कौटुंबिक सहजीवन फुलवण्याची सुसंधी (डॉ. सपना शर्मा)

dr sapna sharma
dr sapna sharma

लॉकडाऊननं आपल्यासमोर जसे अनेक प्रश्न उभे केले आहेत, तसेच त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचीही सुस‌ंधी याच लॉकडाऊननं आपल्याला दिली आहे. खासकरून कुटुंबातल्या विविध नात्यांकडे नव्या दृष्टिकोनातून पाहायला लावण्याची, काही बिघडलं असेल तर ते ठीकठाक करण्याची, आधीच सगळं काही चांगलं असेल तर ते अधिकाधिक चांगलं, अधिकाधिक समृद्ध करण्याची संधी घेऊन हा कालावधी आला आहे. ही संधी अशीच दवडता नये...

‘‘हे सगळं लॉकडाऊन प्रकरण कधी संपणार आहे?’’
एका व्हॉट्सअप ग्रुपवर हा अगतिक प्रश्न तीन-चार दिवसांपूर्वी वाचला. वाचताना गंमतच वाटली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, काही दिवसांपूर्वी जेव्हा शाळा-कॉलेजना सुटी लागल्याचं जाहीर झालं, तेव्हा याच ग्रुपवर ‘ऑफिसेसनाही सुटी का जाहीर केली जात नाही? मस्त आराम करता येईल.’ अशी चर्चा रंगली होती.
माणसाचं हे असंच आहे.
ऊन्ह असलं की ‘फार उकडतंय’ची तक्रार, थंडी असली की ‘किती थंडी वाजतेय’ची तक्रार.
आपल्याला नेमकं काय हवंय हे आपल्याला तरी माहीत आहे का? एरवी अगदी अशक्य असलेली ही संधी प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीला लॉकडाऊनच्या या कालावधीत अशी अचानकच मिळालेली आहे. मात्र, नेहमीच वेळ नसल्याची तक्रार करणाराही, आज मिळालेल्या वेळेचा उपयोग हा बहुतकरून व्हॉट्सअपवरचे मेसेजेस पुढं ढकलण्यात वाया घालवतो आहे आणि आपल्याला किती त्रास आहे अशी तक्रार करून सगळ्यांची मनःस्थिती बिघडवतो आहे.

‘‘स्वतःच्या आनंदासाठी काय करता?’’असं मी जेव्हा सेमिनारमध्ये विचारते तेव्हा बहुतांश लोक ‘‘करायचं तर खूप काही आहे हो; पण वेळच कुठं आहे?’’ असं सांगून मोकळे होतात. मात्र, सध्या वेळच वेळ मिळाला आहे तर किती लोक स्वतःसाठी काही करत आहेत? हे एक वेळ सोडून द्या; पण ‘‘मुलांना वेळच देता येत नाही हो, सारखं कामच मागं लागलेलं असतं,’’ अशी तक्रार एरवी करणारे किती लोक आज खऱ्या अर्थानं मुलांबरोबर आनंदानं वेळ घालवत आहेत?
लॉकडाऊनचा पहिला आठवडा थोडा बरा होता. कारण, सगळंच नवं नवं होतं; परंतु दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच बहुतेकजण ‘लॉकडाऊन संपायला अजून किती दिवस उरलेत,’ हे मोजायला लागले आहेत. म्हणजे पुन्हा तेच! सध्या जो वेळ हातात आहे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून किंवा त्याचा कंटाळा आल्यासारखं करून कुठं तरी दूर असणाऱ्या मौज-मजेच्या दिवसाची वाट अनेकजण पाहत आहेत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर भीती एका गोष्टीची वाटते व ती म्हणजे, जाहीर झालेल्या तारखेच्याही पलीकडे समजा हे लॉकडाऊन वाढलंच तर...तर, ते संपायची एकेक दिवस वाट पाहत असलेली कितीतरी मंडळी किती डिप्रेस्ड् होऊन जातील!
तर मग काय करावं या लॉकडाऊनमध्ये? जेणेकरून आपण सर्वचजण केवळ शारीरिकदृष्ट्याच नव्हे, तर मानसिक व भावनिकदृष्ट्याही पूर्णपणे आरोग्यदायी आणि आनंदित राहू शकू?
याचं उत्तर आपण तीन भागांत पाहू या. तीन भागांत यासाठी की आपल्या आयुष्यातले तीन महत्त्वाचे घटक या लॉकडाऊनच्या निमित्तानं ठळकपणे अधोरेखित झालेले आहेत.
१. आपल्या पत्नीशी/पतीशी आपलं नातं
२. आपल्या मुलांशी आपलं नातं
३. आपल्या स्वतःशी आपलं नातं
रोजच्या आयुष्यात काही ना काही कारणं काढून, काही ना काही सबबी सांगून ‘या तिन्ही विषयांसाठी आपल्याकडे वेळ नाही,’ असं तुम्ही-आम्ही सांगत असतो.
असं करण्यामुळे आपल्याला बरंही वाटत असतं! कारण, या महत्त्वाच्या बाबी असूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याबाबतचा
आपला गिल्ट किंवा अपराधगंड एरवीच्या परिस्थितीत ‘वेळ नाही’ या सबबीमागं आपल्याला सफाईदारपणे लपवता आलेला असतो. मात्र, आज स्थिती तशी नाही.
‘वेळ नाही’ हे एरवीचं कवच आज गळून पडलेलं आहे आणि हे तिन्ही मुद्दे आपल्याकडे आ वासून पाहत आहेत! तर, सध्या आपल्याला मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करायचा असं ठरवून आपण या तिन्ही मुद्द्यांना सामोरे गेलो तर या जागतिक संकटाचा हा काळही आपलं जीवन सावरण्यासाठीची सुवर्णसंधी ठरू शकेल.

