हा आनंदसुद्धा असतो आणि जबाबदारीसुद्धा...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com