शब्दांचं ‘दुधारी’ शस्त्र! (डॉ. सलील कुलकर्णी)

dr salil kulkarni
dr salil kulkarni

प्रत्येक शब्दाचा अर्थ, वजन, वेळ आणि महत्त्व असतं. ‘दैवी गाणं’ असं वर्णन अगदी उथळ गायकासाठी वापरलं, तर मग काही भोळ्या लोकांना हेच दैवी वाटेल ना? त्याची जबाबदारी कोणाची? आपण एखादा शब्द जाहीर सभेत किंवा रंगमंचावर किंवा सोशल मीडियावर बोलतो, तेव्हा जसा वाईट शब्दाचा वाईट परिणाम असतो, तसा बेजबाबदारपणे बोललेल्या अती चांगल्या शब्दाचासुद्धा वाईट परिणाम होतो असं नाही वाटत? अशानं नवीन पिढीला काही गोष्टी खऱ्याच वाटायला लागतात. ते हळूहळू प्लॅस्टिकच्या वाघालाच घाबरायला लागतात आणि बोक्याच्या ओरडण्याला ‘डरकाळी’ म्हणू लागतात. पासष्ट टक्क्यांना जर आपण शंभर म्हणून कौतुक करू लागलो, तर मग ‘खरे शंभर’ कसे हे कळणार कसं पुढच्या पिढीला?...

शाळेत फळ्यावर लिहिलेले अनेक सुविचार जसेच्या तसे पाठ असतात आपल्याला. अगदी बाईंनी निळ्या खडूनं लिहिला होता का लाल या तपशिलासकट!... अनेक गोष्टींसारखे हे सुविचारसुद्धा लक्षात ठेवलेले असतात आणि परीक्षेत आपण ते लिहून गुणसुद्धा मिळवतो; पण हे विचार ‘सुविचार’ आहेत हे पटण्यासाठी मात्र आपल्याला अनुभवच घ्यावा लागतो. खरं तर शाळेपासूनच आपल्याला हे जाणवत असतं, की काही जणांना तीक्ष्ण शब्द बोलून सभा, चर्चा, भांडण किंवा धुसफूस जिंकण्याची सवय असते. शब्दांचा थेट वार केला, की समोरचा माणूस गप्प होतो आणि विजयाचा तात्पुरता आनंदसुद्धा मिळतो, असा एक समज असतो. भूतकाळातला एखादा हळवा मुद्दा काढून शब्दाचं धारदार हत्यार वापरणं हा तर
हातखंडा प्रयोग असतो; पण फळ्यावरचा सुविचार आपल्यापर्यंत असा येईल असं आपल्याला वाटतंच नसतं.
‘खिळे आणि लाकडाची पट्टी’ अशी एक गोष्ट मी ‘मधली सुट्टी’ कार्यक्रमात सांगितली होती : ‘‘एकदा शाळेतल्या एका उद्धट आणि टोचून बोलणाऱ्या मुलाला सर सांगतात, की ‘कोणाला ओरडून, टोचून बोलावंसं वाटलं, की या पट्टीवर एक खिळा ठोकायचा आणि तुला सॉरी म्हणावंसं वाटलं, की काढून टाकायचा.’ पंधरा-वीस दिवसानंतर सर त्याला बोलावतात आणि विचारतात : ‘किती वेळा टोचून बोलावंसं वाटलं?’ मुलगा म्हणतो : ‘वीस वेळा; पण सर मला लगेच ‘सॉरी’ म्हणावंसं वाटलं आणि मी खिळा लगेच काढून टाकला.’ सर म्हणतात : ‘मग बघ बरं, आता लाकडाची पट्टी कशी दिसते आहे?’ मुलगा खजिल होऊन बघतो. पट्टीमध्ये खिळे नसतात; पण खूप भोकं मात्र पडलेली असतात.’’ अशा गोष्टी सांगतोच आपण लहानपणापासून मुलांना; पण त्यांना आजूबाजूला मात्र वेगळीच चित्रं दिसत असतात.

बॉस- हाताखालचा माणूस, नवरा- बायको, प्रियकर-प्रेयसी यांच्यात शब्दांची बॉक्सिंग सतत चालू असते. ‘अरे, असा मस्त बोललोय ना सगळ्यांसमोर त्याला, बघ लक्षात ठेवेल तो कायमचा’ यात कौतुक वाटत असतं. सासू- सून या आधीच हळव्या असणाऱ्या नात्यात तर सहज बोललेलं वाक्यसुद्धा टोचू शकतं किंवा टोचेल असं वाक्य सहज म्हणून बोललं जातं. एकूण हा शब्द फेकून मारायचा खेळ आपल्याकडे फारच रंगतो आणि अशा जाहीर शब्दफेकीचं कौतुकसुद्धा होतं.

