किनाऱ्यांवरचा प्लॅस्टिकासुर (डॉ. श्रीकांत कार्लेकर)

dr shrikant karlekar
dr shrikant karlekar

महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्यावर गोवा आणि कर्नाटकच्या किनाऱ्यांपेक्षा जास्त प्लॅस्टिक प्रदूषण आहे आणि इथली पुळणी (बीचेस) सूक्ष्म (मायक्रो) आणि मध्यम (मॅक्रो) आकाराच्या प्लॅस्टिक कणांमुळे प्रदूषित झाल्या असल्याचा असा निष्कर्ष गोव्याच्या राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेनं नुकताच मांडला आहे. त्या निमित्तानं किनाऱ्यावरच्या प्लॅस्टिक प्रदूषणाची वस्तुस्थिती, त्याचे विविध घटकांवर होणारे परिणाम आदी गोष्टींबाबत चर्चा.

महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्यावर गोवा आणि कर्नाटकच्या किनाऱ्यांपेक्षा जास्त प्लॅस्टिक प्रदूषण आहे आणि इथल्या पुळणी (बीचेस) सूक्ष्म (मायक्रो) आणि मध्यम (मॅक्रो) आकाराच्या प्लॅस्टिक कणांमुळे प्रदूषित झाल्या असल्याचा असा निष्कर्ष गोव्याच्या राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेनं (NIO) नुकताच मांडला आहे. नेदरलँड इथल्या ‘केमोस्फिअर’ नावाच्या संशोधनपत्रिकेत ‘भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरच्या प्लॅस्टिकचं मूल्यमापन’ असं शीर्षक असलेल्या लेखात हे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरच्या दहा पुळणींचे नमुने घेऊन त्याच्या अभ्यासानंतर हे अनुमान काढल्याचं यात म्हटलं आहे. यासाठी भौतिक, रासायनिक आणि जैविक स्वरूपाच्या २५ घटकांची आणि त्यांच्या विषारी (टॉक्झिक) परिणामांची तपासणी करण्यात आली असल्याचंही त्यात म्हटलं आहे. या अहवालानुसार भारताच्या संपूर्ण पश्चिम किनाऱ्यापैकी महाराष्ट्राची ७२० किलोमीटर लांबीची किनारपट्टी सर्वांत जास्त प्रदूषित आहे. त्यातही मुंबईच्या किनाऱ्यावर हे प्रमाण लक्षणीय आहे. नदीमुखं आणि खाड्या हे किनाऱ्यावरचे प्रदेश प्रदूषणामुळे जास्त बाधित आहेत.

पुळणींवरची सर्व प्रकारची प्लॅस्टिक प्रदूषकं ही किनाऱ्यावरचे कारखाने, उद्योग, बंदरं आणि पर्यटन व्यवसाय यातूनच पुळण प्रदेशांत आल्याचं निरीक्षणही त्यांत नोंदवण्यात आलं आहे. कोकण किनाऱ्यावर आढळणारे प्लॅस्टिकचे हे कण पांढऱ्या, फिकट पिवळ्या, पिंगट, हिरव्या, निळ्या आणि लाल अशा विविध रंगांत दिसून येत आहेत, असं डॉ. महुआ साहा आणि डॉ. दुष्मत महाराना या प्रकल्पाच्या राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेच्या संशोधकांनी म्हटलं आहे. तीन ते शंभर मिलिमीटर आकाराच्या सूक्ष्म प्लॅस्टिक कणांचं प्रमाण यांत सर्वाधिक असून त्यांच्या, पाण्यात बराच काळ तरंगत राहण्याच्या आणि पुळणीवरही बराच काळ टिकून राहण्याच्या गुणधर्मामुळे ते इतरही अनेक प्रदूषकांचं शोषण करू शकतात. कालांतरानं हे कण प्रदूषकांतलं विषारी द्रव्य सागरी प्राण्यांच्या शरीरातही पोचवतात.