पती-पत्नीचं नातं :
लग्न झालं...मुलं-बाळं झाली...नियमितपणे पैसा घरी येत राहिला की आपलं आयुष्य सफल झालं अशा काहीशा आविर्भावात आपण जगत असतो. मात्र, नात्यात जर गोडवा नसेल तर, एकमेकांबद्दल ओढ नसेल तर किंवा हवं तसं आणि हव्या तितक्या प्रमाणात सर्वांगीण सान्निध्य, सर्वांगीण सहवास नसेल तर कुणाचंच मन आनंदी नसतं.
कित्येक जोडपी एकजुटीनं, एकोप्यानं सोबत राहत असल्याचं जगाला भासवत असतात. मात्र, पैसा-अडका, मुलं-बाळं असं सगळं व्यवस्थित असतानासुद्धा एकमेकांच्या परिपूर्ण सान्निध्याअभावी, परिपूर्ण सहवासाअभावी ती मनानं मरगळलेलीच असतात.
मात्र, या नात्याकडे त्या दृष्टिकोनातून नव्यानं पाहायची संधी आणि त्यासाठीचा पुरेसा वेळही आपल्याला सध्या मिळालेला आहे. एकमेकांच्या चुका काढण्याऐवजी किंवा एकमेकांना धाक दाखवण्याऐवजी, वचक बसवण्याऐवजी एकमेकांच्या सहवासाचा आनंद या काळात घेता येऊ शकेल. एकमेकांना घरकामात मदत करता येऊ शकेल; जेणेकरून दोघांपैकी कुणीतरी एकच जण थकून-दमून जाणार नाही आणि दोघंही एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेऊ शकतील.
जोडीदाराचा हात हलकेच हातात घ्या...उगाचच लाडीगोडी करा...दोघं मिळून एखादा जुना सिनेमा पाहा...तुम्ही हे सगळं करत असलेलं पाहून मुलं हसतील तर हसू देत. तुमच्याकडे पाहून तीही कदाचित त्यांच्या वैवाहिक जीवनासंदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टींचा बोध घेऊ शकतील.

* * *

मुलांशी तुमचं नातं :
सोशल मीडियावर मला मुलांचे मेसेज येत आहेत : ‘घरी जेलमध्ये बसल्यासारखं वाटतं...आई-वडील सारखे ओरडत असतात, झोपेतून सकाळी लवकर उठत नाही, सारखा मोबाईल घेऊन बसलेला असतो, वेळेवर जेवत नाही, खोली पाहा, किती घाण आहे...’
आणि पालकांचेही मेसेज येत आहेत : ‘पोरं अशी वागतात तर त्यांच्याशी जवळीक कधी साधायची?’
यात दिसून असं येतं की आईपेक्षा वडीलच पोरांना अचानक शिस्त लावायच्या मागं जरा जास्तच लागलेले आहेत. मात्र, मुलं अशीच असतात. त्यांचं ‘बेशिस्त’ वागणं तुम्हाला आवडत नसलं तरी एका दिवसात त्यांना शिस्त लावता येत नाही. आधी त्यांच्याशी अनुसंधान साधावं लागतं, मग त्यांच्याशी संवाद साधायचा असतो आणि मग कुठं ते तुमचं ऐकण्याच्या मनःस्थितीत येतात.
त्याही वेळी मुलं अगदी काटेकोर, शिस्तशीर वागायला लागतील अशी अपेक्षा बाळगणं हेसुद्धा घाईचं, अपरिपक्वतेचं ठरेल.
सध्या जो मोकळा वेळ मिळाला आहे त्यात पालकांनी थोडंसं आत्मपरीक्षण करून पाहावं.
लहानपणीच मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण करून त्यांना बिघडवण्यात/लाडावण्यात आलेलं आहे असंच चित्र बहुसंख्य कुटुंबांमध्ये दिसेल.
आणि मुलं थोडी मोठी झाल्यावर त्यांच्याशी संवादाच्या नावाखाली केवळ अभ्यास, परीक्षा, क्लास, मार्क्स याविषयीच बोललं गेलं आहे.
आपल्या मुलांना काय आवडतं, त्यांना कुठली भीती आहे का, कुणापासून त्रास आहे का, त्यांची स्वप्नं कुठली आहेत किंवा त्यांना कुठला न्यूनगंड आहे का, त्यांच्यांत भावनादौर्बल्य आहे का अशा बाबींविषयीची जराशीही कल्पना कितीतरी पालकांना नसतेच.
असं असेल तर मुलं पालकांजवळ कशी येतील?
सध्या जो फुरसतीचा वेळ मिळालेला आहे तो त्यांच्याशी निवांतपणे गप्पा मारून संवाद साधण्याचा आहे.
मात्र, हे काहीच न करता का सारखं त्यांना रागावता? का त्यांच्या चुका काढून स्वतःची आणि इतरांचीही मनःस्थिती बिघडवता? विसरा ते सगळं, झोपू द्या मुलांना आरामात...करू द्या त्यांना मोबाईलचा वापर...त्यांची मनःस्थिती चांगली झाली की आणि तुमचीही चांगली झाली की त्यांच्या खांद्यावर हात ठेवून गप्पा मारा. करून तर पाहा.
हे लॉकडाऊन कदाचित त्यासाठीच असेल!