‘त्यांनी भाषणात चिमटे काढले’, ‘त्यांनी कोपरखळ्या मारल्या’, ‘खरपूस समाचार घेतला’ असे मथळे घेऊन, हीच चर्चा सरळ बोलूनसुद्धा झाली असती यावर पांघरून घालून, अशा टोमणेबाजीचं कौतुक केलं जातं. तिरकस बोलून आनंद मिळवणं किंवा वरचष्मा मिळवणं असा खेळ खेळणाऱ्यांना हा शाळेतला सुविचार पुनःपुन्हा ओरडून सांगावासा वाटतोच; पण अजून एक प्रकारच्या मंडळींना हा सुविचार सतत सांगावासा वाटतो.
‘तू काय आहेस ना, ते मी चांगलंच ओळखून आहे’, ‘तुझ्यासारखा माणूस असाच वागणार’, ‘मला वाटलंच होतं तू ‘असा’ असशील’... ‘तुझी लायकी’.. ‘तुझ्या घरचे’... हे तर अती तीक्ष्ण बाण.. पण लोकप्रिय... त्यातून हे टोचणारे बाण! दुसरा माणूस तिसऱ्याला बोलताना आवडणारी मंडळी आपल्याकडे पुष्कळ आहेत, त्यामुळे त्यांच्या शाळेत हा सुविचार असतोच की!...पण ते लिहून मार्क मिळवतात; पण विचार नाही रुजत.

शब्द हे शस्त्र आहे. ते कुठंही जपून वापरायला हवं, अगदी वर्णन किंवा कौतुक करतानाही.. भुरभुर पावसाला ‘धो धो’ म्हणून खऱ्या मुसळधार पावसाला आपण कमी लेखतो का?.. ‘अहो ज्याचा त्याचा चॉईस आहे, ते कशालाही काहीही म्हणतील,’ वगैरे समाजवादी दृष्टिकोन मान्य करूनसुद्धा, एखाद्या चित्रपटाला आपण ‘सांगीतिक मेजवानी’ म्हणतो, तेव्हा याआधी, कोणत्या उंचीवरच्या कलाकृतीला हा शब्द वापरला गेला होता याचं भान ठेवता यायला हवं, असं मला वाटतं.
रंगमंचावर हातात माईक आल्यावर तर काहींच्या तोंडात शब्दांची फुलबाजीच लागते. ‘अभूतपूर्व’, ‘देदीप्यमान’, ‘न भूतो न भविष्यती’ वगैरे एकदा चालू झालं, की.. ‘अहो जरा थांबा, थोडं विचार करून बोलता का?’ असं सारखं सांगावंसं वाटतं. एकदा मी आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर असा दोघांचा कार्यक्रम असताना, सुरुवातीलाच माझी ओळख करून देताना निवेदिका बाई म्हणाल्या : ‘ज्येष्ठ संगीतकार सलील... ’.. मी तात्काळ म्हणालो : ‘अहो, मग हे कोण?.. हे खरे ज्येष्ठ ना!!’ मग सगळी धावाधाव झाली.. आता नवीन विशेषण आणणार कुठून खरोखर ज्येष्ठ माणसासाठी? प्रत्येक शब्दाचा अर्थ, वजन, वेळ आणि महत्त्व असतं ना. ‘दैवी गाणं’ असं वर्णन जर अगदी उथळ गायकासाठी वापरलं, तर मग काही भोळ्या लोकांना हेच दैवी वाटेल ना? त्याची जबाबदारी कोणाची? आपण एखादा शब्द जाहीर सभेत किंवा रंगमंचावर किंवा सोशल मीडियावर बोलतो, तेव्हा जसा वाईट शब्दाचा वाईट परिणाम असतो, तसा बेजबाबदारपणे बोललेल्या अती चांगल्या शब्दाचासुद्धा वाईट परिणाम होतो असं नाही वाटत?