गेली अनेक वर्षं आम्ही महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्यावर बोर्डी, डहाणूपासून वेंगुर्ले, रेडीपर्यंत सतत भूशास्त्रीय संशोधन करत आहोत. पूर्वी विश्लेषणासाठी गोळा केलेले या किनाऱ्यावर असलेल्या पुळणीवरच्या वाळूचे नमुने आणि गेल्या दहा वर्षांतले नमुने यांत निरनिराळ्या प्रदूषकांचं विशेषतः सूक्ष्म प्लॅस्टिकचं प्रमाण खूप वाढल्याचं आमच्याही संशोधनातून स्पष्ट झालं आहे. किनारे अस्वच्छ होणं, त्यांचं सौंदर्य नष्ट होणं, किनाऱ्यावर दुर्गंधी वाढणं, किनाऱ्याजवळचं पाणी विषारी होणं यासारखे परिणाम महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर दिसू लागले आहेत. जगातल्या पुळणीवरच्या निरनिराळ्या प्रदूषकांपैकी दहा टक्के प्रदूषकं ही सूक्ष्म आकाराच्या प्लॅस्टिक कणांची आहेत. आपल्या पुळणींवर हे प्रमाण ३२ टक्क्यांपेक्षाही जास्त असावं, असा प्राथमिक अंदाज आहे! दैनिक वारे, ऋतू, समुद्रप्रवाह, किनाऱ्याचा दंतुरपणा, पर्यटन आणि शहरी वस्त्यांची नजीकता यावर प्लॅस्टिकच्या सूक्ष्म कणांचं वितरण मोठ्या प्रमाणावर ठरतं, असं दिसून आलं आहे.

आपल्या किनाऱ्यांवर जिथं बंदिस्त पुळणी आहेत म्हणजे दोन जवळजवळच्या भूशिरांदरम्यान (हेडलॅंड्स) आहेत, तिथं अशा बारीक आकाराच्या प्लॅस्टिक प्रदूषकांचं प्रमाण जास्त आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या किनाऱ्यावरच्या पालशेत, अडूर, नरवण, वायंगणी, पडवणे, केळूस, कालवी आणि रेडी इथल्या पुळणींवर ही परिस्थिती दिसून येते. जिथं पुळणी बंदिस्त नाहीत; पण जिथं पर्यटकांचं जाणंयेणं वारंवार सुरू आहे, अशा अलिबाग, नागाव, काशिद, मुरुड, हरिहरेश्वर, गुहागर, वेळणेश्वर, गणपतीपुळे, रत्नागिरी, तारकर्ली, देवबाग आणि रेडी या सर्व पुळणींवरही हे प्रमाण जास्त आहे. या आणि अशा अनेक ठिकाणी किनाऱ्यावरच्या नदीनाल्यांतून येणारं प्लॅस्टिक खाडीत येऊन पडतं आणि तिथून ते समुद्रात जातं. भरती येते, तेव्हा हे सगळं प्लॅस्टिक किनाऱ्यावरच्या पुळण प्रदेशांत पसरतं. प्रत्येक मॉन्सूनमधल्या वादळी लाटांमुळं आणि नेहमीच्या भरती ओहोटी (टाइड) प्रवाहांमुळं यातल्या मोठ्या आकाराच्या प्लॅस्टिकचे कालांतरानं सूक्ष्म कण बनतात. हे कण पुळणीवरच्या वाळूत मिसळून जातात आणि त्यांचं विघटन खूप कमी वेगानं होत असल्यामुळे पुळणींवरच अडकून राहतात.

हरिहरेश्वरसारख्या ठिकाणी किनाऱ्याजवळच्या सागरतट मंचावर (शोअर प्लॅटफॉर्म) अडकून राहिलेल्या प्लॅस्टिकचे तुकडे विघटित होऊन पुळणीच्या दिशेनं वाहत जातात आणि सगळी पुळण प्रदूषित करतात. मुंबई, रत्नागिरी, मालवण यांसारख्या शहरांजवळ तर ही परिस्थिती अधिकच भयावह आहे. प्रत्येक भरतीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर वाहत येणारं प्लॅस्टिक हे इथलं नेहमीचंच दृश्य आहे! अशा किनाऱ्यांजवळ आणि खाडीत मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांच्या जाळ्यात हल्ली माशांपेक्षा प्लॅस्टिकच जास्त येतं, असा त्यांचा अनुभव आहे.

महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर बोर्डी, एलिफंटा, रेवदंडा, मुरुड, देवबाग अशा अनेक ठिकाणी केवळ प्लॅस्टिकच नाही, तर इतर वेगवेगळ्या प्रकारांनी होणाऱ्या सागरी प्रदूषणाचे दुष्परिणाम गेल्या काही दिवसांपासून प्रकर्षानं दिसू लागले आहेत. केवळ लहान मासेच नाहीत, तर डॉल्फिनसारखे मोठे मासे मरून पडल्याच्या घटना समोर येत आहेत. दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी, तरंगणारे प्लॅस्टिक पदार्थ यामुळे कोकणातल्या खाड्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाल्या आहेत. या समस्येची वेळीच दखल घेतली नाही, तर भविष्यात परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाईल यात शंका नाही.

सागरी प्रदूषण ही जगातल्या समुद्रकिनारी प्रदेशांना भेडसावणारी एक फार मोठी समस्या आहे. निवासी भागांतलं सांडपाणी, शेतजमिनीतून होणारं पाण्याचं निर्गमन, निरनिराळ्या औद्योगिक आणि निवासी संकुलांतून रसायनांचं आणि दूषित पदार्थांचं समुद्रात होणारं उत्सर्जन यामुळे सागरी प्रदूषण होतं. किनारी प्लॅस्टिक प्रदूषकांचं सर्वांत जास्त प्रमाण हे मुंबईसारख्या नागरी वस्त्यांच्या जवळून वाहणाऱ्या नदी मुखातून म्हणजे खाड्यातून होतं आहे. किनारी शहरांच्या जवळ असलेल्या वाळूच्या पुळणीवर हे प्रदूषण इतकं प्रमाणाबाहेर वाढलं आहे, की या पुळणी आता पर्यटकांसाठी व स्थानिकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात याव्यात अशी परिस्थिती आहे.
हिंदी महासागरात प्लॅस्टिकचे १३०० कोटी लहान मोठे तुकडे आजच्या घडीला अस्तित्वात आहेत. समुद्रातल्या प्रवाळ आणि प्रवाळ खडकांवर या प्लॅस्टिकचा मोठा दुष्परिणाम होतो आहे. प्लॅस्टिक प्रदूषकांमुळे प्रवाळ नष्ट होण्याची शक्यता इतर प्रदूषकांपेक्षा वीसपटींनी जास्त असते. किनाऱ्यावरच्या प्लॅस्टिकचं विघटन तिथल्या खारट आणि थंड पर्यावरणामुळं अतिशय मंद गतीनं होतं, त्यामुळंच ते त्याच प्रदेशात अनेक दिवस टिकून राहतं. ते जास्तीत जास्त पाचशे ते सहाशे वर्षं टिकून राहतं.
लाटांबरोबर आणि प्रवाहांबरोबर पुळण प्रदेशात खाड्यांतून वाहत येणारं दूषित आणि धोकादायक पाणी व प्लॅस्टिक आणि इतर पदार्थ आणि त्यामुळे वाढणारी रोग निर्माणकारी अतिसूक्ष्म जीवजंतूंची पातळी भविष्यात जगातल्या अनेक किनाऱ्यांची मोठीच समस्या ठरू शकेल. रासायनिक प्रदूषकं, तेलगळती, घरगुती सांडपाणी व मैलापाणी आणि इतर अनेक प्रकारच्या पदार्थांचे तरंगणारे गोळे, सिगारेटची थोटकं, प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि वस्तू यांचं प्रमाण सगळीकडंच वाढताना दिसतं आहे. दवाखाने आणि रुग्णालयं यातून समुद्रात सोडली जाणारी त्याज्ज औषधं आणि इतर वैद्यकीय प्लॅस्टिक वस्तूंचा कचराही मोठ्या प्रमाणावर शहरानजीकच्या किनाऱ्यांचं प्रदूषण वाढवत असतो. खाड्या आणि पुळणी तर या प्रकारे रोजच दूषित होत आहेत.