* * *
तुमचं स्वतःशी नातं :
सध्या तुम्हाला कुठंही जायचं नाहीए...तुम्हाला आयुष्यात अशी परिस्थिती लाभली असल्याची कदाचित ही पहिली आणि एकमेव वेळ म्हणा किंवा संधी म्हणा, असू शकते!
घरकाम करणारी बाई सध्या येऊ शकत नसल्यानं तुम्हाला जास्त काम करावं लागत असेल हे खरं किंवा तुम्ही ‘वर्क फ्रॉम होम’ करत असाल हेही खरं...असं असलं तरीसुद्धा
ऑफिसला जाण्या-येण्याचा, त्या वेळा पाळण्याचा/सांभाळण्याचा ताण तुम्हाला सध्या नाही. मुलांना शिस्तीत ठेवण्याचाही ताण सध्या तसा कमीच आहे. परिणामी, मानसिकदृष्ट्या तुम्ही पूर्वीपेक्षा सध्या अधिक मोकळे आहात. तेव्हा दिवसातला थोडा तरी वेळ प्रत्येकानं स्वतःसोबत घालवायला हरकत नाही. ‘अलोन-टाइम’ किंवा ‘एकट्यासाठी वेळ’ यासारखं सोपं मेडिटेशन नाही! त्यासाठी काय करावं लागेल? सर्वांनी मिळून कुठलीही एक वेळ ठरवून घ्यायची आणि त्या वेळी फक्त एखादा तास सगळ्यांनी मोबाईल, टीव्ही बंद करून घरात किंवा अंगणात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बसायचं. बस, इतकंच. तुम्ही या वेळेचा उपयोग आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांबाबत चिंतन-मननासाठी अथवा ध्यानधारणेसाठी करू शकता. उदाहरणार्थ : माझ्या आयुष्याचा हेतू काय? मी जे करतो आहे तेच मला करायचं आहे का? मी माझं आरोग्य राखण्यासाठी काही करत आहे का? मी माझी महत्त्वाची नाती लक्षपूर्वक, काळजीपूर्वक जपतो/जपते आहे का? मला स्वतःसाठी आणखी काय करायची इच्छा आहे? माझा एखादा तरी छंद मी जोपासतो/जोपासते आहे का? त्यासाठी मी काय करू शकतो/शकते? इत्यादी...

समजा, तुम्ही कुठं कुणावर किंवा परिस्थितीवर उगाचच राग धरून बसला असाल किंवा आवडत नसलेलं काम करत राहिला असाल तर त्यासंबंधीही काही वेगळा विचार करण्याची संधी सध्याचा हा मोकळा वेळ घेऊन आला आहे.
या मोकळ्या वेळाचा उपयोग तुम्ही तुमच्या आयुष्याचं नवीन प्लॅनिंग आखण्यासाठी करू शकता. कुठल्याही विषयाचा अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. आज इंटरनेट जवळपास प्रत्येकाकडेच असतं आणि असं असेल तर मग तुमच्या हाती सगळ्या जगातलं ज्ञान आहे. त्याचा सदुपयोग तुम्हाला करून घेता येईल.
सध्या जिम बंद असल्यामुळे मी तर एका ऑनलाईन ग्रुपबरोबर रोज अर्धा तास नृत्याचा सराव करत आहे. मजा येते आणि आरोग्यही राखलं जातं.
तर, सांगायचा मुद्दा हा की या सगळ्यातलं थोडं थोडं जरी तुम्हा अमलात आणायला सुरुवात केलीत तर लॉकडाऊनचा हा कालावधी कधी निघून गेला हे लक्षातही येणार नाही.

आणि हो...स्वतःला आणि आपल्या जवळच्यांना चांगलं आरोग्य लाभलं आहे याबद्दल, तसंच आपल्याला लाभलेल्या
सुरक्षित घराबद्दल आणि या अडचणीच्या काळातही रोज चांगलं जेवण मिळत असल्याबद्दल रोज एकदा तरी ईश्वराला किंवा निसर्गदेवतेला मनापासून धन्यवाद जरूर द्या.

लॉकडाऊनचा हा कालावधी नकारात्मक नाही. उगाच मेसेजेस वाचून आणि ते इतरांना पाठवून हा कालावधी नकारात्मकतेत बदलू नका!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com