मदनमोहन, आर. डी बर्मन यांच्यासाठी वापरली जाणारी विशेषणं इतर कोणासाठी वापरायची तर थोडा संयम हवा ना? पु. ल. देशपांडे यांच्यासाठी कायम वापरलं जाणारं ‘महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व’ हे विशेषण दुसऱ्या कोणासाठी वापरायचं असेल, तर किमान एकदा मनात तपासून बघायला नको का? अशानं नवीन पिढीला काही गोष्टी खऱ्याच वाटायला लागतात. ते हळूहळू प्लॅस्टिकच्या वाघालाच घाबरायला लागतात आणि बोक्याच्या ओरडण्याला ‘डरकाळी’ म्हणू लागतात. पासष्ट टक्क्यांना जर आपण शंभर म्हणून कौतुक करू लागलो, तर मग ‘खरे शंभर’ कसे हे कळणार कसं पुढच्या पिढीला? आवड, नावड सापेक्ष असू शकतेच; पण आपण ‘डोंगर’ कशाला म्हणायचं आणि ‘पर्वत’ कशाला याचे काही निकष असायला हवेत असं वाटतं. दहा जणांनी ‘चोर.. चोर’ असं ओरडून एखादा निरपराध माणूस चोर होत नाही, तसाच काही लोकांनी ‘जगप्रसिद्ध’ म्हणून एखादा माणूस साऱ्या जगात प्रसिद्ध नाही होणार. दुःख कोणाला अवाजवी यश मिळाल्याचंसुद्धा नसतं... पण काळ सोकावतो!
मध्यंतरी एका गायिकेची मुलाखत ऐकताना, ग. दि. माडगूळकर, शांता शेळके यांच्याशी नातं सांगणारी शब्दरचना म्हणून एका नवीन कवयित्रींच्या काही ओळी टीव्हीवर ऐकवल्या- ज्यामध्ये ना वृत्त अचूक होतं, ना शब्दरचना.. पण घरी बसून ऐकणारा रसिक म्हणतो, की या म्हणतायत म्हणजे असतील मोठे. म्हणजे ज्यांच्या शब्दाला जास्त किंमत आहे, त्यानं तर तो अजूनच जपून वापरायला हवा.
‘बेटा, आपके गले मे सरस्वती है’ असं वाक्य एखादा परीक्षक सहज एखाद्या छोट्या मुलाला म्हणून जातो आणि मग हा किती उमदा माणूस म्हणून त्याचं कौतुक होतं आणि तो त्याची फी घेऊन घरी जातो; पण त्या छोट्या मुलाला आणि मोठ्या कष्टानं त्याला वाढवणाऱ्या त्याच्या गरीब आई-वडिलांना खरंच वाटतं, की याच्या गळ्यात सरस्वती आहे!.. जो बोलून गेला, तो हे विसरून जाऊ शकतो; पण त्या मुलाच्या मनावर काय परिणाम होईल? .. जसं मुलांना लहानपणी एखादा भयानक प्रसंग बघून मनावर ओरखडा उठतो याची भीती वाटते, तशीच केवळ चमकदार वाक्य बोलायचं म्हणून त्या मुलाचं अवास्तव आणि अस्थानी कौतुक झाल्यामुळे त्याच्या आयुष्यात अधिक मोठा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती मला कायम वाटते. लहान मुलांसाठी, त्यांच्या मनाचा पिसारा फुलायला एखादं वाक्यसुद्धा पुरेसं असतं, याचं भान ठेवायला हवं.. मोठमोठे नेते जातीचं राजकारण करून कोवळ्या मुलांना भडकवतात, तेव्हा हेच शब्द त्यांच्या मनावर कोरले जातात. ते शब्द घेऊनच ते लढतात आणि अडकतातसुद्धा..

‘मला असं म्हणायचं नव्हतं’ किंवा ‘मी तेव्हा रागावून बोललो ’, ‘आता सोडून दे’... शब्द हे शस्त्र वापरणाऱ्या मंडळींची पाश्चत्तापदग्ध अवस्थेमधली ही लाडकी वाक्यं; पण.. एकदा बाण सुटला, की सुटला! फार वाईट किंवा फार चांगलं, खात्री नसेल तर एकदा मनात बोलून बघावं का?
शब्द... तीक्ष्ण असतात, तेव्हा दुखावतात. कधी..अतिरंजित कौतुक असतं, तेव्हा सुखावतात; पण नुकसान करतात.
एकूणच.. नाजूक प्रकरण! सुविचारांत किती सोपे वाटायचे.. आणि खरे? फारच जालीम? दोन्ही बाजूंनी...
शब्द हे फारच धारदार शस्त्र आहे
खरंच जपून वापरावेत..!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com