घरगुती आणि औद्योगिक स्रोतांतून येणारं प्लॅस्टिक केसाइतक्या सूक्ष्म आकाराच्या कणांमध्ये विघटित होतं आणि सहजपणे तरंगत दूरवर वाहत जातं किंवा पुळणींवर राहतं. हे प्लॅस्टिक इतक्या दूरवर जातं, की पॅसिफिक महासागरात कॅलिफोर्नियापासून सहा हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या मिडवे या बेटावरच्या अल्बेट्रॉस पक्ष्यांच्या शरीरांत असं प्लॅस्टिक मोठ्या प्रमाणावर सापडलं आहे. जवळजवळ नव्वद टक्के समुद्री पक्षांत हे प्लॅस्टिक असल्याचं निरीक्षण अलीकडंच समोर आलं आहे.
किनारी प्रदूषकांचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. तरंगणारी प्रदूषकं आणि विषारी पदार्थ. या दोन्हींमुळे पाण्याची प्रत झपाट्यानं बिघडते. किनारी प्रदूषकांचे स्रोत अनेक ठिकाणी आढळून येतात . त्यांचे स्थानीय आणि अस्थानीय स्रोत असे प्रकार केले जातात. समुद्रकिनाऱ्याच्या प्रदेशात, बोगदे, कालवे, पाईप यांतून सांडपाण्याचं आणि कचऱ्याचं विसर्जन जिथून केलं जातं, त्याला स्थानीय स्रोत असं म्हटलं जातं. मोठमोठ्या जहाजातून जिथं तेलगळती होते, त्यासही स्थानीय स्रोतच म्हटलं जातं. याउलट किनाऱ्यानजीकच्या शेतजमिनी, जवळच्या शहरातले रस्ते, वाहनतळ, खारजमिनी यांस अस्थानीय स्रोत असं म्हटलं जातं. या प्रकारात प्रदूषकांचा पुरवठा विस्तृत क्षेत्रातून होत असल्यामुळे स्रोताचा हा प्रकार जास्त धोकादायक मानला जातो.
शहरांजवळचे स्थानीय स्रोत जुने झाले असतील किंवा त्यावर खूप ताण असेल, तर किनाऱ्यावरचं प्रदूषण वेगानं वाढत राहतं. पाण्यातली बॅक्टेरियाची पातळी धोकादायक बनते. किनारी प्रदेशात शहरांचं सांडपाणी आणि कचरा टाकल्यामुळे पाणी दूषित होतंच; पण त्याचबरोबर पाण्यातले प्राणवायू कमी होतो, विषारी द्रव्यं वाढतात. किनारी प्रदेशात सर्वत्र दुर्गंधी पसरते. ही सगळी प्रदूषकं किनारी प्रदेशात दूरवर पसरल्यामुळं जवळपासच्या पुळणीही प्रदूषित होतात. मुंबईच्या उत्तरेकडच्या आणि दक्षिणेकडच्या उत्तन, गोराई, आवास, किहीम इथल्या पुळणी प्लॅस्टिक प्रदूषणानं अशाच बाधित झालेल्या दिसल्या. डहाणू, नरपडच्या भागांत प्लॅस्टिक प्रदूषणामुळं अतिजैविकीकरण (युट्रोफिकेशन) होऊन शैवाल आणि जलपर्णींची मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसते.

महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्यावर प्लॅस्टिकचं प्रदूषण वाढण्याचं मुख्य कारण पर्यटन हेच आहे. अनिर्बंध, बेशिस्त पर्यटन आणि पर्यटक आणि स्थानिक यांच्याकडून होणारी अनास्था या गोष्टी याला जबाबदार आहेत. किनारे स्वच्छ ठेवावेत ही इथं येणाऱ्या पर्यटकांची मानसिकताच नसल्याचं चित्र सार्वत्रिक आहे, असं म्हणायला हरकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com